जपतोय गावरान आंब्यांचा मेवा

अमित गद्रे 
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

आंबा विशेष

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने सन २०११  ते २०१५  या काळात सह्याद्री पट्यातील शाळांमध्ये ‘पश्‍चिम घाट स्पेशल इको क्‍लब योजना’ राबविण्यात आली. या उपक्रमातून सह्याद्री पट्ट्यातील गावरान आंब्यांच्या २०५ जातींची नोंद झाली. जनुकीय ठेवा जपण्याच्या दृष्टीने, नवीन जातींचा विकास आणि हवामान बदलाच्या काळात या गावरान जाती महत्त्वाच्या ठरणार आहेत.

सह्याद्री पट्ट्यातील जैवविविधता संवर्धन हा जागतिकदृष्टीने महत्त्वाचा विषय. या दिशेने पर्यावरण शिक्षण केंद्र, वन विभाग, शाळा आणि स्थानिक समुदायांच्या कडून विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाच्या माध्यमातून सह्याद्रीच्या डोंगराळ भागात काम करताना आंब्याच्या स्थानिक गावरान जातींचे संवर्धन आणि जनुकीय विविधतेचा अभ्यास हा विषय पुढे आला. त्या दृष्टीने पर्यावरण शिक्षण केंद्राने शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परिसरातील गावरान आंबा जातींची त्यांच्या वैशिष्ट्यांसह माहिती गोळा करण्यास सुरवात केली. राज्यातील सह्याद्री पट्यात असणाऱ्या तेरा जिल्ह्यांतील ६३ तालुक्‍यांमधील २३९ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. 

या उपक्रमाबाबत माहिती देताना पर्यावरण शिक्षण केंद्राचे कार्यक्रम समन्वयक सतीश आवटे म्हणाले, की सह्याद्रीच्या डोंगराळ भागातील जैवविविधता संवर्धनाबाबत गावकऱ्यांशी चर्चा करताना असे लक्षात आले, की सह्याद्रीमधील (उत्तर पश्‍चिम घाट) अनेक बहुपयोगी वनस्पती, फळझाडे आणि त्यांच्या जाती दुर्मिळ होत आहेत. काही नष्ट होण्याच्या काठावर आहेत. हे लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात आंब्याच्या गावरान जाती आणि त्यांच्यातील जनुकीय विविधतेच्या अभ्यासाने सुरवात झाली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परिसरातील गावरान आंबा जातींची त्यांच्या वैशिष्ट्यांसह माहिती गोळा होऊ लागली. गावातील वयस्क आणि शालेय विद्यार्थ्यांना गावशिवारातील आंबा जातींची चांगल्यापैकी माहिती असते. त्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. आंबा जातींच्या नोंदीसाठी विशिष्ट फॉर्म तयार केला. यामध्ये आंबा जातीचे स्थानिक नाव, गावाचे नाव, झाडाचे ठिकाण (जीपीएस नोंद), मालकाचे नाव, जातीची वैशिष्ट्ये, झाडाचा आकार, फळ आणि पानांचा आकार, सालीची जाडी, फळातील केसराचे प्रमाण, फळ कच्चे आणि पक्के झाल्यानंतरचा रंग, वजन, चव, सुगंध अशी विविध निरीक्षणे नोंदविण्यात आली. काही गावांच्यामध्ये एखादे दुसऱ्या तर काही गावांच्यामध्ये वीसहून अधिक आंब्याच्या गावरान जाती मिळाल्या. सन २०१२-१३ या दोन हंगामात सह्याद्री पट्ट्यातील सुमारे पन्नास गावांतील शाळा आणि गावकऱ्यांच्या सोबत आंब्याच्या २०५ गावरान जातींची नोंद आणि अभ्यास झाला. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्गातील शाळांनी उपक्रमशील सहभाग नोंदविला.  पर्यावरण शिक्षण केंद्रातील तज्ज्ञांनी आंबा जातींचे फोटो आणि माहितीचे संकलन केले. सध्या शासनाच्या पर्यावरण सेवा योजना आणि इतर उपक्रमातून आंब्यांच्या जनुकीय विविधता संवर्धनाचे हे काम विविध जिल्ह्यातून पुढे नेले जात आहे.

गावरान जातींच्या संवर्धनाची गरज
गावकऱ्यांच्या निरीक्षणानुसार गेल्या तीस वर्षांत पन्नास टक्के गावरान आंबा जाती आणि झाडांची संख्या कमी झाली. पूर्वोत्तर भारत हे आंब्याचे मूळ ठिकाण. याचबरोबरीने आंबा जातीतील जनुकीय विविधता पश्‍चिम घाटात दिसून आली. त्यामुळे या पट्ट्यातही आंब्याचे मूळ आहे का? हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्याकडे पूर्वापार या जातींची शास्त्रीय नोंद नाही, त्यावर अभ्यासही झालेला नाही. पर्यावरण शिक्षण केंद्राने कृषी विभाग, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडे  या २०५ जातींची नोंद सादर केली आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत हापूस, पायरी, केसर याच जातींची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे बिटकी, साखदोडी, साखऱ्या, खोबरी, रायवळ अशा विविध चवीच्या आंबा जाती दुर्लक्षामुळे सह्याद्री पट्ट्यातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आंबा जाती नष्ट झाल्याने त्यांची चव, गुण वैशिष्ट्ये असलेला जनुकीय ठेवा कायमचा नष्ट होतो. तो जपणे गरजेचे आहे. रायवळ आंब्याची मोठी झाडे ऑर्किड, फुलपाखरे, बांडगुळांचे ’होस्ट प्लान्ट’ आहेत. गावरान आंबा हा अनेक पक्षी, माकडांचा खाण्याचा स्रोत आहे. येत्या काळात हापूस, पायरी, केसर या आंबा जातींच्या बागेत किमान दहा टक्के प्रमाणात गावरान जातींची लागवड वाढवण्याची गरज आहे, त्याचा परागीकरणासाठी फायदा होईल,त्यातून फळ गुणवत्ता टिकून राहील. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक बागेत स्थानिक दुर्लक्षित जातींचेही संवर्धन होईल. 

संस्थेने गावरान आंब्याच्या जातींच्या फळांचे पोस्टर आणि पोस्ट कार्ड आकाराची भेट पत्रे तयार केली. पुण्यातील आयसर या विज्ञान संशोधन- शिक्षण संस्थेच्या सहकार्याने सह्याद्रीतील साठ आंब्याच्या गावरान जातींचा वेगळेपणा ओळखण्यासाठी त्यांच्या जनुकांचे विश्‍लेषण करण्यात येत आहे. त्या माध्यमातून या गावरान जातींचे जनुकीय पातळीवरील साम्य तसेच वेगळेपण अत्याधुनिक पद्धतीने सर्वांच्यासमोर आणणे शक्‍य होणार आहे.  लोकांनी वर्गीकरण केलेल्या या जातींचा जनुकीय स्तरावर अभ्यास करण्यात येत आहे. यातून या जातींचे गुणधर्म जनुकीय पातळीवर कायम राहतात का ? ते समजेल. हे संशोधन अंतिम टप्यात आहे. या संशोधनाचा भविष्यात नवीन आंब्याची जात विकसित करण्यासाठी तसेच मूळ जातीची लागवड वाढविण्यासाठी होणार आहे. आंब्याच्या बरोबरीने पर्यावरण शिक्षण केंद्राने शाळांच्या सहकार्याने सह्याद्रीपट्यातील जांभूळ, फणस, करवंदाच्या स्थानिक जातींची नोंद घेतली. 

जपानमध्ये सादरीकरण
जपानमध्ये २०१३ मध्ये झालेल्या ’युनेस्को’च्या आशिया पॅसिफिक सांस्कृतिक केंद्राने आयोजित केलेल्या तज्ज्ञ परिसंवादामध्ये या उपक्रमाचे सादरीकरण पर्यावरण शिक्षण केंद्राचे कार्यक्रम समन्वयक सतीश आवटे आणि मुठा (जि. पुणे) या गावातील शिक्षक धोंडिबा कुंभार यांनी केले होते.

विद्यार्थ्यांची रोपवाटिका 
 गावरान आंबा जातीच्या संवर्धनासाठी शास्त्रीय नोंदणीच्याबरोबरीने रोपनिर्मिती आणि लागवडीवरही भर देण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना सतीश आवटे म्हणाले, की आंब्याच्या गावरान जातींचा अभ्यास झाल्यानंतर  विविध ठिकाणी संवर्धन होण्याच्या दृष्टीने पर्यावरण शिक्षण केंद्राने यातील निवडक जातींची रोपे, कलमे तयार करण्यासाठी पुणे व सोलापूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना आंबा कलमीकरणाचे प्रशिक्षण दिले आहे.

रंग, आकार आणि परंपरेने मिळाली आंब्याला नावे 

  • सालीच्या रंगानुसार पिवळ्या, सफेदा, काळा, पांढरा आणि आकारानुसार राघू, कोयती,केळी, वाकडा, गोटी, भोपळी, नारळी, मोग्या अशी नावे.
  • आंबा तोडताना त्यातून येणारा चिक ही फळातील नैसर्गिक संरक्षण प्रणाली. त्यामुळे जसजसे आपण जंगली प्रदेशाच्या आत जाऊ तसतसे आंब्यातील चिकाचे प्रमाण वाढते. त्यावरून जास्त चिकाचा चिक्काळ्या, फुंगशी, चिकाला अशी नावे.
  • गराला शेपूसारखा वास असेल तर शेप्या आंबा.
  • झाडाच्या स्थळानुसार आंब्याला दिलेले नाव ः पन्हाळा गावातील तहसीलदारांच्या सरकारी घराच्या आवारातील आंब्याच्या झाडाला ’तहसीलदाराचा आंबा‘ हे नाव.
  • भुदरगड तालुक्‍यातील सावंतवाडी गावात दर वर्षी भरपूर आंबा फळे देणारे झाड आहे. गावातील प्रत्येक घरातील लोक टोपली भरभरून या झाडाचे आंबे घेऊन जातात. सगळ्यांना पुरूनही झाडाला आंबा फळे शिल्लक राहतात म्हणून या जातीचे नाव ’वताचा आंबा‘.
  • कोल्हापूर जिल्ह्यातील परळेनिनाई या गावातील निनाईदेवीच्या जत्रेसाठी घरातून नैवेद्य ’पोस्त’ पाठविला जातो. गावात ज्या आंबा झाडाखाली नैवेद्य वाटून खाल्ला जातो, त्या झाडाला गावकऱ्यांनी ’पोस्ताचा आंबा‘ असे नाव दिले आहे.

संशोधनासाठी महत्त्वाचा ठेवा
दापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर म्हणाले, की आम्ही आंबा पिकातील संशोधनासाठी राज्यभरातील विविध गावरान जातींचे संकलन करीत आहोत. वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रावर  ३१६ आंबा जातींचे संवर्धन झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वाद, आकार, वैशिष्टपुर्ण चव असणाऱ्या जाती आहेत. काही जाती कीड,रोग प्रतिकारक आहेत. काही जातींच्या रसाला वेगळा स्वाद,रंग आहे. काही गावरान जाती रायता, लोणचे आणि रसासाठीच प्रसिद्ध आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर बिटकी आंबा हा आजही रसासाठी प्रसिद्ध आहे. राज्यभरातील गावरान आंब्याचा ठेवा जैवविविधतेच्यादृष्टीने मोलाचा आहे. हवामान बदलाच्या काळात तग धरणाऱ्या आणि चांगले फळ उत्पादन देणाऱ्या गावरान जातींचा अभ्यास संशोधनासाठी उपयुक्त आहे. यातून एखादी जात पारंपरिक जातींच्या बरोबरीने संकरीकरणासाठी येत्या काळात उपयोगात आणली जाईल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या