लढा, पळा, थांबा!

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 8 मार्च 2021

किशोर काथा

“काका, आज काही झालं तरी गोष्ट हवी हं आम्हाला!” अनिश आणि आभा हट्टाला पेटले होते. जीवशास्त्रज्ञ असलेला त्यांचा लाडका समीरकाका येऊन दोन दिवस झाले होते, पण गोष्टीचा मुहूर्त काही लागला नव्हता अजून. काका मान हलवत म्हणाला, “अरे, हायस्कूलला जाता आता तुम्ही, गोष्टींचा कसला हट्ट धरता? बरं ठीक आहे, गोष्टीचं नाव आहे ‘रानातला एक दिवस’ ” आणि गोष्ट सुरू झाली. 

‘ते  एक घनदाट जंगल होतं. भरदिवसा अंधारलेलं आणि रातकिड्यांचा किर्र आवाज येणारं. उंच-उंच वाढलेल्या झाडांनी आपल्या पानांच्या छत्र्या पिसारल्या होत्या. सूर्यकिरणांना जमिनीपर्यंत पोचायला जणू मज्जाव होता. त्या सरळसोट खोडांना भल्यामोठ्या वेली बिलगल्या होत्या. जमीन पाला-पाचोळ्यानं भरून गेली होती. चालताना वाळलेल्या पानांचा आवाज येत होता. मधूनच त्या पार्श्वभूमीत बेमालूमपणे मिसळून गेलेला एखादा सरडा सुळकन इकडून तिकडे सरपटत जात होता. गर्द झाडीमुळे बोलण्याचे आवाजही दबले जात होते.

चानी, चीतू आणि बाका आज हट्ट करून बाहेर पडले होते. मोठ्यांच्या देखरेखीशिवाय जाण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. जवळचं अन्न संपलं होतं. वडील दूरच्या मोहिमेवर गेलेले. ते अजून परत आले नव्हते. घरात छोटं बाळ होतं, त्यामुळे आईला बाहेर पडता येत नव्हतं. एकूण काय, नाइलाजानं का होईना, आईला त्यांना जायला परवानगी द्यायलाच लागली होती. नाहीतर उपासमारीची वेळ आली असती.  

चानी उड्या मारत पुढे चालली होती. चालता चालता नेहमीप्रमाणे तिची बडबड चालू होती. चीतू वाटेतल्या पानाफुलांचं बारकाईनं निरीक्षण करत होता. इतक्या रंगांची आणि आकारांची पानं पाहून त्याला नेहमी नवल वाटायचं. बाका मात्र सावधपणे इकडे तिकडे बघत चालला होता. वाटेत येऊ शकणाऱ्या धोक्यांची त्याला पुरेपूर कल्पना होती. 

आज त्यांना पोचायचं होतं काही अंतरावर असलेल्या एका तळ्यापर्यंत. तळ्याचा काठ उथळ होता. तिथं खूप मासोळ्या पकडता यायच्या. शेकोटीवर भाजलेल्या ताज्या मासोळ्या चानीच्या आवडीच्या. म्हणून तर ती सगळ्यात पुढे चालली होती. तळ्याच्या काठावर एक वनस्पती उगवायची, मुलांना तिचं नाव माहिती नव्हतं, पण त्यांनी तिचं नाव ठेवलं होतं ‘रसाळी’! त्या वनस्पतीची रसरशीत फळं खूप चविष्ट लागायची. शिवाय त्याचं कोवळं देठ जातायेता चघळायला मजा यायची. 

बाकाला रस्ता माहिती होता. तळ्याजवळ पोचल्यावर चानी आणि चीतू खूश होऊन उड्या मारायला लागले. तिघांनाही तहान लागली होती. तळ्याचं निवळशंख स्वच्छ पाणी ते घटाघटा प्यायले. गार गार पाणी तोंडावर मारून घेतल्यावर त्यांचा सगळा थकवा पळाला. थोडं ताजंतवानं झाल्यावर मुलं कामाला लागली. बाका व चानी मासे पकडायला लागले आणि चीतू रसाळीची झाडं शोधायला लागला. थोडावेळ तिथे शांतता पसरली. चीतू वनस्पती शोधता शोधता गुणगुणत होता. तेवढ्यात त्याला गुरगुरण्याचा आवाज आला. त्यानं सावध होऊन वर पाहिलं. तर काही अंतरावरच्या झाडोऱ्यात दोन डोळे चमकत होते. चीतू घाबरून जागच्या जागीच थिजून उभा राहिला. त्याचे हातपाय जणूकाही कुणीतरी घट्ट धरून ठेवले होते. चीतूचं गाणं एकदम का थांबलं म्हणून चानी आणि बाका बघायला लागले. समोर वाघ बघून चानी इतकी घाबरली, की ती धूम पळत सुटली. बाका जवळचा दंडुका हातात घट्ट धरून तयारीत राहिला. शक्यतो आपणहून वाघावर चाल नको करायला, त्याच्या ताकदीपुढे आपला आणि आपल्या दंडुक्याचा टिकाव कुठला लागतोय! 

बाका श्वास रोखून तयारीत, चानी दुरून वाकून बघतेय आणि चीतू घाबरून दगड झालेला. दोन-तीन मिनिटंच गेली असतील, त्यांना मात्र ती तासाभराएवढी लांबलचक वाटली. थोड्या वेळानं वाघ शांतपणे वळला आणि निघून गेला. ‘हुश्श! थोडक्यात वाचलो!’ इतका वेळ रोखलेला श्वास बाकानं सोडला, चीतूच्या पायात जान आली, पळून गेलेली चानी हळूच परत आली. तिघांचे चेहरे घामानं चिंब झाले होते आणि त्यांच्या छातीत धडधड होत होती. एकमेकांना घट्ट पकडून, हातातलं सामान सांभाळत मुलं परतली. आईला सगळं सांगताना मात्र हळूहळू त्यांची भीती पळून गेली. उलट त्यांना आता सगळ्याची मजाच वाटायला लागली. ‘अगं आई, आपला बाका कसला शूर आहे माहितेय! न घाबरता उभा होता दंडुका घेऊन.’ चानी अभिमानानं भावाकडे बघत म्हणाली. ‘हो ना, माझी तर पार तंतरली होती!’ चीतूला त्या आठवणीनंही कापरं भरलं. आणलेल्या मेव्याची त्यांनी मस्त मेजवानी चापली. कधी एकदा वडील परत येतात आणि त्यांना आपला पराक्रम सांगतो असं त्यांना झालं होतं. त्यांच्या येण्याची वाट बघत केव्हा झोप लागली, त्यांना कळलंसुद्धा नाही.’

“काका, अरे पण वाघ तिघांनाही एकाच वेळी दिसला, मग तिघंही असे वेगवेगळे का वागले?” हातातला रुबिक क्यूब बाजूला करून अनिशनं विचारलं. काका मिशीतल्या मिशीत हसला. “एकदम बारीक निरीक्षण आहे रे तुझं, अन्या! तुमच्या लक्षात आलं असेल, की ही गोष्ट खूप पूर्वी घडलेली आहे. जेव्हा माणूस जंगलात राहायचा, मिळेल ते खायचा, तेव्हा. आहे त्या परिस्थितीत तो तेव्हा चिकाटीनं तग धरून राहायचा, जीव वाचवायचा. त्याच्याकडे कुठली भारी शस्त्रं नसायची. आपापल्या कुवतीनुसार तो संकटांचा सामना करायचा. आता या तिघांचंच बघा ना! छोट्या चानीनं पळून जाऊन आपला जीव बचावला. चीतूचं म्हणशील तर तो जर एका जागी स्तब्ध उभा राहिला नसता, तर वाघाला त्याच्यापासून धोका आहे असं वाटलं असतं आणि त्यानं त्याच्यावर हल्ला केला असता. बाका हातात मिळेल ते शस्त्र घेऊन तयार होता, गरज पडलीच तर वाघाशी दोन हात करायला. तिघांच्याही प्रतिक्रिया उत्स्फूर्त होत्या - Fight, flight किंवा freeze! लढा, पळा किंवा थांबा! जगण्यासाठी गरजेच्या असल्यामुळे आपल्या मेंदूत खोलवर रुजल्यात या प्रतिक्रिया पूर्वीपासूनच.’’

इतका वेळ तोंड उघडं टाकून गोष्ट ऐकत बसलेली आभा गंभीर चेहऱ्यानं म्हणाली, “मला तर बुवा आमची परीक्षा पण वाघासारखीच वाटते. गंमत म्हणजे मी कधीकधी चानीसारखी त्यापासून पळून जाते, कधीकधी चीतूसारखी घाबरून गार होते, आणि कधीकधी तर बाकासारखी परीक्षेशी झटापट करते आणि नको त्या चुका करून ठेवते.”

“हं, परीक्षा हा काही वाघ नव्हे, इतकं आजच्या गोष्टीतून लक्षात ठेवलंत तरी पुरे!” आइस्क्रीम घेऊन आलेली आई हसत  हसत म्हणाली.

संबंधित बातम्या