शिकवण

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 31 मे 2021

किशोर काथा

एक कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब. आई, बाबा, दादा आणि मिच असं चौकोनी कुटुंब. बाबा एक छोटीशी नोकरी करायचे. आई गृहिणी. कष्टाला त्यांची ना नव्हती. आणि हो, त्या घरात सर्वात जास्त महत्त्व होतं शिक्षणाला, खेळाला आणि चांगलं वागण्याला. आईबाबा चुकूनसुद्धा कधी मुलांना पैशाच्या टंचाईबद्दल बोलून दाखवायचे नाहीत. पण त्यांच्या कष्टांची मुलांना पूर्ण कल्पना होती. 

व्हिटनी यंग शाळेतल्या दहा-बारा मुली आणि त्यांची फ्रेंच शिक्षिका शिकागो विमानतळावर जमल्या. त्यातल्या बहुतेकींची विमानात बसायची पहिलीच वेळ होती. उत्सुकतेनं आणि काहीशा भीतीनं त्या विमानतळाचं निरीक्षण करण्यात मग्न होत्या. त्या सगळ्याजणी फ्रेंच शिकत होत्या. पॅरिसला जाऊन तिथल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यायच्या आणि मुख्य म्हणजे फ्रेंच भाषेचा प्रत्यक्ष फ्रेंच लोकांशी बोलून सराव करायचा असा त्यांच्या या ट्रीपचा उद्देश होता. मिचनं खिडकीची जागा पटकावली होती. त्या भल्यामोठ्या जेट विमानानं आकाशात झेप घेतली. मिचनं खिडकीतून दूर दूर जात नाहीशा होणाऱ्या शिकागो शहराकडे पाहिलं आणि समाधानानं डोळे मिटून घेतले.

शिकागोमधल्या ब्रॉन्झव्हिल नावाच्या उपनगरात राहणारं त्यांचं एक कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब. आई, बाबा, दादा आणि ती असं चौकोनी कुटुंब. बाबा एक छोटीशी नोकरी करायचे. आई गृहिणी. कष्टाला त्यांची ना नव्हती. आणि हो, त्या घरात सर्वात जास्त महत्त्व होतं शिक्षणाला, खेळाला आणि चांगलं वागण्याला. आईबाबा चुकूनसुद्धा कधी मुलांना पैशाच्या टंचाईबद्दल बोलून दाखवायचे नाहीत. पण त्यांच्या कष्टांची मुलांना पूर्ण कल्पना होती. आपल्याला एक प्रेमळ उबदार घर आहे, शाळेत बसनं जाण्याइतके पैसे मिळतायत, आणि घरी पोचल्यावर गरमगरम जेवण मिळतंय यावर ती खूश होती. वायफळ गोष्टींसाठी ती अजिबात हट्ट करायची नाही.

घर छोटंसं होतं, त्यातली परसदारची छोटीशी खोली दादाची. त्याच्या पुस्तकांनी खोली भरून गेली होती. शिवाय तो हायस्कूलमधला लोकप्रिय आणि यशस्वी बास्केटबॉल खेळाडू होता. त्यामुळे बास्केटबॉल, बूट, मोजे आणि खेळायच्या जर्सी यांनीही खोलीचा मोठा भाग व्यापला होता. मिच अभ्यासाला खाली राहणाऱ्या आजीकडे जायची. दादाचं हायस्कूल संपल्यावर त्याला त्याच्या मार्कांच्या जोरावर एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्याच्या बास्केटबॉलमधल्या कौशल्यामुळेही तिथले अधिकारी प्रभावित झाले होते.

आता घरात फक्त तिघेजण राहिले. मिचचा अभ्यास वाढला होता. ती बसने शाळेत जायची. बसायला जागा मिळावी म्हणून ती आणि टेरी, तिची मैत्रीण, घरातून पंधरा मिनिटं लवकर निघायच्या. संध्याकाळी दमून आली की ती थोडंफार खाऊन आईला मदत करायची आणि वह्या पुस्तकं घेऊन अभ्यासाला पळायची. मोठी होऊन मुलांची डॉक्टर व्हायचं असं तिनं ठरवलं होतं, कारण तिला मुलं फार आवडायची.

मिच शाळेत फ्रेंच शिकायची. फारसं सोपं जात नव्हतं ते तिला, पण ती जिद्दी होती. पुन्हा पुन्हा प्रयत्न केले की काहीही जमू शकतं यावर तिचा ठाम विश्वास होता. एके दिवशी त्यांच्या शिक्षिका वर्गात आल्या. “मुलींनो, एक आनंदाची बातमी आहे. फ्रेंच शिकणाऱ्या विद्यार्थिनींची आम्ही एक ट्रीप नेणार आहोत. कुठे माहितेय का? थेट पॅरिसला! प्रत्यक्ष फ्रान्समध्ये जाऊन भाषेचा सराव करायची संधी मिळणार आहे तुम्हाला. आपल्याला विमानाच्या तिकिटात सूट मिळणार आहे आणि आपण तिथे एका हॉस्टेलवर राहणार आहोत.

पण तरी खर्च जरा जास्त आहे हं! आपापल्या घरी विचारून मला सोमवारपर्यंत सांगा. म्हणजे बुकिंग करता येईल.” वर्गात एकदम चिवचिवाट सुरू झाला. सगळ्या मुली उत्साहानं एकाच वेळी बोलायला लागल्या. पण हळूहळू आवाज कमी झाले. त्यातल्या काही मुलींच्या लक्षात आलं की एवढा खर्च करणं आपल्याला अशक्य आहे. त्यांचे चेहरे हिरमुसले झाले. “मी काही झालं तरी आईला पटवणार आहे. ती एकदा हो म्हणाली की बाबा जाऊ देतीलच.” जेन म्हणाली. “किती लकी आहेस, गं!” समांथा हेव्यानं म्हणाली. “माझी यावर्षीची फी भरायलाच आमच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे मी कितीही मागे लागले तरी काही उपयोग होणार नाही. तुझं काय मिच?” मिच शांतपणे बसली होती. ती म्हणाली, “नाही गं, मी सांगणारच नाहीये आईबाबांना. आधीच दादाला पैसे पाठवायचे असतात. मी विचारलं आणि त्यांना जमलं नाही तर त्यांना फार वाईट वाटेल. मला नकोय ते.” आणि काहीच न झाल्यासारखी ती समोरचं पुस्तक वाचायला लागली.

शनिवारी संध्याकाळी निवांत गप्पा मारत जेवायचा त्यांचा रिवाज होता. जेवण झाल्यावर आवराआवरी झाल्यावर मिच म्हणली, “आsहा, मस्त होतं आजचं पुडिंग. जाम पोट भरलं माझं. चला, आज खूप होमवर्क दिलंय आम्हाला. जाऊ मी अभ्यासाला?” “एक मिनिट, जरा इकडे ये.” बाबा गंभीरपणे म्हणाले. “काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का?” मिचनं चाचरत विचारलं. आई म्हणाली, “टेरीची आई भेटली होती आज. हे फ्रान्स ट्रीपचं काय? काही बोलली नाहीस तू?” “नाही सांगितलं. अगं, फार पैसे लागणार आहेत त्याला.” “हे तू कोण ठरवणार, मिच?” बाबांचा आवाज जरा दुखावलेला होता. “आणि आम्हाला काही महितीसुद्धा नसेल, तर आम्ही तरी कसं ठरवणार?” मिचनं तिच्या आईबाबांकडे पाहिलं. 

बाबांनी त्यांचा कामाचा युनिफॉर्म बदलून घरचा शुभ्र शर्ट घातला होता. स्वयंपाक करताना बांधलेला आईचा एप्रन अजून तिच्या कमरेला तसाच होता. ते दोघे त्यांच्या चाळीशीत होते, त्यांचं लग्न होऊन वीस वर्षं झाली होती. इतक्या वर्षात ते एकदाही युरोपला गेलेले नव्हते. त्यांचं स्वतःच्या मालकीचं घर नव्हतं आणि ते शक्यतो हॉटेलिंगवर वगैरे पैसे खर्च करायचे नाहीत. पण कशावर पैसे खर्च करायचे याविषयीच्या त्यांच्या कल्पना अगदी स्पष्ट होत्या. “तू या ट्रीपला जाते आहेस, कळलं?” बाबा ठामपणे म्हणाले.

शेवटी आजचा दिवस उजाडला होता. मिच विमानात बसून पॅरिसला निघाली होती. आईबाबांचा तिला फार अभिमान वाटला. त्यांच्याविषयी मनात कृतज्ञता दाटून आली. पुढे मोठी होऊन मिच डॉक्टर नाही झाली पण वकील झाली. आईबाबांनी न बोलता दिलेली शिकवण ती विसरली नाही, अगदी जेव्हा ती अमेरिकेची फर्स्ट लेडी झाली, तेव्हाही नाही! तिचं नाव? मिशेल ओबामा!

संबंधित बातम्या