नियमित तपासण्या आवश्‍यक 

डॉ. मीनाक्षी देशपांडे
सोमवार, 15 जुलै 2019

आरोग्य विशेष
 

स्त्रियांचाच विषय; पण पुरुषांनाही तितकाच महत्त्वाचा वाटणारा, असे मुद्दे मी मांडीत आहे. हा लेख केवळ स्त्रियांसाठी नसून पुरुषांनासुद्धा आपल्या आई, बहीण, बायको व मुलगी, इतर महिला नातेवाईक यांच्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्य शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल असे वाटल्याने लिहीत आहे. 
गेल्या किमान २७ वर्षांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून असे ठामपणे वाटते, की स्त्रीमध्ये स्वतःविषयी जागरूकता निर्माण व्हायला हवी. त्याला पुरुषांच्या मदतीचा हातभार लागून योग्य वेळेला शारीरिक तपासण्या करण्यात आल्या तर कितीतरी आजार टाळता येतील. यात मुख्य म्हणजे कर्करोग... त्यातसुद्धा स्तनाचा आणि गर्भाशयाच्या समस्या. यांसाठी वेळेत तपासण्या केल्या, तरच प्राथमिक अवस्थेत रोगनिदान होऊन त्यातून पूर्ण बरे होता येऊ शकते. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या शरीराची माहिती ठेवणे, स्वतःच्या प्रकृतीच्या दृष्टीने आवश्‍यक आहे. 
आपल्या शहरांमध्ये आरोग्यासंबंधी चांगली जनजागृती झाली आहे. पण खेड्यामध्ये अजूनही तशी परिस्थिती दिसत नाही. स्वतःच्या शिक्षणापासूनच वंचित असल्यामुळे त्यांना अशा आजाराची माहिती नसते अथवा अंधविश्‍वासामुळे या महिला या आजारांना बळी पडतात. 
स्त्रियांच्या कर्करोगापैकी ३३ टक्के कर्करोग हा स्तनांचा असतो आणि तो खूप वेळेला सौम्य प्रकाराने, कळतनकळत वाढतो. स्तनात येणाऱ्या गाठींपैकी फक्त १० टक्के गाठी या कर्करोगाच्या असतात. दुर्दैवाने कर्करोग हा न दुखणारा असल्याने स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय संकोच, भीती आणि काळजी यामुळे तपासणी करण्याऐवजी तो दडवून ठेवण्याकडे कल असतो. परंतु वाळवी दडवून ठेवल्यावर जसे घर पोखरते, तसेच कर्करोग आत वाढत जातो आणि शेवटी रुग्णाचा बळी जातो. प्रत्येक ३५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या स्त्रीने स्वतःच्या स्तनांची तपासणी दर महिन्याला करणे आवश्‍यक आहे. 

स्तनाच्या कर्करोगाबद्दल काही उपयुक्त माहिती  
बाळाला स्तनपान केल्याने कर्करोग होण्याची शक्‍यता बरीच कमी होते. 

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने स्तनाच्या कर्करोगाच्या शक्‍यतेत कोणतीही वाढ होत नाही. तसेच त्या गोळ्यांनी बीजांड कोश आणि गर्भाशय यांच्या कर्करोगाची शक्‍यतासुद्धा बरीच कमी होते. या गोळ्यांचे फायदे, त्यांच्या तोट्यांपेक्षा नक्कीच खूप जास्त आहेत हे आता सिद्ध झाले आहे. 

गर्भारपणात स्तनाच्या कर्करोगाची शक्‍यता १ः४००० इतकी असते. त्यामुळे त्याकाळात तयार झालेल्या स्तनाच्या गाठीकडे दुर्लक्ष करू नये. प्रत्येक स्त्रीच्या स्तनाची ठेवण वेगळी असल्याने त्याबद्दल काही तक्रार असल्यास लगेच डॉक्‍टरना सांगावे. 

आनुवंशिकता : कर्करोग हा बऱ्यापैकी आनुवंशिक आहे. त्यामुळे ज्या स्त्रियांच्या जवळच्या (first degree) नातेवाईक स्त्रीला (आई किंवा सख्खी बहीण) स्तनाचा कर्करोग झाला आहे, तिला कर्करोग होण्याची शक्‍यता दहा पटींनी वाढते. जिच्या जवळच्या दोन नातेवाईक स्त्रियांना (आई आणि बहीण किंवा दोन्ही बहिणी) कर्करोग झाला आहे, त्यांना कर्करोग होण्याची शक्‍यता शंभर पटींनी वाढते. आपल्या नातेवाईकाला (आई व बहीण) ज्या वयात कर्करोग झाला असेल, त्याच्या पाच वर्षे आधीपासून स्वतःची तपासणी करण्यास सुरुवात करावी. आईला जर तिच्या चाळिसाव्या वर्षी कर्करोगाचे निदान झाले असेल, तर तिच्या मुलीने आपल्या ३५ व्या वर्षापासून ही तपासणी सुरू करावी. 

मासिक पाळीच्या ५-६ दिवसांनंतर अंघोळीच्या वेळी प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या स्तनांची तपासणी करावी. रजोसमाप्तीनंतर महिन्याच्या कोणत्याही दिवशी ठरवून आपण तपासणी करावी. आपल्या घरातील कॅलेंडरवर ओम किंवा टिंब अशी दुसऱ्याला लक्षात येणार नाही अशी खूण करावी म्हणजे प्रत्येक महिन्यात तपासणी झाली आहे की नाही हे कळेल. जर आपण तपासणी करण्यास विसरलो, तर जेव्हा लक्षात येईल तेव्हा ती करावी. मासिक पाळीच्या ५-६ दिवसांनी करण्याचे कारण असे, की पाळीच्या अगोदर किंवा पाळीदरम्यान स्तन सुजलेले किंवा दुखरे असतात. त्यामुळे त्या काळात ही तपासणी व्यवस्थित होत नाही. 

सोनोमॅमोग्राफी ही चाचणी वयाच्या चाळिसाव्या वर्षापासून दरवर्षी केल्यास कर्करोगापासून मृत्यूचे प्रमाण तीस टक्‍क्‍यांनी कमी होते. वयाच्या पन्नाशीनंतर तर ही चाचणी नक्कीच करावी. 
यात स्तनाचे वरून खाली आणि डावीकडून उजवीकडे असे दोन एक्‍स रे काढले जातात. त्यानंतर स्तनाची सोनोग्राफी केली जाते. या दोन्ही चाचण्या एकमेकांना पूरक आहेत. या दोन्ही चाचण्यांनी कर्करोग सापडण्याची शक्‍यता ९० टक्‍क्‍यांपर्यंत असते. कर्करोग लक्षात येण्याअगोदर आपल्या शरीरात साधारण ५-६ वर्षे असतो आणि सोनोमॅमोग्राफी केल्याने तो साधारण एक ते दीड वर्षे अगोदर लक्षात येतो. त्याचवेळी गाठ काढून टाकल्यावर रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. जितका आपण उशीर लावू तितका तो रोग पसरण्याची शक्‍यता असते. यासाठी गाठ लक्षात आल्यास ताबडतोब आपल्या फॅमिली डॉक्‍टर किंवा कर्करोग तज्ज्ञाकडे जावे. 

गर्भाशय 
स्त्रियांच्या गर्भाशयाचे कार्य आणि उपयुक्तता सर्वांनाच माहीत आहे. मुलीच्या जन्मापासूनच तिचे स्त्री-बीज कार्यरत असते. स्त्री-बीजाची संख्या किती असावी हे जन्माच्या वेळीच ठरलेले असते आणि जशी मुलगी मोठी होते तसे स्त्री-बीजाची संख्या कमी होत जाते. वयात येताना मासिक पाळी सुरू होणे हा मोठा बदल मुलींमध्ये होतो. गर्भधारणा होणे, गर्भाशयाचा आकार वाढणे, बाळंतपण, चाळिशीनंतर पाळी बंद होणे या गोष्टी घडतात. 
नैसर्गिकपणे गर्भाशयासंबंधित सर्व क्रिया सुरळीत चालू असतात. पण त्यातही थोडेफार बदल होतात किंवा कधीकधी जास्तच बिघाड होऊ शकतात. जसे पाळीच न येणे किंवा गर्भाशयात गाठी होणे, जास्त रक्तस्राव होणे या गोष्टी घडतात. स्त्रियांचे वय वाढते तसे गर्भाशयाचे अनेक आजार उद्‌भवू शकतात. सगळ्याच स्त्रियांमध्ये असे घडत नाही. पण ज्यांच्यामध्ये असे दिसते त्यांनी वेळेतच स्त्रीरोगतज्ज्ञाकडून तपासून घ्यायला हवे. गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान त्याच्या प्राथमिक स्वरूपात असतानाच करायला पाहिजे, म्हणजे वेळीच उपचार होऊन गंभीर आजार टळू शकतात. 
अति रक्तस्राव होणे अथवा वेळीअवेळी अंगावरून थोडे लाल जात राहणे : स्त्रियांना पाळीमध्ये अति रक्तस्राव होणे हे साधारणपणे वयाच्या चाळिसाव्या वर्षापासून होऊ शकते. गर्भाशयात फायब्रॉईड होणे, स्त्री-बीजाचे आजार होणे, स्त्री-बीजामध्ये गाठी होणे किंवा कर्करोग होणे या कारणामुळे अति रक्तस्राव होऊ शकतो. या वयात सर्वांत जास्त धोकादायक आजार म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा, स्त्री-बीजाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग. 

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग 
या कर्करोगाचे (CERVICAL CANCER) प्रमाण आजही आपल्या देशात खूप जास्त आहे. नियमित तपासणी करून न घेणे आणि स्वतःकडे दुर्लक्ष करणे यामुळे हा रोग वाढत जातो. या रोगाची लक्षणे म्हणजे सुरुवातीला पांढरे पाणी अंगावरून जाते. शारीरिक संबंधांनंतर रक्तस्राव होणे, रक्तमिश्रित स्राव जाणे ही लक्षणे दिसतात. अशा स्त्रीने दरवर्षी स्त्रीरोगतज्ज्ञाकडून तपासून घ्यायला हवे. म्हणजे वेळेत निदान होऊन उपचार सुरू होतात. 

  • त्यासाठी खालील गोष्टी महिलांनी दर दोन वर्षांनी करून घेणे खूप आवश्‍यक असते. अर्थात स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्‍यक आहे  
  • पॅप स्मीअर नावाची अत्यंत सोपी आणि स्वस्त तपासणी केल्यास गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सुरुवातीलाच लक्षात येतो. 
  • यामध्ये प्रगत तंत्रज्ञान COLPOSCOPY वापरून नवीन पद्धतीने व अचूक असे निदान होते व तिथल्या तिथेच उपचार करता येतात. 
  • गर्भाशय मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून सध्या लसीकरण उपलब्ध आहे. वयाच्या ११ ते ४५ वर्षांपर्यंत हे HPV लसीकरण आपण घेऊ शकतो. ते सर्व ठिकाणी मिळू शकते. 
  • गर्भाशयाच्या कर्करोगाला (ENDOMETRIAL CANCER) असेही म्हणतात. यामध्ये अंगावरून जास्त रक्तस्राव जाणे हे लक्षण दिसते. याचेही निदान लवकर करता येते. वेळीच सोनोग्राफी आणि नवीन तंत्रज्ञान Hysteroscopy केल्याने गर्भाशयातील अस्तर जाड झाले असेल तर छोटेसे ऑपरेशन BIOPSY करून कर्करोग आहे किंवा नाही हे कळू शकते. त्याप्रमाणे पुढचे ऑपरेशन ठरवले जाते. 

स्त्री-बीजाचा कर्करोग 
पाळीमध्ये अनियमितपणा किंवा अति रक्तस्राव, ओटीपोटात दुखणे असे दिसल्यास सोनोग्राफी Transvaginal USG केल्यास निदान होऊ शकते. गर्भाशयाच्या आजारामध्ये जर साध्या गाठी असतील - जसे फायब्रॉईड्‌स किंवा स्त्री-बीज मोठे झाले असेल तर किंवा अति रक्तस्राव होत असेल तर गर्भपिशवी काढून टाकल्यास आजार पूर्णपणे नाहीसा होतो. सध्याच्या काळात फायब्रॉईड्‌समुळे अतिरक्तस्रावामुळे गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. याबाबत सगळीकडे जनजागृती होत आहे. तसेच सोनोग्राफी, सीटी स्कॅनसारखे तंत्रज्ञान सगळीकडे उपलब्ध असल्याने निदान लवकर होणे शक्‍य झाले आहे. स्त्रियाही पुढे येऊन ऑपरेशन करून घेत आहेत. 
गर्भपिशवी काढण्याच्याही अनेक पद्धती आहेत. प्रत्येक स्त्रीच्या गरजेप्रमाणे गर्भपिशवी कुठल्या पद्धतीने काढावी ते ठरवले जाते. सध्या दुर्बिणीतून गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण जास्त आहे. कारण या ऑपरेशननंतर रुग्ण लवकर बरे होतात. लवकर घरी जातात आणि त्यांच्या कामालाही सुरुवात करू शकतात. या ऑपरेशनमध्ये रक्तस्रावही खूप कमी होतो. 
रोग बरा होणे किंवा बळावणे हे त्याचे निदान कधी होते यावर अवलंबून असते. त्यामुळे जितके लवकर निदान होईल तेवढा तो रोग बरा होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे वेळच्यावेळी तपासण्या करणे आवश्‍यक असते.  

संबंधित बातम्या