बाप रे! भूत!

- डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 17 मे 2021

किशोर काथा
 

कारगाव हे एक अगदी छोटंसं गाव. गावाजवळून वाहणाऱ्या कारी नदीवरच्या धरण प्रकल्पावर काम करणाऱ्या लोकांसाठी एका बाजूला बांधलेल्या आखीव-रेखीव टुमदार क्वार्टर्स. प्रत्येक घराला नेटकं अंगण आणि त्यात लावलेली अबोलीची आणि कोरांटीची झाडं. त्यांच्या मधून जाणारे अरुंद पण सरळसोट रस्ते. मधोमध एक प्रशस्त करमणूक केंद्र. त्यात गणपतीपासून सगळे कार्यक्रम साग्रसंगीत पार पडायचे. 

कॉलनीचा वार्षिक महोत्सव म्हणजे धमाल असायची. रांगोळ्या, नाटकं, विविध गुणदर्शन; असे खचाखच कार्यक्रम असत. दुसऱ्या बाजूला छोटंसं मूळ गाव. त्यात एक भाजीबाजार, एक मासळी बाजार आणि काही किरकोळ दुकानं. गाव डोंगराच्या कुशीत होतं. लोकसंख्या तशी कमीच. तिथले स्थानिक कातकरी डोंगरावरचा मेवा गावात विकायला यायचे.

सावंत कुटुंबीय तिथे नवीनच राहायला आलं. तनय नववीत आणि श्यामली सातवीत. शेजारच्या मुलांशी त्यांची लगेच गट्टी झाली. श्यामली सगळ्यांच्यात लहान. भित्री तर इतकी, साधं लपाछपी खेळतानासुद्धा सहज सापडायची, कारण कुठेतरी खबदाडीत लपायला जायचीच नाही. त्यावरून सगळे नेहमी तिची थट्टा करायचे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या. मुलांनी दिवसभराचा प्लॅन केला. घरून डबे घेऊन यायचं. आधी धरणाकडे फिरायला जायचं, येता येता करवंदं तोडायची, कैऱ्या जमवायच्या आणि परत आल्यावर वडाच्या झाडाखाली पारावर करवंद खात, टंगळमंगळ करत बसायचं.

ठरल्याप्रमाणे सगळे सकाळी सकाळी जमले. निघेनिघेपर्यंत उन्हं वर आली. मुलांनी रमतगमत चालायला सुरुवात केली. रस्ता रिकामाच होता. दहाएक मिनिटं चालल्यावर लांबून एक जमाव येताना दिसला. तनयचं तिकडे लक्ष गेलं आणि तो एकदम ओरडला, “ए ती बघ,प्रेतयात्रा येतेय तिकडून!” बाप रे! सुमिता म्हणाली, “मला भीती वाटतेय. आपण जाऊया इथून. आपल्या मानगुटीवर भूत बसेल नाहीतर.” वरून दाखवत नसले तरी सुमिताचं बोलणं ऐकून मनातून सगळेच घाबरले. आत्तापर्यंत कुणीच असा अनुभव घेतलेला नव्हता. श्यामली तर घाबरून रडायलाच लागली. नंदू त्यांचा म्होरक्या. त्यानं निर्णय घेतला. “ए चला, मी ‘तीन’ म्हटलं की पळत सुटायचं सगळ्यांनी. ते जवळ येण्याआधी सटकूया इथून. एक, दोन, तीन!” 

अर्जुन त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होता. “अरे, का पळताय? घाबरण्यासारखं काही नाही त्यात.” पण त्याचं ऐकायलासुद्धा कुणी थांबलं नाही. सगळेजण आपापल्या वेगानं पळत सुटले. श्यामली जरा मागे पडली. इतर मुलांचे आवाज हळूहळू लांब लांब जात नाहीसे झाले. आजूबाजूला सन्नाटा पसरला. श्यामलीला काही सुचेना. नवीन जागा, अनोळखी रस्ते. वाट फुटेल तिकडे पळता पळता कशी कोण जाणे, ती नदीच्या अगदी जवळ पोचली. तेवढ्यात तिला परत तो जमाव दिसला आणि श्यामलीला धडकी भरली. तिनं भीतीनं डोळे मिटून घेतले.

इकडे सगळेजण ठरल्याप्रमाणे वडाच्या झाडाखाली पोचले. “सुमिता, श्यामली कुठेय? तुझ्याबरोबर होती ना ती?” तनयनं विचारलं. “मला नाही माहीत, मला वाटलं तुझ्याबरोबर आहे.” सुमिता कावरीबावरी होऊन म्हणाली. “अरे येईल ती, एवढं काय घाबरता? वाट बघू आपण.” 

नंदू असं म्हणाला खरा, पण अर्धा-पाऊण तास झाला तरी श्यामली आली नाही. शेवटी तिला शोधायला जायचं ठरलं आणि ते आल्या वाटेनं परत निघाले. मुलं जरा दडपणाखाली होती. जाताना बडबड करत, दंगामस्ती करत जाणारी मुलं आता चुपचाप इकडे तिकडे शोधत चालली होती.

“ती बघ!” सुमिता ओरडली. लांबून श्यामली येताना दिसली. तिचे केस विस्कटलेले होते, एका पायातली सँडल तुटली होती, ती एक पाय ओढत, फरफटत चालली होती. ती जवळ आली. तिची नजर त्यांच्या दिशेला होती पण ती तिसरीकडेच बघत होती. तिला तसं बघून तनय घाबरून ओरडला, “श्यामली, अशी काय विचित्र दिसतेयस? ए, इकडे बघ.” त्यानं तिचे खांदे धरून गदागदा हलवले. सुमिता म्हणाली, “मला वाटतं तिला भुतानं झपाटलंय. लवकर पळाली नाही ना ती!” अर्जुन म्हणाला, “सुमिता, भूत-बीत काही नसतं. घाबरली असेल ती. तू आणखी घाबरवशील तिला असलं काहीतरी बोलून.” पण तनयला जाम टेन्शन आलं होतं, “अरे पण मग ती बोलत का नाहीये? आणि नीट बघतपण नाहीये आपल्याकडे. आई चांगलीच ओरडणार आहे मला. तिच्याकडे लक्ष ठेव असं मला बजावलं होतं तिनं.” श्यामलीनं तेवढ्यात डोळे फिरवले, तिच्या घशातून काहीतरी विचित्र आवाज आला. ती हातपाय झाडायला लागली. कुणीतरी श्यामलीच्या तोंडात बाटलीतलं पाणी घातलं, तर तिनं ते न गिळता तसंच थुंकून टाकलं. आता मात्र सगळे थरथरायला लागले. तनयला रडू फुटलं.

“आता काय रे करायचं?” अर्जुननं हताश होऊन नंदूकडे पाहिलं. नंदू म्हणाला. “हिला डॉक्टरकाकांकडे घेऊन जाऊया आपण आधी. आणि तिथूनच काकूंना फोन करूया.” 

तेवढ्यात त्यांना मोठ्ठ्यांदा हसण्याचा आवाज आला. बघितलं तर श्यामली हसत होती. ‘आता हे काय नवीन? हिला परत काही ॲटॅक आला की काय?’ पण छे, ती खरंच मिश्कीलपणे हसत होती. “अरे, मजा करत होते मी तुमची!” ती हसता हसता म्हणाली. 

झालं होतं असं की श्यामलीला रस्त्याचा काही अंदाज आला नाही आणि ती नेमकी परत त्या लोकांपर्यंतच पोचली. धक्क्यानं तिला चक्कर येतेय की काय असं वाटायला लागलं. तेवढ्यात शिंदेकाकांनी तिला पाहिलं आणि हाक मारली म्हणून बरं. “काय झालं गं?” त्यांनी विचारलं. श्यामलीनं कारण सांगितल्यावर ते खो खो हसायलाच लागले. “अगं, ते काही प्रेत नव्हतं काही, लाकडाच्या मोळ्या होत्या त्या. धरणावर लागणार होत्या आम्हाला.” श्यामलीला हे सगळं सांगताना खूपच मजा येत होती. “तिथे बसून आम्ही सगळ्यांनी मस्त चहा-बिस्किटं खाल्ली. मुख्य रस्त्यापर्यंत काका माझ्यासोबत आले आणि मला रस्ता दाखवून परत गेले. वाटेत मी ठरवलं, या गोष्टीचा फायदा घेऊन तुमची चांगली जिरवायची. मग जरा केस-बिस विस्कटले, आणि सुरू केली ॲक्टींग! कसली मजा आली ना? चेहरे बघायला हवे होते तुम्ही आरशात.”

“शहाणे, इथे तुझ्या काळजीनं आम्हाला काही सुचत नव्हतं. त्यात पोटात कावळे ओरडत होते आणि बाईसाहेब स्वतः मात्र मस्त हादडून आल्यात! थांब, बघूनच घेतो तुला आता!” तनय, नंदू, अर्जुन, सुमिता श्यामलीवर धावून गेले. “मग? मला 

चिडवत होतात ना भित्री भागुबाई म्हणून? 

आता कोण घाबरट, अं?” खदाखदा 

हसत श्यामली पळत सुटली.

संबंधित बातम्या