जुन्या साजाला नवतेचे कोंदण...! 

आशिष तागडे 
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

आपल्याला एखाद्या पुस्तकाचा संदर्भ मिळालेला असतो आणि नेमके तेच पुस्तक ‘आउट ऑफ प्रिंट’ असते. एखाद्या पुस्तकाची वाचकांना ओढ असते, परंतु ते प्रकाशित करण्याबाबत प्रकाशकांचा ओढा नसतो. नेमका हाच पूल सांधण्याचा प्रयत्न काही तरुण मंडळी करत आहेत. पुस्तकाच्या मूळ ढाच्याला (आशयाला) कोणताच धक्का न लावता त्याला नवतेचे कोंदण देत ते वाचकांपर्यंत पोचते. ‘किताबकल्हई’ असे या प्रयोगाचे नाव आहे. या प्रयोगातून १२५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले ‘सूपशास्त्र’ पुस्तक नव्या स्वरूपात वाचकांसमोर आणले आहे. 

पूर्वी ठराविक कालावधीनंतर घरातील पितळ्याच्या भांड्यांना कल्हई करावी लागायची. का तर ते भांडे चांगले दिसावे आणि स्वच्छ राहावे. हाच प्रकार साहित्य क्षेत्रातही केला जात आहे. पुण्यातील काही पुस्तक वेडे मित्र एकदा एकत्र आले. त्यातले कोणी वकील होते, कोणी चार्टड अकाउंटंट, तर कोणी भाषांतरकार, तर कोणी रसायनशास्त्रातील संशोधक. क्षेत्र वेगवेगळे असले तरी प्रत्येकाला एकत्रित बांधणारा दुवा म्हणजे मराठी पुस्तकांवरील प्रेम! 

पुण्यातील नेमक्‍या ठिकाणी, पदपथांवर रद्दी घेऊन विकायला बसणाऱ्या पुस्तकांच्या गर्दीत वेगळेपणा शोधणारी ही मंडळी. भूषण पानसे, आदित्य पानसे, चिन्मय दामले, मेघना भुस्कुटे, अमोल करंदीकर, आदूबाळ, प्रियांका पोफळीकर आणि सुनीता वडके ही पुस्तक वेडी मंडळी. ते सर्वजण कायम भेटत होते, जुन्या दुर्मीळ पुस्तकांबाबत बोलत होते. ‘हे बोलत असताना जुन्या व दुर्मीळ आणि आत्ताच्या काळाशी सुसंगत अशा पुस्तकाचे आपण नव्या ढंगात काही करू शकतो का? ही संकल्पना पुढे आली,’ आदित्य पानसे सांगत होते. ‘अर्थात नव्याने करायचे म्हणजे केवळ रीप्रिंट करायचे नाही, यावर आम्ही ठाम होतो,’ आदित्य यांनी ‘किताबकल्हई’मागची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले. ते म्हणतात, जुने पुस्तक नव्याने प्रिंट करण्याचा आमचा कोणताही व्यावसायिक उद्देश नाही. ज्या पुस्तकांची आजच्या वाचकांना आत्यंतिक आवश्‍यकता आहे आणि जी पुस्तके प्रिंट करून त्याचा व्यावसायिक लाभ होणार नाही, अशा मानसिकतेतून प्रकाशन प्रिंट न करणाऱ्या पुस्तकांचा आम्ही शोध घेतो. चर्चेअंती आमच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, अगदी शंभर, पन्नास वर्षांपूर्वीचीच नाही तर १९७० च्या आसपास प्रकाशित झालेली अनेक पुस्तके ‘आउट ऑफ प्रिंट’ आहेत. ही पुस्तके का उपलब्ध होत नाहीत, यावर आमचे विचारमंथन सुरू झाले. त्यामागे एक दुष्टचक्र असल्याचे आमच्या लक्षात आले. एका बाजूला वाचक पुस्तक उपलब्ध होत नसल्याची कारणे देतात, तर दुसऱ्या बाजूला मागणी नाही म्हणून ती पुस्तके प्रकाशित करत नसल्याचे प्रकाशकांचे म्हणणे आहे. ही मोठी दरी आहे. ती सांधता येईल का? यावर विचार झाला. काही प्रकाशकांना आम्ही भेटलो, परंतु पुस्तक प्रकाशित करण्यासाठी ती नाखूष होती, आदित्य यांनी समयोचित अडचण स्पष्ट केली. 

‘आमच्या, म्हणजे काम करणाऱ्या व्यवस्थापकांच्या बाजूने हा उपक्रम ‘ना-नफा’ तत्त्वावर चालवत आहोत. दर्जात, विपणनात, निर्मितिमूल्यांत तडजोड न करता पुनरुज्जीवित पुस्तक कमीत कमी किमतीत उपलब्ध व्हावे अशी इच्छा आहे. जुनी पुस्तके नव्या स्वरूपात प्रकाशित होत आहेत, मात्र आमचा तसा प्रयत्न नाही,’ आदित्य यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. पुस्तकाची वाट पाहत असलेले वाचक आणि न होणारे प्रकाशन यातील दुवा साधण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी कालसुसंगत आवृत्तीच प्रकाशित करायची असा आमचा विचार कायम होता, असे सांगत आदित्य म्हणाले, ‘त्यासाठी आम्ही एक प्रकारचे धोरण किंवा आपण त्याला भूमिका म्हणू, ते स्पष्ट केले. मुळात दुर्मीळ पुस्तकाचेच पुनरुज्जीवन करायचे. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ते पुस्तक रीप्रिंट करायचे नाही. त्या पुस्तकातील वेगळेपणा शोधण्याचा आमच्या टिमचा प्रयत्न राहणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्या कामातील समाधान शोधणे. आम्ही काही वेगळे इनोव्हेशन करत नाही. हाती आलेल्या पुस्तकाला कालसुसंगत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणत्याही पुस्तकात सृजनात्मक भर घालणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. अर्थात त्यासाठी संबंधित पुस्तकातही तेवढा सकसपणा असणे आवश्‍यक आहे. त्यामुळेच ‘किताबकल्हई’ या उपक्रमासाठी पहिले पुस्तक निवडले ते रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी १४४ वर्षांपूर्वी  

लिहिलेले आणि रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी जगद्‍हितेच्छु छापखान्यात छापलेले १८७५ मधील ‘सूपशास्त्र’ हे मराठीतले आद्य पाकपुस्तक. या पुस्तकाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारी प्रस्तावना आम्ही दिली आहे. तरी, हे पुस्तक इतर कुक बुक्‍सपेक्षा वेगळे आहे. यातल्या पाककृती करून पाहता याव्यात यासाठी मोजमापे, कोष्टके, तळटिपा दिल्या आहेत, परंतु तरी हे पुस्तक वाचकांनी ललित वाङ्‍मयासारखे वाचावे, त्यातून तत्कालीन सामाजिक परिस्थितीविषयी काही कळावे असाही आमचा हेतू आहे. त्याचप्रमाणे १९०० व्या शतकातील अनेक विज्ञानकथा आहेत, त्यावरही आपण काम करू शकतो. पुस्तकाच्या मूळ आशयाला कोणताच धक्का न लावता त्यामध्ये आत्ताच्या काळाला अभिप्रेत असा मजकूर समाविष्ट करणे सोपे नाही. आम्ही सूपशास्त्रात तो प्रयोग केला. त्यासाठी आमच्या टिमने पुस्तक वाचले. कोणाला काय सुचते याचा आढावा घेतला. कोणी टिप्स सांगितल्या, कोणी आणखी काही सुचवीत होते. अशारीतीने पुस्तकाला आकार येत गेला.’ 

नावाचा महिमा...! 
आपण काहीतरी वेगळे करत आहोत, असे आम्हाला अजिबातच वाटत नाही. आमच्यापैकी अमोल करंदीकर हा पदार्थवैज्ञानिक आहे. त्याने एकदम ‘किताबकल्हई’ असे नाव सुचविले. आम्हाला ते खूपच सयुक्तिक वाटले. मुळात या कामाला आम्ही सर्वांनी २०१९मध्ये सुरुवात केली. अर्थात त्याचा पाया २०१८मध्येच घालण्यात आला होता. आमच्या कल्पनेनुसार २०१९ च्या दिवाळीत पुस्तक यावे अशी आमची कल्पना होती. मात्र दिवसेंदिवस नवीन संकल्पनांनुसार काम वाढत गेले. आमच्याकडे वेळ भरपूर होता आणि हा काही व्यावसायिक प्रकल्प नसल्याने काहीतरी वेगळे करायचे हे सर्वांच्या मनात होते. रेखाचित्र वाढवावीत म्हणून सूचना आली. त्याचवेळी चिन्मय दामले यांनी प्रस्तावना लिहिली. मनाचे समाधान होत नाही, तोपर्यंत सूपशास्त्र पुस्तकाचे काम करत राहिलो. हे १२५ वर्षांपूर्वी लिहिलेले पुस्तक ४५ वर्षांपूर्वी आउट ऑफ प्रिंट झाले होते. या पुस्तकात निश्‍चितच काहीतरी वेगळे आहे, याची जाणीव झाली. यासाठी आम्ही काम करत गेलो. सर्वांचे एकत्रीकरण, नवीन कल्पना आणि महत्त्वाचे म्हणजे वाचकांना आवडले पाहिजे हा आमचा मुख्य उद्देश होता. जुनी वस्तू घासून-पुसून आणि त्याला नवी झळाळी देऊन, ती पुन्हा वापरायला योग्य करतो, त्याच संकल्पनेने आम्ही जुन्या पुस्तकाला कल्हई करतो. म्हणूनच या उपक्रमाला ‘किताबकल्हई’ असे वरकरणी विक्षिप्त वाटणारे, परंतु समर्पक नाव दिले आहे. 

निर्मितीमागची भूमिका 
हा प्रयोगच आहे, असे सांगत आदित्य म्हणाले, पहिल्या प्रस्तुतीचे व्यावसायिक यशापयश यथावकाश कळेलच, परंतु हा उपक्रम करताना आम्हाला भरपूर मजा आली. आमच्यापुरते हेच याचे यश आहे; हेच आम्हाला हवे होते. एकच पुस्तक करून थांबायचा विचार नाही. आणखी पुनरुज्जीवित पुस्तके घेऊन आम्ही आपल्या भेटीला येतच राहू. जागतिक पुस्तक व्यवसायात ‘लिटररी एजंट’ अशी एक संस्था असते. चांगले लेखन शोधणे, त्याला प्रोत्साहन देणे, त्यावर योग्य ते संस्कार करून प्रकाशनायोग्य करणे, प्रकाशकांबरोबर व्यावसायिक बाबींवर काम करणे, असे काहीसे त्यांच्या कामाचे स्वरूप असते. जुन्या पुस्तकांच्या संदर्भात ‘किताबकल्हई’ने अशी काहीशी भूमिका करावी असा आमचा विचार आहे. आता नव्याने लगेच पुढील विचार झालेला नाही. यथावकाश तो होईलही. त्यावर आताच बोलणे अवघड आहे. अनेक पुस्तकांची नावे डोळ्यासमोर आहेत. परंतु पुन्हा प्रश्‍न येतो तो कालसुसंगतेचा. त्या दृष्टीने आम्ही शांत, परंतु ठामपणे पावले उचलत आहोत. पुण्यात आजही आपण काही पदपथांवरून चाललो तर कडेला दुर्मीळ पुस्तके घेऊन बसलेला रद्दीवाला दिसतो. खरेतर त्याला रद्दीवाला म्हणावे का हा खरा प्रश्‍न आहे. कारण त्याच्याकडे दुर्मीळ पुस्तकांचा खजिना असतो. त्यातूनही आपल्याला खूप चांगली पुस्तके सहज उपलब्ध होतात, हे लक्षात घेतले पाहिजे. 

भविष्य काय? 
‘मी आधीच सांगितले हा काही आमचा व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेला प्रयोग नाही. आम्ही सर्वांनी मिळून पैसे जमा केले आणि पुस्तक प्रकाशित केले. त्या पुस्तकातून मिळालेल्या रकमेतून पुढील प्रकल्प करणार आहोत आणि हा प्रकल्प टारगेट ओरिएंटल अजिबात नाही. वर्षातून एक पुस्तक झाले तरी आम्हाला चालणार आहे. त्यासाठी पुस्तक निवडताना खूप काटेकोरपणे विचार केलेला असतो. पुस्तकातील आशय काय आहे, तो आत्ताच्या काळाला सुसंगत आहे का आणि आपण त्यामध्ये कालसुसंगत काही भर घालू शकतो का, याचा प्राधान्याने विचार केलेला असतो. जुन्या, परंतु महत्त्वाच्या पुस्तकांकडे आजचे वाचक वळावेत, त्यांनी प्रेमाने, आपुलकीने ती पुस्तके वाचावीत, संग्रही ठेवावीत असा आमचा प्रयत्न आहे. ‘जुने पुस्तक निवडून त्याचे पुनरुज्जीवन करणे’ असे या प्रयोगाचे स्वरूप आहे. पण ‘पुनरुज्जीवन’ याचा अर्थ ‘जसेच्या तसे पुनर्मुद्रण’ नव्हे. मूळ मजकुराला धक्का न लावता त्यात काही सृजनात्मक भर घालण्याचा आमचा हेतू आहे. त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य आणि महत्त्व मांडणारी प्रस्तावना, समीक्षात्मक लेख, विषयानुरूप टिपा, स्पष्टीकरणे, वगैरे गोष्टी या ‘सृजनात्मक भर’मध्ये मोडतील.’ आदित्य यांनी स्पष्ट केले. पहिल्या पुस्तकानंतर पुढील पुस्तक कोणते, याबाबत जाणकार वाचकांकडून आम्हाला लगेच विचारणा व्हायला लागली आहे. अन्य भाषेत, प्रामुख्याने इंग्रजी भाषेत होतात, तसे प्रयोग मराठीत करणार का? अशीही विचारणा केली जाते. तुर्तास आम्ही मराठीवर लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या भाषेतील सकस, आशयघन साहित्य जाणकार मराठीजनांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे, आदित्य यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना भविष्यातील भूमिका सांगितली. 

ही तर सुरुवात आहे 
आपल्याला अनेकदा एखाद्या चांगल्या पुस्तकाचे नाव समजते, आपल्यासाठी ते पुस्तक खरोखरच उपयुक्त असते, मात्र दुर्मीळ असल्याने ते उपलब्ध होत नाही. हा हिरमोड खूप वेदनादायक असतो. काही वेळा ते पुस्तक एखाद्या जुन्या ग्रंथालयात अथवा संग्रहालयातही उपलब्ध असते. परंतु आपण त्याचे सभासद नसतो. अशा वेळी जुन्या आणि दुर्मीळ पुस्तकांच्या पुनर्निर्माणाचे महत्त्व लक्षात येते. या पार्श्‍वभूमीवर ‘किताबकल्हई’चा उपक्रम खूपच चांगला आहे. यामुळे केवळ जुने पुस्तक रीप्रिंट होणार नसून त्यातील सकस साहित्याला आत्ताच्या काळाची जोड मिळणार आहे. अर्थात यामध्ये अजून खूप काम होणे अपेक्षित असून ते पुढील काळात निश्‍चितच होईल. ‘किताबकल्हई’चा हा उपक्रम केवळ ‘सूपशास्त्रा’पुरता मर्यादित नाही. ती सुरुवात आहे. अजून खूप पुस्तकांवर काम करायचे आहे. काळाच्या दृष्टीने सुसंगत असलेल्या पुस्तकावर काम करणार आहोत. 
- मेघना भुस्कुटे  

संबंधित बातम्या