फोन-अभ्यास

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

किशोर काथा

त्या छोट्या गावातले चार दिवस हा हा म्हणत संपले. मुलांना इतक्या काय काय गोष्टी करायला सापडल्या की टेकडीवरच्या त्या देवळात रेंज आहे हे कळल्यावरसुद्धा तिथे जाऊन कुणाला फोन करायची त्यांना इच्छा झाली नाही. गावातल्या या वास्तव्यानं प्रत्येकाला काही ना काही दिलं होतं.

“अरे कसली भंगार जागा आहे ही! साधी मोबाईलची रेंज पण नाही.” – सनत

“आणि रेंज असली तरी वीज कुठाय? फोन चार्ज तरी व्हायला हवा ना!”- निकी

“बाप रे, अजून चार दिवस काढायचे आहेत आपल्याला इथं.” – मानस

कालच ते इथं पोचले होते. दहावीची परीक्षा नुकतीच झाली होती. काहीतरी भन्नाट, कायम लक्षात राहील असं करावं म्हणून त्यांनी ठरवलं की चार दिवस एखाद्या छोट्या गावात जाऊन राहायचं. दिपेनच्या दादानं या जागेची खूपच भलावण केली, म्हणून त्यांनी ही निवडली. त्यांची राहायची सोय दादाच्या मित्राच्या वाड्यात केली होती. तो मित्र सध्या इथे नव्हता, तो इस्राईलला आधुनिक शेती शिकायला गेला होता म्हणे. पण त्याच्या आई-बाबांनी त्यांचं अगदी प्रेमानं स्वागत केलं. दिवसभराच्या प्रवासानं मुलं इतकी थकून गेली होती की अंथरुणाला पाठ टेकताक्षणीच त्यांना झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा क्षणभर आपण कुठे आहोत हे त्यांना समजेना. कसले कसले अपरिचित आवाज येत होते, पक्ष्यांचे, गाईच्या हंबरण्याचे, वाहत्या पाण्याचे...

एकदा जाग आल्यावर मात्र पहिली आठवण झाली ती मोबाईलची. आणि मग रेंज, वीज असे सगळे प्रॉब्लेम्स लक्षात आले. मोबाईल नसण्याच्या कल्पनेनं सगळेच अस्वस्थ झाले.

निकी म्हणाली, “तरी मी सांगत होते, चांगलं एखाद्या ट्रेकला वगैरे जाऊ, पण नाही! तुम्हालाच हौस! एक तर इथं पोचण्यासाठी एसटी बस शिवाय पर्याय नव्हता. वाटेत टायर पंक्चर झालं, मग अपघातामुळे रस्ता तासभर बंद! शेवटी गचके खात, दुपारी दोन वाजता पोचायचो ते संध्याकाळी सात वाजता पोचलो आपण.”

“अगं हो हो निकी, शांत हो आणि खाली चल. काकूंनी मस्त नाश्ता केलाय, दही, भाकरी आणि मिरचीचं लोणचं. खाऊन झालं की गावात चक्कर मारूया आपण. काल पोचलो तेव्हा अंधारून आलं होतं, गाव असं फारसं काही दिसलंच नाही. चला चला, तुम्ही पण या रे लवकर.” मीतूनं तिच्या नेहमीच्या समजूतदारपणानं परिस्थिती निवळायचा प्रयत्न केला.

पोटपूजा झाल्यावर शेवटी निघाली गॅंग. गाव तसं स्वच्छ होतं. छोटीशी घरं, घरांसमोर आटोपशीर अंगण, एक दोन फुलांची झाडं, तुळशीवृंदावन आणि त्यासमोर हळदी-कुंकू घातलेली रांगोळी. हंबरणाऱ्या गाई-म्हशी, टपोऱ्या डोळ्यांनी बघणारी वासरं. क्लक-क्लक करत किडे टिपत हिंडणाऱ्या कोंबड्या. येता जाता लोक एकमेकांना हाका देऊन, थांबून चौकशा करत होते. मुलांना नवल वाटत होतं. ‘किती निवांत आहेत हे सगळे! उगीच वाघ मागं लागल्यासारखे धावत सुटले नाहीयेत. आणि अगत्य किती!’

थोडं पुढे गेल्यावर एका झाडाखाली काही मुलं दिसली. त्यातली काही गोट्या खेळत होती. काही जण खाली झुकलेल्या झाडाच्या फांदीवर बसली होती. काहीजण काटक्यांनी खालच्या धुळीत रेघोट्या काढत होती. त्यांना बघून त्यातला एक चटपटीत दिसणारा दिनू नावाचा मुलगा पुढे आला आणि म्हणाला, “कुठल्या गावचे तुम्ही? फिरायला आले का?” “हो. काय रे, सुट्ट्या लागल्या शाळेला? परीक्षा झाली का?” “हो झाली की. मी आठवीत जाणार आता.” दिनू म्हणाला. “पण हा शंभू सोडणार आहे शाळा या वर्षी. त्याला अवघड जातंय.” अनुजनं आश्चर्यानं विचारलं, “शाळा सोडणार? कुठला विषय अवघड जातो रे तुला?” सगळे एकदम त्याच्याकडे बघायला लागलेले पाहून शंभू जरा कानकोंडा झाला. तो म्हणाला, “सगळेच. सर कधीतरीच येतात शाळेत. दोन वर्गांना मिळून एक सर आहेत.” तेवढ्यात मनात काहीतरी येऊन दिनू म्हणाला, “दादा, ताई, तुम्ही शिकवाल का आम्हाला?” सनतचे डोळे चमकले, “ए खरंच, आपण शिकवू की. पण आत्ता तर आपण चारच दिवस असणार. नंतर कॉलेज सुरू होईल. मग कसं जमणार?” मानसच्या डोक्यात चक्रं फिरली, “आयडिया! माझी आई एका प्रोजेक्टसाठी आडगावच्या काही मुलींना फोनवर गोष्टी वाचून दाखवायची. तसं केलं तर?” निकी म्हणाली, “अरे वा, मस्तच आहे ही आयडिया! पण रेंजचं काय? आणि फोन आहे का रे तुमच्याकडे?” मुलं म्हणाली, “न-नाही, पण आम्ही घेऊ कुणाचा तरी. इथं टेकडीवर देऊळ आहे, तिथं येती रेंज.” सनत उत्साहानं म्हणाला, “मग प्रश्नच मिटला. आपण व्हिडिओ कॉल करूया मस्तपैकी.” मानसनं हसून त्याच्या डोक्यावर टपली मारली, “अरे रेंज म्हणजे फोनची रेंज आहे इथे, इंटरनेटची नाही काही. आपल्याला वाचूनच दाखवायला लागेल. आपण त्यांच्या पुस्तकांचा एक सेट विकत घेऊन ठेवू या आपल्याकडे. म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही.”

जोरजोरात बोलत, प्लॅन करत मुलं घरी परतली. रात्री गच्चीवर झोपायचं ठरलं. सगळीकडे दाट अंधार, चांदण्यांनी खच्चून भरलेलं आकाश आणि शांतता. मधूनच ऐकू येणारा कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आणि दुरून कानावर पडणारी कोल्हेकुई. गार वारा सुटला होता. भुतांच्या गोष्टी एकमेकांना सांगता सांगता मुलं झोपली.

चार दिवस हा हा म्हणत संपले. त्यांना इतक्या काय काय गोष्टी करायला सापडल्या की टेकडीवरच्या त्या देवळात रेंज आहे हे कळल्यावरसुद्धा तिथे जाऊन कुणाला फोन करायची त्यांना इच्छा झाली नाही. आईबाबांना खुशालीचा एक फोन केला तेवढाच. उद्या परतीचा दिवस. गावातल्या या वास्तव्यानं प्रत्येकाला काही ना काही दिलं होतं. मीतूमधला लेखक जागा केला, आणि राघवच्या आत दडलेला चित्रकार. सनत आणि मानस या दोघा मोबाईल-वेड्यांना खऱ्या जगाच्या आणि निसर्गाच्या जादूचा साक्षात्कार झाला. अनुजच्या आवडत्या पदार्थांच्या यादीत गावरान पदार्थांची भर पडली. निकीच्या मनातला अस्वस्थ गोंधळ गावच्या निःशब्द शांततेत कुठे विरघळून गेला, कळलंसुद्धा नाही; आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिनू आणि मुलांच्या अभ्यासासाठी काहीतरी करायचं ठरवल्यामुळे त्यांना एक नवा उद्देश मिळाला.

काका-काकूंना मात्र ते जाणार म्हणून हुरहूर वाटत होती. धुरळा उडवत बस येऊन थांबली. तेवढ्यात तिकडून धावत धावत, नाक पुसत दिनू आला. त्याच्याबरोबर त्याची गॅंग होतीच. “ताई, दादा, नक्की कराल न आम्हाला फोन? हे घ्या, आम्ही विषयांचं वेळापत्रक करून ठेवलंय.” “म्हणजे काय, नक्कीच. तुम्ही तयार रहा म्हणजे झालं.” बसच्या धुरळ्यात नाहीसे होईपर्यंत सगळे निरोपाचे हात हलवत राहिले.

संबंधित बातम्या