व्हॅली ऑफ बटरफ्लाय!
कव्हर स्टोरी
जंगलात फिरणं ही एक प्रकारची अनुभूती असते. जंगल मनाला नेहमी ताजंतवानं करतं. प्रत्येक वेळी नव्यानं काही अनुभवायला मिळतं म्हणून पुनःपुन्हा या जंगलाकडे पाय वळतात. कोल्हापूर जिल्हातील आंबेश्वराची देवराई, आंबा, मानोली या परिसरातील जंगलात बऱ्याचदा भटकण्याची संधी मला मिळाली. तिथला गंध गात्रांना सुखावतो. पक्ष्यांचा, कीटकांचा स्वर मनात सतत निनादात रहातो. खरंतर, नागरी वस्तीतही पक्षी, कीटकांचे आवाज त्यांचे रंग, रूप, आकार मनाला खुणावत असतात. पण, जंगलातले त्यांचं रूप न्यारंच!
त्यांच्या अस्तित्वाला तिथे एक प्रकारचा तजेला मिळतो. गेली तीन वर्षे डिसेंबर-जानेवारी दरम्यान मानोली जंगलात फुलपाखरांचे निरीक्षण करण्यासाठी मी मुद्दाम जाते. या कालावधीत तिथे अनेक प्रकारची शेकडो फुलपाखरं दृष्टीस पडतात. यावर्षीदेखील फुलपाखरांची ही ओढ मनाला स्वस्थ बसू देईना. डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास या परिसरात पुन्हा चकरा मारल्या. ऋतुबदलानुसार जंगलात अनेक घडामोडी घडल्या होत्या. पण यावेळेस शेकड्यांनी येणारी फुलपाखरं मात्र बेपत्ता झाली होती.
त्या ठिकाणचा आत्माच जणू हरवला होता. ज्यांच्या असीम ओढीने एखाद्या ठिकाणी जावं आणि तेच जर तिथं नसेल तर मन बेचैन, अस्वस्थ होतं. फेब्रुवारी अखेरीस तिथंच राहणाऱ्या आणि त्या भागातील जंगलाचा दांडगा अभ्यास असणाऱ्या प्रमोद माळी यांचा फुलपाखरं आल्याचा निरोप आला. पुढे दोनच दिवसांत आम्ही मानोली जंगलात आलो. जंगलात काटेसावर, पांगारा फुलला होता. वारस, जंगली सुरंगी, करवंद,रानजाई, कुडा, अंगोपांग फुलली होती. त्यांच्या गंध साऱ्या जंगलात भरून राहिला होता. जंगलात प्रवेश करताच मलबार पाईड हॉर्नबिलचा आवाज कानी आला. काही क्षणातच पंखांचा झपझप आवाज करत पाच हॉर्नबिल समोरून गेले. तो एक शुभशकून वाटला. सुरवात तर चांगली झाली. फुलं, पक्षी दिसत असले तरी मन मात्र फुलपाखरांच्या ओढीने धावत होतं जंगलाचा पहिला टप्पा पूर्ण करून त्या विशिष्ट ठिकाणी आलो, तो काय!! ओढ्याच्या ओलाव्यावर पन्नास मीटर परिसरात शेकडो फुलपाखरं भिरभिरत होती, रुंजी घालत होती, रुंजी घालत होती. नयनरम्य सोहळा दृष्टीस पडला.
डोळ्यांत किती आणि कसं साठवू असं होऊन गेलं. ग्रास यलो, कॉमन आणि मॉटल्ड इमीग्रंट, गल, ऑरेंज टीप जमिनीलगत उडत होती. मधूनच क्षारशोषणासाठी ओलसर मातीत बसत होती. रस्टीक, तामिल योमन, कॅस्टर, प्लम ज्युडी, कॉमन क्रो अशी तपकिरी, लालसर, शेंदरी, काळसर, रंगाची फुलपाखरं एकमेकांत मिसळली होती. याशिवाय हिरव्या रंगछटेचे टेल्ड जे, कॉमन ब्लू बॉटल त्यांच्यात उठून दिसत होते. या रंग सोहळ्यात निळसर रंग छटेचे ब्लू पॅन्सी, ब्लू टायगर, टायनी ग्रास ब्लू आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू ‘ब्लू मोरमॉन‘ ही सामील झाले होते. त्यांची चित्ताकर्षक निळाई मनाला वेड लावत होती. ब्लू मोरमॉन बघता बघता जंगलात पसार व्हायचं. ती चमकदार निळाई माझ्या नजरेला जंगलाच्या पोटात घेऊन जात होती. यापूर्वी ही फुलपाखरं पाहिली होती. या फुलपाखरांमुळे जंगलातल्या या ओढ्याला चित्तवेधक रंगाची जरतार लाभली होती अस भास होत होता. काही फुलपाखरं पंख मिटून बसली की मातीशी एकरूप व्हायची. पंख उघडले की चमकदार रंगाची दुनिया साकारायची. माझ्या दृष्टीनं तो परिसर फुलपाखरांचे अन्नग्रहण केंद्रच बनला होता. तिथं पवित्र ‘यज्ञकर्म’ सुरू होत. क्षारशोषण ,रुंजी घालणं, भिरभिरणं !
ओलसर माती त्यांचं स्फूर्तिस्थान बनली होती. ती काळी आई , फुलपाखरांबरोबरच त्यांची भावी पिढीही सुदृढ व्हावी यासाठी त्यांना पोषक खनिज द्रव्ये, क्षार भरभरून देत होती. ‘जाणिजे यज्ञकर्म’ म्हणजे काय असते, ते कळत होतं. सारं वातावरणच मंत्रमुग्ध करणारं होतं.
ओढ्याच्या परिसरात सगळ्या कुळातील फुलपाखरं एकत्र जमली होती. जणू त्याचं संमेलनच भरले होते. कूळ कोणतेही असो, या सगळ्यांच्या एकत्र येण्याने जंगलात स्वर्गीय वातावरण निर्माण झाले होते. फुलपाखरांची उडण्याची तऱ्हाही निराळी होती, वैशिष्टपूर्ण होती. काही जमिनीलगत, काही थोड्या उंचीवरून तर काही अगदी उंचावरून उडत होती. कॉमन सेलर निवांत, अलगद तरंगत उडणारे तर कॉमन आणि क्रीम्सन रोझ हळूवार उडणारे... यांना ना कसली गडबड, ना घाई. प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेत जगणं सुरू होते. टेल्ड जे, ब्लू बॉटल, लेपर्ड अगदी चंचल! कॉमन नवाब, कमांडर, बॅरन यांचे उडणे सुसाट बाणासारखे ! साऱ्यांचेच उडणं उत्साही होते. त्यांचे भिरभिरणे स्तिमित करणारे. तिथे शेकडो फुलपाखरं भिरभिरत होती पण एकमेकांना चुकूनही स्पर्श होत नव्हता. धक्का लागणं तर दूरच राहिलं. रसरशीत जीवनाचं मर्म तिथं दडलेलं होतं. मला ते रिझवत नव्हते तर मीच त्यांच्यात शिरून त्यांचं रसरसलेपण घेत होते. फुलपाखरांचे रंग, रूप, आकार, उडणं निरखत असतानाच कॉमन नवाब वेगानं उडत येऊन दोन घिरट्या घालून ओलसर जागी ऐटीत उतरलं. त्यांच्या पंखाच्या मधोमध असलेला फिक्कट पोपटी रंग मिळून एखादा मुकुट तयार झाल्याचा भास झाला. नवाबानं छान पोझ देऊन फोटो काढून घेतले. नवाबापुढे खरचं नतमस्तक झालो. फोटोग्राफरनं तर चक्क लोळण घेतली. थोड्या वेळात जणू पहाणी केल्यासारखे सार्जंड भिरभिरले. आणि अचानक ‘कमांडर’ साहेबही अवतरले. त्यांना ‘ऑल इज वेल’ वाटलं असावं. ज्या वेगात ते आले त्याचं वेगात निघूनही गेले. फुलपाखरांची लोभस रूपं न्याहाळत असतानाच भारतातले सगळ्यात छोटं फुलपाखरू ‘ग्रास ज्वेल’ आपले नाजुकसे पंख हलवत आले. आपली इवलीशी शुंडा ओलसर मातीत खुपसून क्षारपान सुरू केले. त्याच्या मागील पंखावरील केशरी कोंदलातले इवलेसे ठिपके अतिशय सुंदर दिसत होते. मोठ्या कौतुकाने अगदी वाकून त्याला निरखत होतो. त्याच्या पुढे बराच वेळ नतमस्तक झाल्यानं मान अवघडली. मानेला थोडा व्यायाम द्यावा म्हणून मान वर केली. आणि काय आश्चर्य, भारतातले सर्वांत मोठे फुलपाखरू ‘सदर्न बर्डविंग’ उंचावरून उडत गेलं. मन अतृप्त राहिले. त्याच्या दर्शनाची आस लागली. आमच्या भावना त्याच्यापर्यंत तीव्रतेनं पोचल्या असाव्यात. पुन्हा ते उंचावरून उडत उडत थोडं खाली आलं. फांदीच्या टोकावरील पानावर काही क्षण विसावले. कोवळ्या उन्हात त्याच्या काळ्या पंखावरील, सोनपिवळ्या रंगछटा उठून दिसत होत्या. आता मात्र त्याच्या दर्शनानं थोड्या वेळापुरतं का असेना मन भरले. ओढ्यात एके ठिकाणी अर्ध पारदर्शक, पांढऱ्या रंगाचे, पंखावर नकाशाप्रमाणे उभ्या रेषांची जाळी असलेले चार-पाच कॉमन मॅप क्षारपान करत होते. तेवढ्यात स्वर्गीय नर्तकानं एका मॅपला अलगद टिपले आणि त्याच्या फन्ना उडवला. या नर्तकाच्या जोडीला इतरही पक्षी फुलपाखरांची न्याहारी करण्यासाठी टपलेले होते. पण फुलपाखरांच्या क्षारशोषणात, भिरभिरण्यात काही फरक पडत नव्हता.मृत्यूचे भय त्यांच्या गावीही नव्हतं. फुलपाखरांच्या दुर्दम्य जीवनोत्सवाचे अनुपम दर्शन तिथं घडत होतं. पशुपक्ष्यांच्या जगात शिकारी पक्षी किंवा प्राणी आला की इशारतीचा आवाज काढून ते एकमेकांना सावध करतात आणि जीव वाचवतात . मग फुलपाखरांच्या विश्वात असं का नाही ? असा विचार मनात चमकून गेला. रंग गोपनाच रहस्य त्यांना का दिलंय, हे खरंच. आणि ‘जीवो जीवस्य जीवनम’ हे ही तितकंच खरंय. तरीही जीव हळहळतो. तिथंच एके ठिकाणी क्रिम्सन रोझचा गळून पडलेला पंख आढळला. हातात पंख घेताच सर्वांग शहारलं, थरारलं. मन अंतर्मुख होऊन गेलं. त्या पंखात कितीतरी गोष्टी दडलेल्या होत्या. आनंदी,मुक्त जीवनाचं रहस्य त्यात होतं. अंडे फोडून बाहेर येणं होतं. सर्वांगाने परिपूर्णतेने वाढ होण्यासाठी आईनं नेमून दिलेल्या झाडावर काही काळ उदरभरण होतं. पंख फुटण्यासाठी, उडण्याचे बळ मिळवण्यासाठी समाधी अवस्था स्वीकारून कोषावस्थेत काही काळ राहणं होतं. आणि एक दिवस स्वतः निर्मिलेली कोष स्वतः:च फोडून आकाशात मुक्त विहरणं होतं. फुलपाखरांचे जीवनचक्र विलक्षण आहे ! अजब आहे !! फुलपाखरांच्या थव्यात काही नकलाकार माद्याही होत्या. ग्रेट आणि डॅनाइड एगफ्लाय सपत्नीक होते. ग्रेटची मादी कॉमन इंडियन क्रो सारखी तर डॅनाइड्ची प्लेन टायगरसारखी कॉमन मॉरमॉनची मादी तर तीन तीन जणांची नक्कल करते. यांचे नर भलतेच हुश्शार! कुणाची ही नक्कल करो. नर आपल्याच प्रजातीतल्या मादीला अचूक ओळखतात आणि जीवनचक्र सुरू ठेवतात. या सगळ्या फुलपाखरांमध्ये एक अपवादात्मक गोष्ट होती. सगळे पतंग (मॉथ) निशाचर. ते रात्री उडतात. पण एक पतंग दिवसा उडतो.त्याचं नावच आहे,डे फ्लाइंग मॉथ!
फुलपाखरांनी सजलेला हा जंगलातला भाग अतिशय मनोहारी दिसत होता. जंगलाचा सुगंध,अधूनमधून येणारी पक्ष्यांची गोड शीळ,अत्यंत प्रसन्न आणि मुग्ध वातावरण होतं.हिरव्यागार वनराईतून येणारा तो खडकाळ ओढा, छोट्या छोट्या पाणथळ जागा, नाजूकसा झिरपा, मातीच्या वरच्या थराखाली असलेला ओलावा असं सुंदर दृश्य होतं.अशा समृद्ध नैसर्गिक पार्श्वभूमीवर ओढ्याच्या पाचशे मीटरच्या परिसरात नयनरम्य रंगात ,सुंदर आकारात फुलपाखरांचे नृत्य साकारत होतं. इथे फुलपाखरांचे विविध रंग होते, आकार होते, नाजुकता होती आणि अत्यंत बोलकी शांतता होती. निसर्गाने भुंगे, मधमाश्या, पक्षी, प्राणी, झुळझुळत्या पाण्यात, सळसळणाऱ्या पानांत नाद निर्माण केला आहे. त्यांना स्वर दिला आहे. पण निसर्गाने फुलपाखरांच्या भिरभिरण्यात, रुंजी घालण्यात, अन्न ग्रहण करण्यात, मात्र नादगर्भ अवस्था निर्माण केली आहे. जी मानवी कानांना सहजी ऐकू येत नाही. त्या नादगर्भ अवस्थेला अपार्थिवतेचा हळुवार स्पर्श लाभलेला आहे. नाद, स्वर उमटतो पण तो फक्त आत काळजात! अंतरंगात!