प्रसंगावधान

- डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 25 जानेवारी 2021

किशोर कथा
 

शाळेमध्ये आज एकदम उत्साही आणि रंगीबेरंगी वातावरण होतं. नेहमीच्या बोअरिंग त्याच त्या युनिफॉर्ममधून सगळ्यांना सुटका मिळाली होती. आज शाळेचं स्नेहसंमेलन होतं. त्यानिमित्तानं सगळ्यांनी पारंपरिक कपडे घालून यायचं होतं. लाल-निळ्या-पिवळ्या-हिरव्या रंगांचे ड्रेस घातलेल्या मुली आणि कुर्ते-पायजमे घातलेली मुलं यांनी शाळेचं पटांगण अगदी भरून गेलं होतं. काही उत्साही मुलांनी फेटे बांधले होते आणि दहावी ‘ब’च्या मुली तर नऊवारी साड्या नेसून आल्या होत्या.

स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम संपले. सौम्या, निधी, गायत्री, महिमा आणि आर्याची अगदी घट्ट मैत्री. ‘‘ए आर्या, तो रमण तुझ्याकडंच बघतोय हं केव्हाचा. काय विशेष?’’ निधी आर्याला कोपरानं ढोसत म्हणाली. 

आर्यानं डोळे फिरवले, ‘‘शी, काहीही काय! मला अज्जिबात आवडत नाही हं तो!’’ हे ऐकून ग्रुपमधल्या इतरांनीही त्याच्याकडं वळून पाहिलं आणि सगळ्या हसायला लागल्या. रमण एकदम कानकोंडा झाला आणि तिथून निघून गेला.

‘‘चला चला, उशीर होतोय. निघूया आता,’’ करत हळूहळू सगळे पांगले. निधी आणि आर्या एकाच सोसायटीत राहायच्या, शाळेपासून जवळच. त्या चालत चालत निघाल्या.  “हं, सांग आता. काय म्हणतोय रमण?” निधीनं आर्याला विचारलं. 

“च्, कुठे काय? का पीळ मारतेयस मला केव्हाची? सांगितलं ना एकदा? मला आवडत नाही तो अजिबात! निधी, ही सेटिंग लावायची सवय सोड आता तू.” आर्या वैतागून म्हणाली. 

वर्गातल्या कितीतरी जणांना कुणी ना कुणी बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड होते. सारखी चिडवाचिडवी चालायची. आर्या या सगळ्यापासून दूर असायची. त्यांच्या ग्रुपनं ठरवलं होतं की आता आर्याचं जमवून द्यायचं. ती जबाबदारी निधीवर टाकली होती. रमण निधीचा मित्र. निधीनं मनाशी काहीतरी ठरवलं आणि जाताना आर्याला म्हणाली, “टेकडीवर चार वाजता आपण सगळे भेटणार आहोत, ये हं नक्की.” नंतर फोन करून रमणला सांगितलं, “टेकडीवर जा चार वाजता, आर्याला यायला सांगितलंय. आम्ही नाही येणारे कुणी. तू बोल आर्याशी.”

निरोपानुसार आर्या टेकडीवर बरोबर चार वाजता पोचली. ‘आज इतक्या लवकर का बरं भेटायचं ठरवलंय या मुलींनी? आणि इथं तर कुणी दिसतसुद्धा नाहीये.’ ती इकडंतिकडं बघत विचार करत होती. टेकडीवरचा गार वारा खात ती एका दगडावर बसली. कितीतरी चिमुकले पक्षी गोड आवाज करत इकडून तिकडं उडत होते. घाणेरीच्या लाल-केशरी फुलांचा गोडसर वास दरवळत होता आणि भुंगे गुं गुं करत आपल्याच मस्तीत त्या झुडपांमधून आतबाहेर करत होते. त्या थंड शांत वातावरणात आर्याची मस्त तंद्री लागली. कसल्यातरी आवाजानं ती एकदम दचकली. तीन-चार माणसांच्या बोलण्याचा आवाज येत होता. बोलत कसले, भांडतच होते ते लोक. आवाजावरून असं वाटत होतं की त्यांनी दारू प्यायली असावी. आर्या हळूच थोडीशी सरकली आणि त्यांना दिसणार नाही अशा बेतानं झुडपाच्या मागं दडली. तिला जरा भीती वाटायला लागली होती. आईबाबा एकदा पेपर वाचत असताना बोलत होते, ते तिला आठवलं. ‘टेकडीवर फिरायला आलेल्या मुलाला आणि मुलीला धाक दाखवून लुटलं,’ अशी काहीतरी बातमी ते वाचत होते. ‘बाप रे, आता काय करायचं? मदतीला दुसरं कुणी दिसतही नाहीये इथं! आणि ग्रुपमधले सगळे आहेत कुठं? मी वेळ चुकीची ऐकली की काय? तसे कराटे येतात मला, पण तीन-चार मोठ्या माणसांसमोर निभाव लागणं कठीण आहे.’ आर्यांनं छाती भरून खोल श्वास घेतला आणि स्वतःला शांत करायचा प्रयत्न केला. घाबरून जाऊन काही उपयोग होणार नाही, उलट आपण आयते त्यांच्या तावडीत सापडू, हे तिला माहिती होतं.

थोड्या वेळानं धडधडत्या छातीनं तिनं हळूच डोकावून पाहिलं आणि ती भयंकर दचकली. ती चांडाळचौकडी तिच्या अगदी जवळच पोचली होती. अचानक तिच्या पायाखाली एक काटकी मोडली. त्या शांततेत तो आवाज केवढ्या तरी मोठ्यानं ऐकू आला. त्या आवाजानं त्यांच्यातल्या एकाचं तिच्याकडं लक्ष गेलं. “ए मुली, इकडं ये. आणखी कोण आहे तिकडं?” तो गुरगुरत म्हणाला. “क-कुणी नाही, मी एकटीच आहे.” आर्यानं थरथरत उत्तर दिलं. “एकटीच आहेस?” त्या माणसाचे डोळे एकदम खुनशीपणे चकाकले. तोपर्यंत इतर तिघंही आपसातलं भांडण थांबवून तिच्याकडं बघायला लागले. आता मात्र आर्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकायला लागले. तिनं पुन्हा एकदा खोल श्वास घेतला, आजूबाजूला पाहिलं आणि कुणाच्या लक्षात येण्याआधी ती पळत सुटली. वाटेतल्या मोडक्या फांद्या, काटेकुटे, कश्शाची पर्वा न करता धावत सुटली. कसंही करून या लोकांपासून दूर जायचं, इतकंच तिच्या डोक्यात होतं. एका झुडपात तिचा स्कार्फ अडकला, तर तिनं तो काढून फेकून दिला. मधेच तिनं मागे वळून पाहिलं, ती माणसं दिसत नव्हती आता. बहुधा ते तिच्या अचानक पवित्र्यानं गोंधळून गेले. शिवाय तिच्या वेगानं त्यांना पळता आलं नसणार.

आता ती जरा माणसात आली होती. फिरायला आलेले अनेक जण दिसायला लागले. त्यांच्यात तिच्या शेजारचे काका-काकूही होते. धापा टाकत येणाऱ्या आर्याला पाहून ते घाबरलेच. “काय झालं गं?” त्यांनी काळजीनं विचारलं. कसंबसं त्यांना सगळं सांगून आर्या मटकन खाली बसली. त्यांनी तिला पाणी प्यायला दिलं. तीन-चार धडधाकट लोक तिनं दाखवलं त्या दिशेनं गेले. तेवढ्यात इतरांच्या मागे रेंगाळत असलेला रमण हळूच पुढे आला. “तू? तू इथं कसा? बाकीच्या सगळ्याजणी कुठं आहेत?” आर्यानं त्याला संशयानं विचारलं. रमणनं तिची नजर चुकवली आणि तिला सगळा उलगडा झाला. “या निधीला बघतेच आता! काही खरं नाही तिचं!” 

ताडकन उठून तरातरा चालायला लागलेल्या आर्याकडं रमण आ वासून बघतच राहिला.

संबंधित बातम्या