निसर्गसमृद्ध कोल्हापूर

उदय गायकवाड
बुधवार, 28 मार्च 2018

निसर्गाचे वरदान आणि समृद्धी कोल्हापूर जिल्हाला लाभली आहे. ज्याची पश्‍चिम सीमा सह्याद्रीच्या डोंगररांगांवरच्या माथ्या-शिखरांनी आखली. पश्‍चिमेला कोकण आणि पूर्वेला दख्खनचा पठारी प्रदेश. दक्षिणेला गोवा-कर्नाटकची किनार. जैवविविधतेने नटलेले सह्याद्रीच्या कुशीत जवळपास नऊ तालुके. एखादा पूर्वेकडचा तालुका वगळला तर बारमाही हिरवागार प्रदेश. जंगल किंवा शेती अशा पर्यायांमध्ये विसावलेल्या या जिल्ह्यात वारणा, कासारी, कुंभी, तुळशी, धामणी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा, तिलारी, हिरण्यकेशी, ताम्रपर्णी, चित्री अशा बारा नद्यांचे जाळ विणले आहे. नद्यांच्या उगमाचा - डोंगरदऱ्यांचा प्रदेश निम्न सदाहरित जंगलाचा प्रदेश.

निसर्गाचे वरदान आणि समृद्धी कोल्हापूर जिल्हाला लाभली आहे. ज्याची पश्‍चिम सीमा सह्याद्रीच्या डोंगररांगांवरच्या माथ्या-शिखरांनी आखली. पश्‍चिमेला कोकण आणि पूर्वेला दख्खनचा पठारी प्रदेश. दक्षिणेला गोवा-कर्नाटकची किनार. जैवविविधतेने नटलेले सह्याद्रीच्या कुशीत जवळपास नऊ तालुके. एखादा पूर्वेकडचा तालुका वगळला तर बारमाही हिरवागार प्रदेश. जंगल किंवा शेती अशा पर्यायांमध्ये विसावलेल्या या जिल्ह्यात वारणा, कासारी, कुंभी, तुळशी, धामणी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा, तिलारी, हिरण्यकेशी, ताम्रपर्णी, चित्री अशा बारा नद्यांचे जाळ विणले आहे. नद्यांच्या उगमाचा - डोंगरदऱ्यांचा प्रदेश निम्न सदाहरित जंगलाचा प्रदेश. नदीकाठावरच्या तांबड्या मातीत उसाची शेती. डोंगरउतारावर नाचणी, आजरा-चंदगडच्या परिसरात घनसाळ भाताचा घमघमाट, पूर्वेकडच्या भागात नदीकाठावर वांगी आणि भाज्या. हिवाळ्यात धुक्‍यात मिसळलेला गुऱ्हाळाचा वास, गरम गूळ, उसाचा रस आणि तांबडा-पांढरा रश्‍याबरोबर मटण. शास्त्रीय संगीतापासून लावणी-पोवाड्याचा असा कलेचा वारसा असलेला हा जिल्हा. भाषेत रांगडेपणा असलेल्या कोल्हापुरात दिलदार माणसांशी गट्टी. इतिहासाला जपणारे आणि त्याचा अभिमान बाळगणारे कोल्हापूर , कोणत्याही ऋतूत आवडणार यात शंका नाही.

महाराष्ट्र उन्हाने भाजून निघताना, कोल्हापुरात नद्या भरून वाहताना आणि हिरवीगार शेत - जंगले पाहिली की उन्हाळा जाणवत नाही. पन्हाळा, आंबा, आणुस्कुरा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा ही सारी ठिकाणे समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचावर आहेत. त्याच दरम्यान असलेली वारणा, कासारी, कुंभी, राधानगरी, काळमावाडी, पाटगाव, तिलारीसह इतर अनेक धरणांचे जलाशयसुद्धा आल्हाददायी आहेत. उन्हाळ्यात आंबा, काजू, फणस, जांभूळ, करवंद, नेर्ले, आळू, तोरण या रानमेव्याला चाखता येतो. दुपारी थोडेफार ऊन जाणवले तरी संध्याकाळी सुटणारा वारा हवाहवासाच असतो.

गवे, मोर, भेकर, शेकरू, साळिंदर, खवल्या मांजर अशा जंगली श्‍वापदांना पाहण्याची संधीही तशी उन्हाळ्यात असते. नाचणीची आंबिल, दही, ताक, उसाचा रस, पन्हे, कोकम या पेयांसह शाकाहारी-मांसाहारी पदार्थ चाखण्याची संधी असते. भुदरगड, सामानगड, पारगड, गंधर्वगड, कलानिधीगड, रांगणा, महिपालगड, पन्हाळा, पावनगड, विशाळगड, शिवगड हे किल्ले सहजपणे फिरायचे तर उन्हाळा किंवा हिवाळाच योग्य ठरतो. गडावरून दिसणारी निसर्गदृश्‍य तीनही ऋतूमध्ये वेगवेगळी असली तरी ती आकर्षक असतात. इतिहासाचा साक्षीदार असलेले हे गड फिरताना त्यांचा कणखरपणा अनुभवण्याबरोबरच मराठी सैन्याच्या गनिमी काव्याच्या कथा मनात रेंगाळू लागतात. अभेद्य ठरलेल्या या गड-किल्ल्यावरील वास्तू त्यांच्या वास्तुशिल्पाचा नजारा आणि भव्यता दर्शवितात. सातवाहन, यादव काळापासून मराठेशाहीची राजवट अनुभवलेले हे किल्ले वैभवशाली परंपरा सांभाळत उभे राहिलेले पाहताना अंगावर शहारे येतात. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेलेला मार्ग आणि त्या दरम्यान गजापूरच्या खिंडीत बाजी-फुलाजींनी बांदलांसह केलेली लढाई. ही धारातीर्थ युद्धभूमीसुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहे. ज्या काळात ही लढाई झाली, तो पावसाळ्याचा काळ होता. त्यामुळेच हजारो युवक-युवती पावसातही पदभ्रमंती करतात. आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घ्यावा असा आहे. त्याचप्रमाणे सरसेनापती प्रतापराव गुजरांची केवळ सहा साथीदारांसह बहलोलखानाच्या सैन्यासोबत नेसरीची लढाई झाली, ती रणभूमी पाहता येते.

बुद्धकालीन लेणी असलेला पोहाळे, मसाई पठार, पळसंबे, गगनबावडा ही ठिकाणे जरी कोरीव काम, चित्रे यांचा अभाव असला तरी पाहण्यासारखी आहेत. आरे, बीड, बहिरेश्‍वर, इब्राहिमपूर, खिद्रापूर  येथील प्राचीन मंदिरे हा वास्तुशिल्पासह धार्मिक संदर्भाचा ठेवा आहे. इ.स. आठव्या शतकात बांधलेली अंबाबाई, विठ्ठल मंदिर ही हेमाडपंथी शैलीची ओळख करून देतात. खिद्रापूर, अंबाबाई मंदिरातील शिल्पे, नवग्रह मंडपाचे छत, विष्णू मंदिराचे छत, विठ्ठल मंदिराचा दरवाजा अप्रतिम शिल्ले आहेत. आसळजला महाराष्ट्रातील सर्वात उंच विरगळ पहायला मिळते. अशा अनेक विरगळी जुन्या गावातील मंदिरासभोवती दिसतात. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी आणि इतर अनेक गावात असलेले चौसोपी वाडे, राजवाडे हे देखील कोल्हापूरचे वैभव आहे. महाराष्ट्रात राजवाडे असलेले शहर कोल्हापूर आहे. त्यापैकी न्यू पॅलेसमधील संग्रहालय हे महत्त्वाचे आकर्षण. त्याचबरोबर टाऊन हॉल येथे इ. स. पूर्व २०० मधील उत्खननात आढळलेल्या वस्तूंच्या संग्रहासह समकालीन चित्रे-वस्तूंची दालने जगाच्या इतिहासाशी कोल्हापूरचे नाते घट्ट करतात. मांडरेंचे कलादालन, वि. स. खांडेकर संग्रहालय ही वास्तू तितकीच महत्त्वाची ठरतात. 

 पावसाळ्यात धो-धो पाऊस तर कधी रिमझिम सरी, ढगांची पळापळ अनुभवायला आणि धबधब्यात भिजायला हा परिसर भारी आहेच. मेघांना घेऊन वाहणारा वारा ‘मेघोली’, पेरणोली, सुळेरान, मसाई, अणुस्कुरा, पद्मसत्ती अशा ठिकाणी एकदा तरी अनुभवावा. बर्की, राऊतवाडी, पळसंब्यासह नांगरतासचे धबधबे आणि घाटमाथ्यावर उभे राहून दरीत कोसळणारे शेकडो प्रवाह इथे अनुभवता येतात. पुराने दुथडी भरून वाहणारी नदी आणि त्यासोबत गरम गरम मांसाहारी जेवण हे वर्णन लिहिण्या-ऐकण्याचे नाही, ते अनुभवावच लागते. थंडीमधले कोल्हापूर दुपारचा एखादा तास सोडला तर दिवसभर आल्हाददायी असतो. सह्याद्रीसह सर्वच परिसर तसा रोमॅंटिक मूडचा बनतो. पायी चालून जंगल अनुभवायला, गडभ्रमंती करायला, किल्ले पहायला तीनही सिझन परफेक्‍ट ठरतात. अगदी पूर्वेकडे असणाऱ्या बाहुबली, कुंभोज, सादळे-मादळे, रामलिंगचा परिसरसुद्धा या काळात देखणा असतो. मोरांचा केकारव, शेंगा-हुरडा किंवा मक्‍क्‍याचे भाजलेले, उकडलेले कणीस खात ऐकावा. अनेक माळावरचे पक्षी किंवा रात्रीचे निरभ्र आकाश निरीक्षण हे देखील हिवाळ्याचे देणे आहे. भडंग, दुधाची आमटी, बासुंदी अशा खास कोल्हापुरी पदार्थांची चव घ्यावी. जरा ठसका आणि झणझणीत, खुसखुशीत बाकरवडी, संगीत चिवडा, भेळ हे पदार्थ तोंडाला पाणी सुटणारे. याच थंडीत पंचगंगेचा घाट कार्तिक पौर्णिमेला लाखो दिव्यांनी पहाटे उजळून निघतो. तो स्वर्गीय अनुभवसुद्धा खास आहे.

 गुऱ्हाळघरात जाऊन ऊस खावा, रस प्यावा, चिरमुऱ्याचे लाडू खाऊन गरम-गरम गूळ, चिक्की गुळ खात गप्पा माराव्यात आणि तांबड्या-पांढऱ्या रश्‍श्‍यासह भाकरी मटण चाखावे हे ‘लई भारी’. नवरात्र उत्सवापासून साधारणत: जोतिबाच्या यात्रेपर्यंत हा काळ अतिशय सुखद आणि सर्वांना योग्य वाटणारा आहे.

 जिल्ह्यात राधानगरीचे अभयारण्य, चांदोली जंगलाचा दक्षिणेकडील भाग, पाटगाव, आजरा, चंदगड, तिलारीचा जंगल प्रदेश हा थ्रिल देणारा आहे. काही ट्रेल-ट्रेक आणि तांबुतील राहणेसुद्धा अनुभवण्यासारखे आहे. चाळीस देवराया आजही आहेत. त्यांचे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता अनुभवण्यात वेगळा आनंद मिळतो. पावसाळ्यात मसाई, भुदरगड, बोरबेट अशी पठारे रानफुलांनी सजतात तेव्हा त्याचा रंगीत नजारा अनोखा असतो.

थंडीच्या सुरुवातीला नदीकाठावरची बच्चाची झाडे फुलतात. पाठोपाठ काटेसावर,पळस, पांगरा, निलमोहर, पांढरा चाफा, बहावा फुलतो. हा निसर्गाचा आविष्कार बारकाईने टिपण्यात आनंद आहे. शेकडो फुलपाखरे आणि होणारी पानगळ, पुन्हा नवी पालवी हे ऋतुचक्र एकदा येऊन कधी अनुभवता येत नाही. डोंगर, दऱ्या, पठार, कडे, सुळके, चढण, वाकणे, घाट, शिवार, घनदाट जंगल, हिरवीगार गवती कुरणे, नदीकाठची शेती, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, विस्तीर्ण जलाशय, आल्हाददायी वारा, निरभ्र आकाश, बहरलेली झाडे, हाताने घेऊन खाता येणारा रानमेवा, खास झणझणीत कोल्हापुरी पदार्थ, गडकिल्ले, मंदिर, संग्रहालय, मर्दानी खेळ, पारंपरिक कला, गूळ-साखर दूध-रस चप्पल, कोल्हापुरी फेट्याचा थाट, कुस्ती-फुटबॉलचा थरात; भाषेचा रांगडेपणा, कलेच कलापूर आणि आपुलकी जपणारी माणसं हे कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे. रात्री-बेरात्री कधीही पाहुणचाराला, अगत्याला, मदतीला आणि भरभरून खायला घालणारी माणसे इथे भेटतील. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या