जपून.. रात्र कोरोनाची आहे

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

आरोग्य संपदा

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकटच होत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंता वाढली आहे.  ३ सप्टेंबर रोजी विक्रमी १८,१०५ रुग्ण वाढले. त्यामुळे अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा २ लाखांच्या पार गेला आहे.  तर सुमारे ३९१ कोरोनाबाधित रुग्णांनी त्या दिवशी आपला जीव गमावला. असे आकडे ते वाचणाऱ्यांच्या पोटात रोजच खड्डा पाडतात आणि रोजचा खड्डा खूप मोठा असतो. कारण कालपेक्षा आजचे आकडे भयावह असतात. 

जगातल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी १४ टक्के रुग्ण भारतात आहेत. भारतातल्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातल्या रुग्णांपैकी ५७ टक्के रुग्ण पुणे, मुंबई आणि ठाण्यात आहेत. संपूर्ण भारतात १७ ऑगस्टपासून सर्वांत जास्त रुग्ण पुण्यात आहेत. पुण्याची लोकसंख्या मुंबईच्या एक तृतीयांश आहे, पण तरीही पुण्यात मुंबईपेक्षा रुग्णांची संख्या आजमितीला जास्त आहे. 

नऊ फेब्रुवारी २०२० पासून १ ऑगस्टपर्यंतच्या ७ महिन्यांत पुण्यात ८४ हजार ७६५ रुग्ण बाधित झाले. पण केवळ एका ऑगस्ट महिन्यात त्यात ८५ हजारांची भर पडून ते १,६९,२८१ पर्यंत पोचले. म्हणजेच त्यात दुपटीने वाढ झाली. त्याच वेळी मरण पावलेल्यांची संख्या १ ऑगस्ट रोजी १९८१ होती; या एका महिन्यात तिप्पट झाली. ३१ ऑगस्ट रोजीपर्यंत पुण्यात मृत्यू आलेल्यांची संख्या ५७५८ एवढी झाली. ऑगस्ट महिन्यापर्यंत फक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रादुर्भाव असलेल्या कोरोनाचा कहर आता पुणे जिल्ह्यातील छोट्या गावांपर्यंत पोचला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात आता रुग्ण आढळू लागले आहेत. प्रत्येक खेड्यापाड्यात या महामारीचे भीषण अस्तित्व जाणवू लागले आहे. 

आज पुण्यामध्ये रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करायचे असेल, तर सरकारी काय आणि खासगी काय कुठल्याच हॉस्पिटलमध्ये जागाच नसते. दत्ता एकबोटे या पुण्याच्या माजी महापौरांना हॉस्पिटलमध्ये खाट उपलब्ध नसल्याने, उपचाराअभावी मृत्यू आला. मरण पावल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव घेऊन स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने तीन ठिकाणी फिरवावे लागले. पांडुरंग रायकर या तरुण उमद्या टीव्ही पत्रकाराचा रुग्णवाहिका सात तास न मिळाल्याने मृत्यू झाला. असे कित्येक रुग्ण उपचारासाठी अक्षरशः तडफडत या हॉस्पिटलच्या दारातून त्या हॉस्पिटलकडे न्यावे लागताहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आज मृत्यूची कर्मभूमी झाली आहे. 

थोड्या अधिक प्रमाणात ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांतही आज याहूनही भयानक परिस्थिती आहे. कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड आणि नागपूर या जिल्ह्यांतही आता कोरोनाचा उद्रेक होतो आहे, या पाच जिल्ह्यांत फक्त ऑगस्टमध्ये रुग्णांची संख्या चौपटीने वाढली. 

जुलै महिन्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. ते पाहून हा आजार आटोक्यात येतो आहे, असे वाटू लागले होते. पण ऑगस्ट महिना उजाडला आणि ही परिस्थिती पूर्णपणे झाकोळून गेली. का उद्‍भवली ही काळरात्र? काय आहेत या परिस्थितीची कारणे? 

कारणे 
कोरोनाची ही भयाण परिस्थिती उद्‍भवल्यानंतर साहजिकच जनतेचा रोष सत्ताधाऱ्यांवर ओढवतो. पण या कोरोनाचा विळखा महाराष्ट्राच्या जनतेच्या गळ्याभोवती करकचून आवळला जायला अनेक कारणे आहेत. त्यात सत्ताधाऱ्यांची आणि त्यांच्या हुकुमावर हलणाऱ्या आणि चुकीची धोरणे राबवणाऱ्या प्रशासकीय फौजेची अनास्था तर आहेच, पण या आजाराची प्रतिबंधक तत्त्वे न पाळणाऱ्या आणि डॉक्टरांचे सल्ले धुडकावून लावणाऱ्या जनतेच्या बेदरकारपणातही आहे. याशिवाय साथीच्या रोगांच्या शास्त्रातही याची कारणे सापडतात. 

 जनतेची बेपर्वाई ः 
कोरोना विषाणू नष्ट करून तो आजार बरा करणारे कोणतेही औषध आजतागायत अस्तित्वात नाही. आजमितीला कोरोना प्रतिबंधक लसदेखील येत्या दोन महिन्यात येण्याची शक्यता नाही. अनेक प्रकारच्या लशी संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आहेत खऱ्या, पण त्या सर्वसामान्य माणसांना मिळण्यासाठी आणखी काही महिन्यांचा काळ लोटणार आहे. भारतातल्या १३० कोटी नागरिकांपैकी किमान ७० टक्के व्यक्तींमध्ये, म्हणजे ९१ कोटी लोकांचे लसीकरण व्हायला आणखी एखाद-दोन वर्षे लागतील, हे आधीच्या कित्येक लसीकरण मोहिमांवरून लक्षात येईल. 
याचाच अर्थ असा, की कोरोनाच्या या वाढत्या विखारी संसर्गापासून आपले प्राण वाचवायचे असतील तर फक्त प्रतिबंधक उपाय पाळणे एवढेच आपल्या हातात आहे. अन्यथा कोरोनाचा घाला आपल्यावर केव्हा पडेल याचा नेम नाही.. आणि आज आपण आजूबाजूला पाहिले तर नेमक्या त्याच गोष्टींचा फज्जा उडालेला दिसतो. कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला जी कारणे आहेत, त्यात तेही एक महत्त्वाचे कारण आहे. 
 

प्रतिबंधक उपाय ः
सोशल डिस्टन्सिंगची आज पूर्णपणे वासलात लागलेली आहे. लॉकडाउनच्या पहिल्या दोन - अडीच महिन्यांत, म्हणजे मे अखेरपर्यंत या गोष्टी बऱ्यापैकी पाळल्या जात होत्या. कारणाशिवाय घराबाहेर कुणीही पडत नव्हते. पण जून महिना सुरू झाला आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले धंदे-व्यवसाय, शेती, व्यापार  आणि कारखाने यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. परराज्यात राहणारे लाखो मायग्रंट वर्कर्स आपापल्या गावी निघाले. तिथूनच या प्रतिबंधक उपायांबाबतचे गांभीर्य कमी होत गेले. 

आजमितीला महाराष्ट्रात जेवढे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले असतात, त्याच्या चौपटीने रुग्ण रस्त्यावर वावरत असतात. कारण एकुणातल्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नसतात आणि आपल्याला काही त्रास नाही, तर तपासणी कशाला? अशा विचारांनी कित्येक जणांची तपासणी झालेली नसते. पण याचाच अर्थ आपण घराबाहेर पडल्यावर आपल्या समोर येणारा, आपल्याला खेटून चालणारा किंवा आपल्याशी बोलणारा कोणताही माणूस हा कोरोनाचा संशयित रुग्ण असू शकतो; नव्हे असतोच. त्यामुळे घरातून बाहेर पाऊल टाकताना आणि बाहेरून घरी येताना प्रत्येक पाऊल हे सहा फूट अंतराचे सोशल डिस्टन्सिंग पाळूनच आणि मास्क लावूनच टाकायचे आहे. पण हे घडतेय का? 

आज कोणत्याही गावात जा, रस्त्यावर, भाजीपाल्याच्या मंडईत, किराणा मालाच्या दुकानात खांद्याला खांदा लावून दाटीवाटीने लोक उभे असतात. चौकाचौकांत सिग्नल लागल्यावर टू-व्हीलर खेटून उभ्या असतात. फुटपाथवर गळ्यात गळे घालून लोक फिरत असतात. संध्याकाळच्या वेळेला आणि रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी तरुणतरुणींचे हितगुज रंगात आलेले असते. आज हॉटेल्सना कागदोपत्री परवानगी मिळालेली नाही. पण हॉटेलांकडून ‘होम डिलिव्हरी पॅकेट्स’ दिली जातात. याचा फायदा घेऊन वडा-पावच्या आणि खाऊगल्लीतल्या हातगाड्या, टपऱ्या पुन्हा तुडुंब भरू लागलेल्या दिसताहेत. यापैकी कोणी मास्क वापरलेला नसतो आणि एकमेकातले अंतर सहा फूट राहू द्या, सहा सेंटीमीटरही नसते. 

मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगला एकीकडे सुशिक्षित लोक आणि तरुणाई पायदळी तुडवताना दिसते. यामध्ये ‘जाऊ दे काय होतेय?’ अशी बेफिकिरी आहेच, पण चौकातील सिग्नल न पाळणे, दुचाकीवर हेल्मेट न घालणे, रस्त्यात न थुंकणे या नियमांचे पालन न करण्यात जशी मर्दुमकी वाटते तशी भावना दिसून येते. शिवाय सोशल मीडियावरून येणाऱ्या ‘हर्ड इम्युनिटी’च्या बोगस पोस्ट्सचाही त्यामध्ये हातभार लागलेला असतो. 

आपण टेलिव्हिजनवरील बातम्यांत गावपातळीपासून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील ठिकठिकाणच्या नेत्यांच्या, शासकीय अधिकाऱ्यांच्या मीटिंग्ज आणि दौऱ्याची वृत्ते पाहिली, तर त्यात मास्क गळ्यात लटकावून एकमेकांशी लोक बोलतायत असे दिसून येते. मास्क घातल्यावर तो एका मिनिटासाठीदेखील दूर करणे धोक्याचे असते, तो खाली वर करताना मास्कच्या दोरीला हात लावायचा असतो, मास्कच्या पुढच्या भागाला नाही, हे या लोकांच्या गावीही नसते. आपण असे वागलो तर कितीही भारी मास्क वापरले तरी आपल्याला कोरोनाची बाधा होऊ शकते आणि आपल्यामुळे इतरांनाही होऊ शकते, याचीही त्यांना खंत नसते. याचाच अर्थ या नियमांचे महत्त्व राजकीय, सामाजिक आणि शासकीय नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्याही पचनी पडलेले नाही, तर जनतेचे काय घेऊन बसलायत? 

दुसरीकडे नजर टाकली तर अर्धशिक्षित, अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातले दाट वस्त्यांमध्ये आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या हे गावीही नसते की अशा काही नियमांचे पालन करणे आपल्या जीवाच्या दृष्टीने आवश्यक आहे, आपल्या कुटुंबीयांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या जीवाच्या दृष्टीने गरजेचे आहे. तसेच हे न पाळल्यामुळे आज कोरोनाची साथ वेगाने फोफावते आहे आणि लाखो लोकांचे मृत्यू आपल्यामुळे घडतायत. 

मास्कबद्दल आपले सर्वसामान्य लोक कसे वागतात याबाबत मी स्वतः रोज अनुभवत असलेली एक गोष्ट यासंबंधात सांगाविशी वाटते. माझ्या दवाखान्यात प्रत्येकाला मी सांगतो की मास्क घातल्याशिवाय मी पेशंट तपासणार नाही आणि दवाखान्यात बसताना किंवा बाहेर रांगेत उभे राहताना सहा फूट अंतरावर थांबा. पण एकतर यामुळे पेशंटशी आमचे रोज वाद होतात. मध्यंतरी दवाखान्यात एकाच घरातील तीन स्त्रिया आल्या. निम्न मध्यमवर्गीय मराठी घरातल्या त्या होत्या. तिघींनी मास्क घातलेले नव्हते. आमच्या रिसेप्शनिस्टने त्यांना ‘मास्क घालून या तरच मग आत येता येईल’ असे सांगून बाहेर काढले. त्या तिघींपैकी एक जण जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये गेली, तिथून एक मास्क आणला. तो दवाखान्याच्या बाहेरच उभे राहून आळीपाळीने एकेकीने घालून माझ्याकडून तपासून घेतले आणि नंतर तो मास्क पर्समध्ये घालून निघून गेल्या. त्यांच्या नंतर नंबर असलेल्या पेशंटने मला जेव्हा हे सांगितले, तेव्हा कपाळावर हात मारून घेणेही मला शक्य नव्हते, कारण कोरोनाच्या साथीत आपल्या चेहऱ्याला कुठेही हात लावण्याआधी, हात साबणाने स्वच्छ धुवावे लागतात. 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या साथीत तुम्हाला साधी सर्दी, खोकला किंवा ताप यापैकी काही झाले तरी लगेच डॉक्टरांना दाखवून घ्यावे असे सतत सांगितले जाते. पण अजूनही शहरात असो वा खेड्यात, लोकांना सर्दी, ताप आला तरी बहुसंख्य लोक ते तसेच अंगावर काढतात. कारण हे आजार एरवी औषधे न घेताही आपोआप बरे होतात असा त्यांचा नेहमीचा अनुभव असतो. पण नेमके इथेच चुकते. कोरोनाच्या या काळात सर्दी, ताप येणे ही कोरोनामुळेही असू शकते. नेमके कित्येक व्यक्तींना हे लक्षात येत नाही. तापही उतरतो पण कोरोनाचे विषाणू वाढत जातात. मग दम लागतो किंवा खूप गळून गेल्यासारखे होते. त्यांनतर मग डॉक्टरांना दाखवण्याची तयारी होते. डॉक्टर तपासून टेस्टिंग करायला सांगतात. टेस्ट पॉझिटिव्ह येते, पण आजार खूप वाढलेला असतो. रुग्णालयात जागा मिळत नाही, या ठिकाणाहून त्या ठिकाणी फिरत बसावे लागते. आज ही परिस्थिती दवाखान्यात औषधे घ्यायला येणाऱ्या ५० टक्के रुग्णांत अनेक डॉक्टरांनी अनुभवली आहे. त्याबाबत सतत सांगितलेही जातेय. पण जनतेच्या मानसिकतेत फरक पडत नाही. रुग्णवाढीचे आणि मृत्युदर वाढण्याचे हे एक खूप महत्त्वाचे कारण सर्वांकडून दुर्लक्षित होते आहे. 

सर्दी-खोकला झालेले बहुसंख्य रुग्ण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी मेडिकल स्टोअरमधून किरकोळ औषधे घेऊन भागवतात. हा गेल्या अनेक दशकांचा प्रघात आहे. कोरोनाच्या या महासाथीमध्ये अशी औषधे देऊ नयेत, असे बंधन एफडीएने या मेडिकल स्टोअर्सवर कायद्याने घातलेले आहे, पण याचे जनतेकडूनच जागोजागी उल्लंघन होते आहे, हे दिसून येते. याचा परिणाम शेवटी आजार वाढण्यात आणि तो गंभीर आणि प्राणघातक ठरण्यात होतो आहे, हे उघड सत्य आहे. 

दवाखान्यात आल्यावर रुग्णामध्ये संशयित लक्षणे आढळली, तर त्याचे टेस्टिंग करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पण निम्म्याहून अधिक रुग्ण तो पाळत नाहीत किंवा सांगितले तर तो पुढे ढकलतात. कोरोनाच्या रुग्णाला विषाणूची लागण झाल्यावर दोन ते चार दिवसात लक्षणे दिसून येत असतात. पहिल्या पाच दिवसांत त्याने टेस्टिंग करून उपचार चालू केले तर तो हमखास बरा होण्याची शक्यता असते. पण नेमके हेच घडत नाही. डॉक्टरांनी कोरोनाची तपासणी करायला सांगितल्यावर, ‘तुम्ही डॉक्टर जरा काही झाले की अनावश्यक तपासण्या करायला सांगता,’ असे उत्तर अनेकदा रुग्णांकडून मिळते. सोशल मीडिया, वृत्तपत्रे आणि टेलिव्हिजनवरून नेहमीच डॉक्टरांच्या विरुद्ध होणाऱ्या अशा प्रचाराच्या प्रभावाचा तो भाग असतो. कित्येक तथाकथित संस्था आजही ‘कोरोना केवळ ढोंग आहे, सरकार आणि डॉक्टर्स यांची मिलीभगत आहे.’ असा प्रचार करताना दिसतात. त्यामुळे तपासण्या न करता, घरीच थातूरमातूर औषधे करत राहून, आजार वाढत जाऊन मृत्यू घडल्याच्या कित्येक घटना आमच्या समोर आल्या आहेत. यासाठी सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की डॉक्टरांचा सल्ला टाळू नये आणि वेळेतच टेस्टिंग आणि उपचार करून आपला जीव वाचवावा. 

कोमॉर्बिड कंडिशन्स ः 
ज्या व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे किंवा यकृताचे आजार, कर्करोग आणि त्याची केमोथेरपी सुरू असणे, दमा, सीओपीडी आणि फुप्फुसाचे दीर्घकालीन आजार असणाऱ्या व्यक्तींना कोरोनामध्ये जास्त धोका असतो. या आजारांना कोमॉर्बिड कंडिशन्स म्हणतात. या व्यक्तींना कोरोनाची बाधा लवकर होऊ शकते, त्यांच्यात तो आजार लगेच गंभीर स्वरूप धारण करतो आणि मग त्यामध्ये मृत्यू पावण्याची शक्यताही खूप जास्त असते. हे घडू नये यासाठी विशेषतः मधुमेह उच्च रक्तदाब, हृदयविकारांच्या रुग्णांनी आपले आजार नियमित तपासण्या आणि डॉक्टरांचे सल्ले पाळून काटेकोरपणे ताब्यात ठेवावे लागतात. पण आपल्याकडील या आजारांचे ५० टक्क्यांहून जास्त रुग्ण आजारांच्या उपचारात हेळसांड करताना दिसतात. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार दर दोन - तीन महिन्यांनी वैद्यकीय तपासणी, विविध चाचण्या, पथ्ये, व्यायाम, वजन ताब्यात ठेवणे याकडे डोळेझाक करतात ही वस्तुस्थिती आहे. 
आज कोरोनाने जे रुग्ण गंभीर होतात आणि मृत्युमुखी पडतात, त्यात हे आजार असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. तरीही त्यात सुधारणा होत नाही. 

कोरोनाची महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर आहे. साथ आटोक्यात येण्याची शक्यता अजिबात दिसून येत नाही. आपण या साध्या सोप्या गोष्टी पाळल्या नाहीत तर ती अजूनच वाढत जाण्याची शक्यता दाट आहे. आजच्या घडीला रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही. साथ अशीच वेगाने वाढत गेली तर हॉस्पिटल्सच्या खाटा शोधणाऱ्या आणि अॅम्ब्युलन्सची वाट पाहणाऱ्या लोकांचे रस्त्यावर मृत्यू होतील. त्यामुळे राजा सावध राहा... रात्र कोरोनाची आहे.   

संबंधित बातम्या