मधुमेह टाळता येतो? 

डॉ. आरती शहाडे 
सोमवार, 15 जुलै 2019

आरोग्य विशेष
 

‘मधुमेह’ म्हणजे एक त्सुनामीच असते. तो वादळी वेगाने सर्व शरीरात पसरतो आणि शरीरातल्या पेशी, रक्तवाहिन्या यांच्या अस्तित्वावर घाला घालतो. जनुकीय बदल, प्रमाणाबाहेरील स्थूलत्व, चुकीची जीवनशैली, आजाराबाबतच्या सामाजिक जागृतीचा अभाव आणि आरोग्यसेवेतल्या त्रुटी या साऱ्या गोष्टी हे वादळ उठवायला कारणीभूत असतात. मधुमेहामुळे होणारी सामाजिक आणि आर्थिक हानी तर मोजण्याच्या पलीकडची आहे. मधुमेहाचा एकही रुग्ण नव्याने निर्माण होऊ नये यासाठी आज प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. या आजाराचा प्रतिबंध प्राथमिक पातळीवरच केला जावा, असे धोरण आज जगातल्या प्रत्येक राष्ट्राने घेण्याची नितांत गरज आहे. 
मधुमेहाचे दोन प्रकार असतात. त्यातला टाइप-१ हा इन्सुलिनच्या अभावाने होतो. तो जन्मजात असू शकतो किंवा आयुष्यात केव्हाही डोके वर काढू शकतो. मात्र टाइप-२ चा मधुमेह हा मुख्यत्वे टाळता येण्याजोगा आजार असल्याने, आपण त्याबद्दलच प्रामुख्याने विचार करूयात. 

मधुमेह होण्याची दोन प्रमुख करणे असतात  
    रक्तातील साखरेच्या पातळीचे नियंत्रण करणाऱ्या स्वादुपिंडातील इन्सुलिनचा अभाव. 
    शरीरातल्या नैसर्गिक इन्सुलिनच्या कार्याला प्रतिरोध करणारा इन्सुलिन रेझिस्टन्स. हा प्रतिरोध आपल्या शरीरातल्या स्नायूंमध्ये, यकृतात आणि चरबीच्या पेशींमध्ये निर्माण होत असतो. त्यामुळे इन्सुलिनचे कार्य कमी होऊन रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत राहते. 

मधुमेह टाळू शकता का? 
आज हा प्रश्‍न समस्त डॉक्‍टरांना तर भेडसावतो आहेच, पण सर्वसामान्य नागरिकांनादेखील ही समस्या नेहमीच खुणावत असते. आजमितीला जगातील सर्व सरकारेदेखील या विषयामुळे चिंताग्रस्त आहेत. दरवर्षी मधुमेह आणि त्यातून निष्पन्न होणारे गुंतागुंतीचे आजार यांच्या उपचारांवर जगातील सर्व देशांचे कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. एखाद्या आजाराची साथ पसरल्यावर जसे लोकांचे धडाधड मृत्यू होतात, तसाच प्रकार संसर्गजन्य नसूनही मधुमेहामुळे होत आहे. 
अनियंत्रित मधुमेहामुळे मूत्रपिंडे निकामी होतात. पायांना गॅंगरीन होऊन तो गमवावा लागतो. या लोकांना आपल्या या आजारांचा इलाज करायला घर, जमीनजुमला विकावा लागतो, कर्जबाजारी व्हावे लागते. हे हृदयद्रावक दृश्‍य सर्वत्र आणि सातत्याने दिसून येते आहे. म्हणूनच मधुमेहाचा प्रतिबंध ही नुसती वैयक्तिक नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक गोष्ट झाली आहे. 
मधुमेह टाळण्यासाठी कुठली लस नाही. त्यामुळे एक इंजेक्‍शन घेतले आणि आजाराचा कायमचा प्रतिबंध झाला असे नसते. त्याकरता वैयक्तिक पातळीवर करावे लागणारे आहारातील पथ्य, व्यायाम, समाजात रुजलेले विचार व रूढी बदलणे, आजाराचे निदान झाल्यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्‍यक असते. त्यासाठी सार्वजनिक आरोग्यात आमूलाग्र बदल करणारे शासकीय धोरण असण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारला तशी उत्कट इच्छा असणे आवश्‍यक आहे. हे घडल्यासच पुढच्या पिढीत मधुमेहाचे रुग्ण कमी होतील.  
डायबेटिसमध्ये रक्तशर्करा तिच्या नॉर्मल पातळीपेक्षा जास्त असते. अशी सतत वाढलेल्या पातळीतील रक्तशर्करा त्या रुग्णाच्या आरोग्यामध्ये अनेक शारीरिक आजार निर्माण करत असते. मधुमेहाचे प्रमाण भारतीय आणि एकूणच दक्षिणपूर्व देशांमध्ये जास्त आहे. त्यामुळे त्याचा प्रतिबंध करणेच योग्य ठरेल. 
मधुमेह होण्याचे कारण जनुकीय परिणाम आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित असते. यातले जनुकीय म्हणजे आनुवंशिक घटक अल्पकाळात कधीच बदलत नाहीत. आजमितीला मधुमेहाचे वाढलेले प्रमाण हे पर्यावरणात होणाऱ्या हानिकारक बदलांमुळे आहे. त्याच बरोबर आहार, वेगवान जीवनशैली, सामाजिक रूढींमधील संक्रमण, बदलते शरीरक्रियाकलाप आणि वाढते ताणतणाव हे त्याचे मुख्य व निर्धारक घटक आहेत. त्यामुळेच जीवनशैलीमध्ये बदल घडवल्यास आणि औषधोपचारांच्या योगे मधुमेहाचा प्राथमिक प्रतिबंध केल्यास मधुमेहाला आळा घालणे शक्‍य होईल असे अनेक संशोधनात्मक सर्वेक्षणात आढळून आले आहे. 

प्रतिबंधक तत्त्वे 
    प्राथमिक प्रतिबंध : मधुमेह होण्याची कारणे ध्यानात घेऊन त्यांची काळजी घेणे 
    दुय्यम प्रतिबंध : एखादी व्यक्ती जर मधुमेह होण्याच्या प्राथमिक पातळीवर असेल (प्रीडायबेटिक), तर आहार, व्यायाम यांच्या साह्याने त्याची रक्तशर्करा सामान्य पातळीवर आणणे. 
    तृतीय पातळी प्रतिबंध : मधुमेहाच्या रुग्णाने नियमित औषधोपचार, पथ्ये आणि व्यायाम यांच्या साह्याने आजारामध्ये गुंतागुंत होऊ न देणे. 

जोखमीचे घटक 
    वांशिकता : दक्षिणपूर्व आशियातील व्यक्ती; यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ असे देश येतात. ही जोखीम पूर्ण अपरिवर्तनीय आहे. 
    कौटुंबिक इतिहास : पालकांना मधुमेह असेल तर मुलांमध्ये तो होण्याची शक्‍यता ५ ते ६ पटीने जास्त असते. ही जोखीमही अपरिवर्तनीय असते. 
    लठ्ठपणा : जसे वजन वाढत जाते तशी मधुमेह होण्याची शक्‍यता वाढते. कारण त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. अशा व्यक्तींच्या पोटाभोवती असलेल्या चरबीचे यामध्ये महत्त्वाचे योगदान असते. पोट आणि वजन कमी केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होऊन मधुमेहाची समस्या दूर होऊ शकते. 
    जन्माच्या वेळचे आणि बालपणीचे वजन : या दोन्ही गोष्टींमुळे भावी आयुष्यात मधुमेह होण्याची शक्‍यता वाढत जाते. बालपणी आणि तारुण्यात वजन कमी केल्यास ही जोखीम कमी होते. जन्मावेळी वाजवीपेक्षा कमी वजन असलेल्या बाळांना पुढील आयुष्यात मधुमेह होऊ शकतो. थोडासा विरोधाभास वाटणारे, पण संशोधनातून सिद्ध झालेले हे एक निखालस सत्य आहे. ‘थ्रीफटी जेनोटाईप’ या नावाने ही संकल्पना प्रसिद्ध आहे. म्हणजेच बालपणी अतिशय कृश आणि अतिशय जाड मुलांना मधुमेह होण्याची जोखीम तितकीच असते. 
    मातेच्या पोटातील गर्भावर मातृगर्भातले पोषण खूप परिणाम करते. या पोषणाच्या प्रभावाखाली जनुकीय परिणाम आणि आनुवंशिकता बदलते. त्यामुळे मातेचे पोषण योग्य असावे, असे प्रयत्न गर्भधारणेआधी आणि त्यानंतर करणे गरजेचे आहे. 
    मधुमेहाचा प्रभाव जन्मणाऱ्या मुलींवर आणि तिच्या पुढच्या पिढीवर होत राहतात. या कारणामुळेच आपण सर्व दक्षिणपूर्व आशियातील नागरिक मधुमेहाचा आघात सोसत आहोत. 
    जीवनशैली : शारीरिक हालचाली व व्यायाम, आहारपद्धती, वजन ताब्यात ठेवणे, तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपान टाळणे, योग्य काळ झोप घेणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. 
मधुमेह होण्याचे दुसरे कारण प्रामुख्याने स्थूलपणात आढळते. म्हणूनच वजन नियंत्रित ठेवणे हे मधुमेह प्रतिबंधासाठी आवश्‍यक असते. योग्य उष्मांकांचा आहार आणि व्यायाम यातून ते साध्य होते. वजन कमी करणे आणि ते कमी केलेले वजन टिकवून ठेवणे दोन्ही गरजेचे असते. दृढनिश्‍चय, योग्य सल्ला, प्रोत्साहन यांची यासाठी आवश्‍यकता असते. त्याबरोबरच पैसे व वेळ खर्च करायची तयारी हवीच. 
जेव्हा हे सर्व उपाय निष्फळ ठरतात आणि वजन खूपच जास्त असते, तेव्हा इंट्रागॅस्ट्रिक बलून, बॅरिॲट्रिक सर्जरी अशा अत्याधुनिक पद्धती वापरून वजन कमी करावे लागते. 

कोणामध्ये प्रतिबंध आवश्‍यक? 
    वयाची चाळिशी ओलांडलेले. 
    बीएमआय २५ पेक्षा जास्त असलेले. 
    बैठे काम करणारे. 
    उच्चरक्तदाब असलेले. 
    गर्भवती असताना रक्तातील साखर जास्त असलेल्या स्त्रिया - जेस्टेशनल डायबेटिस. 
    रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणे. 
    आईवडिलांना किंवा जवळच्या नातेवाइकांना मधुमेह असणे. 

जीवनशैलीमधील बदल

 • वर्तनबदल (Behavior modification). 
 • आहारोपचार. 
 • शारीरिक क्रियाकलाप. 
 • धूम्रपान / तंबाखूसेवन बंद करणे. 
 • मधुमेहासाठी वाढीव जोखीमश्रेणी   -  (प्रीडायबेटीस) 
 • उपाशीपोटी रक्तशर्करा १०० ते १२५ मिलिग्रॅम  -  इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज 
 • ७५ ग्रॅम ग्लुकोज पाण्यातून प्यायला दिल्यावर २ तासांनंतर १४० ते १९९ मिलिग्रॅम  -  इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स 
 • एचबी-ए १ सी - ५.७ ते ६.४ टक्के 

मधुमेह टाळण्यासाठी 

 • सखोल तीव्रतर जीवनशैली उपचार. 
 • औषधोपचार. 
 • बॅरिॲट्रिक सर्जरी. 

जीवनशैलीतील बदल 
वजन नियंत्रणात आणल्यावर रक्तातील साखर सर्वसामान्य पातळीवर आणता येते. जीवनशैलीतील बदल सामान्यतः फायदेशीर असतात आणि त्यांचे प्रतिकूल परिणाम नगण्य असतात. रक्तातील साखरेची पातळी सुधारल्यावर प्रीडायबेटिसचे टाइप-२ मधुमेहामध्ये होणारे परिवर्तन रोखले जाऊ शकते. ‘फिनिश मधुमेह प्रतिबंधात्मक संशोधन प्रकल्प’, ‘मधुमेह प्रतिबंधक कार्यक्रम’ असे अनेक कार्यक्रम विभिन्न देशात मोठ्या प्रमाणात राबवले जात आहेत आणि ते चांगलेच यशस्वी ठरत आहेत. या संशोधनात एखाद्या मधुमेही व्यक्तीने पाच ते दहा टक्के वजन कमी केले तरी त्याचा मधुमेह अधिक चांगल्या रीतीने ताब्यात राहतो. 

आहार 
आहारातले उष्मांक आवश्‍यक तेवढे आणि मर्यादित ठेवल्यास मधुमेह नियंत्रणात आणता येतो. दैनंदिन आहारात सर्व पोषक घटक (मेद, पिष्टमय पदार्थ, प्रथिने) प्रमाणात असावेत. त्यांचे प्रमाण वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये विभिन्न असते. कीटो डाएटमध्ये पिष्टमय पदार्थ कमी आणि मेद जास्त असतात. तर इतर डाएटमध्ये प्रथिने जास्त आणि मेद कमी असतात. कोणते मेदयुक्त पदार्थ आहारात असावेत? ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणा तेल, तूप यापैकी काय असावे? प्रथिने कोणती चांगली? सोयाबीन, मांसाहार, दुग्धजन्य की दुग्धविरहित असावीत? कोणते पिष्टमय पदार्थ खावेत? गहू, बाजरी की तांदूळ? इत्यादी बारकावे डॉक्‍टर्स आणि आहारतज्ज्ञांच्या मताने ठरवावेत. आहारात तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वांना विसरून चालत नाही. किती खावे, केव्हा खावे आणि किती वेळा खावे हे प्रत्येकाच्या आजाराच्या व्याप्तीवर आणि वजनावर ठरते. साखर, गूळ व मीठ आहारात कमी असावे. डबाबंद, तयार पॅकेज्ड अन्न टाळावे. बाहेरचे जंकफूड आणि फास्टफूड खाण्याऐवजी बालपणापासून शक्‍यतो घरच्या अन्नाची गोडी लावावी.
या सर्व बाबी लक्षात घेऊन काही डाएट पद्धती रूढ होतात. उदाहरणार्थ - मेडिटरेनियन, डॅश, केटो, नॉर्डिक आणि काही भारतीय पद्धती. ही सर्व डाएट्‌स परिणामकारक असतात, पण त्यात सातत्य टिकवणे अवघड असते. 
वजन कमी करताना उगाच उपासतापास करून प्रतिकारशक्ती कमी होऊ देऊ नये, स्टॅमिना टिकवून ठेवावा, तसेच कुपोषण टाळणे आवश्‍यक असते. 
    व्यायाम : जरी सर्व व्यक्तींसाठी एकच व्यायाम ठरवता येत नसला, तरी ज्यांच्यामध्ये मधुमेह होण्याची जोखीम जास्त असते अशांनी दररोज ३० ते साठ मिनिटे मध्यम-तीव्रतेचे एरोबिक व्यायाम करावेत. 
    व्यायाम कधी करावा, त्याची सुरुवात कशी करावी, तो किती तीव्रतेचा करावा, कोणत्या प्रकारचा करावा हे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने ठरवावे. वय, शरीरयष्टी, व्यायामक्षमता, दैनंदिन हालचाल आणि वजन किती कमी करायचे या सर्व गोष्टी विचारात घेऊन एक योजना करावी लागते. सामान्यतः एरोबिक म्हणजे धावणे, सायकल चालवणे, पोहणे किंवा ट्रेडमिल, ट्रेकिंग असे प्रकार केले जातात. दिवसाआड रेझिस्टन्स एक्‍सरसाईज, वजने उचलणे, स्नायूंना ताण देणारे स्ट्रेचिंग यांचा समावेश असतो. झुंबा, पॉवरयोग असे आधुनिक व्यायाम प्रकारदेखील फायदेशीर ठरतात. सातत्य ही महत्त्वाची गोष्ट आहे. तंत्रज्ञान वापरून लोकांना उत्तेजन देणे, बदल सुचवणे आणि नवीन पद्धत रुजवणे आज सहज शक्‍य झाले आहे. पेडोमीटर वापरून रोज दहा हजार पावलांचा हिशेब ठेवता येतो. व्यायाम करताना इजा होऊ देऊ नये. म्हणून व्यायाम क्रमाक्रमाने वाढवावा. वॉर्मअप आणि कूल डाऊन वेळ नाही म्हणून चुकवू नये. 
    औषधोपचार : जर जीवनशैलीतले बदल यशस्वीरीत्या लागू झाले नसतील, तर सुरक्षित औषध म्हणून मेटॉफॉर्मिनची शिफारस केली गेली आहे. रोझिग्लिटाझोन, पायोग्लिटाझोन आणि एकारबोझ उच्च-जोखीम टाइप-२ मधुमेहाच्या प्रतिबंधासाठी वापरले गेले आहेत. 
    बॅरिॲट्रिक सर्जरी : जेव्हा सर्व उपाय निष्फळ ठरतात, तेव्हा इंट्रागॅस्ट्रिक बलून, बॅरिॲट्रिक सर्जरी असे अत्याधुनिक उपाय करावे लागतात. अतिस्थूलपणामुळे मधुमेह आणि इतर संलग्न त्याला संबंधित आजार असल्यास हा उपाय उपयुक्त ठरतो. यामुळे या आजारांपासून काही काळ सुटका होते आणि जीवनाची गुणवत्ता निःसंशयपणे सुधारते.
    मधुमेहाचे अर्थशास्त्र : या आजाराच्या गुंतागुंतीच्या उपचारांचा खर्च खूप जास्त असतो. यात वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर आर्थिक बोजा कमालीचा जास्त असतो. प्रतिबंधक धोरणे मोठ्या प्रमाणात अमलात आणण्यासाठी, सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात काळजीपूर्वक योजना आखल्या पाहिजेत. सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्थांनी यात भाग घेऊन त्यादृष्टीने सक्षम पावले उचलली पाहिजेत. 
चला तर मग, एक पाऊल उचलू या.. मधुमेहविरहित निरोगी जीवनाकडे...

संबंधित बातम्या