बालकांसाठी रोगप्रतिबंधन

डॉ. जयंत नवरंगे
सोमवार, 15 जुलै 2019

आरोग्य विशेष
 

सर्वसाधारणपणे जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंतचा काळ हा बालचिकित्सा या संज्ञेत अंतर्भूत आहे. जन्माला आल्यापासून, किंबहुना गर्भधारणा झाल्यापासूनच मानवी जिवाचा बाहेरील, तसेच अंतर्गत जंतू-शत्रूंशी सतत झगडा चालू असतो. या हल्ल्यापासून सुखरूप बाहेर पडून, संघर्ष करून, स्वतःची वाढ व प्रगती साधायची असते. म्हणूनच भक्कम संरक्षक व्यवस्था सदैव दक्ष आणि तत्पर असणे आवश्‍यक असते. 

आजच्या जमान्यात रोगांचे ढोबळमानाने तीन प्रकार पडतात.  
१)
प्रथम आपण जंतुसंसर्गाने होणाऱ्या आजारांपासून रोगप्रतिकार करण्यासंबंधी काय करता येईल ते पाहू  
अ) वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता : रोगजंतू व शरीर यांचा पदोपदी संबंध येतोच - तो टाळण्यासाठी शिंकताना/खोकताना रुमालाचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे; कचरा/घाण उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी न भिरकावणे; न थुंकणे; सांडपाणी, शौच, मूत्र यांचा योग्य तो निचरा; प्रदूषण टाळणे इत्यादी गोष्टी आचरणे आवश्‍यक आहे. 
ब) स्वतःचे शरीर तंदुरुस्त राखणे: म्हणजेच संतुलित, सकस, स्वच्छ, ताजा आहार आणि व्यायाम. शरीर सुदृढ नसेल, तर रोगप्रतिकारक शक्ती पुरेशी निर्माण होत नाही आणि कितीही लसी व औषधे दिली तरी ती कुचकामी ठरतात. 
क) तान्ह्या बाळांच्या दृष्टीने एक वर्षापर्यंत स्तनपान मिळणे एक उत्तम रोगप्रतिबंधन ठरते. 
ड) तसेच गर्भावस्थेतील अर्भकाचे कुपोषण टाळण्यासाठी मातेची योग्य काळजी, तिचे योग्य पोषण तसेच लसीकरण होणे आवश्‍यक आहे. उदा. ट्रिपल एम. एम. आर; स्वाईन फ्लू, इत्यादी. सहाव्या ते नवव्या महिन्यांत तिला या लसी मिळणे आवश्‍यक आहे. बाळंतपण योग्य रुग्णालयात डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली होणे जरूरीचे आहे. 
इ) बाळाच्या जन्मानंतर लसीकरण पूर्ण करणे आवश्‍यक आहे. सरकारने आज बऱ्याच लसी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या जरूर दिल्या जाव्यात. 

सर्वसाधारण लसींचा तक्ता  
    जन्मतः - बीसीसी, हिपॅटायटिस बी व पोलिओ डोस. 
    सहा आठवडे - ट्रिपल (त्रिगुणी) + हिपॅटायटिस बी, हिब, पोलिओ इंजेक्‍शन, रोटाव्हायरस; न्यूमोनिया (PCV). 
    १० आठवडे - ट्रिपल + हिपॅटाटिस बी, हिब, पोलिओ इंजेक्‍शन, रोटाव्हायरस; न्यूमोनिया (PCV). 
    १४ आठवडे - ट्रिपल + हिपॅटायटिस बी, हिब, पोलिओ इंजेक्‍शन, रोटाव्हायरस; न्यूमोनिया (PCV). 
    सहा महिने - फ्लू (स्वाईन फ्लू). 
    सात महिने - फ्लू दुसरा डोस. 
    आठ महिने - टायफॉईड लस - नवीन प्रकारची. 
    नऊ महिने - एमएमआर. 
    एक वर्ष - जपानी मेंदूज्वर लस. 
    बारा महिने - हिपॅटायटिस ए - १. 
    पंधरा महिने - एमएमआर, कांजिण्या. 
    पंधरा ते अठरा महिने - हिपॅटायटिस ए - १, त्रिगुणी (बूस्टर). 
    अठरा ते चोवीस महिने - कांजिण्या २. 
    बारा ते चोवीस महिने - मेंदूज्वर (मेनिंगोकॉकल). ट्रिपल (त्रिगुणी) म्हणजे घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला प्रतिबंधक लस. तोंडाने देण्याचा डोस पोलिओ (Pulse Polio) दरवर्षी दोन वेळा सरकार जाहीर करते. त्या तारखांना पाच वर्षांखालील सर्व बालकांना देणे. याशिवाय इतरही लसी असतात, उदा. रेबीज, कॉलरा इत्यादी. त्या जरुरीप्रमाणे देण्यात येतात. 

२. असांसर्गिक रोगांच्या : उदा. स्थूलता, अतिरक्तदाब, मधुमेह, दमा, कर्करोग इत्यादी प्रतिबंधासाठी सर्वसाधारणपणे आहार (संतुलित, नैसर्गिक, प्रक्रियाविरहित, ताजे, सकस अन्न) व नियमित व्यायाम (मैदानी खेळ, पोहणे, सायकलिंग इत्यादी) हवा. यांच्या जोडीला व्यसनांपासून दूर राहणे (शालेय वयातच तंबाखू सेवन, अमली पदार्थ इत्यादीचा विळखा सुरू होतो आहे), तसेच प्रदूषण टाळणे (धूर, घातक रसायने, पचापच थुंकणे, गोंगाट इत्यादी) या सर्वांची जोड आवश्‍यक ठरते. पौंगडावस्थेतच असले आजार डोके वर काढू लागले आहेत. उदा. स्थूलतेचे प्रमाण पुण्यातील मध्यमवर्गीय व तथाकथित उच्चभ्रू शाळांमध्ये २० टक्‍क्‍यांपर्यंत वाढलेले आहे. यातच अतिरक्तदाब, मधुमेह, काही कर्करोग, पित्ताशयातील खडे इत्यादी आजारांचे मूळ आहे. 

३. मानसिक रोगांच्या प्रतिबंधासाठी मनाची योग्य मशागत करणे आवश्‍यक आहे. उदा. मुलांना सतत प्रोत्साहन देणे, कुटुंबातील सुसंवाद, कोणत्याही कारणाने कुचेष्टा व हेटाळणी न करणे, जास्तीत जास्त गुणांचा (परीक्षेत) जोरा करणे, ताण वाढविणे टाळले पाहिजे. कुटुंबकलह, जोडप्यांमधील विभक्तपणा, मद्य व इतर अमली पदार्थांचे व्यसन इत्यादी गोष्टी मुलांच्या मानसिकतेवर भयावह दुष्परिणाम करतात. मुले व तरुण व्यक्तींमध्ये त्यामुळे मानसिक आघात व आजार निर्माण होऊ शकतो. त्यातूनच नैराश्‍य, वैफल्य, आत्महत्या, अपघात, आक्रमकता, हिंसा, विध्वंस इत्यादी उद्‌भवतात यांचे प्रतिबंधनही आवश्‍यक आहे. रोगप्रतिबंधन हे रोग झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा केव्हाही श्रेयस्कर व किफायतशीर व खात्रीशीर असते - त्यांच्या जोडीला पॉझिटिव्ह आरोग्य, तंदुरुस्ती व मानसिक सुदृढता मिळाल्यास रोगप्रतिबंधन अधिकच सक्षम होते.  

संबंधित बातम्या