रोगप्रतिबंधकशास्त्र

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 15 जुलै 2019

आरोग्य विशेष
 

आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये रोगप्रतिबंधक हे एक शास्त्र मानले गेले आहे. हरतऱ्हेच्या आजारांची वाढ काबूत ठेवणारी, त्यांच्यावर विजय मिळवणारी आणि अनेक आजारांना पृथ्वीतलावरून नष्ट करणारी ही एक महत्त्वाची वैद्यक शाखा आहे. या शाखेमध्ये अनेकविध रोगांचा प्रतिबंध, प्रत्येक व्यक्तीच्या स्वास्थ्याची जपणूक आणि आरोग्य संवर्धन यांचा शास्त्रीय दृष्टीने व्यावहारिक विचार करण्यात येतो.

सार्वजनिक आरोग्याची जपणूक आणि आणि सर्व नागरिकांच्या आरोग्याचे संवर्धन ही सामाजिक स्वरूपातून, योजनाबद्ध रीतीने राबविण्याची महत्त्वाची संकल्पना आहे. व्यक्तिगत पातळीवरील स्वास्थ्य संवर्धनाच्या उपाय योजनांच्या प्रयत्नात या संकल्पनेचा उगम असतो. पण सामूहिक तसेच सामाजिक स्तरांवर त्याची गरज आणि उपयुक्तता असतेच. शासकीय यंत्रणेमार्फत त्यासंबंधीची देखरेख होणे गरजेचे असते. 

सुरुवातीस या रोगनियंत्रण उपक्रमांचे स्वरूप फक्त सांसर्गिक रोगांवरील प्रतिबंधक उपाय योजणे एवढेच मर्यादित होते. त्यामध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि लसीकरण एवढ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जायचे. पण विज्ञानातील चौफेर आणि विस्तृत प्रगतीमुळे त्यात फार आमूलाग्र बदल झाला आहे. प्रगत, प्रगतिशील आणि अप्रगत अशा तीन प्रकारात विभागल्या गेलेल्या राष्ट्रांमध्ये या वैद्यकासंबंधीच्या दृष्टिकोनात तसेच उपाय योजनांत आज तफावत आढळत असली, तरी त्याचे स्वरूप निर्विवादपणे व्यापक झाले आहे. 

या उपाय योजनांची व्याप्ती कुटुंब किंवा गावपातळीवर मर्यादित राहिलेली नसून जिल्हा, राज्य, देश आणि जागतिक स्तरावर पसरलेली आहे. यामध्ये प्रतिबंधक योजना सुसूत्रपणे करणे, त्यासाठी दूरसंदेशवहन, संगणक, इंटरनेट, संख्यागणित शास्त्र अशा आधुनिक तंत्रविज्ञानातील साधनांचा वापर करणे नित्याचे झाले आहे. केवळ शासकीय आणि ‘जागतिक आरोग्य संघटने’सारख्या जागतिक संस्थांमार्फत उपाययोजना अमलात आणणे असे त्याचे स्वरूप आता राहिले नसून त्यात अनेक देशी-विदेशी सेवाभावी संस्था जोमाने सहभागी होऊ लागल्या आहेत.

सांसर्गिक रोगांवरील प्रतिबंधक उपाय करणे असे या शास्त्राचे स्वरूप मर्यादित न राहता रोगाचा उद्‌भव, त्याचा प्रसार आणि नियंत्रण, त्या आजारामधील आनुवंशिकता, पर्यावरण विज्ञान, सांस्कृतिक रुढींचा होणारा परिणाम यांचाही विचार करणे आता क्रमप्राप्त झाले आहे. याशिवाय वेळेत रोगाचे अस्तित्व ओळखणे आणि रोगाच्या सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेत त्याचे निदान करणे. त्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करणे, सांसर्गिक रोगांबरोबर अ-सांसर्गिक रोगांचाही प्रतिबंध करण्याचे प्रयत्न करणे. आजाऱ्याची काळजी घेण्याच्या पद्धतीत बदल सुचविणे. आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या गरजेनुसार विविध पद्धतींनी त्यांचे पुनर्वसन करणे आणि रोग्याला रोगातून मुक्त झाल्यानंतर समाजाचा एक घटक म्हणून त्याला जगू देण्यासाठी आणि त्याच्या क्षमतेनुसार त्याला समाजाचा एक उपयुक्त घटक म्हणून जगण्यासाठी नवी संधी उपलब्ध करून देणाऱ्या उपाय योजना करणे अशा अनेक बदलांनी या वैद्यक शाखेचे स्वरूप खूप व्यापक झाले आहे.

रोगप्रतिबंधक उपाय 
रोग प्रतिबंधक वैद्यकाची मूलभूत कल्पना पाहिली, तर लक्षात येते, की आधी होऊन गेलेल्या अनेक क्रियांचा परिणाम म्हणून विविध घटना घडून येतात. निरनिराळ्या क्षेत्रांत घडणाऱ्या घटनांच्या मागे अनेक गोष्टींची साखळी आढळून येते. या साखळीचे सारे दुवे प्रथम दर्शनी लक्षात येत नसले, तरी असे दुवे असतात याबद्दल एक खात्री असते. 
 रोग ही अशीच घटना असून तिच्या मागेही रोग्याच्या परिसरातील आणि अंतर्गत क्रियांमध्ये बदल घडवणारे दुवे असतात. त्या बदलानुसार शारीरिक प्रतिक्रिया न घडल्यामुळे रोग उत्पन्न होतो. तसेच रोगाची परिणती होण्यापूर्वीही दुसऱ्या अनेक घटनांचे दुवे दिसून येतात. त्या प्रत्येक दुव्याची माहिती करून घेऊन त्यांपैकी कमकुवत दुव्यावर आघात केल्यास कारण शृंखला तुटून रोगोत्पत्ती तसेच रोगप्रसार यांना आळा घालणे शक्‍य असते.
 अशा तऱ्हेने रोगप्रतिबंधक करणे शक्‍य असलेले पाच मुद्दे आज ओळखले जातात. त्यांपैकी प्राथमिक अवस्थेतच प्रतिबंधक उपाय करता आल्यास रोगोत्पत्ती होतच नाही. त्यापुढील अवस्थांतील उपायांमुळे रोगामुळे होणारी हानी कमी करता येते.

स्वास्थ्य संवर्धन 
 पहिला दुवा स्वास्थ्य संवर्धन आहे. साधारणपणे असे म्हणता येईल, की रोगाला योग्य अशी परिस्थिती तयार असल्याशिवाय रोग होत नाही. उदा. सदोष किंवा विपरीत आहार, स्वास्थ्याला बाधक अशी राहणी यांमुळे रोगाला योग्य अशी पार्श्वभूमी तयार होते. या गोष्टी टाळता आल्या, तर स्वास्थ्यरक्षण होऊन रोग टळतो. स्वास्थ्य संवर्धनामध्ये आहार, व्यायाम, निद्रा, विश्रांती आणि स्वच्छता यांबद्दल लोकजागृती करणे गरजेचे ठरते. लोकशिक्षण हा स्वास्थ्य संवर्धनाचा पाया आहे. हे लोकशिक्षण त्या विषयातील अधिकारी व्यक्तीने केल्यास लोकांचा विश्वास सहज संपादन करता येतो. 

स्वास्थ्य रक्षणाबाबत डॉक्‍टरांचे स्थान अनन्य साधारण आहे. अनेक आजारांवर उपचार करत असल्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास सहज बसतो. हस्तपत्रके, भित्तिपत्रके, चित्रपटगृहांतील तसेच दूरचित्रवाणीवरील जाहिराती यांचा या कामी उपयोग होतो. पण तरीही डॉक्‍टरांच्या शब्दावर रुग्णांचा विश्वास जास्त बसतो. रोगी बरा होण्याच्या मार्गावर असताना तर डॉक्‍टरांच्या सल्ल्यावर रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांची गाढ श्रद्धा असते. 
 आधुनिक वैद्यकात डॉक्‍टरांची ही भूमिका फार महत्त्वाची मानली जाते. दीर्घकाळ अंगवळणी पडलेल्या रोग साहाय्यक सवयी एकदम सुटणे शक्‍य नसते. पण डॉक्‍टरांनी चिकाटीने आणि युक्तीने प्रयत्न केल्यास त्याला यश येण्याची शक्‍यता असते. असा प्रयत्न केल्यानंतर एखाद्या कुटुंबाला त्या विषयाचे महत्त्व पटले म्हणजे रोगप्रतिबंधाला योग्य अशी मनोभूमिका तयार होऊ शकते.

विशिष्ट रोगांचा प्रतिबंध 
 ही प्रतिबंधाची दुसरी पायरी आहे. रोगप्रतिबंधक लस टोचणे हा यातील प्रमुख भाग असतो. लस टोचल्यामुळे कित्येक रोग होऊ शकत नाहीत, पण दैनंदिन व्यवहारातील साध्या दिसणाऱ्या गोष्टींचाही रोगप्रतिबंधास उपयोग होतो. उदा. हिवतापाच्या प्रतिबंधासाठी मच्छरदाणी वापरणे, मोटारसायकलवर बसताना शिरस्त्राण वापरणे, गरोदर स्त्रियांना लोह आणि फोलिक ॲसिडच्या गोळ्या देणे यांमुळे परिणामकारक प्रतिबंध होऊ शकतो. 

त्वरित निदान व वेळीच उपचार  
रोगाचे त्वरित निदान करून त्यावर वेळीच उपचार करणे ही रोगप्रतिबंधाची तिसरी पायरी असते. अर्थात त्यामुळे प्रत्यक्ष रोगप्रतिबंधक होत नसला, तरी वेळीच केलेल्या उपचारामुळे रोग दीर्घकाळ टिकत नाही. त्यामुळे त्यात शारीरिक हानी कमी होते. या गोष्टी अंतिम परिणामाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. क्षयरोग, गुप्तरोग, कुष्ठरोग, कर्करोग, मधुमेह यांच्याबाबत हे महत्त्वाचे असते. तिरळेपणावर, मोतीबिंदूवर वेळीच उपचार केल्यास अंधत्व टाळता येते. 

अनेक दुखण्यांवर प्राथमिक वैद्यकीय मदत करणे अपेक्षित असते. ताप, खोकला, जुलाब, उलटी, डोकेदुखी, पोटदुखी अशी लक्षणे तर नेहमीच आढळतात. याशिवाय छातीत दुखणे, सूज, चक्कर अशीही लक्षणे कधीकधी आढळतात. आता नुसता ताप, खोकला, जुलाब, इत्यादी शब्दांना रोगनिदानाशिवाय फारसा अर्थ नाही. ही लक्षणे ज्यामुळे आली आहेत तो रोग ओळखणे शक्‍य झाल्याशिवाय प्राथमिक आरोग्य सेवा शक्‍य नाही.

आजारातून येणारे पंगुत्व रोखणे 
 रोग होऊन गेल्यावर त्याचा परिणाम दर्शवणारे पंगुत्व कायम राहत असले, तरी ते वाढू नये यासाठी काही पूरक गोष्टी कराव्या लागतात. पोलिओमध्ये रोगग्रस्त भाग फळीने बांधून ठेवला असता पंगुत्व वाढत नाही. काही वेळा आजाराचा जो दुष्परिणाम होऊन गेलेला असतो, फक्त त्याची तीव्रता व प्रमाण कमी करता येते. उदा. भाजलेल्या रुग्णांच्या बाबतीत जखमा भरताना अवयव आखडणार नाहीत याची काळजी घेता येते. 

पुनर्वसन 
रोगामुळे रोग्याच्या शारीरिक क्रियेमध्ये काही न्यून उत्पन्न झाल्यानंतर किंवा एखाद्या अवयवाचा संपूर्ण नाश झाल्यानंतर रुग्णाच्या पुनर्वसनासाठी अनेक गोष्टी करणे अपेक्षित असते. या वेळी पंगुत्वामुळे रोग्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विघटन होऊ न देणे महत्त्वाचे असते. नाहीशा झालेल्या अवयवाचे कार्य राहिलेल्या अवयवास प्रशिक्षण देऊन रोग्याच्या मनाची जिद्द टिकविणे हे फार महत्त्वाचे आहे. उदा. अपंगांना कृत्रिम हातपाय बसवून, अंधाला स्पर्शाने लेखन-वाचनासारखी कामे शिकवून किंवा कर्णबधिर रुग्णांना ओष्ठ वाचनाने शब्द संज्ञा शिकवून त्यांचे पुनर्वसन करणे शक्‍य असते. याकरिता तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. अशा वेळेस रुग्णाला योग्य मार्गदर्शन करून त्याचे मनोधैर्य टिकविणे महत्त्वाचे असते. याबाबत मार्गदर्शन झालेल्या व्यक्ती स्वावलंबी होऊन आपल्या पायांवर उभे राहू शकतात. 
 कोणत्याही आजारांचा त्याचे निदान होण्याआधी किंवा तो हाताबाहेर जाण्याआधी असे अनेक प्रतिबंधक उपाय करावे लागतात. या उपायांनी समाजात उद्‌भवणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी होते. आरोग्याची पातळी उंचावते आणि रोगांच्या उपचारांवर देशाच्या अर्थव्यवस्थेतून खर्च होणाऱ्या अवाढव्य आकाराच्या वाढत्या आर्थिक बोजाला खीळ बसते.  रोगप्रतिबंधाच्या या ‘पाच पायऱ्या’ म्हणजे प्रतिबंधक उपायांचा आधार असून त्यांचा व्यवसायात उपयोग करणारा डॉक्‍टर हा संपूर्ण अर्थाने वैद्यकीय सेवक ठरतो आणि त्यांचा योजनापूर्वक वापर करणारे राष्ट्र निरामय होते.  

संबंधित बातम्या