दुर्ग आमुचे, आम्ही दुर्गांचे 

डॉ. अमर अडके,  सदस्य, गडकोट संवर्धन समिती, महाराष्ट्र शासन
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

कव्हर स्टोरी
 

''सालेरी - अहिवंतापासून चंजी- कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य, शतावधि किल्ले, तसेच जलदुर्ग, किती एक विशाल स्थले..... केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली.'' 

आज्ञापत्रात श्री. शिवराय आणि त्यांच्या स्वराज्यनिर्मिती विषयीचा गौरवास्पद उल्लेख आणि अग्रक्रमाने आलेला 'साल्हेर'चा उल्लेख. 

हा साल्हेर किल्ला महाराष्ट्राच्या उत्तरेला नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्‍यातला सर्व गिरिदुर्गांमध्ये मुकुटमणी शोभावा असा... सह्याद्रीच्या उत्तर डोंगररांगेतला अफाट इतिहास पुरुष... महाराष्ट्रातला सर्वांत उंच किल्ला... दुर्ग माथ्यावरचे परशुराम शिखर, महाराष्ट्रातले क्रमांक दोनचे उंच शिखर... कातळात खोदलेल्या पायऱ्या चढून दुर्गमाथ्यावर उभे राहिले आणि भोवतीच्या आसमंताकडे पाहिले, की अवघ्या महाराष्ट्राने आपल्याला मस्तकी धरले आहे अशी भावना मनात दाटते. तो साल्हेर किल्ला... माथ्यावरच्या परशुराम मंदिरासमोर उभे राहिले, की समोर त्याचा जुळा भाऊ किल्ले सालोटा नजर वेधून घेतो... मग मनात साल्हेरापासून सालोट्याची कातळवाट रुंजी घालू लागते... प्रचंड कड्याच्या पोटात कोरून काढलेली कातळवाट... डावीकडच्या खोल दरीच्या कडेने जाणारी, कातळातच कोरून काढलेल्या सहस्रकापूर्वीच्या पायऱ्या, दोन दुर्गांमधली चिंचोळी मोरज खिंड, मग कातळातल्या पायऱ्यांची उभी सालोट्याची चढण, मग दरीच्या कडेने जाणारी उभ्या कातळ भिंतीतली कोरून काढलेली वाट आणि त्या वाटेवरली कातळात कोरलेली असंख्य पाण्याची टाकी... भर उन्हातही थंडगार पाणी असणारी... शतके लोटली तरी अजूनही पाण्याने बारमाही भरलेली... हे साल्हेर आणि सालोटा हे जोडकिल्ले... खरे तर जागतिक वारसा म्हणून जपले जावेत असे यांचे स्थापत्य. गंगासागराच्या वरच्या अंगाला साल्हेरीच्या गुहेसमोर चांदण्या रात्री पथारी पसरली, की आकाशगंगा अधिकच जवळ आल्यासारखी दिसते. ताऱ्या-ताऱ्यांमधली अंतरे स्पष्ट जाणवू लागतात, जणू आपण त्या अवकाशातच असल्याचा भास होतो... तो साल्हेर किल्ला! 

शिवरायांच्या आज्ञेने प्रतापराव गुजर आणि मोरोपंतांनी प्रचंड मोगली सैन्याचा याच किल्ल्याच्या पायथ्याशी १६७२ मध्ये मैदानी युद्धात केलेला पराभव, श्री. शिवराज्याभिषेकाच्या आधीच्या लढायांमधली ही सर्वांत मोठी मैदानी लढाई. या लढाईत महाराजांचे बालपणापासूनचे सहकारी सूर्यराव काकडे बहुत पराक्रम करून धारातीर्थी पडले. 

तीन कोश चौरस कोणास आपले व परके माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले, दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहाले. 

युद्ध करिता (करिता) सूर्यराव काकडे पंचहजारी, मोठा लष्करी धारकरी याणे युद्ध थोर केले. (परंतू) ते समयी जंबुरी याचा गोळा लागून पडिला! सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे! भारती जैसा कर्ण योद्धा, त्याच प्रतिभेचा असा शूर पडला!’ 

असे स्फूर्तीदायी वर्णन ज्या साल्हेरीच्या युद्धाचे केले जाते... तो साल्हेर किल्ला... हा काय साल्हेरचा इतिहास नव्हे. 

साल्हेरच्या माथ्यावर उभे राहून बागलाणातली सेलबारी-डोलबारीची डोंगररांग पाहिली, की अभिमानाने ऊर कसा भरून येतो हे त्या माथ्यावर गेल्यावरच कळते. 

काल रात्री झोप आली नाही... सारखा साल्हेर डोळ्यासमोर दिसायला लागला, त्याचे चहुअंगाचे ताशीवकडे, तो गंगासागर, तो परशुराम, भग्न तरीही भक्कम प्रवेशद्वार, साल्हेरवरच्या रात्री, साल्हेरवरचा सूर्योदय, साल्हेरवरचा सूर्यास्त सारे आठवायला लागले. 

हा भाडेतत्त्वावर देणार? 

नाही नाही कसे शक्‍य आहे ते? 

हा किल्ला कुणाचा? 

छत्रपती शिवरायांचा, त्यांच्या मावळ्यांचा, महाराष्ट्राच्या मनामनांचा... प्रवासासाठी पैसे साठवून पाठीवर पिशवी आणि त्यात शिधा बांधून निष्ठेने किल्ले भटकणाऱ्या महाराष्ट्रातल्या पोराटोरांचा... मराठी मातीत जन्मलेल्या प्रत्येक पोराच्या श्‍वासाचा... इथली माती सूर्याजी काकड्यांसारख्या वीराच्या रुधिराने पवित्र झाली आहे, त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाच्या मालकीचा... 

कुणाला अधिकार आहे तो भाड्याने द्यायचा? महाराष्ट्रातली लाखो पोरे या किल्ल्यांवर उन्हात, पावसात, थंडीत भटकताहेत. कित्येक पिढ्या या किल्ल्यांच्या वाटांवर घडल्या... हे किल्ले तमाम महाराष्ट्राची अस्मिता आणि आत्मा आहे. आमचा हा आत्मा कोणीही भाड्याने घेऊ शकत नाही आणि देऊही शकत नाही. 

ोण म्हणतेय किल्ल्यांना इतिहास नाही?  इतिहासाशिवाय किल्ला असूच शकत नाही... किल्ल्यांची वर्गवारी कोणी केली? ती आपणच केली. सह्याद्री किंवा इतिहास अशी वर्गवारी कधीच करत नाही. इतिहास आणि भूगोलाला सारे किल्ले सारखेच, तेवढ्याच तोलामोलाचे... प्रत्येक किल्ल्याला इतिहास असतोच. मग तो शिवरायांचा असो... शिवपूर्व कालातील आपल्या पराक्रमी पूर्वजांचा असो किंवा शिवोत्तर काळातील धुरंधर सेनानींच्या पराक्रमाचा असो. प्रत्येक किल्ल्याच्या दगडादगडात आणि मातीच्या कणाकणात तो ओतप्रोत भरलेला असतो. प्रत्येक किल्ला हा मृत्युंजय इतिहासाचा साक्षीदार असतो... 

उभे आयुष्य झोकून देऊन या किल्ल्यांसाठी झटणारे हजारो वेडे, होय वेडेच... या महाराष्ट्रात आहेत. किल्ल्यावरच्या मातीच्या कणाकणातला इतिहास आणि अभ्यास त्यांच्या रोमारोमात भिनलेला आहे. त्यांना विचारा या किल्ल्यांचे संवर्धन कसे करायचे? 

महाराष्ट्रात काय फक्त साडेतीनशेच किल्ले आहेत? कुणी सांगितले? याहीपेक्षा शेकड्यांनी अधिक किल्ले या भूमीवर आहेत. गेली किमान तीन तपे या सह्याद्री मंडळातल्या किल्ल्यांवर भटकतो आहे, डोंगर-दऱ्या-घाट वाटा फिरतो आहे. तब्बल चारशे चोपन्न किल्ले फिरलो, पण अजूनही कूप महाराष्ट्र फिरायचा बाकी आहे. अजूनही खूप किल्ले बाकी आहेत. कुणास ठाऊक या आयुष्यात फिरून होतील की नाही? आम्हाला माहिती आहेत तेवढेच किल्ले महाराष्ट्रात आहेत? किंवा आमच्याकडे नोंदी आहेत तेवढेच किल्ले म्हणजे महाराष्ट्राची दुर्गभूमी असे कोणीही समजू नये. महाराष्ट्र हा दुर्गांचा देश आहे हे लक्षात ठेवावे आणि हे दुर्ग म्हणजे महाराष्ट्राचे अमूल्य वैभव आहे हेही लक्षात ठेवावे. 

सर्व कायदे, व्यवहार आणि नियम याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या अंतर्मनाला स्पर्श करणारे हे किल्ले आहेत हे सत्य आहे. 

दुर्गांचे संवर्धन ते भाडेतत्त्वावर न देता अन्य अनेक मार्गांनीही करता येते. त्याद्वारे स्थानिकांना रोजगारनिर्मिती करता येते, महसूल उत्पन्नही मिळवता येते. 

दुर्गांच्या सद्यःस्थितीचा थोडा विचार करू. महाराष्ट्रात शेकडो किल्ले आहेत. पण त्यांपैकी फारच थोड्या किल्ल्यांची शासन दरबारी नोंद आहे. त्यात काही किल्ले ASI म्हणजे केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या नोंदीत आणि अखत्यारीत आहेत. काही किल्ले राज्य पुरातत्त्व खात्याकडे नोंद आहेत. उर्वरित किल्ल्यांची कुठेच नोंद नाही! 

बहुतांश किल्ल्यांच्या मालकीची अवस्था फारच विचित्र आहे. किल्ल्याचा काही भाग जंगल विभागाच्या अखत्यारीत, काही भाग पर्यटन खात्याच्या मालकीचा, काही भाग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारात, तर काही भाग खासगी मालकीचा. बहुतांश गिरिदुर्ग हे जंगल विभागाच्या हद्दीत आहेत. पण संवर्धनाचे नियम आणि जबाबदारी मात्र पुरातत्त्व खात्याची असा समज. वरील परिस्थितीच दुर्ग संवर्धनातील मोठा अडथळा आहे. भाडेतत्त्वावर दुर्ग देण्याआधी ही प्रशासकीय बाब सुकर केली, तर दुर्ग संवर्धन तर होईलच आणि मूलभूत सुविधा निर्माण करता येतील. त्यामुळे न वळणारी पाऊलेही दुर्गांकडे वळतील. शासनाचा वरील प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे आपापल्या परीने दुर्ग प्रकार आणि परिसरात काही ना काही करीत असतो. पण त्यात समन्वय आणि शास्त्रोक्तपणाचा अभाव नक्कीच आहे. या सर्व विभागांनी एकत्रित येऊन परस्पर समन्वयाने काम केले तर उत्तम दुर्ग संवर्धन होऊ शकते. अर्थात यासाठी दुर्गांचे स्थान, त्यांचे स्थापत्य, परिसराचा भूगोल, इतिहास यांचा समग्र अभ्यास केला जावा. खरे तर शास्त्रोक्त दुर्ग संवर्धनासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि अभ्यास असणाऱ्या महाराष्ट्रभरच्या तज्ज्ञांची ''गडकोट संवर्धन समिती'' शासनाने गठीत करून एक चांगले पाऊल उचलले आहे. या समितीच्या अभ्यास आणि मार्गदर्शनाने संवर्धनाचे काम नेटाने पुढे नेले, तर दुर्ग संवर्धनासाठी इतर मार्गांचा अवलंब करण्याची गरज भासणार नाही. मग भाडेतत्त्वावर द्यायची गरज तर दूरच. 

दुर्ग संवर्धनाचा विषय हा भावना आणि व्यावहारिकता असा दुहेरी आहे. तमाम महाराष्ट्राच्या भावना या गडकोटांशी गुंतलेल्या आहेत याचा विचार करूनच धोरणे आखायला हवीत. संवर्धनाआधी दुर्गांचे काही महत्त्वाचे विषय ठोसपणे मार्गी लागले पाहिजेत. एक म्हणजे जे किल्ले राज्य शासनाच्या नोंदीत आणि अखत्यारीत आहेत ते राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले पाहिजेत. म्हणजे संवर्धनाला चालना मिळेल. जे केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहेत त्याच्या देखभालीचे, संवर्धनाचे अधिकार प्राप्त करून घेतले पाहिजेत. असा यशस्वी प्रयोग रायगड संवर्धनाच्या बाबतीत आकारालाही आला आहे. तसेच समितीच्या आग्रहामुळे किल्ले संरक्षित करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. पंरतु, प्रशासकीय अडचणी, नियम यांमुळे या प्रक्रियेने म्हणावी तशी गती घेतलेली नाही. माझ्या माहितीनुसार, केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे महाराष्ट्रातल्या ४४ किल्ल्यांची तर राज्य पुरातत्त्व विभागाकडे ४८ किल्ल्यांची संरक्षित किल्ले म्हणून नोंद आहे. ही आकडेवारी काय बोलते? संवर्धन करायचेच असेल तर प्रथम अस्तित्वात असलेले दुर्ग संरक्षित करा. मग त्याचे शास्त्रोक्त संवर्धन करूया. अवघ्या महाराष्ट्राला हेच हवे आहे. दुसरी गोष्ट महाराष्ट्रातल्या सर्व किल्ल्यांचे सविस्तर नोंदीचे गॅझेटिअर तयार व्हायला हवे. संरक्षित, असंरक्षित, खासगी कोणत्याही विभागाच्या अधिकारात असणाऱ्या किल्ल्यांचे समग्र गॅझेटिअर असणे ही काळाची गरज आहे. तशी प्रक्रिया सुरुही झाली आहे, पण ती लवकर व्हावी यासाठी आग्रह धरूया! 

खरे तर प्रत्येक किल्ला हा नैसर्गिक आणि मानवनिर्मित स्थापत्याचा अजोड नमुना आहे. या स्थापत्याचे उत्तम संवर्धन करूया. आपल्याकडचे हे असामान्य सौंदर्य जगासमोर नेऊया, जगभरातल्या लोकांना आकृष्ट करूया. मग कशाला गरज भासते किल्ल्यांवर नव्याने काही बांधण्याची आणि कुणाला भाड्याने द्यायची. पण इथेच तर आम्ही कमी पडतो. जगाच्या पाठीवर कुठेही नसणारे नैसर्गिक दुर्गस्थापत्य आपल्याकडे असूनसुद्धा ते जगासमोर नेण्याची कोणतीही योजना आपल्याकडे नाही. आपल्या कित्येक किल्ल्यांवर पिरॅमिडलाही लाजवतील अशी कातळ बांधकामे आहेत. फक्त हे अभ्यासपूर्ण रीतीने जगासमोर मांडायला हवे. 

किल्ल्यांवर राहायचेच असेल आणि खऱ्या अर्थाने त्या रात्रींचा रोमांच अनुभवायचा असेल, तर आकाशाच्या छताखाली उघड्या प्रांगणात जो आनंद असतो तो चार भिंतीत मिळणार नाही. किल्ले फिरणारी आमची पोरे नाही का, झोपायची आपली वळकटी किंवा तंबू पाठीवर घेऊनच किल्ले भटकतात. 

महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची रचना, त्यांची भौगोलिक स्थाने हा सर्वस्वी वेगळा विषय आहे. उर्वरित देशातील विशेषतः उत्तर हिंदुस्थानातील किल्ले यांच्याशी तुलना होऊच शकत नाही. तो भूभाग वेगळा, त्याचे स्वरूप वेगळे; म्हणून राजस्थान, दिल्लीतील किल्ल्यांचे नियम इथल्या किल्ल्यांना लावायचे काहीच कारण नाही. खरे तर हा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी त्यांची जपणूक अत्यंत आवश्‍यक आहे... आणि खरे सांगायचे झाले, तर महाराष्ट्रातली हजारो दुर्गप्रेमी मंडळी कष्टपूर्वक हे किल्ले जपताहेत. त्यांना बळ दिले, तर किल्ल्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे निम्मे काम होईल. जे काम लोकांच्या ताब्यात देऊन होईल असे वाटते, ते काम ही मंडळी आधीच करताहेत तेही विनामोबदला... कारण हा शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी ठेवलेला प्रेरणेचा वारसा म्हणून...! 

दुर्ग संवर्धनाची जाणीव खरे तर आता महाराष्ट्रात खोलवर रुजली आहे. या निमित्ताने ती प्रकर्षाने जाणवली इतकेच. आपण सर्वांनी मिळून या दुर्ग वारशाच्या जपणुकीसाठी एक चतुःसूत्री तयार करूया. 

पहिल्यांदा किल्ले स्वच्छ करूया. अनावश्‍यक वाढलेली झाडेझुडुपे, गवत उपस्थित बांधकामाला कोणताही धक्का न लावता काढूया. आवश्‍यक पायऱ्या, बांधकामे यावरची माती आणि पाण्याच्या टाक्‍यातील गाळ अशीच काळजी घेऊन काढूया म्हणजे किल्ले नव्या रूपात आपल्यासमोर येतील. मग या किल्ल्यांची सर्वांगीण टिपणे कारूया. रेखाटने करुया. (DOCUMENTATION). मग या किल्ल्यांच्या संरक्षण-संवर्धनाची दीर्घकालीन योजना तयार करूया (MASTER PLAN). मग आवश्‍यक त्या बांधकामांसह प्रत्यक्ष संवर्धन करूया. किल्ल्याच्या स्थापत्याला, रचनेला, इतिहासाला कसलीही बाधा न आणता काही मूलभूत सुविधा निर्माण करुया आणि त्याच्या इतिहास भूगोल व स्थापत्य वैशिष्ट्यांसह दिमाखात जगासमोर आणूया. 

हे सर्व स्वयंस्फूर्तीने करू इच्छिणारी तरुणाई, मानसिकता आज तयार आहे. नुसती एक हाक दिली, की लाखो माणसे किल्ल्यांसाठी उभी राहतील. मग काय गरज आहे किल्ले भाड्याने द्यायची? सह्याद्रीच्या अंतरंगातली ही दुर्ग शिल्पे व्यापारी हस्तक्षेपापासून मुक्त असायला हवीत आणि हो इतिहासाची अशी कधीच विभागणी करता येत नाही बरे का, की हे किल्ले शिवाजी महाराजांशी संबंधित आहेत आणि हे संबंधित नाहीत... ही सारी महाराष्ट्र भूमी शिवमय आहे असा आमचा दृढ विश्‍वास आहे. म्हणूनच किल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धनाचा किंबहुना भवितव्याचा निर्णय असा चटकन घेता येणार नाही. किल्ल्यांच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या आणि त्यांच्या इतिहासावर पोसलेल्या आम्हा दुर्गभटक्‍यांना डावलून तर मुळीच नाही. एक ब्रिटिश सेनाधिकारी कर्नल मेडोज टेलर ‘नळदुर्ग’ किल्ल्याविषयी म्हणतो, The fort of Naldurg is one of the most interesting places I have ever seen. स्थापत्याचा अत्युत्कृष्ट नमुना असणारा हा किल्ला. तुळजापुराकडून वहात येणारी बोरी नदी अख्खीच्या अख्खी वळवून त्या नदीपात्राचाच संरक्षणासाठी वापर केलेला हा किल्ला... नदीपात्रातल्या बंधाऱ्याच्या पोटात असणारा अप्रतिम पाणी महाल, गणेश महाल आणि खुबीने पुन्हा मूळ पात्रात प्रवाहित केलेली नदी अशी अनेक असामान्य स्थापत्य वैशिष्ट्ये असणारा हा किल्ला, हा भाड्याने द्यायचा? त्यापेक्षा राष्ट्रीय स्मारक म्हणून जगासमोर आणायला हवा... आपल्या दुर्गांचे हे अमूल्य वैभव आपल्याला कळत नाही हे मूळ दुखणे आहे. हे किल्ले म्हणजे महाराष्ट्र मनाचा तेजस्वी हुंकार आहे. 

मग असे काही आजूबाजूला घडू लागले, ऐकायला येऊ लागले, वाचनात आले, की उगीचच मन धास्तावते. हे किल्ले आपल्यापासून कोणी दूर तर घेऊन जाणार नाही ना? आज भाड्याने दिले जातील, उद्या विकले तर जाणार नाहीत ना? मग वेडे मन पेटून उठते आणि समजावते आमचे किल्ले इतके दुर्बल नाहीत, की ते कुणाच्या तरी ताब्यात जातील, आमचे किल्ले आमचेच आहेत आणि आमचेच राहतील. जोपर्यंत प्राण देहात आहेत, तोपर्यंत ते आमचेच राहतील अशी आमची दृढ भावना आहे. कारण तो शिवाजी महाराजांनी आमच्यासाठी ठेवलेला प्रेरणेचा वारसा आहे.

संबंधित बातम्या