यम्मी डेझर्ट्स!

अनुषा मुदगल
सोमवार, 21 डिसेंबर 2020

ख्रिसमस पार्टीमध्ये केकबरोबर कुकीज आणि इतर डेझर्ट्सही पाहिजेतच, त्याशिवाय पार्टीची रंगत कशी वाढणार! म्हणूनच केकच्या रेसिपीज बरोबरच कुकीज आणि इतर डेझर्ट्सच्या रेसिपीजही खास तुमच्यासाठी...

चॉकलेट चिप कुकीज 
साहित्य : दोन कप (२४० ग्रॅम) मैदा, २ टीस्पून बेकिंग पावडर, १ कप (१२० ग्रॅम) ब्राऊन शुगर, १ कप (१२० ग्रॅम) बटर, ५ टेबलस्पून दूध, ५० ग्रॅम चॉकलेट चिप्स, २ टेबलस्पून कोको पावडर.
कृती - मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून दोन वेळा चाळून घ्यावे. ओव्हन १८० डिग्री सेंटिग्रेड किंवा ३५६ डिग्री फॅरेनहाइटला प्रीहीट करावा. एका भांड्यात बटर आणि ब्राऊन शुगर घ्यावी आणि साखर वितळेपर्यंत चांगले फेटून घ्यावे. नंतर बटरच्या मिश्रणामध्ये दूध, कोको पावडर चांगले मिसळून घ्यावे. चॉकलेट चिप्सवर थोडा मैदा भुरभुरून वरील मिश्रणात चॉकलेट चिप्स मिक्स करावे. आता या सर्व मिश्रणाचे छोटे गोळे करावेत आणि दोन्ही हातांनी दाबावेत. सर्व कुकीज तयार करून घ्याव्यात व ग्रीज केलेल्या ट्रेमध्ये ठेवाव्यात. प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८० डिग्रीला दहा ते पंधरा मिनिटे बेक कराव्यात. कुकीज गार झाल्यावर सर्व्ह कराव्यात किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

श्रुबेरी बिस्कीट
साहित्य - दीडशे ग्रॅम मैदा, १२० ग्रॅम बटर, ७५ ग्रॅम पिठीसाखर, पाव टीस्पून बेकिंग पावडर, १ टेबलस्पून दूध.
कृती - मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून दोनदा चाळून घ्यावे. बटर आणि साखर चांगले फेटून घ्यावे. साखर बटरमध्ये पूर्ण विरघळली पाहिजे. दूध घालून पुन्हा एकदा मिक्स करावे. आता हळूहळू मैदा घालून मऊ गोळा मळावा. गोळा ओल्या कपड्याने झाकून दोन तास फ्रीजमध्ये ठेवावा. आता वरील गोळ्याचे १४ एकसारखे बॉल्स करावेत. हाताने किंवा कुकी कटरने गोल शेप द्यावा. प्रीहिटेड ओव्हनमध्ये १५० डिग्रीला १० ते १५ मिनिटे बेक करावे. गार झाल्यावर सर्व्ह करावे किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

बेसिक व्हॅनिला स्पाँज केक
साहित्य - शंभर ग्रॅम मैदा, १०० ग्रॅम पिठीसाखर, १०० ग्रॅम बटर, २ अंडी, पाव टीस्पून बेकिंग पावडर, एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स, ५० मिली दूध.
कृती - मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावी. बटर आणि साखर चांगले फेटून घ्यावे. अंड्याचे पांढरे आणि पिवळे वेगळे करून पांढरे दुप्पट होईपर्यंत फेटून घ्यावे. साखर आणि बटरच्या मिश्रणात अंड्याचे पिवळे, फेटलेले पांढरे, व्हॅनिला इसेन्स घालावा. हळूहळू चाळलेला मैदा घालून हाताने मिक्स करावे. गरज पडल्यास दूध घालावे. तुमच्या आवडीच्या केक टिनमध्ये खाली बटर पेपर घालून मिश्रण ओतावे. प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८० डिग्रीला ३० मिनिटे केक बेक करावा.

चॉकलेट कन्फ्युजन
साहित्य - दोनशे ग्रॅम चॉकलेट स्पाँज केक, ५०० मिली थिक व्हॅनिला कस्टर्ड, २०० मिली अमूल फ्रेश क्रीम, २ टेबलस्पून डार्क कोको पावडर, डेकोरेशनसाठी चॉकलेट सिगार्स, चॉकलेट कर्ल्स.
कृती - चॉकलेट केक क्रश करून घ्यावा. फ्रेश क्रीममध्ये कोको पावडर मिक्स करून हाय स्पीडवर बीट करून घ्यावे. आता एका मध्यम उंचीच्या ग्लासमध्ये लेअर्स लावायचे आहेत. सगळ्यात आधी क्रश केलेला चॉकलेट केक, त्यावर व्हॅनिला कस्टर्ड, पुन्हा एकदा चॉकलेट केक आणि त्यावर फ्रेश क्रीमचा थर रचावा. चॉकलेट सिगार्स आणि चॉकलेट कर्ल्सने डेकोरेट करून फ्रीजमध्ये एक तास सेट करावे. चॉकलेट कन्फ्युजन चिल्ड सर्व्ह करावे!

कॅरट केक
साहित्य - शंभर ग्रॅम मैदा, १०० ग्रॅम पिठीसाखर, १०० ग्रॅम बटर, २ अंडी, पाव टीस्पून बेकिंग पावडर, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, ५० मिली दूध, १०० ग्रॅम किसलेले केशरी गाजर.
कृती - मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावे. बटर आणि साखर चांगले फेटून घ्यावे. अंड्याचे पांढरे आणि पिवळे वेगळे करून पांढरे डबल होईपर्यंत फेटून घ्यावे. साखर आणि बटरच्या मिश्रणात  अंड्याचे पिवळे, फेटलेले पांढरे, व्हॅनिला इसेन्स घालावा. हळूहळू चाळलेला मैदा घालून हाताने मिक्स करावे. नंतर किसलेले गाजर मिक्स करावे. गरज पडल्यास दूध घालावे. तुमच्या आवडीच्या केक टिनमध्ये खाली बटर पेपर घालून मिश्रण ओतावे. प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८० डिग्रीला ३० मिनिटे केक बेक करावा.

चॉकलेट मूस
साहित्य - पाचशे मिली व्हिपिंग क्रीम, २५० ग्रॅम डार्क चॉकलेट स्लॅब, १०० मिली दूध.
कृती - डार्क चॉकलेट सुरीने बारीक चिरून घ्यावे. त्यावर गरम दूध ओतावे. चमच्याने नीट मिक्स करून डार्क चॉकलेट सॉस तयार करून घ्यावा. आता एका भांड्यात चिल्ड व्हिपिंग क्रीम घ्यावे. हँड ब्लेंडरने दहा ते पंधरा मिनिटे हाय स्पीडवर बीट करावे. तयार केलेला चॉकलेट सॉस हळूहळू मिक्स करावा. छोट्या छोट्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या बोलमध्ये वरील मिश्रण सेट करण्यासाठी ओतावे. एक ते दोन तास रेफ्रिजरेट करून चिल्ड सर्व्ह करावे.

बिस्कीट केक
साहित्य - पार्ले-जी बिस्किटे (१० रुपयांचा पुडा), २ चमचे कोको पावडर, दीड कप दूध, अर्धी वाटी साखर, इनो (साधा) (छोटे पाकिट). 
कृती - प्रथम मिक्सरच्या साहाय्याने बिस्किटांचा बारीक चुरा करून घ्यावा. त्या चुऱ्यामध्ये साखर आणि कोको पावडर घालावी. नंतर दूध घालून भज्याच्या पिठाप्रमाणे सरबरीत भिजवावे. ॲल्युमिनियमच्या डब्याला सर्व बाजूंनी तूप लावावे. गॅसवर लोखंडी तवा तापत ठेवावा. वरील मिश्रण इनो घालून फेटून घ्यावे. मिश्रण फेटल्यानंतर ते डब्यामध्ये ओतावे. झाकण लावून डबा तव्यावर ठेवावा. साधारण ३० मिनिटांनी झाकण उघडून केक तपासून पाहावा. बिना अंड्याचा हा केक खूप छान लागतो.

मावा केक
साहित्य - दोन कप मैदा, १ कप मावा, ४ टेबल स्पून मलई किंवा साय, १ कप दूध, १ टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, १०० ग्रॅम बटर, १ कप पिठीसाखर, १ टीस्पून वेलची पूड, सजावटीसाठी पिस्त्याचे काप.
कृती - मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र चाळून घ्यावे. मलई, पिठीसाखर, बटर चांगले फेटून घ्यावे. त्यात मावा घालून पुन्हा एकदा मिक्स करावे. आता हळूहळू मैदा घालून हलक्या हाताने मिक्स करावे. दूध घालून कन्सिस्टन्सी ॲड्जस्ट करावी. वेलची पूड घालावी. ग्रीज केलेल्या बेकिंग पॅनमध्ये वरील मिश्रण ओतावे. पिस्त्याचे काप घालावेत. प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८० डिग्रीला ३० ते ४० मिनिटे मावा केक बेक करावा.

संबंधित बातम्या