अँटी-सॅटची अभिमानास्पद धडक

डॉ. अनिल लचके 
सोमवार, 8 एप्रिल 2019

कव्हर स्टोरी
 

मानवनिर्मित उपग्रहांचे अनेक प्रकार असतात. अंतराळात वेगवेगळ्या उंचीवरून ते परिभ्रमण करतात आणि त्यांना नेमून दिलेली कामगिरी ‘अहोरात्र’ पार पाडत असतात. भूसंलग्न (भूस्थिर) उपग्रह ३६ हजार किलोमीटर उंचीवरून रेडिओ-टीव्हीचे कार्यक्रम प्रक्षेपित करतात. पृथ्वीपासून साधारणतः ३०० ते २००० किलोमीटर उंचीवरून भ्रमण करणाऱ्या उपग्रहांना ‘एलईओ’ म्हणजे ‘लो अर्थ ऑर्बिट’ म्हणतात. त्यांची कामगिरीदेखील निश्‍चित असते. ई-मेल, व्हिडिओ कॉन्फरन्स, संदेशवहन यासाठी हे उपग्रह उत्तम! कृत्रिम उपग्रहांचे अनेक उपयोग आहेत. इंटरनेट, हवामानाचा अंदाज, दूरचित्रवाणीचे कार्यक्रम प्रक्षेपित करणारा दुवा, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस), नकाशे तयार करणे आणि मुख्य म्हणजे सर्वदूर संवाद! ज्या दुर्गम भागात जाणे मुश्‍कील असते, तेथे निरीक्षण करून त्या भागाचे नकाशे करायचे असतील, तर आयआरएस, रिसॅट, लॅंडसॅट इत्यादी उपग्रह उपयुक्त असतात. लष्करी हालचालींसाठी, टेहळणीसाठी, निश्‍चित स्थानावर हल्ला करण्यासाठी ही माहिती विशेष उपयोगी पडते. उपग्रहांचे अनेक चांगले फायदे असले, तरी शत्रुराष्ट्रे त्याचा दुरुपयोग करू शकतात. 

उपग्रहांवर लक्ष आणि ‘लक्ष्य’  
अशा हेरगिरी करणाऱ्या शत्रूंच्या उपग्रहांना हेरून त्यांच्या हालचाली बंद पाडणे किंवा त्याला भेदून त्याच्या ठिकऱ्या उडवणे गरजेचे असते. मात्र, ते अजिबात सोपे नाही. हे तंत्रज्ञान काय आहे, ते आपण लक्षात घेऊयात. द्रौपदीच्या स्वयंवरासाठी एक ‘पण’ लावलेला होता. डोक्‍यावर गरागरा फिरणाऱ्या माशाच्या खाली असलेल्या पाण्यातील प्रतिबिंबात माशाचा डोळा पाहायचा आणि त्या डोळ्यावर अचूकपणे शरसंधान करायचे. या ‘पणा’मध्ये फक्त माशाचा डोळा फिरत होता, पण धनुर्धारी मात्र स्थिर होता. आधुनिक काळात शत्रूचा उपग्रह ताशी २७ हजार किलोमीटर वेगाने भ्रमंती करत असतो. याचा अर्थ त्याला भेदण्यासाठीचे क्षेपणास्त्र त्याहून वेगाने जायला पाहिजे. या ठिकाणी लक्ष्य आणि क्षेपणास्त्र दोन्ही एकाच दिशेने पण प्रचंड वेगात जात असतात. पण त्याआधी क्षेपणास्त्राने त्याचा निश्‍चित मार्ग आखला पाहिजे. त्यासाठी गणिताचा गाढा अभ्यास पाहिजे. तसेच त्याला साथ देणारे सॉफ्टवेअर-संगणक पाहिजेत आणि तरबेज तल्लख बुद्धीचे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञही पाहिजेत. 

भारताने ‘मिशन शक्ती’ प्रकल्प आखला आणि ए-सॅट (अँटी-सॅटेलाईट) यंत्रणा उभारली. हे १८ टन वजनाचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून त्याला दोन बूस्टर रॉकेट होते. ते घडवण्यात डीआरडीओ संस्थेचे ३०० शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांचे मोठे श्रेय आहे. मात्र, चाचणी घेण्यासाठी लो ऑर्बिट सॅटेलाईटची निवड आणि त्या अनुषंगाने लागणारी इतर माहिती व यंत्रणा यांची जोड इस्रोच्या तज्ज्ञ लोकांनी दिली. या उपग्रहाचे कार्य संपुष्टात आलेले होते. तो नियोजित चाचणीसाठी वापरायला काहीच हरकत नव्हती. डीआरडीओच्या क्षेपणास्त्राणांची चाचणी घेण्याची यंत्रणा एपीजे अब्दुल कलाम बेटावर आहे. ते बेट ओडिशा राज्यामधील बालासोर येथे आहे. तेथून त्यांनी अँटी-सॅटच्या साह्याने भारताच्याच एका ७४० किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहाला नष्ट केले. ताशी २८ हजार किमी वेगाने जाणाऱ्या आणि २७४ किमी उंचीवरील कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहाचा प्रथम वेध घेऊन स्थान निश्‍चित केले गेले. उपग्रहाहून जास्त वेगात झेपावणाऱ्या क्षेपणास्त्राने उपग्रह नष्ट करण्याचे काम कौशल्याचे तसेच अत्यंत जटिल व गुंतागुंतीचे होते. या क्षेपणास्त्रात स्फोटके, अस्त्रे नव्हती. होती ती फक्त गतीज (कायनेटिक) ऊर्जा. त्याचा वेग आणि वजन यांची धडक नियोजित उपग्रहावर पडली. हेच ते ‘कायनेटिक किल व्हेईकल’. भारताची २५ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वाजता केलेली पहिल्याच प्रयत्नातील ही चाचणी १०० टक्के यशस्वी झाली. चाचणी तीन मिनिटांमध्ये घेण्यात आली. यासाठी अग्नी ५ या क्षेपणास्त्राचा वापर झाला. त्याचे लक्ष्य होते मायक्रोसॅट-आर हा उपग्रह.    

शत्रूचा उपग्रह जर आपल्या प्रदेशाची (हल्ला करण्याच्या दृष्टीने) टेहळणी करत असेल, संदेशांची संशयास्पद देवाणघेवाण करत असेल, तर तो उपग्रह अवकाशातच निकामी करण्याचे तंत्र आपल्या संशोधकांनी विकसित केले आहे. केवळ उपग्रहच नव्हे, तर आकाशातून झेपावणारे शत्रूचे अस्त्र नष्ट करण्याची क्षमता असल्याचे आपल्या तंत्रज्ञांनी सिद्ध केले आहे. सर्व देशांचे लष्करी निरीक्षण करणारे उपग्रह सध्या अवकाशात भ्रमंती करीत आहेत. एक हजार किमी दूर असणाऱ्या उपग्रहाचा वेध घेऊन तो नष्ट करण्याची आपली क्षमता आहे. असे अत्यानुधिक तंत्रज्ञान कोणताच देश कोणालाही देत नाही. अंतराळ तंत्रज्ञानावरील आपली पकड भारताने सगळ्या जगापुढे आणून दाखवली. संपूर्ण स्वदेशी सामग्री आणि आपलेच तंत्रज्ञ यांना ही सफलता मिळवता आली. याचा अर्थ येथेही ‘स्वयंपूर्णते’चे आपले ध्येय आपण जपले. जगात फक्त तीन देशांकडे ‘अँटी-सॅट’ क्षमता आहे (कंसात चाचणी केल्याचे वर्ष) - अमेरिका (१९८५), चीन (२००७) आणि रशिया (२०१५). या स्टार वॉर क्‍लबच्या नामावलीमध्ये आता भारताची नोंद होत आहे, ही आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशीच गोष्ट आहे. डीआरडीओच्या तंत्रज्ञांनी क्षेपणास्त्राच्या क्षेत्रातील आपले प्रभुत्व यापूर्वी वेळोवेळी सिद्ध केलेले होतेच. मात्र, ही चाचणी कोणत्याही देशाविरुद्ध नव्हती. 

भावीकाळात आपल्या देशाच्या संरक्षणासाठी किंवा अवकाशातील उपग्रह, क्षेपणास्त्रे यांना असणाऱ्या संभाव्य धोक्‍यापासून संरक्षण करण्यासाठी ही चाचणी घेतली गेली. त्या आधी संगणकाच्या साह्याने ‘सिम्युलेशन’ (भ्रामक अनुकरण) करून अशी चाचणी अनेकदा यशस्वी रीतीने घेण्यात आली. हे तंत्रज्ञान भारताने २०१२ पासून आत्मसात केलेले होते. केव्हा तरी अशी प्रत्यक्ष प्रायोगिक चाचणी घेणे गरजेचे होते; अर्थातच ती चाचणी आपल्या स्वतःच्या मालकीच्या उपग्रहावरच घ्यावी लागते.

गाइडेड, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे
क्षेपणास्त्राचे मुख्यतः दोन प्रकार असतात. युद्धभूमीवर जेव्हा क्षेपणास्त्राचा वापर तत्कालीन कारणासाठी होतो. तेव्हा टॅक्‍टिकल क्षेपणास्त्र वापरले जाते. शत्रूच्या हद्दीमधील (किंवा आतील भागातील) महत्त्वाच्या ठिकाणी जेव्हा हल्ला होतो, तेव्हा त्याला स्ट्रॅटेजिक क्षेपणास्त्राचा हल्ला असे म्हणतात. काही देश क्षेपणास्त्राचे वर्गीकरण त्याच्या संहारक शक्तीप्रमाणे करतात. 
कोणतेही नियोजित क्षेपणास्त्र हे शत्रूच्या सरहद्दीतील मोक्‍याच्या जागी जाऊन शत्रूची युद्धसामग्री नष्ट करणारे व शत्रूला नामोहरम करणारे हवे. यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर करून क्षेपणास्त्राची दिशा, मार्ग आणि वेग आदींवर नियंत्रण मिळवून क्षेपणास्त्र सोडायला पाहिजे. ज्या क्षेपणास्त्राची दिशा आणि मार्ग नियंत्रित करता येतो, त्याला ‘गाइडेड मिसाईल’ म्हणतात. याचा पल्ला आणि मारकक्षमता मर्यादित असते. क्षेपणास्त्र दोन टप्प्यात कार्य करते. पहिल्या टप्प्यात (बूस्ट फेजमध्ये) ते पूर्ण इंधन वापरून उंची आणि वेग घेते. दुसऱ्या टप्प्यात ते लक्ष्यावर जाऊन आदळण्यासाठी पूर्व नियोजित दिशा आणि उंची घेते. जेव्हा एखादे लक्ष्य आणि त्याचे तंतोतंत स्थान निश्‍चित माहिती असेल, तेव्हा ‘बॅलिस्टिक मिसाईल’ वापरून लक्ष्यभेद करता येतो. यात अग्निबाणाचा उपयोग केलेला असतो. या क्षेपणास्त्राचा मार्ग पहिल्या टप्प्यातच, म्हणजे ‘बूस्ट फेज’मध्ये आखला जातो. नंतरचा लक्ष्यभेद करणारा टप्पा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र स्वतःच आखते आणि कामगिरी फत्ते करते. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रात स्फोटके, रसायने किंवा आण्वीय अस्त्रे असू शकतात. 
क्रूझ क्षेपणास्त्र मात्र वेगळे असते. ते चालकरहित विमानासारखे असते. त्यामध्ये विस्फोटके भरलेली असतात. या अस्त्राला इंजिनासह पंखही असतात. प्रगत क्रूझ क्षेपणास्त्रात ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम’ वापरलेली असते. शत्रूच्या इमारतीची खिडकी किंवा दरवाजा वेगात आणि अचूकपणे भेदून जाण्याची यंत्रणा यात आहे.

भारताची ‘क्‍लीन टेक्‍नॉलॉजी’
अंतराळात जेव्हा एखादा उपग्रह नष्ट केला जातो, तेव्हा त्याच्या ठिकऱ्या उडतात. या ठिकऱ्या म्हणजे अंतराळातील कचराच होऊन बसतो. ते तुकडे दुसऱ्या देशांच्या उपग्रहाच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण करू शकतात. चीनने २००७ मध्ये उपग्रह नष्ट करण्याची एक चाचणी घेतलेली होती. तो उपग्रह ८०० किमी उंचीवर होता. चीनने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करून जेव्हा एक उपग्रह नष्ट केला, तेव्हा त्याचे सुमारे १४ हजार तुकडे झाले. त्यातील बरेच तुकडे तसेच अंतराळात फिरू शकतात. त्यामुळे अंतराळातील कचऱ्यात भर पडते. भारताने ही अडचण लक्षात घेतली आणि स्वतःचा उपग्रह सुमारे ३०० किमी उंचीवरून भ्रमण करीत असताना नष्ट केला. तो ‘लो ऑर्बिट अर्थ’ वर्गीय असल्याने नष्ट झालेल्या उपग्रहाचे तुकडे केवळ ४५ दिवसात पृथ्वीकडे येऊ लागतील आणि येता येताच भस्मसात होऊन जातील. 
ए-सॅट तंत्रज्ञान संपूर्णतः भारतीय आहे. यामुळे देशाची संरक्षण सिद्धता मजबूत झाली आहे. एवढेच नव्हे, तर आपला आत्मविश्वास आणि अभिमान उंचावला गेलाय, हे निश्‍चित! 
 

संबंधित बातम्या