साथीच्या आजारांवर विजय

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 15 जुलै 2019

आरोग्य विशेष
 

‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ असे संत तुकारामांनी म्हटले आहे. पण आजमितीला देशातली आणि जागतिक स्तरावरली आरोग्याबाबतची परिस्थिती पाहिली, तर ‘आरोग्य पाहता जवापाडे, रोग पर्वताएवढे’ असेच म्हणावे लागेल.
एखाद्या गावात, प्रदेशात किंवा लोकसंख्येच्या ठराविक भागात एखाद्या आजाराची लागण अपेक्षेपेक्षा जास्त किंवा सर्वसाधारण प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणात आढळून आली, तर त्या भागात त्या आजाराची साथ आल्याचे मानले जाते. 
हा आजार आजारी व्यक्ती दुसऱ्या निरोगी व्यक्तीच्या संपर्कात आल्यास जर त्या दुसऱ्या व्यक्तीला होत असेल, तर त्याला संसर्गजन्य आजार म्हणतात.

प्रतिबंधक आरोग्याचा इतिहास
अठराव्या शतकापर्यंत साथीच्या आणि इतरही आजारांबाबत वैद्यकीय शास्त्र प्रगत झाले नव्हते. रोग का होतात? कशामुळे होतात? रोग झाल्यावर शरीरात काय प्रक्रिया घडतात? याबाबत रोगप्रक्रियेची माहिती जाणून घेणारे विज्ञान प्रगत नव्हते. त्या काळात साथींचा संबंध दैवी प्रकोप, मानवी पापे, पातके, त्यांमुळे होणारे दूषित वातावरण, दूषित शरीरे, आकाशातील ग्रहताऱ्यांची बदलती स्थिती अशा गोष्टींशी लावला जाई.
लंडनमध्ये १८३१ ते १८३५ या काळात कॉलराच्या साथीत सात हजार रुग्ण दगावले. त्यानंतर १८५३-१८५४ मध्ये १२ हजार रुग्ण कॉलरा आणि टायफॉईडच्या आजाराने मृत्युमुखी पडले. त्यामुळे अशा आजारांचा पद्धतशीर अभ्यास करून त्यांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने ‘रोगपरिस्थिती वैज्ञानिक संस्था’ स्थापन झाली. त्यांच्या सर्वेक्षणानुसार या साथींचा प्रादुर्भाव पिण्याचे पाणी स्वच्छ नसल्याने आणि गटारांचा मैला नदीत सोडल्यामुळे होतो, असे दिसून आले. या संस्थेच्या संशोधनात्मक अहवालानुसार -

  •  लंडन शहराला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविणे. 
  •  टेम्स नदीत शहराचे मलयुक्त सांडपाणी न सोडणे. 
  •  सार्वजनिक स्वच्छता बाळगणे. 
  •  सरकारी स्तरावर सार्वजनिक आरोग्य विभाग स्थापन करणे.  

यासाठी आवश्‍यक ते नियम आणि सार्वजनिक आरोग्यविषयक स्वतंत्र सरकारी विभाग स्थापन झाला. साथीच्या रोगांच्या अभ्यासास चालना मिळाली. तीव्र संसर्गजन्य विकारांच्या प्रतिबंधाचा उद्देश पुढे ठेवून संशोधनात्मक आणि प्रतिबंधात्मक कार्य सुरू झाले. 
अठराव्या शतकात आणि त्यानंतर सूक्ष्मजंतू, विषाणू, इतर जिवाणू याबाबत संशोधन होऊन या आजारांची जीवशास्त्रीय माहिती आणि त्यांच्यामुळे होणारे संसर्गजन्य आणि संक्रमणजन्य रोग याबाबत वैज्ञानिक प्रबोधन होऊन ‘साथीचे आजार’ हा शब्दप्रयोग मुख्यतः प्रचारात आला. कॉलरा, प्लेग, टायफॉईड, इन्फ्ल्यूएन्झा अशा आजारांचे वर्गीकरण साथीच्या संसर्गजन्य आजारात करण्यात आले. 
विसाव्या शतकात आरोग्याविषयी जाणिवा व्यापक प्रमाणात निर्माण झाल्याने संक्रामणांखेरीज इतर विकारांचा, तसेच आरोग्य-विघातक घटनांचाही अभ्यास साथींच्या शीर्षकाखाली होऊ लागला. पण त्यांना असंसार्गिक साथीचे आजार मानले जाऊ लागले. यामध्ये कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, मनोविकार, अपघात, धूम्रपान, मादक पदार्थांचे सेवन, औषधी पदार्थांचे दुष्परिणाम यांचा समावेश झाला.

प्रतिबंधात्मक संशोधन
कोणत्याही आजाराची साथ आली, तर सार्वजनिक आरोग्यविभाग खालील मुद्द्यांवर त्यांचा अभ्यास करून उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कार्यप्रणाली ठरवते. 
१. संख्यात्मक अभ्यास : रोगाचा धोका असलेली लोकसंख्या किती आहे, कोणत्या प्रकारची आहे? उदा. शाळकरी मुले, नदीकाठची वस्ती, यात्रेकरू, उपाहारगृहात खाणाऱ्या व्यक्ती इत्यादी. रोगांची वारंवारता निश्‍चित करण्यासाठी हा आकडा आवश्‍यक असतो. उदा. २० हजार शाळकरी मुलांपैकी एक हजारांना गोवर झाला आहे असे लक्षात आले, तर दुसऱ्या एखाद्या ठिकाणच्या प्रमाणापेक्षा हे अधिक आहे किंवा नाही हे ठरविता येते.
२. रोगनिदान :  रुग्णांच्या रक्त, लघवी, थुंकी, शौच अशा गोष्टींचे राष्ट्रीय विषाणू निदान संस्थेकडून जैवशास्त्रीय परिशीलन करून आजाराचे निदान केले जाते. 
 यात आलेली साथ तापाची असल्यास तो कोणता ताप आहे? उदा. इन्फ्ल्यूएंझा, डेंग्यू, हिवताप, स्वाईनफ्लू आहे, की एखादा वेगळाच आहे. 
 जुलाब, उलट्या यांची साथ असल्यास तो कॉलरा आहे का ग्रॅस्ट्रो? 
 काविळीची साथ असल्यास त्याचे कारण काय? 
 इन्फ्ल्यूएंझाचा प्रकार कोणता? 
 पूर्वी आलेल्या साथीमधील विषाणू व आताचे विषाणू यात काही फरक आहे का?
३. आजाराचे विशेष निरीक्षण : साथीचा उद्‌भव केव्हा झाला? आजार किती दिवस टिकत आहे? कोणत्या ऋतूत अधिक रुग्ण आढळतात?
४. भौगोलिक अभ्यास : देशातील कुठला प्रांत, कोणत्या प्रदेशाच्या किंवा शहराच्या कुठल्या भागात आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो आहे? यात भौगोलिक नकाशा वापरून त्यामध्ये साथीच्या प्रगतीची नोंद केली जाते.
५. आजारांमधील विशेष घटक : वय, लिंगभेद, जात-धर्म, देश, व्यवसाय, आर्थिक स्तर, सामाजिक दर्जा, व्यसनाधीनता अशा घटकांपैकी आजारी पडणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकाराचे आधिक्‍य आहे? याचे संख्याशास्त्रीय परिशीलन केले जाते. 
६. रोगप्रसाराचे स्वरूप : ही साथ कशी पसरते आहे? एकाच ठिकाणी तिचे केंद्र आहे. की अनेक केंद्रांपासून ती पसरत आहे? लागणीचा वेग मंद आहे की शीघ्र? प्रसारामध्ये प्रवासी व्यक्ती, आहाराचा प्रकार, प्रत्यक्ष संपर्क यांसारख्या घटकांची भूमिका आहे का? उदाहरणार्थ २००३ मधील ‘सार्स’, २००९  मधील ‘स्वाईनफ्लू’ या आजारांत आंतरराष्ट्रीय प्रवास हा महत्त्वाचा घटक होता. रोगसंक्रमण एखाद्या केंद्राकडून सर्वांना होत आहे का? उदा. अन्न-विषबाधा अथवा संक्रमणाची काही शृंखला लक्षात येते आहे का? उदा. कॉलरा, टायफॉईड. यात एखाद्या समारंभातील भोजन समारंभ, एखादे भोजनालय किंवा शाळा-कॉलेजेसच्या मेस इत्यादी.

प्रतिबंधाची विशेष तत्त्वे
साथींचा अभ्यास करताना एखाद्या साथीमध्ये तिथल्या रुग्णांचा एकाच वेळी केलेला अभ्यास जसा उपयुक्त असतो; त्याचप्रमाणे अशा समुदायाचा किंवा विशिष्ट गटाचा दीर्घकालीन अभ्यास करणेही गरजेचे असते. साथीचे पुनरागमन, त्यासमवेत अन्य रोगांचा आढळ, विकारामुळे निर्माण होणारी दीर्घकालीन दुर्बलता यांसारख्या अनिष्ट परिणामांची माहिती त्यामुळे मिळू शकते. यात आजाराच्या उद्‌भवाचे किंवा नवीन रुग्णांचे प्रमाण, एकूण रुग्णांची त्या विभागातील टक्केवारी, आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण, अपंगत्वाचे किंवा तात्पुरत्या दुर्बलतेचे प्रमाण, वंध्यत्वाचे प्रमाण या गोष्टी पाहता येतात. दुसऱ्या गटांसमवेत केलेला तुलनात्मक अभ्यासही रोगाच्या स्वरूपाविषयी बरीच माहिती देऊ शकतो. त्यासाठी आजाराच्या नोंदी आवश्‍यक असतात.
कोणत्याही साथीमध्ये केलेल्या प्रायोगिक अभ्यासातूनही रोगांच्या कारणांबद्दल, त्यामुळे शरीरात घडणारे बदल, विकृती, त्यामुळे येणारी इम्युनिटी यांची माहिती मिळू शकते. तसेच रोगनिदान, प्रतिबंध व निर्मूलनासाठी शोधून काढलेल्या तंत्रांची चाचणी करता येते. 

प्रतिबंधक उपाय
 कोणत्याही साथीत अनेक स्तरावर प्रतिबंधक उपाय वापरणे गरजेचे असते. यामध्ये मुख्यत्वे खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो.
१. रोगाचे उगमस्थान आणि संचय : संसर्गजन्य आजाराची कुठलीही साथ आली, की ती जिथून सुरू झाली तिथल्या रुग्णांची पाहणी केली जाते. तो आजार का पसरला याची संभाव्य करणे शोधली जातात. काही वेळेस पाण्याचा साठा, अन्नपदार्थांची सुरक्षितता याबाबत निरीक्षणे करून या आजाराचे जंतू कुठून आले किंवा कुठे साठवले जातात याची माहिती घेऊन त्याचा प्रतिबंध केला जातो आणि आजार न झालेल्या नागरिकांना सुरक्षिततेचे उपाय सुचवले जातात. उदा. डेंगीची साथ शहरातील उच्चभ्रू वस्तीत जास्त असतो. अशा ठिकाणाचे एसी, रेफ्रिजरेटर यांच्यामध्ये साचणाऱ्या पाण्यात डेंगीच्या डासांच्या अळ्या सापडतात. त्याप्रमाणे हे संचय नष्ट करण्याची मोहीम आखली जाते. 
२. अपेक्षित रुग्णांचा बचाव : साथीमध्ये ज्यांना लागण होऊ शकेल अशांचे त्या आजारापासून संरक्षण करणे आवश्‍यक असते. नुकत्याच बिहारमधील मुझ्झफरपूर येथे इनकेफेलायटीस किंवा चमकी आजाराच्या साथीत दीडशेहून जास्त मुले मृत्युमुखी पडली. यामध्ये या वयोगटातील इतर मुलांना हा आजार होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने काळजी घ्यायची असते. 
स्वाईनफ्लूच्या साथीमध्ये गर्भवती स्त्रिया, कर्करोगाचा उपचार घेणारे रुग्ण, एचआयव्ही बाधित व्यक्ती, सततचा खोकला आणि दमा असलेल्या व्यक्तींना तो आजार होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.
३. लसीकरण : गोवर, कांजिण्या, रुबेला, घटसर्प, डांग्या खोकला, पोलिओ, मेंदूज्वर, लहान मुलांमधील रोटा व्हायरसमुळे होणारे जुलाब, हिपॅटायटिस-बी, धनुर्वात अशा आजारांच्या प्रतिबंधाबाबत लसीकरण हा दीर्घकालीन इलाज असतो. तर स्वाईनफ्लू, टायफॉईड, रेबीज अशा आजारांमध्ये काही विशिष्ट काळासाठी प्रतिबंध करायला लसीकरण उपयुक्त असते.
४. इम्युनोग्लोबिनचा वापर : रेबीज, धनुर्वात अशा आजारात इम्युनोग्लोबिनचा वापर आजाराचा प्रतिबंध करायला केला जातो. 
५. प्रतिबंधक औषधांचा वापर : स्वाईनफ्लूची साथ असताना ऑसिल्टॅमिव्हिर (टॅमिफ्लू, फ्लूव्हिर), मलेरियासाठी क्‍लोरोक्विन अशी औषधे वापरली जातात.
६. वैयक्तिक पातळीवर प्रतिबंध : स्वास्थ्य संवर्धन : वैयक्तिक स्वास्थ्य संवर्धन हा अतिशय महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे. सर्वसाधारणपणे रोगाला योग्य अशी परिस्थिती तयार असल्याशिवाय रोग होत नाही. सदोष आणि विपरीत आहार, स्वास्थ्याला बाधक अशी राहणी यांमुळे रोगाला पोषक वातावरण तयार होते. या गोष्टी टाळल्यास स्वास्थ्यरक्षण होऊन रोग होण्याचे टळते. 
 स्वास्थ्य संवर्धनामध्ये आहार, व्यायाम, निद्रा, विश्रांती व स्वच्छता यांबद्दल लोकजागृती करणे याला फार महत्त्व आहे म्हणजेच लोकशिक्षण हा स्वास्थ्य संवर्धनाचा पाया आहे. 
 पिण्याचे पाणी : गाळलेले आणि स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरावे. त्यामुळे उलट्या, जुलाब, कांिजण्या, टायफॉईड, फ्लू, यांसारखे आजार पसरत नाहीत. 
 अन्न पदार्थ : एखादी संसर्गजन्य साथ असताना रोजचे जेवण ताज्या स्वरूपात मिळायला हवे. शिळे अन्न खाऊ नये. तसेच बाहेर असताना रस्त्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. त्यामुळे उलट्या, जुलाब, कावीळ-ए, टायफॉईड या आजारांचा प्रतिबंध होतो. 
 हात धुण्याचे महत्त्व : हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याचा वापर करावा. साबणाऐवजी साबणाचे द्रावण असलेल्या बाटल्या जास्त उपयुक्त असतात. आजकाल मिळणारे सॅनिटायझर वापरल्यास उत्तम. हात धुताना हाताचा तळवा, बोटांमधील जागा घासून स्वच्छ धुणे गरजेचे असते. कमीतकमी १५ सेकंद हात चोळून धुवावेत. हात पुसण्यासाठी टिश्‍यू पेपरचा वापर करावा.
 जंतू संसर्गाचे मार्ग : ज्या ठिकाणी अनेकांचा वावर असतो किंवा ज्या गोष्टी अधिक हाताळल्या जातात. अशा गोष्टी म्हणजे दरवाज्याचे हॅन्डल, फोन्स, आरसा अशातून जंतूंचे संक्रमण होऊन तो आजार पसरण्याची शक्‍यता जास्त असते. इन्फेक्‍शन पसरण्याचे प्रमाण अधिक असते. क्‍लोरिन किंवा फिनेल यांसारखी घरगुती जंतुनाशके वापरून स्वच्छता ठेवणे गरजेचे ठरते. स्वच्छतेसाठी वापरले गेलेले कागद, कपडे कोरड्या कचऱ्यात टाकून द्यावेत.
 नाक-तोंड झाकून घेणे : आजार झालेल्या व्यक्तीने स्वच्छ कपड्याने तोंड झाकून घ्यावे. त्यामुळे आजाराचा संसर्ग पसरण्यास प्रतिबंध होईल आणि निरोगी व्यक्तीला तो होण्यापासून रोखता येते. इन्फ्लूएन्झा, स्वाईनफ्लूसारख्या आजारात अशी काळजी घ्यावीच लागते.
 लसीकरण : काही आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे असते. ६ महिने किंवा त्याहून मोठ्या मुलांना फ्लूची लस देणे गरजेचे असते. 
 वापरलेले टिश्‍यू पेपर : नाक, हात पुसण्यासाठी वापरलेले टिश्‍यू कचऱ्यात फेकावेत किंवा कमोडमधून फ्लश करावे. हात-तोंड पुसलेल्या अशा वस्तूतून जंतुसंसर्ग पसरण्याची निश्‍चिती असते.
 सिंथेटिक इन्सेक्‍ट रिप्लिकंट : मलेरिया, डेंगीसारखे आजार कीटकांमुळे होतात. इन्सेक्‍ट रिप्लिकंटमुळे डास, माश्‍या व अन्य कीटक यांना आळा बसतो किंवा त्याचे प्रमाण आटोक्‍यात राहण्यास मदत होते. सिंथेटिक इन्सेक्‍ट रिप्लिकंट हे अधिक प्रभावी असून त्याचा परिणाम दीर्घ काळ चालतो. 
 एकमेकांचे अन्न, पाणी न वापरणे : इन्फेक्‍टेड व्यक्तीच्या ताटात जेवणे, एकाच बाटलीतून पाणी पिणे टाळावे. त्यामुळे त्या आजाराचा प्रादुर्भाव अनभिज्ञ व्यक्तीला होण्याचा धोका असतो.
 घरातील स्वच्छतागृहे : संडास व बाथरूम रोज साफ करणे गरजेचे असते. त्यासाठी क्‍लोरिन, फिनेल वगैरे वापरून बाथरूम स्वच्छ करावी. रस्त्यावर मलमूत्र विसर्जन टाळावे.   
७. सार्वजनिक प्रतिबंध : नागरिकांमध्ये साथीच्या आजारांबद्दल जागरूकता आणि प्रतिबंधक उपायांबद्दल जाणीव निर्माण करणे. त्यासाठी जाहिराती, वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन यांचा वापर करणे.
 स्वच्छ आणि निर्जंतुक पाण्याचा पुरेसा पुरवठा करणे. सार्वजनिक पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या विहिरी, बोअरवेल्स यांच्यामधून मिळणाऱ्या पाण्याच्या दर्जावर नियंत्रण ठेवणे. 
 खाद्यपदार्थ, पेये, बर्फ यांचे वितरण करणारी हॉटेल्स, स्टॉल्स, हातगाड्या यांच्याकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचा आरोग्यदर्जा, त्या ठिकाणाची स्वच्छता, ते करवणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य याकडे लक्ष देणे. 
 सार्वजनिक स्वच्छता, सांडपाणी-मैला निचरा, कचरा यांची तजवीज करणे.
 डेंगी, मलेरियासारख्या आजारांचा प्रसार डासांमुळे होतो. पाणी साचल्यामुळे त्यात डासांची उत्पत्ती होते. स्वच्छ पाणी साचल्यास त्यात डेंगीच्या डासांची, तर डबक्‍यांमध्ये मलेरियाच्या डासांची पैदास होते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे असे पाणी साचू न देणे हे सार्वजनिक प्रतिबंधातील प्रमुख काम असते.
 यात्रेच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या दर्जावर तसेच त्यांच्या वितरणातील आरोग्यविषयक गोष्टींवर नियंत्रण ठेवणे.
 सार्वजनिक पद्धतीने, सरकारी रुग्णालयात, आरोग्यकेंद्रात साथीच्या आजारांसाठी लसीकरण उपलब्ध ठेवणे.
 आपल्या भागात जे साथीचे आजार उद्‌भवत असतात त्यांच्या नोंदी ठेवणे, संशयित रुग्णांची तपासणी, रक्त चाचण्या घेणे, रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या विशेष आणि सर्वसाधारण औषधांचा पुरेसा साठा ठेवणे.   
८. सर्व्हिलन्स : एखाद्या भागात जर साथीचा आजार पुन्हा पुन्हा उद्‌भवत असेल, तर त्या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची इत्थंभूत तपासणी करणे आवश्‍यक असते. आज भारतातून पोलिओचा आजार नष्ट झाला आहे. पण तरी ताप येऊन एखाद्या रुग्णाच्या पायाला किंवा हाताला लकवा मारला गेला किंवा त्यातील शक्ती नाहीशी झाली, तर त्या रुग्णाची सर्वंकष तपासणी केली जाते.  
९. अपंगत्व नियंत्रित करणे : आजार होऊन गेल्यावर त्याचा परिणाम म्हणून येणारे पंगुत्व कायम राहणारे असले, तरी ते अधिक होऊ नये यासाठी तो आजारी असतानाच काही गोष्टी कराव्या लागतात. 
१०. पुनर्वसन : आजारामुळे रोग्याच्या शारीरिक क्रियेमध्ये काही न्यून उत्पन्न झाल्यानंतर किंवा एखाद्या अवयवाचा संपूर्ण नाश झाल्यानंतरही त्याच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे. ही मदत शारीरिक तसेच मानसोपचारावर आधारित असावी लागते.
 आज संपूर्ण जगात साथीच्या आजारांचा सुळसुळाट झाला आहे. त्यापासून मानवाचा बचाव करण्यासाठी आजारांचे केवळ उपचारच नव्हे, तर त्यांचा प्रतिबंध केला तरच सर्व जगाचे जीवनमान उंचावेल.

संबंधित बातम्या