उपयोग

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

किशोर काथा

मीराला वॉल-क्लाइंबिंग शिकायचा आता कंटाळा येऊ लागला होता. काय उपयोग आहे हे शिकून असं तिला वाटायला लागलं. क्लास सोडून द्यायचा विचार तिच्या डोक्यात येऊ लागला होता... पण हे आगळंवेगळं ज्ञान मामाच्या गावी गेल्यावर उपयोगी पडणार आहे हे तिला तेव्हा कुठं माहीत होतं...

“मीरा, तुझी क्लासची वेळ झालीय. लवकर निघायला हवं. हल्ली फार अळंटळं करायला लागली आहेस हं तू.” घड्याळाकडे नजर टाकत आईनं हाक मारली. 

“ए आई, आज नाही गेलं तर चालणार नाही का? मला बास झालंय आता वॉल-क्लाइंबिंग. काय उपयोग त्याचा?” मीरा कुरकुरत म्हणाली. “ए, आणि या सुट्टीत आम्ही इथे पुण्यात नाही राहणार हं. आम्ही गावाकडे जाणार, निनादमामाकडे.” जाताना मीरानं जाहीर करून टाकलं. आज दुपारीच तिनं आणि सनतनं यावर जोरदार खलबतं केली होती. दोन वर्षांपूर्वी गावाकडे गेले होते तेव्हा कसली मजा आली होती! तिकडं असताना आईचं त्यांच्याकडे बिलकूल लक्ष नव्हतं. त्यामुळे त्यांना पूर्ण मोकळीक मिळाली होती. मामेभावंडांबरोबर दिवसभर धुडगूस घालायचा, चक्क झाडावर चढून हातानं काढून पेरू आणि आंबे खायचे आणि रात्री उशिरापर्यंत चांदण्यांनी खचाखच भरलेल्या आकाशाकडे बघत गप्पा मारायच्या! 

 “अगं, तुझ्या क्लासचा समर कॅम्प आहे, तो बुडेल ना!” आई म्हणाली. “च्, बुडू दे गं, नाहीतरी मला सोडायचाच आहे तो आता.” मीराचं हे उत्तर ऐकून आईनं डोक्यावर हात मारला. ‘काहीतरी खूळ डोक्यात घेतलंय झालं. किती प्रगती केलीय खरंतर तिनं वॉल-क्लाइंबिंगसारख्या वेगळ्याच क्षेत्रात!’ 

ठरवल्याप्रमाणे हट्टानं मुलं गावाकडे गेली. गेल्या गेल्या भावंडांबरोबर त्यांची मस्ती सुरू झाली. मुलांना गावाकडे येऊन दोन-तीन दिवस झाले होते. आज शेतात जायचं ठरलं होतं. त्यादिवशी सकाळपासून उकडत होतं. बसल्याबसल्यासुद्धा घामाच्या धारा लागत होत्या. “किती गदगदतंय! आज पाऊस येणारसं दिसतंय.” आजी म्हणाली. “लवकर या रे परत शेतातून. अडकून पडाल नाहीतर पावसात.” “हो गं आजी, तू नको काळजी करूस.” बाहेर कडक ऊन पडलं होतं, त्यामुळे आजीच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देता सगळे निघालेसुद्धा. 

पण थोड्याच वेळात एकाएकी आभाळ भरून आलं. जोराचा वारा सुटला. पालापाचोळा उडायला लागला. धुळीचे झोत डोळ्यात जायला लागले. वाऱ्याचा आवाज इतका होता की शेजारी बोललेलंही ऐकू येईना. आकाशात एक डोळे दिपवून टाकणारी विजेची नागमोडी रेषा लखलखली आणि आजूबाजूचा परिसर त्या विचित्र प्रकाशात उजळून निघाला. लगोलग कानठळ्या बसतील असा ढगांचा गडगडाट झाला. “ए चला, लवकर घरी जाऊया. माझ्यामागे या, मला एक शॉर्टकट माहिती आहे.” त्यांचा मामेभाऊ वीर खरोखरच्या शूरवीराच्या भूमिकेत शिरला. तिकडून दहा वर्षांचा मुलगा धावत, धापा टाकत येताना दिसला. तो शेतावर राहणारा मोहन होता. तो खूप घाबरला होता. “दादा, सोनू सापडत नाहीये. मी खूप हाका मारल्या त्याला. पण वादळात काही ऐकूच येत नाहीये बहुतेक.” तो रडत रडत बोलायला लागला. “मला भीती वाटतेय. आई खूप रागावेल रे. सोनूला काही झालं तर?” मीरानं त्याला जवळ घेऊन शांत केलं. “घाबरू नकोस, मोहन. आपण काढू शोधून त्याला. तुम्ही कुठे गेला होतात सांग बरं.” त्यानं सांगितलेल्या खाणाखुणांवरून ते बांधाजवळच्या एका खडकाळ टेकाडाजवळ पोचले आणि सोनूला हाका मारायला लागले. 

सनतचं सहज वर लक्ष गेलं, तर त्याला तिथे दगडाच्या कपारीत काहीतरी हलताना दिसलं. “ते बघा, तिकडे कुणीतरी आहे.” “सोनूsss” मोहननं होता नव्हता तेवढा जोर एकवटून खच्चून हाक मारली. कपारीतून हळूच एक डोकं बाहेर आलं. “दादाsss” बारीक आवाजात उत्तर आलं. “तुला खाली उतरता येईल का सोनू?” वीरनं त्याला विचारलं. “नाही, मी अडकलोय.” सोनू रडवेल्या आवाजात म्हणाला. ‘आता काय करायचं?’ तेवढ्यात मीरा म्हणाली, “मी वॉल क्लाइंबिंग शिकलेय. मी प्रयत्न करते.” “बरं. सोनू, तू तिथेच थांब मग. ताई घ्यायला येतेय तुला.” 

मीरानं एक खोल श्वास घेतला. आत्तापर्यंत ती नेहमी त्यांच्या सरांच्या मार्गदर्शनाखालीच चढली होती. बरोबर सगळं साहित्य असायचं सुरक्षिततेसाठी. आज तसं काहीच नव्हतं. तिनं तो खडक आधी बारकाईनं न्याहाळला, त्यावरच्या खाचाखोचा बघून घेतल्या. नशिबानं कपार फार उंचावर नव्हती आणि त्यात भरपूर खाचा होत्या. तिनं चढायला सुरुवात केली. खाली उभं राहिलेली मुलं श्वास रोखून बघत होती. मधेच तिचा पाय घसरला. “ताई, हळू!” सनत ओरडला. पण मीराची इतक्या दिवसांची प्रॅक्टिस उपयोगाला आली. काळजीपूर्वक एकएक पाऊल चढत ती सोनूपर्यंत पोचली. सोनूनं एकदम तिच्या कमरेला मिठी मारली. “अरे जरा हळू, नाहीतर आपण दोघेही खाली पडू.” असं म्हणून तिनं आधारासाठी त्याच्या कंबरेला तिची ओढणी गुंडाळली आणि हातात ओढणीचं एक टोक धरून हळूच त्याला उचलून थोड्या खाली असलेल्या एका पायरीसारख्या भागावर ठेवलं. वीर त्यांच्यामध्ये सगळ्यात उंच, तो एका दगडावर चढला. आता त्याचा हात तिथपर्यंत पोचत होता. त्यानं अलगद सोनूला पकडलं आणि खाली घेतलं. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

“तिथे कसा पोचलास रे इतक्या उंचावर?” मोहननं त्याला विचारलं. “अरे, मला तू दिसतच नव्हतास. मग मी घाबरलो. वर गेल्यावर नीट दिसशील म्हणून हळूहळू वर गेलो. मागच्या वेळी तू चढला होतास ते बघितलं होतं मी.” सोनूचा रडवेला चेहरा आता खुलला होता. “हं, चांगलाच शूर दिसतोस की. इथे आमचं धाबं दणाणलं होतं! चला निघूया. पावसाला सुरुवात झालीये.” वीर घाई करत म्हणाला.  

सोनू आणि मोहनचे आईबाबा काळजीत पडलेच होते, तेवढ्यात मुलं आली आणि त्यांनी सगळी कथा सांगितली. काका म्हणाले, “फार चांगलं काम केलंस मीराताई, देव तुझं भलं करो! आता इथेच थांबा तुम्ही. पावसाचा जोर कमी झाला की मी येतो तुम्हाला सोडायला.” “अहो पण काका, आईबाबा काळजी करतील, आम्ही जातो.” वीर म्हणाला. “अरे, तुझ्या बाबांनी हा मोबाईल फोन दिलाय त्याचा काय उपयोग मग? मी कळवतो त्यांना. बसा निवांत.” सगळे त्या छोट्याशा झोपडीत दाटीवाटीनं बसले. काकूंनी दिलेल्या चहा आणि गरमगरम चपातीचा मुलांनी मनापासून आस्वाद घेतला. थोड्या वेळानं काकांनी त्यांना घरी सोडलं. पुढचे दोन दिवस मीराचं नुसतं कौतुक चाललं होतं. 
आठवडा कधी संपला मुलांना कळलंही नाही. मुलं दोन दिवस आधीच घरी परतली. आईला आश्चर्य वाटलं. “समर कॅम्प चालू होतोय ना, म्हणून!” मीराचं स्पष्टीकरण. ‘हं, वॉल-क्लाइंबिंग सोडायचं खूळ डोक्यातून गेलेलं दिसतंय.’ आईनं सुटकेचा निःश्वास सोडला.

 

संबंधित बातम्या