क्रीडाजगतासही कोरोनाने ग्रासले

किशोर पेटकर
सोमवार, 20 एप्रिल 2020

कव्हर स्टोरी
 

कोरोना (कोविड-१९) या महामारीने साऱ्या जगाला घट्ट विळखा घातला आहे. मृतांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या महामारीस रोखण्यासाठी अजूनही जालीम उपाययोजना अस्तित्वात नाही, त्यामुळे फक्त लॉकडाऊनचाच सहारा आहे. अमेरिकेसारखा जगातील महासत्ता असलेला देशही कोरोना विषाणू महामारीसमोर खचून गेला असून शरणागत झाला आहे. कोरोना विषाणूने क्रीडाजगतासही ग्रासले आहे. जगभरातील सारी मैदाने ओस पडली आहेत. उत्साहाने ओसंडणाऱ्या कित्येक भव्य स्टेडियम्सना अवकाळी स्वरूप आले आहे. महामारी फोफावत असताना बंद स्टेडियममध्ये खेळण्याचा प्रयोगही चालला नाही, कारण हा विषाणू फारच घातक आहे. कधी कोणाचा वेध घेईल याचा नेम नाही. केवळ आताच नव्हे, तर येत्या काही महिन्यांसाठी क्रीडा मैदानेही बंद करावी लागली आहेत. त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्ये नियोजित असलेली टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एका वर्षासाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती व जपान सरकारने घेतला आहे. हिरवळीवरील टेनिस स्पर्धेसाठी विख्यात असलेली ''विंबल्डन स्पर्धा'' यंदाच्या वर्षासाठी रद्द झाली. मार्चमध्ये सुरू होणारी जागतिक क्रिकेटमधील आकर्षणाची केंद्र असलेली ''इंडियन प्रीमियर लीग'' (आयपीएल) स्पर्धा लांबणीवर पडली आहे. युरोपात फुटबॉल ठप्प झालेले आहे. कोरोना महामारीमुळे केवळ क्रीडा मैदाने रिकामी झाली नसून क्रीडा जगतातील अर्थचक्रही कोलमडले आहे. भरमसाठ रक्कम कमविणाऱ्या फुटबॉलपटूंच्या वेतन कपातीचा प्रस्ताव समोर आला आहे. स्पेनमधील बार्सेलिनो एफसी लिओनेल मेस्सी याचे, तर इटलीतील युव्हेंट्स संघ ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे मानधन तात्पुरत्या स्वरूपात कमी करणार आहे. इतर युरोपियन फुटबॉल स्पर्धांतील खेळाडूही आपल्या मानधन कपातीस तयार झाल्याचे वृत्त आहे. स्पर्धेचे प्रक्षेपण हक्क, पुरस्कर्ते यांच्या माध्यमातूनही क्रीडाजगतास तोटा सहन करावा लागत आहे. स्थिती पूर्वपदावर कधी येईल याचा नेम नाही. सध्या तरी सर्व स्टेडियम लॉकडाऊन आहेत. व्यायामशाळा बंद आहेत. क्रीडापटूंना आवश्यक तंदुरुस्ती राखण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नेहमी खुल्या मैदानावर मेहनत घेणारे, घाम गाळणारे क्रीडापटू कोरोना विषाणूच्या धास्तीने इनडोअर अडकून पडले आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग खूपच महत्त्वाचे आहे.

परंपरा खंडित
दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेची परंपरा यंदा कोरोना या महामारीमुळे खंडित झाली आहे. ग्रीसमधील अथेन्स नगरीत १८९६ मध्ये पहिली ऑलिंपिक स्पर्धा रंगली, तेव्हापासून जागतिक महायुद्धाचा कालावधी वगळता, ठरलेल्या कालावधीत हा क्रीडा मेळावा रंगलेला आहे. १९१६, १९४० व १९४४ मध्ये महायुद्धाची झळ बसल्यामुळे ऑलिंपिक स्पर्धा रद्द करावी लागली होती. महामारीमुळे ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलण्याची पाळी प्रथमच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीवर आली आहे. २०१६ मध्ये ब्राझीलमधील रिओ दी जानेरो येथे ऑलिंपिकचा पडदा उघडला, तेव्हा झिका विषाणूचा फैलाव होता, पण ऑलिंपिकला त्याची झळ पोचली नव्हती. रिओतील स्पर्धा सुरळीत ठरली. सुरुवातीस टोकियोतील ऑलिंपिक स्पर्धा यंदा २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत ठरल्यानुसार होईल असा अंदाज होता, पण चीनमधून प्रसारित झालेल्या कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केले. केवळ आशिया-युरोपलाच नव्हे, तर अमेरिकेपासून दक्षिण अमेरिकेतील देशांपर्यंत या महामारीने आपले जीवघेणे बाहू फैलावले. साहजिकच टोकियो ऑलिंपिक रद्द करण्यावाचून पर्यायच राहिला नाही. गतवर्षी डिसेंबरच्या उत्तरार्धात चीनमध्ये रांगणाऱ्या या महामारीने आता जगभरात महाकाय रूप धारण केले आहे. कोणीच या विषाणूस रोखण्याचे धाडस करू शकत नाही. त्यामुळे जुलैपर्यंत ही महामारी नियंत्रणात येण्याची शक्यता अंधूक वाटते. जास्त न ताणता आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने यंदाची ऑलिंपिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर टाकताना, स्पर्धा पुढील वर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेण्याचे निश्चित केले. मार्केटिंग आणि ब्रँडिंगच्या दृष्टीने सोईस्कर व्हावे यामुळे स्पर्धा ''टोकियो ऑलिंपिक २०२०'' या नावानेच ओळखली जाईल. २०२४ मध्ये पॅरीसमध्ये होणारी ऑलिंपिक स्पर्धा ठरल्यानुसारच पार पडेल. 

क्रीडापटूंना दिलासा
ऑलिंपिक स्पर्धा रद्द होऊ नये ही क्रीडापटूंची भावना होती, कारण - टोकियो स्पर्धा झाली नसती, तर क्रीडापटूंनी गेली चार वर्षे घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरले गेले असते. ऑलिंपिक एका वर्षाने लांबणीवर पडल्यामुळे खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे. टोकियो ऑलिंपिकसाठी आतापर्यंत ५७ टक्के क्रीडापटूंनी पात्रता मिळविली आहे. बाकी पात्रता प्रक्रिया अर्धवट आहे. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे पात्रता स्पर्धाही लांबणीवर पडल्या आहेत. कदाचित वर्षअखेरपर्यंत ऑलिंपिक पात्रता प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे ऑलिंपिक समितीने वाढीव कालावधी दिला आहे. नव्या नियोजनानुसार, २९ जून २०२१ ही ऑलिंपिक पात्रतेचे शेवटची तारीख असेल. प्रत्येक देशाला आपापल्या पात्र खेळाडूंची यादी ५ जुलै २०२१ पर्यंत टोकियो ऑलिंपिक संयोजकांना सादर करावी लागेल. ऑलिंपिक स्पर्धा लांबल्यामुळे पात्र खेळाडूंना आणखी तयारी करण्याची संधी राहील, पात्रतेच्या प्रतीक्षेत असलेल्या क्रीडापटूंना आणखी मेहनत घेत प्रगती साधता येईल. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यताही आहे. जवळपास साऱ्याच क्रीडापटूंचा शास्त्रोक्त सराव खुंटला आहे.

अब्जावधींचे नुकसान
टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर पडल्यामुळे अब्जाबधींचे नुकसान होण्याचे अंदाज आहेत. एका पाहणीनुसार, १२.६ ते २५ अब्ज डॉलरचा तोटा अपेक्षित आहे. ऑलिंपिकनिमित्त साधनसुविधा, स्टेडियम यांची निगा राखण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करावा लागेल. याशिवाय इतर यंत्रणांसाठी अंदाजपत्रक नव्याने करावे लागेल. स्पर्धेच्या ब्रॉडकास्टर्सना जास्त फटका बसण्याचे संकेत आहेत. प्रक्षेपणासाठीचे सारे नियोजनच स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे विस्कळित झाले आहे. त्यातच सध्या साऱ्याच स्पर्धा स्थगित असल्यामुळे अतोनात नुकसान होईल असे मानले जाते. मोठमोठ्या कंपन्यांना ऑलिंपिकच्या माध्यमातून नफा कमविण्याची संधी लाभते. स्पर्धा वर्षभराने पुढे गेल्यामुळे त्यांनाही नव्याने अंदाजपत्रक तयार करावे लागेल आणि तूट किती, नुकसानीचा नेमका आकडा किती याचे उत्तर कालांतरानेच मिळेल.

विम्याने विंबल्डनला तारले
इंग्लिश स्ट्रॉबेरीज आणि क्रीमसाठी प्रसिद्ध असलेली हिरवळीवरील विंबल्डन टेनिस स्पर्धा कोरोना (कोविड-१९) महामारीमुळे यंदा रद्द करावी लागली. जागतिक महायुद्धांचा कालावधी वगळता १८७७ पासून ही स्पर्धा दरवर्षी खेळली जाते. ब्रिटनलाही कोरोना महामारीने कवटाळले आहे. मृतांची संख्या वाढीव आहे, त्या पार्श्वभूमीवर विंबल्डन-लंडनमधील ऑल इंग्लंड क्लबवरील ही स्पर्धा येत्या २९ जूनपासून खेळली जाणार नाही. जागतिक महायुद्धामुळे १९१५ ते १९१८, तसेच १९४० ते १९४५ या कालावधीत ही जुणीजाणती स्पर्धा झाली नव्हती. यंदा महामारीमुळे प्रथमच स्पर्धा रद्द करण्याची पाळी आयोजकांवर आली. स्पर्धेची १३४ वी आवृत्ती २८ जून ते ११ जुलै २०२१ या कालावधीत खेळली जाईल. यंदाची स्पर्धा रद्द झाली, पण स्पर्धा आयोजकांना नुकसान सहन करावे लागणार नाही. महामारी विम्यापोटी त्यांना १४१ दशलक्ष डॉलरची भरपाई मिळण्याचे वृत्त आहे. २००२ मध्ये जगभरात सार्स विषाणूचा फैलाव झाला होता, तेव्हा खबरदारी या नात्याने विंबल्डन टेनिस स्पर्धा आयोजकांनी स्पर्धेचा महामारी विमा उतरविला. २००३ पासून प्रतिवर्षी विमा रक्कम भरली जात होती. त्यामुळे यंदा कोविड-१९ महामारीमुळे विंबल्डन स्पर्धा रद्द करताना आयोजकांना विम्याने दिलासा दिला. पण इतर स्पर्धां रद्द झाल्यास विमा रक्कम मिळण्याची शक्यता नाही. पॅरीसमधील रोलाँ गॅरोवरील मातीच्या कोर्टवरील फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा रद्द करण्यात आली नाही, तर मे महिन्यात होणारी ही ग्रँड स्लॅम स्पर्धा सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. फ्रेंच ओपन रद्द न केल्यामुळे त्या स्पर्धेच्या आयोजकांवर टीका होत आहे, पण नुकसानभरपाईचा स्त्रोत नसल्यामुळे स्पर्धा लांबणीवर टाकणे आयोजकांना सोईस्कर वाटले असावे.

क्रिकेट लॉकडाऊन
कोरोना महामारीमुळे सारे क्रिकेटविश्व लॉकडाऊन झाले आहे. बंदिस्त स्टेडियममध्ये क्रिकेट सामने घेण्याचा प्रयोग अयशस्वीच ठरला. ऑस्ट्रेलियास न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका रद्द करावी लागली. आता सारे क्रिकेटपटू इनडोअर बंदिस्त आहेत. कोरोना महामारीमुळे २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होऊ शकली नाही. मे महिनाअखेरपर्यंत स्पर्धा होण्याची अजिबात शक्यता नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक पाहूनच भारतीय क्रिकेट नियमाक मंडळास या लोकप्रिय स्पर्धेला हिरवा कंदील दाखवावा लागेल. २०२० मध्ये आयपीएल स्पर्धा झाली नाही, तर केवळ बीसीसीआय नव्हे, तर फ्रँचाईजी, ब्रॉडकास्टर्स यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल. खेळाडूंच्या मोठ्या मानधनाचाही प्रश्न आहे. स्पर्धा नाही, तर खेळाडूंना मानधन नाही अशी भूमिकाही काही फ्रँजाईजींनी घेण्याची तयारी केली आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेबाबत अनिश्चितता आहे. ऑस्ट्रेलिया सरकार महामारीसंदर्भात धोका पत्करण्यास तयार नसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा कधी पूर्ववत होईल याचा नेम नाही. कोरोना विषाणू महामारीचा समूळ नायनाट झाल्याशिवाय क्रीडाविश्वात पुन्हा जल्लोष अनुभवायला मिळणार नाही हे स्पष्टच आहे.

संबंधित बातम्या