आरोग्य विमा का असावा?
आरोग्य विशेष
कुठलेही मोठे आजारपण किंवा अपघात सांगून येत नाही. अचानक रुग्णालयामध्ये भरती व्हावे लागले, तर खिशाला कात्री लागण्याची शक्यता असते. रुग्णालयांमधले उपचार महागडे असतात. ऐनवेळी आपल्याकडे पैसेही तयार नसतात. मग धावपळ होते. कोणाकडून तरी उधार घेऊन, कर्ज काढून उपचारांसाठी पैसा गोळा केला जातो. कधी व्यवसायातून पैसा वळवावा लागतो, तर कधी आयुष्यभर साठवलेले पैसे एका झटक्यात संपून जातात. मग पुढे अख्खे कुटुंब आर्थिक संकटात सापडू शकते. अशी वेळ येऊ नये यासाठीच प्रत्येकाचा आरोग्य विमा असावा. त्यामुळे अचानक रुग्णालयीन उपचारांची गरज भासली तर त्याचा खर्च विमा कंपनीकडून मिळू शकतो. चांगल्या रुग्णालयामधून, चांगल्या डॉक्टरकडून उपचार घेता येऊ शकतात.
आरोग्य आणि जीवन विमा यामध्ये फरक आहे. आरोग्य विमा हा माणसाच्या आजारपणासाठी किंवा अपघातासाठीचा विमा असतो. तर, जीवन विमा हा माणसाच्या आयुष्यावरचा विमा असतो. आपल्याला तरुणपणी उपचारांची, परिणामी विम्याची गरज भासत नाही. पण, म्हातारपणी हीच गरज वाढत जाते आणि तेव्हा विमा मिळत नाही. त्यामुळे तरुणपणीच आरोग्य विमा उतरविणे हितकारक आहे. हप्त्याची रक्कम विमा उतरविणाऱ्याचे वय, कुटुंबातील सदस्य, विम्याची रक्कम यावर अवलंबून असतो. विमा संपूर्ण कुटुंबाचाही काढता येतो आणि वैयक्तिकही काढता येतो. साधारण वयाच्या सहा महिन्यांपासून ६५ वर्षांपर्यंत विमा काढता येतो. वय वाढले, की हप्त्याची रक्कम वाढत जाते. समजा ३० ते ३५ वयोगटातील एका व्यक्तीस पाच लाखांचा वैयक्तिक विमा काढायचा आहे. तर, त्याला अंदाजे वार्षिक आठ ते दहा हजार रुपये हप्ता भरावा लागेल. याच वयोगटातील व्यक्तीला आपल्या चार जणांच्या कुटुंबासाठी (म्हणजेच तो स्वतः, त्याची बायको आणि दोन मुले) पाच लाखांचा विमा काढायचा असेल, तर त्याला साधारण १५ हजार रुपये वार्षिक हप्ता भरावा लागेल. हाच कुटुंब विमा जर त्याने ४६-५० या वयात काढला, तर त्याला २५ हजार रुपये वार्षिक हप्ता भरावा लागेल. विम्याची रक्कम वाढविली, तरी हप्त्याची रक्कम वाढेल.
आजच्या घडीला सरकारी कंपन्यांसह अनेक खासगी कंपन्या विविध हेल्थ प्लॅन्स उपलब्ध करून देतात. न्यू इंडिया ॲश्युरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएन्टल इन्शुरन्स या सरकारी विमा कंपन्या आहेत. त्याशिवाय स्टार हेल्थ, अपोलो म्युनिक, मॅक्स बुपा, बजाज आलियान्झ, रिलायन्स हेल्थ, टाटा एआयजी जनरल, एसबीआय जनरल, सिग्ना टीटीके अशा अनेक खासगी आरोग्य विमा कंपन्याही आहेत. थोड्याफार फरकांनी सगळ्या कंपन्यांचे नियम सारखेच असतात. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ऑफ इंडिया, आयआरडीएआय) यांच्यातर्फे कंपन्यांचे मूलभूत नियम तयार केले जातात. साधारणपणे रुग्णवाहिका, हवाई रुग्णवाहिका, उपचार (यामध्ये औषधे, शस्त्रक्रिया, तपासण्या या सर्वांचा समावेश होतो.), खोलीचे भाडे, आयसीयू भाडे, डॉक्टरांची फी, उपचारांआधीची आणि नंतरची सेवा या मूलभूत गोष्टींचा समावेश असतो. काही कंपन्या एक दिवसाच्या उपचारांसाठीही विमा देतात. उदा. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया. ही शस्त्रक्रिया एका दिवसात होते. रुग्णाला काही तासांमध्ये घरी सोडले जाते. अशा उपचारांसाठीही विमा दिला जातो. काही प्लॅन्समध्ये एखाद्या वर्षी विम्याची रक्कम क्लेम केली नाही, तर ‘नो क्लेम बोनस’ मिळून ती रक्कम पुढील वर्षी दुप्पट होते किंवा वाढते.
घरात फक्त म्हातारे आई-वडील असतील आणि काही कारणाने तुम्हालाच रुग्णालयात भरती व्हावे लागले, तर अशा वेळी आई-वडिलांनी पैशांची जमवाजमव कुठून करायची? म्हणूनच आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. ‘मला अचानक पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागले. माझ्या तर लक्षातही नव्हते. रुग्णालयात बसून पैशांची सोय कशी करावी, या विचारात मी होते. पण, रुग्णालयवाल्यांनीच विचारले, तुमचा विमा आहे का? कागदपत्रे दिल्यानंतर सगळी प्रक्रिया निर्विघ्न पार पडली. काहीच अडचण आली नाही. माझ्या आई-वडिलांचे वय ८० च्या पुढे आहे. त्यामुळे त्यांनाही धावपळ करणे शक्य नव्हते. माझ्या कागदपत्रांची माहितीही फक्त मलाच होती. मी शुद्धीवर होते म्हणून सांगू शकले. नाहीतर अवघड होते. त्यामुळे घरात कोणाला तरी या कागदपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे,’ असे अनघा अकोलकर यांनी सांगितले. ‘एक डॉक्टर म्हणून मी सांगेन, की प्रत्येकाचा आरोग्य विमा हा असावाच. प्रत्येकाने दीर्घकालीन विचार करून जास्तीत जास्त रकमेचा विमा उतरवावा. दिवसेंदिवस रुग्णालयांमधल्या किमती वाढत आहेत. लाखांच्या घरात खर्च होऊ शकतो. ज्या ठिकाणी कॅशलेस क्लेम उपलब्ध आहे, शक्यतो अशाच ठिकाणी उपचार घ्यावेत,’ असे मत डॉ. अतुल लिमये यांनी व्यक्त केले.
आरोग्य विम्याचे फायदे
कॅशलेस विमा
प्रत्येक आरोग्य विमा कंपनी कॅशलेस विम्याची सुविधा पुरविते. विमा कंपन्यांचा भारतभरातील रुग्णालयांशी टाय-अप असतो. तुम्ही या रुग्णालयामध्ये भरती असाल, तर तुम्हाला ‘कॅशलेस’ उपचार मिळतात. म्हणजेच तुम्हाला पैसे भरावे लागत नाहीत. तुम्हाला फक्त तुमचा विमा क्रमांक सांगायचा असतो. बाकी प्रक्रिया रुग्णालय आणि कंपनी परस्पर पूर्ण करतात. यामुळे आधी आपण पैशांची जमवाजमव करून ते भरायचे आणि नंतर कंपनीकडून मागायचे या भानगडीतून सुटका होते. मात्र, उपचारांचा खर्च तुम्ही काढलेल्या विम्यापेक्षा जास्त होत असेल किंवा ठराविक उपचारपद्धती तुमच्या विम्यामध्ये समाविष्ट केलेली नसेल तर तुम्हाला वरचे पैसे भरावे लागतात. तसेच, कंपनीचे टाय-अप नसलेल्या रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यास ‘कॅशलेस’ उपचार मिळत नाहीत. आधी पैसे द्यावे लागतात व नंतर विमा कंपनीकडून परत मिळतात.
प्राप्तिकरामधून सूट
तुमचा आरोग्य विमा असेल, तर तुम्हाला प्राप्तिकर कायदा, १९६१ मधील कलम ८०ड नुसार प्राप्तिकरामध्ये सूट मिळू शकते. तुम्ही भरत असलेल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक विमा हप्त्यांवर सूट मिळते. वयाच्या साठीपर्यंत तुम्ही वर्षाला २५ हजार रुपयांपर्यंत कर सवलत मिळवू शकता. तर, साठीनंतर वर्षाला ५० हजारांपर्यंत सवलत मिळू शकते. मात्र, कर सवलत किती मिळणार हे त्या-त्या विमाधारकाचा हप्ता आणि वय यावर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवावे. तुम्ही स्वतःचा व आई-वडिलांचा हप्ता भरत असाल आणि आई-वडील ज्येष्ठ नागरिक असतील, तर वर्षाला ५५ हजार रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते.
विविध कारणांसाठी विमा
वैयक्तिक व कौटुंबिक विम्यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी, शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारासाठी आणि प्रसूतीसाठी विमा काढता येतो. विमा काढताना संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली नाही, तर विमा नाकारला जाऊ शकतो. तसेच, आधीपासूनच एखादे आजारपण असेल किंवा एखादे उपचार सुरू असतील, तरी त्यासाठीही विमा मिळू शकतो. उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडांचा आजार, कर्करोग इ. मात्र, ही माहिती आधी सांगणे गरजेचे आहे.
विमा काढताना या गोष्टींकडे लक्ष द्या
ज्या कंपनीचा विमा घेणार आहात, त्या कंपनीच्या विश्वासार्हतेबद्दल खात्री करावी. ती कंपनी तत्पर सेवा देते का, याबद्दल चौकशी करावी. त्या कंपनीचे आपल्या शहरात, आपल्या नजीक कार्यालय आहे का, ते पाहावे.
सध्या अनेक कंपन्या वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध करून देतात. त्यामुळे आपल्या उत्पन्नानुसार आणि आपल्या गरजेनुसार प्लॅन घ्यावा. प्लॅन घेण्याआधी त्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत आणि कोणत्या नाहीत, हे काळजीपूर्वक वाचावे.
विम्याबद्दल घरातील सर्व मोठ्या व्यक्तींना माहिती असावी. ऐनवेळी कागदपत्रे सापडत नाहीत. असे होऊ नये यासाठी विम्याची कागदपत्रे कुठे ठेवली आहेत, रक्कम काय आहे, हे घरातील सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे.
विम्याचा हप्ता वेळच्या वेळी भरावा. त्याची तारीख लिहून ठेवावी. वार्षिक हप्त्यासाठी वर्षभर दर महिन्याला थोडी रक्कम बाजूला काढू शकता, त्यामुळे एकदम ओझे होणार नाही.
सरकारी विमा योजना
सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांशिवाय केंद्र सरकारच्या अनेक आरोग्य विमा योजना आहेत. दारिद्र्यरेषेखाली कुटुंबांसाठी या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना ः ही योजना दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. यासाठी फक्त ३० रुपयांमध्ये नोंदणी करता येते आणि सरकारच विम्याचे हप्ते भरते. या अंतर्गत ३० हजार रुपयांपर्यंत रुग्णालयाचा खर्च मिळू शकतो. तसेच स्वतः विमाधारक, त्याची पत्नी (महिला विमाधारक असेल तर तिचा पती) आणि तीन मुलांना विम्याचा लाभ घेता येतो.
आयुष्यमान भारत विमा योजनाः या योजनेअंतर्गत कुटुंबाला दर वर्षी पाच लाखापर्यंतचा विमा मिळू शकतो. योजनेअंतर्गत सांगितलेल्या सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येऊ शकतील.
एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स स्कीम (ईएसआयएस) ः या योजनेअंतर्गत कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबाला विम्याचा लाभ घेता येतो. त्याशिवाय कामामुळे झालेला आजार, कायमचे किंवा तात्पुरते अपंगत्व यासाठीसुद्धा विम्याचा लाभ घेता येतो. सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम (सीजीएचएस) ः या योजनेअंतर्गत केंद्र सरकारचे सर्व कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक आणि त्यांचे कुटुंबीय यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवांचा लाभ घेता येतो. यामध्ये औषधोपचारांचा खर्च, दवाखाना/रुग्णालयामध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, ईसीजी, एक्स-रे यांसह इतर तपासण्या, रुग्णालयाचा खर्च इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स स्कीम ः या योजनेअंतर्गत ३० हजार रुपयांपर्यंत विमा मिळू शकतो. अपघाती मृत्यू झाल्यास २५ हजार रुपये मिळतात.
बदललेल्या जीवनशैलीमुळे आत्ता तरुण असलेल्यांनासुद्धा नानाविध आजार उद्भवतात. म्हातारपणी आणखी कशाला सामोरे जावे लागेल, याचे उत्तर तरुणपणी कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे आत्तापासूनच तयारी असलेली बरी!
(प्रत्यक्ष िवमा उतरवताना आकडे बदलू शकतात, याची कृपया नोंद घ्यावी.)