अरे अरे रागा..!

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

किशोर काथा

त्या  अबलख घोड्यावर बिपीन कसाबसा जीव मुठीत धरून बसला होता. घोडा वेगात दौडत होता. हिरवीगार झाडी, झुळूझुळू वाहणारे झरे आणि फाटे फुटलेल्या पायवाटा झपाझप मागे पडत होत्या. घोड्याची शक्ती, त्याच्या स्नायूंच्या दमदार हालचाली, त्याचे ताठ उभे राहिलेले कान आणि त्याचे उष्ण श्वास बिपीन अगदी जवळून अनुभवत होता. अचानक घोडा उधळला. रस्ता सोडून तिसरीकडेच धावायला लागला. खड्ड्यांमधून, ओबडधोबड दगडांवरून उड्या मारत तो वाकडातिकडा धावत होता. बिपीनच्या चुचकारण्याला तो दाद देईना. बिपीनला घाम फुटला. त्याचे हात थरथर कापायला लागले. लगामावरची त्याची पकड सुटली, आणि धडाम! घोड्याच्या पाठीवरून तो दूरवर फेकला गेला.

आपल्या मऊ, उबदार बिछान्यात स्वप्नातून दचकून जागा झाला, तेव्हा बिपीन घामानं भिजला होता. त्याची छाती धडधडत होती. झाडांचा आणि ओल्या मातीचा वास अजूनही नाकाला जाणवत होता. ‘बाप रे, काय भीतीदायक स्वप्न होतं ते! काही ताबाच राहिला नाही त्या घोड्यावर. खरं तर मी कधी प्रत्यक्षात घोड्यावर बसलेलो नाही, कुठून ही स्वप्नं पडतात कोण जाणे!’

पंधरा वर्षांचा बिपीन तसा अगदी शहाणा मुलगा. पण एक गोष्ट मात्र त्याला नेहमी सतावायची, ती म्हणजे त्याचा राग! मनाविरुद्ध काही घडलं की तो इतका सटकायचा, की बस! बहुतेक वेळा नंतर त्याला त्याचा पश्चात्ताप व्हायचा.

मागच्या आठवड्यात त्याच्या दोस्त मंडळींनी ठरवलं की रविवारी सायकली काढून कुठेतरी दूरवर चक्कर मारायची. गावाबाहेर जवळच एका मित्राचा, सिद्धांतचा मळा होता. तिथपर्यंत जायचं ठरलं. परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या. आठवडाभर बिपीननं सायकल चालवली नव्हती. रविवारी सकाळी लवकर उठून तो जाण्यासाठी उत्साहात तयार झाला. पाठीवर छोटी सॅक आणि डोक्यावर कॅप. “जाऊन येतो गं आई!” बाहेरूनच जोरात ओरडून त्यानं दरवाजा ओढून घेतला आणि शीळ मारत बरोबर नेलेल्या फडक्यानं सायकलवरची धूळ झटकली. सायकलचं कुलूप काढलं. सीटवर हातानं थाप मारली. त्यावर टांग टाकणार एवढ्यात बघतो तर काय! मागचं टायर एकदम फ्लॅट! झालं, त्याची खूप चिडचिड झाली.  त्याचा उत्साहही टाचणी लागलेल्या फुग्यासारखा फ्लॅट झाला.  रागानं त्यानं सायकलला एक लाथ मारली. ‘‘ओय ओय!’’ तो कळवळून ओरडला, त्याची लाथ तिथल्या एका दगडावर बसली होती. ‘‘कसलं खत्रूड नशीब आहे! या सायकलीला आत्ताच पंक्चर व्हायचं होतं का? आता उशीर होणार मला. दुकान तरी उघडलं असेल की नाही कोण जाणे!’’ रागारागानं सायकल ओढत तो जवळच्या सायकल दुकानाकडे निघाला. संतापाच्या भरात आपण सायकलचं पंक्चर झालेलं चाक फरफटत नेतोय हे ही त्याच्या लक्षात आलं नाही. नशिबानं दुकान उघडलेलं होतं. दुकानदार काका ओळखीचे होते. ते म्हणाले, ‘‘तू हवा भरून बघितली होतीस का आधी? तुमच्या सोसायटीतली उपद्व्यापी पोरं हवा सोडून देतात बघ नेहमी!’’ बिपीनच्या हे लक्षातच आलं नव्हतं. काकांनी ट्यूब काढून चेक केली. ‘‘आरारा, पार फाटून गेलीय की रे ही ट्यूब! तू चाक उचलून आणलं नाहीस का? आता बदलायलाच लागणार ही. दुकानं उघडल्याशिवाय नवीन ट्यूब मिळणार नाही, ठेवून जा सायकल इथंच.’’

बिपीनच्या संतापाची जागा आता दुःखानं घेतली होती. डोळ्यांत येऊ पाहणारं पाणी कसंबसं रोखून धरत तो घरी आला. ‘येत नाही’ म्हणून मित्रांना कळवलं. त्याला घरात बघून आईबाबा चकित झाले. बिपीननं मग त्यांना काय झालं ते सांगितलं. त्यांना सांगता सांगता त्याच्या स्वतःच्याच लक्षात आलं काय गडबड झाली असावी ते. एकतर त्यानं सायकल आधी बघून ठेवली नव्हती. दूरवर फेरफटका मारायचा म्हणजे खरं तर हवा-बिवा तपासून ठेवायला हवी आधीच. फ्लॅट टायर बघून त्याला इतका राग आला की त्या भरात ‘कुणीतरी हवा सोडली असेल, ती आधी भरून बघावी’ ही साधी गोष्टसुद्धा सुचली नाही. दुकानात पोचेपर्यंत टायर खराब झाला होता. नुसती हवा भरून जो प्रश्न सुटला असता, तो असा भला मोठा झाला. खर्चापरी खर्च आणि मित्रांबरोबरची मजा बुडली ते वेगळंच! अति संतापानं त्याला चांगलाच धडा शिकवला आज. ‘आता बास! माझ्या रागावर  मला ताबा ठेवायला शिकायलाच पाहिजे. तो स्वप्नातला घोडा म्हणजे माझा रागच असणार. ज्यावर माझा बिलकूल कंट्रोल नाही, जो मला संकटात फेकून देतो, असा राग! आता मात्र त्याचा लगाम मी माझ्या हातात घट्ट पकडून ठेवणार.’

विचारांच्या तंद्रीत झोपायला गेलेल्या बिपीनला आज पुन्हा ते घोड्याचं स्वप्न पडलं. आज मात्र तो घोड्यावर ऐटीत बसला होता. वेगानं दौडत, भणाणणारा वारा छातीत खोलवर भरून घेत तो त्या स्वारीचा मनापासून आनंद घेत होता. त्याचे हात ठामपणे लगामाला काबूत ठेवून होते. त्याची सहज पण पक्की मांड घोड्यालाही जाणवत असणार. त्यानं बिपीनचं स्वामित्व मुळी मान्यच करून टाकलं होतं. खूप आत्मविश्वासानं दौड पुरी करून बिपीन पायउतार झाला, त्यानं हलकेच घोड्याच्या पाठीवर प्रेमानं थोपटलं आणि तो  समाधानानं हसला!

संबंधित बातम्या