दृष्टी.. तर सुंदर सृष्टी 

डॉ. संजय पाटील 
सोमवार, 15 जुलै 2019

आरोग्य विशेष
 

आपले डोळे हे शरीरातील महत्त्वाचा अवयवच नाही, महत्त्वाचे इंद्रिय आहे. त्यांची योग्य निगा राखणे व कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून प्रतिबंध उपाय करणे अतिशय महत्त्वाचे आहे. डोळ्यांच्या बाबतीत असलेले बहुतांश आजार हे गुंतागुंतीचे असतात. हे आजार खूप सोप्या पद्धतीने प्रतिबंधात्मक उपायांनी टाळता येऊ शकतात. 

त्यापैकी आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे, संगणक व मोबाईलचा अतिवापर वाढल्यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. लहानपणापासून लांबचे कमी दिसणे, जवळचे कमी दिसणे, डोळ्यांवर ताण येणे, डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, सारखी सारखी रांजणवाडी येणे, चक्कर येणे या तक्रारी दिसून येतात. यामध्ये योग्य वेळी नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून योग्य तो उपचार करून चष्म्याचा नंबर अथवा काँटॅक्‍ट लेन्स लावणे गरजेचे असते. तसेच वेळोवेळी फेरतपासणी करणे आवश्‍यक असते. 

काँटॅक्‍ट लेन्सबाबतीत लेन्स हाताळताना स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. तसेच झोपताना लेन्स नेहमी काढून ठेवावी. लेन्सचा वापर करताना डोळे लाल होणे व डोळ्यात टोचणे अशा तक्रारी असतील, तर लेन्स वापरू नये व लगेचच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डोळे अतिशय नाजूक अवयव असल्यामुळे कित्येक वेळा डोळ्यांना इजा झाल्यास इलाज करणे अतिशय जिकरीचे व गुंतागुंतीचे असते. 

लहान मुलांना टोकदार वस्तू, प्लॅस्टिकची टोकदार खेळणी, खाण्याचा चुना, घरात वापरणाऱ्या ॲसिडयुक्त गोष्टी यांच्यापासून लांब ठेवावे. तसेच वर्कशॉपमध्ये काम करणारे कामगार यांनीपण काम करतेवेळी योग्य ते संरक्षण घ्यावे. समजा चुकून डोळ्यात चुना किंवा केमिकल गेलेच, तर न घाबरता डोळे प्रथम स्वच्छ पाण्याने धुवावेत व नेत्रतज्ज्ञांना त्वरित दाखवावे. 

तसेच आजकाल कॉम्प्युटर व्हीजन सिंड्रोमचे प्रमाण वाढत चालले आहे. यात सतत मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा वापर करणे, आहारविहारावर नियंत्रण नसणे, योग्य प्रमाणात विश्रांती न घेणे, तासनतास वातानुकूलित वातावरणात काम करणे हे त्रासदायक ठरते.

यामध्ये डोळे लाल होणे, पाणी येणे, खुपणे, डोळे आग करणे, अंधुक दिसणे इत्यादी तक्रारी प्रामुख्याने दिसतात. हे बहुतांश प्रमाणात अश्रूंमधील वंगणासारख्या तेलसदृश द्रव्याच्या कमतरतेमुळे घडते. यासाठी योग्य त्या चष्म्याचा वापर करावा. संगणक, मोबाईल यांचा अतिरेक टाळावा. तसेच योग्य ती विश्रांती व आहार घ्यावा. डोळे नेहमी थंड पाण्याने धुवावेत व त्यासाठी योग्य ते आयड्रॉप्स डॉक्‍टरांच्या सल्ल्याने वापरावेत. 

सतत एसीमध्ये बसून काम करणे टाळावे व महत्त्वाचे म्हणजे कॉम्प्युटरवर काम करताना ‘२० - २० - २०’ नियम म्हणजे दर २० मिनिटांनी, २० सेकंदांसाठी २० मीटर लांब; शक्‍यतो हिरव्या झाडांकडे पाहावे. 

त्याचबरोबर ऋतूनुसार डोळे येण्याचे प्रमाण वाढते. यासाठी डोळे आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. त्या व्यक्तीबरोबर हस्तांदोलन न करण्याची खबरदारी घ्यावी. समजा संपर्क आल्यास हात स्वच्छ धुवावेत त्याने वापरलेल्या वस्तू वापरू नयेत. तसेच शंका आल्यास वेळीच डोळे तपासणी करून इलाज सुरू करावा. डोळे येणे हे संसर्गजन्य आजार असल्यामुळे घरात सर्वांना विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांना आजाराची लागण होऊ शकते. यासाठीच योग्य ती खबरदारी घेऊन औषधोपचार करून घेणे गरजेचे असते. बऱ्याच वेळी रुग्ण दुकानातून परस्पर आयड्रॉप्स घेऊन डोळ्यात टाकतात, ते अत्यंत चुकीचे आहे. 

आजकाल मोतीबिंदू हा वृद्धवाचा आजार राहिला नसून तरुणांमध्येसुद्धा याचे प्रमाण वाढत आहे. कारण बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, फास्टफूड, व्यायामाचा अभाव, अतिप्रमाण मोबाईलमुळे डोळ्यावर होणारे परिणाम, त्याचबरोबर इतर शारीरिक आजार - मुख्यतः मधुमेह असल्यास व त्याची योग्य ती खबरदारी न घेतल्यास मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढते. तसेच उन्हात संरक्षण न घेणे, स्वतःच्या मनाने स्टिरॉइड्‌स औषधे डोळ्यात वापरल्यामुळेही मोतीबिंदूचा धोका वाढतो. 

तसेच काचबिंदू व मधुमेहामुळे होणाऱ्या पडद्याच्या आजारांवर वेळीच उपचार केले तरच दृष्टी वाचू शकते. यासाठी प्रत्येक व्यक्तीने ४० वर्षांनंतर नियमित नेत्रतपासणी करणे गरजेचे असते. विशेषतः मधुमेह रुग्णांनी दर सहा महिन्यांनी डोळे तपासणी करावी. 

अशा सर्व सहजसोप्या प्रतिबंधक उपायांमुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पुढील गुंतागुंतीच्या उपचारांपासून दूर राहता येते. दृष्टी असेल तरच ही सुंदर सृष्टी आपण पाहू शकतो, हे सर्वांनी लक्षात घेऊन आपण आपल्या सर्व शरीरातील अवयवांची अशीच काळजी घ्यावी.   

संबंधित बातम्या