परसबाग फुलवताना!

अल्पना विजयकुमार
शुक्रवार, 16 मार्च 2018

कव्हर स्टोरी    
 

घराभोवतीच्या मोकळ्या जागेत, गच्चीवर किंवा छोट्याशा गॅलरीत आवडीची झाडे लावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. विटांचे वाफे, मोठी झाडे, फुलझाडे, भाजीपाल्याचे वाफे, लॉन इ. वापरून सुशोभित केलेली रचना (ग्रीन लॅण्डस्केप) तसेच सीमित जागेत कुंड्या, व्हर्टिकल प्लॅन्टर .वापरून केलेली बाग किंवा खिडकीमध्ये ठेवलेल्या चार कुंड्या या सर्वांमधून लोकांचे बागकामाविषयीचे प्रेम दिसून येते. तसेच रासायनिक खते, कीटकनाशके यांचे दुष्परिणाम माहीत झाल्याने घरच्या घरी सेंद्रिय/ नैसर्गिक पद्धतीने स्वतःपुरता भाजीपाला वाढविण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसतो.

कोणत्याही बागेची आखणी करताना तिथे सूर्यप्रकाश किती वेळ येतो? गॅलरी कोणत्या दिशेला आहे? याचा प्रथम अभ्यास करावा. जिथे प्रत्यक्ष सूर्यप्रकाश येत नाही अशा ठिकाणी फळे व फळभाज्या लावल्यातरी उत्पन्न मिळणार नाही. परंतु पालेभाज्या किंवा इतर शोभेची झाडे चांगली वाढतील. आपण कोणत्या प्रकारची झाडे निवडणार? फळभाज्या पालेभाज्या, मोठी फळझाडे किंवा शोभिवंत झाडे या निवडीनुसार व जागेच्या उपलब्धतेनुसार बागेतील वाफे, कुंड्या, त्यांचे आकार व रचना ठरवावी लागेल. जागा कमी असेल तर अलीकडे विकत मिळणारे व्हर्टिकल प्लांटर्स किंवा रिकाम्या पेट बॉटल्स्‌ कापून घरच्या घरी उभ्या रचना करता येतील. वर्षभर येणारा भाजीपाला कोणता? तसेच ब्रोकोली, केल इ. सारख्या परदेशी भाज्या थंडीतच येतात अशा भाज्या कोणत्या, याचा अभ्यास करणे जरुरीचे आहे.

गार्डनसाठी पाण्याची उपलब्धता किती आहे? विशेषतः उन्हाळ्यात झाडांना दोन वेळा पाणी घालावे लागेल तर तेवढे पाणी उपलब्ध आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. पाण्याची बचत व सोय या दोन्ही दृष्टींनी ठिबक सिंचन (ड्रीप) करणे फायद्याचे ठरले. काही झाडांना कमी पाणी लागते तर काहींना जास्त अशा वेळी ड्रीपरचा साईझ वेगवेगळा ठेवावा लागेल. पावसाळ्यात टेरेसवर पडणारे पाणी पाइपने पुर्नभरणाच्या टाकीमध्ये जमा करून पुढे तेच पाणी वर्षभर वापरता येईल. यासाठी फिल्टर सिस्टिम करणे जरुरीचे आहे.

टेरेस गार्डन करताना स्लॅबचे वॉटर प्रुफींग चांगले आहे का, स्लॅबला तडे गेले आहेत का? बांधकाम किती वर्षांपूर्वीचे आहे हे विचारात घ्यावे लागते. विशेषतः जुन्या टेरेसवर काम करताना या सर्वांचे वजन स्लॅबला झेपेल का? या विषयी स्ट्रक्‍चरल इंजिनिअरचा सल्ला जरूर घ्यावा. गच्चीमध्ये पाण्याची आऊटलेट किती आहेत, गच्चीचा उतार कोणत्या बाजूला आहे, याचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. वड, पिंपळ, आंबा, नारळ यासारख्या मोठ्या झाडांची मुळे टणक असतात. अशी झाडे गच्चीत खाली लावू नयेत. मोठ्या पिंपामध्ये योग्य ती काळजी घेऊन लावावीत.

झाडे वाढविण्याचे माध्यम म्हणजे माती किंवा सेंद्रिय खत (कंपोस्ट) ही गार्डनमधील महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक प्रकारची सेंद्रिय खते सध्या उपलब्ध आहेत. काही प्रमाणात माती, कोकोपीथ व सेंद्रिय खते वापरणे फायदेशीर ठरते. आपल्या घरातील उरलेले अन्न, भाज्यांचे देठ, फळांची साले तसेच बागेतील पालापाचोळा यापासून उत्तम सेंद्रिय खत बनते. यामुळे घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट व झाडांसाठी पोषक खत हे दोन्ही फायदे साधता येतील. झाडे वाढवताना ही पोषकद्रव्ये वापरली जातात त्यामुळे त्यांची कमतरता होते. त्यामुळे दोन-तीन महिन्यांनी सेंद्रिय खत घालणे जरुरीचे आहे. जमिनीवरची बाग करताना माती कशी आहे? तिचा पोत अभ्यासणे, याबरोबरच मातीमध्ये वाळवी, मुंग्या, गोगलगायी यांचा प्रादुर्भाव आहे का हे तपासणे फार महत्त्वाचे आहे. तसे असल्यास आधी त्यांचे नियंत्रण करणे जरुरीचे आहे. विशेषतः पावसाळ्यात नवीन झाडांबरोबर एखादी जरी गोगलगाय बागेत शिरली तर ती मोठी डोकेदुखी होते. कारण गोगलगायींच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांशिवाय खात्रीचा उपाय नाही. तंबाखूचे पाणी शिंपडणे, रिठ्याचे पाणी टाकणे हे खात्रीचे उपाय ठरत नाहीत, असा माझा अनुभव आहे. अशावेळी गोगलगायी हाताने उचलून साबणाच्या पाण्यात टाकणे हाच उपाय ठरतो.

बागेमधील कीडनियंत्रण सेंद्रिय किंवा नैसर्गिक किडनाशके वापरून करता येते. यावर अनेक लोकांचा विश्‍वास नाही. अलीकडे अशा प्रकारची किडनाशके बाजारात उपलब्ध आहेत. पंचगव्य किंवा जीवामृत, गोमूत्र यांचा वापर विशेषतः भाज्या व फळझाडे यासाठी ठराविक वेळी केल्यास किडीचे व इतर प्रकारच्या रोगांचे नियंत्रण होण्यास मदत होते. स्वयंपाकघरातील अनेक वस्तू किडनाशकांचे काम करतात. उदा. ताकाचे पाणी बुरशीनाशक म्हणून हळदपाणी लसूण+ मिरची यांचे सौम्य द्रावण, रिठ्याचे पाणी यांचा उपयोग मावा व व्हाइट फ्लाय या दोन सातत्याने पडणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी होतो. 

आपण स्वतः लावलेली झाडे वाढताना, फुलताना पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. माझ्या ओळखीचे कितीतरी जण त्यांच्या बागेत पहिल्यांदा आलेली फुले, कोबी फ्लॉवर, फळे यांचे फोटो पाठवितात. बागकाम करताना स्ट्रेस कमी होतो. हे आपल्यापैकी अनेकांना जाणवते. एक महिलांचा ग्रुप चक्क लॉनवर झोपलेला आठवतो. आणि तासभर लॉनवर बसले तर चालेल का असे म्हणणारे आजोबा आठवतात.

सरतेशेवटी अशा घरगुती बागांच्या उत्तम वाढीसाठी सेंद्रिय किडनाशकांची वारंवार फवारणी, सिझनप्रमाणे भाज्यांची निवड व माध्यमाची सेंद्रिय सुपीकता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत!

फोटो फीचर

संबंधित बातम्या