वैद्यकीय मदत कशी मिळवाल?

ज्योती बागल
सोमवार, 15 जुलै 2019

आरोग्य विशेष
आरोग्यविषयक समस्या सांगून किंवा एखाद्याची आर्थिक क्षमता बघून येत नाहीत. त्यामुळे कधीही, कोणालाही, कोणताही आजार होऊ शकतो. बऱ्याचदा हा आजार गंभीर स्वरूपाचा असू शकतो. साहजिकच त्यासाठी चांगले रुग्णालय आणि योग्य उपचार घेणे आवश्‍यक असते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना हा खर्च परवडणारा नसतो. अशावेळी वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे असते. त्यामुळे वैद्यकीय मदत नेमकी मिळवायची कशी आणि कोणाकडून याविषयीचा आढावा या लेखात घेतला आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी
 पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत अर्थसाहाय्य पुरविले जाते. तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून मदत केली जाते. या योजनेचे व्यवस्थापन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली केले जात असून त्याची देखरेख आणि नियंत्रणही मुख्यमंत्र्यांकडेच असते. यासाठी विभागवार एक समन्वयक नेमलेला असतो. जो त्या-त्या विभागातील रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे काम करतो. या निधीअंतर्गत साधारण तीन लाखांपर्यंत वैद्यकीय मदत मिळते. https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तीन लाखांपर्यंत मदत मिळू शकते. ही मदत गरीब कुटुंबातील रुग्णाला एखादा दुर्धर आजार झाला असेल, तर दिली जाते. त्यासाठी एक लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आणि दवाखान्याने दिलेले किती खर्च येणार याचे ओरिजनल कोटेशन असावे लागते. या कागदपत्रांची पडताळणी करून ही मदतीची रक्कम थेट रुग्णालयाच्या खात्यावर जमा केली जाते. महात्मा फुले योजनादेखील अशाच गरीब गरजू रुग्णांसाठी आहे. या योजनेत एक लाखापर्यंत मदत मिळू शकते. या योजनांसाठी वयाची कसलीही अट नसून ती सर्वांसाठी आहे.
- विजय जाधव, समन्वयक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, कोल्हापूर, 
अधिक माहितीसाठी संपर्क - ८६२४९९६६६६ 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
 ही योजना २०१३ पासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आली आहे. राज्यातील दारिद्र्यरेषेखालील (पिवळे रेशनकार्ड) आणि दारिद्र्यरेषेवरील (केशरी रेशनकार्ड) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात हा या योजनेचा उद्देश आहे. २०१२ मध्ये हीच योजना राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने योजना सुरू झाली. त्यानंतर २०१७ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने योजना सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये साधारण एक लाखापर्यंत वैद्यकीय मदत मिळते.
 www.jeevandayee.gov.in <http://www.jeevandayee.gov.in/> या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

प्रधानमंत्री सहाय्यता निधी  
प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीची स्थापना जानेवारी  साली करण्यात आली. त्यावेळी पाकिस्तानातून आलेल्या विस्थापितांना साहाय्य करणे हा उद्देश होता. आज या निधीच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती, अपघात, अतिरेकी हल्ले, दंगली तसेच हृदय उपचार, किडनी रोपण आदींसाठी या सहायता निधीचा वापर केला जातो. www.pmindia.gov.in <http://www.pmindia.gov.in/> या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. याशिवाय गृहमंत्री साहाय्य निधी, महापौर साहाय्य निधी आणि आरोग्य मंत्र्यांचा साहाय्य निधीतूनदेखील मदत मिळू शकते.

रुग्णसाहाय्य समिती 
 विविध शहरांमध्ये रुग्णसाहाय्य समिती आणि रुग्णांना साहाय्य व मार्गदर्शन करणाऱ्या सेवाभावी संस्था काम करत असतात. त्यांचा उद्देश रुग्णांना साहाय्य करणे, त्यांना मानसिक आधार देणे, आर्थिक निधी उभा करायला मदत करणे, रक्तपेढी, वैद्यकीय उपकरणे याबाबत माहिती देणे, हा असतो. यातील कित्येक संस्था समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांना आवाहन करून देणग्या गोळा करतात आणि गरजूंना त्या निधीचे आवश्‍यकतेप्रमाणे वितरण करतात.  

धार्मिक, सामाजिक आणि खासगी ट्रस्ट  
 आपल्या समाजात अनेक धार्मिक, सामाजिक आणि खासगी ट्रस्ट आहेत. ज्या गरजू आणि गरीब रुग्णांना वैद्यकीय मदत देऊ करतात. शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्ट, मुंबई येथील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट आणि महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, श्री वेंकटेश्वर निधी, पुण्यातील दगडूशेठ हलवाई ट्रस्ट तसेच राज्यातील आणि देशातील इतर धार्मिक ट्रस्ट हॉस्पिटलायझेशनसाठी मदत करतात. यासाठी दारिद्र्यरेषेची अट नसते. मात्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, खर्चाचे कोटेशनपत्र, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला इत्यादी गोष्टी सादर कराव्या लागतात. या धार्मिक ट्रस्टचा अर्ज असतो. त्यावरच अर्ज करावा लागतो. हा मदत निधी थेट रुग्णालयाच्या खात्यावर जमा केला जातो. धार्मिक ट्रस्टबरोबरच दानशूर उद्योगपती आणि सामाजिक संस्थांचेही देशभरात विविध ट्रस्ट आणि संस्था आहेत. या संस्थाही हॉस्पिटलायझेनसाठी मदत देऊ करतात. अशा संस्थांची माहिती कोणत्याही सरकारी किंवा खासगी रुग्णालयात उपलब्ध असते.
वैद्यकीय मदत मिळवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे वर्तमानपत्रातून मदतीचे निवेदन देणे. त्याचबरोबर सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन करणे. जेणे करून समाजातील दानशूर लोकांपर्यंत ही बातमी पोचून कमी-जास्त प्रमाणात नक्कीच मदत मिळू शकते. 
अशाप्रकारे ज्यांना कोणाला वैद्यकीय मदत हवी असेल त्यांनी सरकारी तसेच खासगी दवाखान्यांत जाऊन योग्यप्रकारे मदत कक्षात किंवा तिथे असणाऱ्या समाजसेवकाकडे चौकशी केली, तर नक्कीच योग्य ती मदत मिळू शकते.

मी २००८ पर्यंत, म्हणजे ३०-३२ वर्षे ससून हॉस्पिटल, औंध येथील टी. बी. हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल अशा सरकारी दवाखान्यांत नोकरी केली आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये मुख्यतः रुग्णांचे उपचार मोफतच होतात. पण निवृत्तीनंतरही प्रॅक्‍टिस करत असताना असे गरीब, गरजू रुग्ण आले, तर मी त्यांच्याकडून पैसे घेत नाही. तसेच त्यांना कोणत्या दवाखान्यात जावे किंवा कोणाची मदत घ्यावी याचेदेखील मार्गदर्शन करतो. विशेषतः सरकारी दवाखाने चांगले असून तिथेदेखील चांगले उपचार केले जातात हे सांगतो. म्हणजे समजा, एखादा टीबीचा रुग्ण असेल, तर तो खासगी रुग्णालयातच उपचार घेऊ असे म्हणतो. कारण त्याला आपल्याला झालेला हा आजार लोकांना कळण्याची भीती असते. पण तेव्हा मी त्याची समजूत काढून त्याला सरकारी दवाखान्यातच जायला सांगतो. कारण एक तर टीबीची ट्रीटमेंट खूप काळ चालणारी असते, जी त्यांना ठराविक कालावधीनंतर परवडू शकत नाही. दुसरे कारण म्हणजे एखाद्या रुग्णाने मधेच उपचार सोडले, तर सरकारी रुग्णालयांत अशी यंत्रणा असते जी त्या व्यक्तीशी संपर्क साधून त्याला पुन्हा उपचारासाठी बोलावू शकतात.
 हृदयविकार, कर्करोगाचे जे रुग्ण असतात त्यांना उपचारासाठी जास्त पैशांची गरज असते. अशावेळी रुग्णालयामध्ये काही सामाजिक धार्मिक संस्थांची यादी असते. त्यातून त्यांना त्या संस्थांची मदत घ्यायला सांगितले जाते. तसेच काही सरकारच्या योजनांचीदेखील त्यांना मदत घेता येते. यासाठी रुग्णाला त्याला खरच गरज आहे हे सिद्ध करावे लागते. यासाठी त्याच्याकडे पिवळे रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला असावा लागतो. रुग्णालयात असणाऱ्या समाजसेवकांकडून या कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि त्यानंतरच त्याला खरच गरज असेल, तर ती मदत दिली जाते. खासगी रुग्णालयाबद्दल बोलायचे झाले, तर रूबी हॉल, जहांगीर अशा ज्या ट्रस्टच्या मोठ्या संस्था असतात. त्यांना सरकारकडून विशिष्ट निधी दिले जातात. त्यातून किमान दहा टक्के रुग्णांवर त्यांनी मोफत उपचार करणे अपेक्षित असते. तिथेदेखील अशीच सर्वप्रकारची कागदपत्रे लागतात. फक्त पद्धत थोडी वेगळी असू शकते. त्यामुळे रुग्णाने योग्य वेळी, योग्य लोकांना किंवा संस्थांना, योग्य प्रकारे मदत मागितली, तर त्यांना नक्कीच वैद्यकीय मदत मिळू शकते. 
 - डॉ. एम.एस.वाणी, छातीच्या रोगाचे तज्ज्ञ व फॅमिली फिजिशियन

‘अनुगामी लोकराज्य महाभियान’ अर्थात अनुलोम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व अतुल वझे (मुख्य प्रशासक, अनुलोम) यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजना तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम गेली तीन वर्षे अखंडपणे करत आहे. समाजातल्या गरजू आणि पीडित लोकांसाठी शासनाने गेल्या ६५ वर्षांत प्रचंड योजना आणल्या, पण त्या पीडित लोकांच्या कितपत उपयोगी आल्या हा चिंतनाचा विषय आहे. याच दुखऱ्या बाजूवर मात करण्यासाठी आज अनुलोम पूर्ण ताकदीनिशी काम करीत आहे. सरकारी योजना गरजू लोकांपर्यंत पोचाव्यात, त्यांना या योजनांचा लाभ थेट मिळावा म्हणून अनुलोम सरकार, सरकारी अधिकारी आणि गरजू नागरिक यातला निःस्वार्थ दुवा म्हणून काम करीत आहे. याचा परिणाम म्हणून आज अनुलोमच्या माध्यमातून चार लाखाहून अधिक लोकांना वैयक्तिक शासकीय योजनांचा लाभ मिळालेला आहे. शहरी-ग्रामीण भागाचा विचार करता आजच्या काळात प्रचंड भेडसावणारा प्रश्न म्हणजे आरोग्य. यात पीडित रुग्णांना मोफत वा सवलतीच्या दरात उपचार देणाऱ्या वा गरजू नागरिकांना वरदान ठरलेल्या शासनाच्या विविध योजना आहेत. जसे की महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे. ज्यात जवळ जवळ ९७२ आजार बरे केले जातात. त्यासाठी फक्त पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड लागते. यांच्या नोंदणीवर धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून आर्थिक आणि दुर्बल घटकांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार देणारे पुणे-पिंपरी चिंचवड भागात जवळजवळ ५७ रुग्णालय आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी, पंतप्रधान सहायता निधी आणि सामाजिक संस्था राज्यात जवळजवळ ४५० च्या वर आज काम करीत आहे. या योजना उपचारांसाठी आवश्‍यक खर्च उपलब्ध नसलेल्या कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभे राहतात. अनुलोम या योजना त्यांच्या स्थानिक जनसेवकाच्या माध्यमांतून पीडित रुग्णांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी अखंडपणे कार्यरत आहे. यासाठी अनुलोमने एक मोबाईल ॲप तयार केले असून त्याच्या माध्यमातून माहितीचा पाठपुरावा करता येतो.
- ॲड. मंगेश अंबुले, अधिक माहितीसाठी संपर्क - ८८५५८८३९३८
 

संबंधित बातम्या