जंगलातील वणव्याचे तांडव  

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

अमेरिकेतील ऑरेगन, कॅलिफोर्नियामध्ये जंगलांमध्ये पेटलेल्या वणव्यांमुळे शेकडो जणांनी आपले घर गमावले तर, हजारो जण या आगीमुळे विस्थापित झाले आहेत. आर्थिक नुकसान प्रचंड झाले आहे. जंगलाला लागलेल्या आगीमध्ये शेकडो प्राण्यांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. कशामुळे पेटले हे वणवे...?

या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील ऑरेगन, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टनमध्ये जंगलात लागलेल्या आगीमुळे (Wildfire) हाहाःकार उडाला. ऑरेगनमध्ये सर्वाधिक भीषण आग लागली आणि त्यात लाखो एकरवरील जंगल जळून खाक झाले आहे. या आगीमुळे विविध राज्यात अनेक   जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.       

तीन दिवसांच्या उष्णतेच्या लाटेने तापमान प्रचंड वाढले होते. अमेरिकेच्या वायव्य भागात लागलेली ही भीषण आग वेगाने वाहत असणाऱ्या वाऱ्यामुळे अधिकच पसरली. ऑरेगन भागातील शेकडो घरे आगीत भस्मसात झाली. ऑरेगनचे राज्यपाल केंट ब्राउन यांनी सांगितले, की जंगलाला लागलेल्या आगीमुळे राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक नुकसान होण्याची भीती आहे. 

मागील काही दिवसांपासूनच जंगलात लागलेल्या आगीमुळे कॅलिफोर्नियाच्या किनारी परिसरातील आकाश केशरी रंगाचे झाले होते. त्यामुळे या भागावर केशरी रंगाची उधळण झाली असल्याचे दृश्य होते. कोरड्या उन्हाळ्यानंतर कॅलिफोर्नियात पानगळीचा हंगाम सुरू होतो. हा काळ आगींसाठी अधिक धोकादायक मानला जातो. 

राज्याच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील तीन मोठ्या आगींपैकी दोन आगी सॅन फ्रान्सिस्को बे एरियात आजही  धुमसत आहेत. या वणव्याला स्थानिक नागरिकांनी ‘अँपल फायर’ असे नाव दिले आहे. या वणव्यामुळे आजूबाजूच्या भागात अनेक ठिकाणी छोट्या छोट्या आगी लागल्या आहेत. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून ही आग मोठ्या व्यापक भूभागावर पसरली आहे. सर्वात प्रथम ही आग लॉस एंजेलिसच्या पूर्वेकडील ७५ मैल अंतरावरील कॅलिफोर्नियातील चेरी खोऱ्यामध्ये पसरली होती. 

आगीची तीव्रता मोठी असल्यामुळे कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को इत्यादी भागातील आकाशाचा रंग जसा बदललेला आढळला, तसेच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राख, धुरके (smog) असल्यामुळे दृश्‍यमानतेवर परिणाम झाला होता. जवळपास प्रतितास ८० किमी वेगाने हवा वाहत होती, त्यामुळेच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, तरीही ते कठीण होत होते. काही ठिकाणी परिस्थिती इतकी भीषण होती, की अग्निशमन दलाच्या जवानांना त्या भागातून माघार घ्यावी लागली. यावरून या संकटाच्या भयावहतेचा अंदाज येतो. शेकडो जणांनी आपले घर गमावले तर, हजारो जण या आगीमुळे विस्थापित झाले. त्याशिवाय अनेकांची वाहनेही आगीत जळून खाक झाली. जंगलाला लागलेल्या आगीमध्ये शेकडो प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अजूनही अनेक प्राणी माणसांप्रमाणेच आसऱ्यासाठी  सुरक्षित स्थळे शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. 

आणखी विध्वंसाची भीती लक्षात घेऊन अमेरिकी वन सेवा विभागाने दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्व आठ राष्ट्रीय वने बंद केली आहेत. कॅलिफोर्नियात दरवर्षी उष्ण कोरड्या वाऱ्यांमुळे जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर जंगलात आगी लागतात. कारण सर्व गवत आणि वनस्पती वाळलेल्या असतात आणि वारा जोराचा असतो. उत्तर कॅलिफोर्नियात सामान्यपणे ऑक्टोबरमध्ये वर्षभरातले थंडीच्या ऋतूतील लक्षणीय पर्जन्य वादळ (Rainstorm) येत नाही, तोपर्यंत जंगल आगींचा हंगाम (Wildfire season) संपत नाही. दक्षिण कॅलिफोर्नियात हा हंगाम नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत असतो.

यावर्षी हे चित्र फारच वेगळे दिसून आले. १० सप्टेंबर २०२० पर्यंतच जंगलांना आगी लागण्याच्या ७,६९४ घटनांची नोंद झाली. या सर्व घटनांत ३५,७७,९२६ एकर प्रदेशातील जंगल पूर्णपणे जळून नष्ट झाले. कॅलिफोर्निया राज्याच्या एकूण १० कोटी एकर क्षेत्रफळाच्या ३ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र यात बाधित झाले. त्यामुळे २०२० चा हा जंगल आगींचा हंगाम कॅलिफोर्नियाच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि हानिकारक ठरला आहे!

हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ यामुळे जंगल आगीची  

तीव्रता वाढल्याचे निरीक्षण कॅलिफोर्नियाच्या वन विभागाने मांडले आहे. याच राज्यात १६ आणि १७ ऑगस्ट २०२० रोजी आलेल्या फौस्टो या उष्णकटिबंधीय वादळानंतर हवेत जमा झालेल्या बाष्पामुळे मोठ्या प्रमाणात जास्त वेगाने वाहणारे वारे निर्माण झाले. त्यामुळे जंगलांना आगी लागून ३६७ ठिकाणे बाधित झाली. त्याच दरम्यान तयार झालेल्या उष्णतेच्या अतितीव्र लाटेमुळे आणि कोविड १९ च्या अडचणींमुळे लोकांना वेळेत मदत पोचविणे, त्यांची सुटका करणे आणि आगी नियंत्रणात आणणे वेळेत शक्य झाले नाही. 

उत्तर कॅलिफोर्नियात सॅन फ्रान्सिस्को बे भागात ईशान्येकडून येणारे वारे वसंत आणि ग्रीष्म (Spring and Fall) ऋतूत वाहतात. या वाऱ्यांना डायब्लो वारे म्हटले जाते. डोंगर, दऱ्याखोरी आणि दाट ढग यामुळे हे वारे अधिक धोकादायक होतात. सांताअना नावाचे वारे दक्षिण कॅलिफोर्नियात आढळतात. डायब्लो आणि सांताअना या वाऱ्यांमुळे आणि त्या भागात निर्माण झालेल्या ऐतिहासिक अशा मोठ्या उष्णतेच्या लाटेमुळे सप्टेंबर २०२० च्या पहिल्या आठवड्यात आगी भडकल्या आणि मोठ्या प्रदेशात पसरल्या. सप्टेंबरच्या या जंगल आगींच्या हंगामाला  ऑगस्ट कॉम्प्लेक्स म्हटले गेले. कॅलिफोर्नियाच्या कोस्टल रेंज या किनारी भागात ३४ वेगवेगळ्या ठिकाणी आगी लागल्या. २०१८ मध्ये लागलेल्या आगीच्या काळास मेन्डोसिनो कॉम्प्लेक्स म्हटले गेले होते. त्यापेक्षा ऑगस्ट कॉम्प्लेक्स जास्त विध्वंसक असल्याचे दिसून आले. 

यावर्षीच्या सुरुवातीलाच असे भाकीत करण्यात आले होते, की या वर्षी हवामान बदलांमुळे जंगलांना आगी लागण्याची ही घटना अतितीव्र असेल आणि कदाचित दीर्घकाळ राहील. आजपर्यंत झालेल्या उष्णतेच्या नोंदीपेक्षा जानेवारी, फेब्रुवारी २०२० मध्ये कॅलिफोर्नियात झालेल्या तापमानाच्या नोंदींवरून हे भाकीत करण्यात आले होते. मार्चमध्ये प्रखर उष्णतेमुळे इथल्या जंगलातील अनेक झाडे मरून गेली होती आणि तेव्हापासूनच जंगलांना आगी लागण्याचा धोका स्पष्ट दिसत होता.

त्यादृष्टीने या येऊ घातलेल्या संकटाचा सामना कसा करता येईल, याचा आधुनिक तंत्रज्ञान वापरून अभ्यास सुरू झाला होता. पण प्रत्यक्षात या आपत्तीची तीव्रता फार मोठी असल्यामुळे त्याच्या निवारणात फार मोठे यश मिळू शकले नाही. 

असे वणवे लागून जंगले मोठ्या प्रमाणावर जळून नष्ट होतात. कालिफोर्नियासाठी तर हा नेहमीचाच अनुभव. उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासातून जंगलातील विविधता वणव्यामुळे कशा प्रकारे नष्ट होते त्याची नेमकी कल्पना येते. उर्ध्वगामी होणारे धुराचे पट्टे, त्यांची पसरण व त्यांनी प्रभावित क्षेत्र उपग्रह प्रतिमांवर ठळकपणे दिसून येते. उपग्रह प्रतिमांचा (Satellite Images) यासाठी खूप चांगला वापर करता येतो व नकाशेही तयार करता येतात. 

उपग्रह प्रतिमेवर वणव्याची ठिकाणे व तिथून बाहेर पडणारा धूर निळसर रंगात दिसतो. मिथ्यावर्ण (False colour) उपग्रह प्रतिमेत हे निर्देशन आणखीनच अचूक होते. उपग्रह प्रतिमांचा चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी जी आय एस संगणक संहिता वापरल्या जातात. प्रतिमेवरून वणव्याने प्रभावित क्षेत्राचा नकाशा तयार केला जातो आणि त्यावर आगीचे प्रमाण, वाऱ्याची दिशा, तापमान, भूप्रदेशाची उंची, झाडांची घनता अशी विविध प्रकारची माहिती नोंदवून तो अधिक उपयुक्त केला जातो. वणवा कसा पसरेल याचे दूरगामी भाकीत करणे हे अजूनही कठीण काम असले, तरी उपग्रह प्रतिमा वापरून केलेले नकाशे, भाकीत करायला खूपच मदत करतात असे दिसून आले आहे. मात्र ही गाणितेही उष्णतेच्या लाटा, स्थानिक हवामान बदल अशा घटनांमुळे आजकाल चुकू लागली आहेत. हेच नेमके याही प्रसंगात दिसून आले आहे!

फोटो फीचर

संबंधित बातम्या