लढवय्ये... 

किशोर पेटकर
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

क्रिकेट रसिकांना १५ ऑगस्टच्या संध्याकाळी एक धक्कादायक बातमी कळली.. महेंद्रसिंग धोनी याने आपली निवृत्ती जाहीर केली... त्यानंतर काहीच वेळात सुरेश रैना यानेही आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. या दोघांच्याही क्रिकेट कारकिर्दीवर टाकलेला दृष्टिक्षेप. 

स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी भारतीय क्रिकेटमधील दोघा दिग्गजांनी बॅट म्यान केली. या दोघांच्या निवृत्तीची घोषणा अनपेक्षितच ठरली. महेंद्रसिंग धोनी... सर्वांचा प्रिय माही... भारतीय क्रिकेटमधील स्मॉल टाऊन सुपरस्टार... झारखंडमधील रांची या शहरातील असामान्य नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेला भारताचा क्रिकेटमधील यशस्वी कर्णधार-फलंदाज-यष्टिरक्षक. दुसरा सुरेश रैना... उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे जन्मलेला डावखुरा आक्रमक शैलीचा फलंदाज-वेळप्रसंगी ऑफस्पिन गोलंदाजी टाकणारा उपयुक्त गोलंदाज... कसोटीत पदार्पणात शतक, तसेच एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्येही शतक झळकाविणारा पहिला भारतीय. 

धोनी आणि रैना जिगरी दोस्त... मैदानावर आणि मैदानाबाहेरही. दोघांनीही अवघ्या काही मिनिटांच्या अवधीत सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. तसे पाहता, धोनी आणि रैना यांच्या कारकिर्दीतील उमेदीचे दिवस इतिहासजमा झाले होते, तरीही आयपीएल स्पर्धा ऐन तोंडावर असताना ते निवृत्त होतील असे वाटले नव्हते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे धोनी आणि रैना यांना आता आयपीएल क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल. दोघेही चेन्नई सुपर किंग्ज संघाचे आधारस्तंभ आहेत. 

गेल्या वर्षी धोनी धावबाद झाल्यानंतर विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. तेव्हाच धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णविराम मिळणार हे स्पष्ट होते. सारे जण धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेकडे नजर ठेवून असताना, हा ३९ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज आपल्याच विश्वात होता. काश्मिरात जाऊन सेनादलातील या मानद लेफ्टनंट कर्नलने सैनिकी प्रशिक्षण-सेवा बजावली. रांचीत कुटुंबात रंगला, मुलीसमवेत बागडतानाही दिसला. मध्यंतरी शेतीकामात मग्न दिसला, तर कधी बाईक चालवताना पाहायला मिळाला. धोनीला बाईक व कुत्र्यांचा फारच लळा आहे. 

धोनीच्या निवृत्तीविषयी उलटसुलट बातम्या येत असताना, हा चपळ यष्टिरक्षक स्पष्टीकरणाच्या नादी लागला नाही. प्रतिस्पर्धी फलंदाज बेसावध असताना त्याला चित्त्याच्या चपळाईने यष्टिचीत करण्यात धोनी माहीर आहे. त्याच पद्धतीने त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली, साऱ्यांना अवाक् केले. टीकाकारांना अजिबात संधी मिळाली नाही. वय वाढलेला, क्रिकेटपासून दूर असलेला धोनी संयुक्त अरब अमिरातीत सप्टेंबरमध्ये आयपीएल स्पर्धेत अपयशी ठरल्यास त्याच्या टीकेचे आसूड ओढण्यासाठी बरेच जण टपून बसले होते. ऑस्ट्रेलियात या वर्षी नियोजित असलेली टी-२० विश्वकरंडक स्पर्धा कोविड-१९ प्रकोपामुळे लांबणीवर टाकावी लागली. पुढील वर्षी ७ जुलैला धोनी ४० वर्षांचा होईल, त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द लांबविणे शहाणपणाचे नव्हतेच. धोनीने स्वातंत्र्यदिनाचे छान टायमिंग साधले. आपल्या जिवलग मित्राच्या पावलांवरून रैना गेला. दुखापतीमुळे उत्तर प्रदेशच्या या ३३ वर्षीय अष्टपैलूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस अगोदरच ब्रेक लागला होता. डिसेंबर २०१८ नंतर तो प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळलेला नाही. गतवर्षीच्या आयपीएल स्पर्धेनंतर त्याच्या डाव्या गुडघ्याची दुखापत बळावली, परिणामी शस्त्रक्रिया करावी लागली. कमबॅक करण्याची त्याला आशा होती, पण धोनीच्या निवृत्ती संदेशानंतर त्यालाही स्फुरण चढले आणि काही मिनिटांतच रैनाच्याही निवृत्तीचे वृत्त आले. 

धोनीची निवृत्ती जास्त भावनिक ठरली. मुकेश यांच्या आवाजातील ‘कभी कभी’ चित्रपटातील ‘मै पल दो पल का शायर हूँ...’ हे भावमधुर गीत पार्श्वभागी वाजवत, धोनीने आपली चित्ररुपी कारकीर्द सादर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. यावेळीही त्याने अचूक टायमिंग साधत पाहणाऱ्यांना गोठवून ठेवले. ‘कभी कभी’ चित्रपट १९७६ मध्ये प्रदर्शित झाला तेव्हा धोनीचा जन्मही झाला नव्हता, मात्र आपल्या निवृत्तीची ध्वनिचित्रफित त्याने संस्मरणीय केली. 

धूर्त कर्णधार 
लांब केसांचा, धडाकेबाज फलंदाजी करणारा महेंद्रसिंह धोनी जरी रांचीसारख्या लहान शहरातून आलेला असला, तरी त्याचा क्रिकेट मेंदू फारच तल्लख होता, मोठ्या शहरातील क्रिकेटपटूंपेक्षा कितीतरी धूर्त, चतुर आणि प्रभावी. त्यामुळेच २००७ मध्ये संघात मोठे दिग्गज असतानाही सचिन तेंडुलकरला धोनीमध्ये भविष्यातील यशस्वी कर्णधार दिसला. सचिनच्याच शिफारसीमुळे सप्टेंबर २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-२० विश्वकरंडकासाठी धोनीच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. तेव्हा सारा संघ नवोदित होता, मात्र नवख्या संघाच्या हिंमतीवर धोनीने जगज्जेतेपदास गवसणी घातली. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी वेस्ट इंडीजमध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडकात राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील संघाला आलेले सारे अपयश धुऊन गेले. पाकिस्तानविरुद्ध जोहान्सबर्ग येथील अंतिम लढतीत शेवटचे षटक मौल्यवान होते. नवोदित गोलंदाज जोगिंदर शर्मा याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविला, तर कर्णधार  धोनीने आपला निर्णय चपखल असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर चार वर्षांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर धोनीने भारताला आणखी एक विश्वकरंडक जिंकून दिला. तेव्हा तो स्वतः आघाडीवर लढला. संघ पावणेतीनशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, प्रमुख मोहरे माघारी फिरले. स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या युवराज सिंगला मागे ठेवत धोनीने स्वतःच्या खांद्यावर शिवधनुष्य घेतले आणि यशस्वीपणे पेलूनही दाखविले. श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज नुवान कुलसेकर याला लाँगऑनवरून षटकारासाठी खेचत भारताला २८ वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगज्जेते बनविले. धोनीची नाबाद ९१ धावांची खेळी आणि हेलिकॉप्टर शॉट अविस्मरणीय ठरला. २०१३ मध्ये भारताने चँपियन्स करंडक जिंकला आणि आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा एकमेवाद्वितीय कर्णधार ही बिरुदावली त्याला मिळाली. 

यष्टींमागे उठाबशा काढत धोनीने अचाट नेतृत्वगुणांच्या चतुराईने भारताला अगणित सामने जिंकून दिलेले आहेत. नेतृत्वगुणांत त्याची समयसूचकता कमालीची ठरली. २००८ मध्ये अनिल कुंबळेकडून त्याच्याकडे कसोटी संघाचे कर्णधारपद आले. त्यावेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आदी नावाजलेले क्रिकेटपटू संघात होते. गांगुलीच्या शेवटच्या कसोटीत त्याला काही काळ मैदानावरील नेतृत्वाची संधी देत धोनीने आदरयुक्त भावनाही प्रदर्शित केली. धोनीच कर्णधार असताना डिसेंबरमध्ये २००९ मध्ये भारत सर्वप्रथम कसोटीत अव्वल क्रमांकाचा संघ बनला. संघातील दिग्गज निवृत्त झाल्यानंतर नवोदितांच्या साथीत त्याने खिंड लढविली. 

मात्र धोनीने काळाची पावलेही वेळीच ओळखली. विराट कोहलीचा उदय झाल्यानंतर, धोनीने डिसेंबर २०१४ मध्ये कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत साऱ्यांनाच धक्का दिला, पण तो स्वतः ठाम राहिला. नंतर जानेवारी २०१७ मध्ये झटपट क्रिकेट संघाचेही नेतृत्व त्यागून कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळण्यास धन्यता मानली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटीत २७, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११०, तर टी-२० क्रिकेटमध्ये ४१ विजय नोंदविले. यशाच्या टक्केवारी पन्नासच्या आसपास राहिली.

१९२९ नंतर... 
सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा करताना धोनी म्हणाला, ‘आपले सदोदित प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. १९२९ वाजल्यापासून मला निवृत्त समजावे.’ असे मानले जाते, की १९२९ म्हणजे सात वाजून २९ मिनिटे ही धोनीने निवृत्ती जाहीर केलेली वेळ आहे. तर, १० जुलै २०१९ रोजी विश्वकरंडक उपांत्य लढतीत मँचेस्टर येथे पन्नास धावांवर धोनी न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या थेट फेकीवर धावबाद झाला, तेव्हा घड्याळ्यात सात वाजून २९ मिनिटे हीच वेळ होती असे सांगितले जाते. कदाचित त्या धावबादेनंतर आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपले हे दर्शविण्यासाठी धोनीने १९२९ या वेळेचा संदर्भ दिला असावा. पावसामुळे दोन दिवस चाललेली मँचेस्टरची ती लढत खूपच नाट्यपूर्ण आणि भावपूर्ण ठरली. २४० धावांचा पाठलाग करताना भारताची ६ बाद ९२ अशी दाणादाण उडाली होती. धोनीला आक्रमक शैलीच्या रवींद्र जडेजाची साथ मिळाली. त्यांच्या शतकी भागीदारीमुळे भारताला आशेचा किरण दिसू लागला. लक्ष्य आवाक्यात येत असताना जडेजा बाद झाला, नंतर साऱ्या अपेक्षा केवळ धोनीवरच होत्या. त्याची खेळी संथ, पण आशादायी होती. अंतिम फेरीत जाण्यासाठी १० चेंडूंत २४ धावांची गरज असताना दुसरी धाव घेण्याच्या नादात घात झाला. गप्टिलच्या थेट फेकीवर वय वाढलेल्या धोनीची बॅट क्रीझपासून काही इंच दूर राहिली. येथेच भारताचे आव्हान आणि तमाम देशवासीयांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. त्याचा सल धोनीलाही कायमची असेल, त्यामुळे त्याने आपल्या निवृत्तीच्या ध्वनिचित्रफितीत तो धावबाद क्षण आणि हताश चेहऱ्याने परतणारी आपली छबी समाविष्ट केली. धोनीने देशातील क्रिकेट चाहत्यांच्या भावनांची कदर केली. निवृत्तीच्या व्हिडिओत पराभवानंतर रागाने भारतीय क्रिकेटपटूंची छायाचित्रे जाळताना नेमके आपले छायाचित्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचे दाखविण्यात या नम्र आणि मितभाषी क्रिकेटपटूने धन्यता मानली. चुकीचा स्वीकार करायलाच हवा हे धोनीचे धोरण. 

आगळा योगायोग पाहा, धोनी आपल्या शेवटच्या ३५० व्या एकदिवसीय सामन्यात धावचित झाला. सोळा वर्षांपूर्वी, २३ डिसेंबर २००४ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा शुभारंभ करताना वन-डे सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला होता. या कालावधीत त्याने ६३४ झेल व १९५ यष्टिचीत या कामगिरीसह ९० कसोटीत ४८७६, साडेतीनशे एकदिवसीय सामन्यांत १०,७७३, तर ९८ टी-२० सामन्यांत १६१७ धावा जमविल्या. 

धडाकेबाज... 
धोनीच्या लांब, स्टायलिश केशरचनेने पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना मोहित केले होते, पण धोनीने त्यांच्या केस न कापण्याच्या सल्ल्याचा विशेष सन्मान केला नाही. वयागणिक त्याची केशरचना बदलत केली. २०११ मध्ये विश्वकरंडक जिंकल्यानंतर त्याने रातोरात मुंडन करून घेतले होते. त्याच्या दूध पिण्याच्या सवयीची खूप चर्चा झाली. मैदानाबाहेर शांत राहणारा धोनी प्रत्यक्ष फलंदाजीत धडाकेबाज ठरला, मात्र गरजेनुसार फलंदाजीतील आक्रमकतेस मुरड घालण्यासही तो शिकला. संधीचे सोने करण्यात तो पटाईत. पदार्पणानंतर अवघ्या पाचव्याच डावात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली, ती दोन्ही हातांनी ओरबाडताना माहीने विशाखापट्टणम येथे पाकिस्तानी गोलंदाजांना सळो, की पळो करून सोडले. १२३ चेंडूतील १४८ धावांच्या खेळीतून भारताला नवा सुपरस्टार गवसला. त्यानंतर काही महिन्यांतच श्रीलंकेच्या गोलंदाजांना त्याने बॅटचे पाणी पाजले. १४५ चेंडूंत १८३ धावा करताना त्याने यष्टिरक्षकातर्फे विक्रमी कामगिरी नोंदविली. मात्र धोनीने फलंदाजीत खालच्या क्रमावर जास्त समाधान मानले. 

धडाकेबाज रैना 
धोनीप्रमाणे सुरेश रैनासुद्धा धडाकेबाज फलंदाजीने गाजला. त्याचा खास चाहता वर्ग आहे. लीलया षटकार खेचणारा रैना धोनीच्या नेतृत्वाखालील संघातील हुकमी एक्का होता. डोईजड ठरणारी जोडी फोडताना त्याची फिरकी गोलंदाजी परिणामकारक ठरत असे. धोनी आणि रैना यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द समकालीन. धोनीने डिसेंबर २००४ मध्ये, तर रैनाने जुलै २००५ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रैनाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द एक वर्ष अगोदर रोखली गेली. तो जुलै २०१८ मध्ये, तर धोनी जुलै २०१९ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. रैनाने एकदिवसीय क्रिकेट खेळल्यानंतर पाच वर्षांनी २०१० मध्ये कसोटीत पदार्पण केले. पहिल्याच कसोटीत शतक ठोकताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरसमवेत द्विशतकी भागीदारी साकारण्याची स्वप्नवत योग त्याने साधला. मात्र रैनावर वन-डे स्पेशालिस्ट हाच शिक्का जास उठून दिसला. त्यामुळेच तो कसोटीत फक्त १८ सामने खेळू शकला, उलट एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २२६ सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले व पाच शतकेही ठोकली. 

मैदानावर रैना हा धोनीचा विश्वासू सहकारी होता. रैनाच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे धोनीतला कर्णधारही सुखावत असे. चेन्नई सुपर किंग्ज संघातही धोनी व रैना यांची जोडी चांगलीच स्थिरावली. मध्यंतरी आयपीएल स्पर्धेतील चेन्नई संघाच्या निलंबनामुळे या जोडीच्या वाटा वेगळ्या झाल्या, पण नंतर ते पुन्हा एकत्र आले. दोघांच्या वयात सहा वर्षांचा फरक आहे, पण त्यांची दोस्ती सच्ची ठरली, त्याचा प्रत्यय निवृत्तीच्या वेळी आला. कर्णधार असतानाही धोनीने आपल्या संघ सहकाऱ्यांना मैत्रीपूर्ण नात्याने सांभाळले.

अनंतकाळ कृतज्ञ... 
महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. १३० कोटी भारतीय अनंतकाळ कृतज्ञ राहतील, असे पत्रात लिहून पंतप्रधानांनी धोनीच्या क्रिकेट मैदानावरील योगदानाचा गौरव केला आहे. मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे धोनीचा क्रिकेटमधील प्रभाव अपूर्वच आहे. रैना निवृत्तीसाठी खूपच तरुण आणि उत्साही ठरला, असे मत पंतप्रधानांनी पत्रात व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी नमूद केल्यानुसार, धोनी आणि रैना यांच्या कारकिर्दीची आठवण पिढ्या काढत राहील हे नक्की.

संबंधित बातम्या