चला पाऊस अनुभवायला... 

आशिष तागडे 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो, असा प्रश्‍न विचारता, महाबळेश्वर हेच उत्तर येते. खरे तर या ठिकाणापेक्षाही जास्त पाऊस पडणारी काही गावे त्याच डोंगररांगेत आहेत, त्याचा हा आढावा... 

पावसाळी पर्यटनाचे नाव उच्चारले तरी आपल्या डोळ्यासमोर ठरावीक ठिकाणं येतात. त्यात मुख्यत्वे काही घाट तर काही नेहमीची पर्यटनस्थळे असतात. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील पाऊस अनुभवण्यासारखा असतो. महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून महाबळेश्वरचा उल्लेख केला जातो. महाबळेश्वरला भरपूर पाऊस पडतो यामध्ये शंका नाहीच, परंतु त्यापेक्षाही थोडा अधिक पाऊस महाराष्ट्रातील काही परिसरात पडतो. यामध्ये महाबळेश्वरच्या जवळील म्हणजे पाटण तालुक्यातील पाथरपुंजचा नंबर लागतो. गेल्या काही वर्षांपासून महाबळेश्‍वरपेक्षा या ठिकाणी अधिक पाऊस पडला असून थेट चेरापुंजीला आकडेवारीत टक्कर दिली आहे. त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचा क्रमांक लागतो. 

कोठे आहे पाथरपुंज 
कोयनानगरच्या (ता. पाटण, जि. सातारा) नैऋत्येला पाथरपुंज हे गाव आहे. भैरवनाथ गडापासून या गावाला जाता येते. सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर हे गाव आहे. अर्थात सातारा जिल्ह्यात हे गाव येत असले तरी गावातील घरे तिन्ही जिल्ह्यात विभागली गेली आहेत हे विशेष. जून ते ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी सुमारे ७ हजार ३५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि चेरापुंजी येथे सुमारे सात हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी वारणा नदीच्या पात्रात जाते. या नदीचा उगमही याच गावाच्या पश्चिमेला आहे. या गावात आणि परिसरात निसर्गाने मुक्तपणे उधळण केली आहे. पाथरपुंज नंतर त्याच परिसरात असलेल्या नवजा गावचा नंबर लागतो. या ठिकाणीही पाऊस दरवर्षी जोरदार बॅटिंग करत असतो. या परिसरात दरवर्षी सुमारे साडेपाच ते सहा हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते. महाराष्ट्राचे वरदायिनी असलेल्या कोयना धरणात पुरेसा पाणीसाठा होण्यात नवजाचा सिंहाचा वाटा असतो. या परिसरातील धबधबा पाहण्यासारखा आहे. त्याचे रौद्ररूप पाहणाऱ्याच्या मनात धडकी भरवते. या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी आता चांगला रस्ता बांधला आहे. 

या गावाबरोबर जोर (ता. वाई, जि. सातारा) हेही पावसाचे आगार म्हणून ओळखले जाते. या परिसरातील पाणी धोम-बलकवडी धरणांत येते. सदाहरित जंगलामुळे हा परिसर विलोभनीय आहे. जंगल ट्रेकिंगचे धाडस करण्यासाठी हा परिसर उत्तम पर्याय आहे. अर्थात सोबत वाटाड्या असणे आवश्‍यक आहे. 

इगतपुरी ः पावसाचे माहेरघर 
पावसाचे माहेरघर, भाताचे कोठार म्हणून इगतपुरीची ओळख आहे दरवर्षी येथे साडेतीन हजार मिलिमीटरपर्यंत पाऊस कोसळतो. इगतपुरी आणि खंडाळा या दोहोंची उंची साधारण सारखीच म्हणजे जवळपास १ हजार ९०० फूट आहे. इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या परिसरातील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. त्याबरोबरच इगतपुरी जवळच असणाऱ्या कसारा घाट व परिसर हा पावसाळ्यात नेहमीच पर्यटकांसाठी सुखावह पर्यटनाचा आनंद देणारा परिसर ठरला आहे. पावसाळी पर्यटनस्थळाच्या शोधात असलेल्या निसर्गप्रेमींसाठी अशोका धबधबा हा उत्तम पर्याय असून मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, वाशी, नवी मुंबई इथल्या पर्यटकांसोबतच नाशिक शहर आणि परिसर त्याचबरोबर स्थानिक इगतपुरी शहर आणि कसारा परिसरातील पर्यटकही या धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. 

इगतपुरीचे वैशिष्ट्य 
सिंहस्थ पर्वकाळातील शाहीस्नानासाठी प्रसिद्ध असलेले कावनई, रामायणकालीन किष्किंधा नगरी, सर्वतीर्थ टाकेदचे रामायणकालीन जटायू मंदिर याच भागात आहेत इगतपुरीत मुक्काम करून आजूबाजूला पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यामध्ये (कंसात इगतपुरीपासूनचे अंतर) अप्पर वैतरणा धरण २६ (किमी), भंडारदरा धरण (३५ किमी), खोडाळा (३० किमी), सुंदरनारायण गणेश मंदिर देवबांध (३५ किमी), अशोका धबधबा (१२ किमी) याशिवाय कुलंग, अलंग, मदनगड कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांधन दरी, रंधा धबधबा या ठिकाणापासून जवळच आहे. कसाराघाटाजवळ भातसा रिव्हर व्हॅली, उंट दरी, पाच धबधबे असे सुंदर ठिकाणे आहेत. कसारा घाटातील धुके आणि रेल्वेचे बोगदे ब्रिटीशकालीन पूल अनुभवणे हा तर एक रोमांचकारी अनुभव असतो. तसेच इगतपुरी गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी धम्मगिरी हे विप्पश्यना केंद्र आहे बौद्ध धर्मातील विपश्यना या ध्यानाच्या एका प्रकाराची साधना करण्यासाठी देशातील निरनिराळ्या भागातून, तसेच परदेशांतूनही अनेक लोक येथे येतात. घोटी या गावाजवळून कावनई, त्रिंगलवाडी हे एका दिवसात पाहण्यासारखे किल्लेही आहेत घोटी येथील तांदूळ, मुरमुरे, रानभाज्यांसह सर्व प्रकारच्या भाजीपाला मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे. इगतपुरी जवळच धनुष्यतीर्थ धबधबा पाहण्यासारखा आहे. कावनई, त्रिंगलवाडी हे एका दिवसात पाहण्यासारखे किल्लेही आहेत. 

कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १ हजार ६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची उंची अंदाजे  
९०० मीटर आहे. यातील अर्ध्या उंचीपर्यंत गावकऱ्‍यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे.

संबंधित बातम्या