सूर्यमंदिर-उत्कृष्ट कलेचा नमुना 

डॉ. राधिका टिपरे
सोमवार, 9 मार्च 2020

कव्हर स्टोरी
 

काही वर्षांपूर्वी अगदी ध्यानीमनी नसताना कोनार्कचे सूर्यमंदिर पाहायला जाण्याचा योग आला आणि मी हरखूनच गेले होते. ‘ब्लॅक पॅगोडा’ या नावाने जगभरात प्रसिद्ध असलेले हे मंदिर पाहायला गेले, तेव्हा या वास्तूच्या भव्यतेमुळे जीव दडपून गेल्यासारखे झाले. समुद्र किनाऱ्‍यावरच, रेतीमध्येच बांधण्यात आलेले हे मंदिर पाहण्यासाठी कितीही वेळ दिला तरी तो अपुरा पडतो, कारण या मंदिराचे स्वरूप इतके विलक्षण आहे, की पाहताना शरीर थकून जाते पण मन तृप्त होत नाही. काय पाहावे... किती पाहावे... आणि लक्षात तरी किती ठेवावे अशी मनाची अवस्था होऊन जाते. 

पडझड झालेल्या अवस्थेत असूनही कोनार्कच्या सूर्यमंदिराच्या अनन्यसाधारण वास्तुकलाविष्काराकडे पाहून अक्षरशः दिपून गेल्यासारखे झाले. खरे सांगायचे तर अप्रतिम, भव्यदिव्य, उत्कृष्ट हे सारे शब्द या मंदिराचे वर्णन करण्यासाठी तोकडे वाटतात. एक मंदिर म्हणून ही वास्तू भव्य आहेच, पण स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनही हे सूर्यमंदिर अप्रतिम देखणे आहे. त्याशिवाय संपूर्ण मंदिरावर असणारी डोळे खिळवून ठेवणारी अपूर्व अशी शिल्पकला पाहून आपण स्तंभित होऊन जातो. ओडिशामध्ये शेकडोंच्या संख्येत असलेल्या ओरिया शैलीतील या मंदिरांमध्ये सर्वोत्तम आहे ते कोनार्कचे सूर्यमंदिर! सर्वोत्तम स्थापत्यकला, सर्वोत्तम शिल्पकला आणि चक्रावून टाकणारी भव्यता या तीनही दृष्टिकोनातून पाहता कोनार्कच्या सूर्यमंदिराविषयी आपण एवढेच म्हणू शकतो, न भूतो... न भविष्यती!

भारताच्या पूर्व किनाऱ्‍यावर, ओडिशा राज्यातील एका छोट्याशा खेड्यात, समुद्रकिनाऱ्‍यापासून केवळ तीन कि.मी. अंतरावर वाळूच्या विस्तीर्ण पट्ट्यावर हे मंदिर आजही दिमाखात उभे आहे. वास्तविक पाहता कोनार्कच्या मुख्य मंदिराची पडझड साधारणतः दोन शतकापूर्वीच सुरू झाली होती. ओरिया स्थापत्यशैलीनुसार बांधण्यात येणाऱ्‍या मंदिरांमध्ये, मुख्य मंदिराच्या पुढे असणारे प्रशस्त सभागृह म्हणजेच ज्याला सामान्यतः जगमोहना असेही म्हटले जाते, तेच आज आपल्याला कोनार्कमध्ये पाहायला मिळते. या जगमोहनाची वास्तू पाहूनच आपण एवढे चकित होऊन जातो, की मुख्य देवळाची इमारत किती उंच आणि भव्य असेल याची केवळ कल्पनाच आपल्याला मनोमन स्तंभित करून टाकते. आज घडीला कोनार्कच्या सूर्यमंदिराचे जे शेष अवशेष आपण पाहतो त्यामध्ये जगमोहनाची संपूर्ण वास्तू, तिचे भव्य आकारमान, अत्यंत प्रमाणबद्ध स्थापत्य आणि त्याच्या जोडीला मंदिराच्या संपूर्ण बाह्य अंगावर असणारे अप्रतिम कोरीवकाम याचा अनुपम संगम पाहायला मिळतो. एखाद्या सुवर्णकाराने सुंदर दागिना घडविताना अत्यंत बारकाईने कलाकुसर करावी, त्याप्रमाणे अप्रतिम असे शिल्पकाम या उत्कृष्ट वास्तुकलाशैलीनुसार उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिराच्या अंगोपांगी पाहायला मिळते. स्थापत्य आणि शिल्पकला यांचा अनोखा संगम असलेली जगमोहनाची वास्तू म्हणजे स्थापत्यकलेचा परमोच्च बिंदू आहे असे म्हणावेसे वाटते.

कोनार्क म्हणजे कोनातील अर्क! अर्क म्हणजे सूर्यदेवता! कोनादित्य! अर्थात या स्थळमहात्म्यविषयीचे संदर्भ आपल्याला आपल्या प्राचीन पुराणग्रंथांमध्ये सापडतात. ब्रह्मपुराणातील उल्लेखानुसार कोनार्क मंदिराची ही जागा सूर्यपूजेच्या दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र आहे. भविष्यपुराण आणि सांबपुराण यामधील संदर्भानुसार सूर्यपूजेचा आणि सूर्यमंदिराच्या निर्मितीचा संबंध श्रीकृष्णपुत्र सांब याच्याशी जडलेला आहे. असे म्हणतात, की काही कारणांनी सांबावर रागावलेल्या नारदमुनींनी सांबाला धडा शिकवण्यासाठी हेतुपुरस्सर चुकीची माहिती दिली. त्यामुळे सांब अजाणतेपणी श्रीकृष्णाच्या स्त्रिया स्नान करीत असलेल्या ठिकाणी पोचला. आपल्या पुत्राच्या या वागण्यामुळे क्रोधीत झालेल्या श्रीकृष्णाने त्याला शाप दिला आणि त्यामुळे सांबाचे शरीर कुष्ठरोगाने जर्जर होऊन गेले. मात्र आपण निरपराध असल्याचे सिद्ध करीत सांबाने क्षमायाचना केली. त्याचे निरपराधित्व श्रीकृष्णाच्याही लक्षात आले होते. पण एकदा दिलेला शाप परत मागे घेता येत नसल्यामुळे सांबाने चंद्रभागेच्या काठावर, मित्रवनात सूर्योपासना करावी म्हणजे त्याचे त्वचाविकार पूर्णपणे दूर होतील असा उ:शाप श्रीकृष्णाने दिला. बारा वर्षांच्या खडतर तपश्‍चर्येनंतर सांब कुष्ठरोगातून मुक्त झाला. कृतज्ञतेच्या भावनेतून, सांबाने त्याजागी सूर्यदेवतेचे मंदिर उभारण्याचे ठरवले. मात्र, सूर्यदेवतेच्या मूर्तीची पूजा करण्यास ब्राह्मणांनी नकार दिला. त्यामुळे सांबाने साक द्वीपावरील सूर्योपासक माग कुटुंबीयांना (इराण येथील सूर्योपासक) या पूजेसाठी बोलावले. या परकीयांचा भारतातील सूर्योपासनेच्या सुरुवातीच्या काळात सहभाग असल्यामुळे की काय, सूर्यप्रतिमा ही नेहमीच इतर देवी-देवतांपेक्षा वेगळी वाटते. सूर्यप्रतिमेच्या पायात बूट असण्याची प्रथा ही मध्य आशियातून उत्तर भारतात स्थलांतरित झालेल्या परकीयांमुळेच सुरू झाली असावी असे मानले जाते.

सांबपुराणात सापडणारे सूर्यमंदिराचे वर्णन हे मुलतान(पाकिस्तान) येथील सूर्यमंदिराशी जुळते. सांबपुराणातील संदर्भानुसार सांबाने तपश्‍चर्या केलेली जागा ही चंद्रभागेच्या किनाऱ्‍यावर आहे. पंजाबमधील चिनाब नदीचे प्राचीन नाव चंद्रभागा असून सांबपुराणातील ‘मूलसांबपूर’ म्हणून उल्लेखलेली जागा म्हणजेच आजचे मुलतान असावे आणि मुलतानमधील सूर्यमंदिर हेच प्राचीन काळातील पहिले सूर्यमंदिर असावे असे मानले जाते. नंतरच्या काळात पूर्व किनाऱ्‍यावरील ओडिशामधील या भूप्रदेशात सूर्यपूजेचे महत्त्व वाढले असावे. त्यामुळेच बहुधा पुराणातील संदर्भानुसार सांबकथेतील मिथकाला नजरेसमोर ठेवून कोनार्क येथे भव्य अशा सूर्यमंदिराची निर्मिती केली गेली असावी. कारण कोनार्क मंदिराच्या जागेपासून केवळ तीन कि.मी. अंतरावर, समुद्रालगतच चंद्रभागा नदी जेथे समुद्राला मिळते तिथे उथळ पाण्याचा तलाव आहे.

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात आजही उपलब्ध असलेल्या ‘मदाला पांजी’ या पामवृक्षांच्या पानांवर लिहलेल्या प्राचीन हस्तलिखितांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, राजा पुरंदर केसरी याने कोनार्क येथे सूर्यमंदिर बांधले असे मानले जाते. पुढे गंगा राज्यकर्त्यांनी केसरी राज्यकर्त्यांचा पाडाव केल्यानंतर नरसिंहदेवा या गंगा राजाने तेराव्या शतकात पुरंदर केसरी राजाने बांधलेल्या मंदिरासमोरच सध्याचे हे मंदिर उभारले आणि त्यातच पूर्वीच्या मंदिरातील सूर्यदेवतेच्या मूर्तीची स्थापना केली. सोळाव्या शतकात मुकुंद राजाच्या मृत्यूनंतर मुसलमानांनी या मंदिराचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला, पण ते मंदिराचे फारसे नुकसान करू शकले नाहीत. मात्र, मंदिराच्या गर्भगृहावरील शिखरावर असणारा ताम्रकलश आणि पद्मध्वज काढून टाकण्यात ते यशस्वी झाले. मुसलमानांच्या तोडफोडीमुळे जी क्षती पोचली तीच पुढे मुख्य मंदिराचे शिखर कोसळण्यास कारणीभूत झाली असावी असे म्हटले जाते.

गंगा राजवटीतील काही ताम्रपटांमध्ये नरसिंहदेवाने तिकोना येथील एका कोपऱ्‍यात उष्णरश्मी सूर्यदेवासाठी ‘महत्कुटीर’ बांधल्याचे उल्लेख आहेत. हे अतिभव्य सूर्यमंदिर राजा नरसिंहदेवाने का उभारले याचे खरे कारण ज्ञात नाही. नरसिंहदेव हा राजा अत्यंत बलशाली होता, कदाचित तो सूर्योपासक असावा कारण त्याच्या पुत्राचे नावसुद्धा भानूदेव ठेवले होते. कदाचित पुत्रप्राप्तीनंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अथवा आपल्या उद्दिष्टपूर्तीनिमित्त त्याने हे मंदिर बांधले असावे असेही मानले जाते. सोळाव्या शतकापर्यंत या अतिभव्य आणि सुंदर कलाकुसरीने नटलेल्या मंदिराची ख्याती दूरवर पोचली होती. पुरीचे जगन्नाथ मंदिर हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे तिर्थक्षेत्र होतेच. बंगालचे प्रसिद्ध संत चैतन्यप्रभू महाप्रभू यांनीही चौदाव्या शतकात या मंदिरास भेट दिली होती. तसेच अकबर बादशहाच्या दरबारातील इतिहासकार अबूल फजल यानेही या मंदिराच्या भव्यतेबद्दल टीकाटिप्पणी केलेली आहे.

या सूर्यमंदिराच्या मुख्य देवळावरील शिखर का कोसळले याबद्दल कुठलीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. काहींच्या मते, मंदिराच्या पायाभरणीचे काम चुकीचे झाले होते; तर काहींना वाटते, की गर्भगृहावरचे शिखर कोसळण्यासाठी एखादा भूकंप किंवा वीज पडण्याचे निमित्त कारणीभूत झाले असावे. कदाचित मंदिराचे काम पूर्णच झाले नसावे. मात्र बहुधा, सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुसलमानांनी केलेल्या विध्वंसक आघातामुळेच झालेल्या परिणामस्वरूप मंदिराची वास्तू हळूहळू निखळण्यास सुरुवात झाली असावी. अखेरीस जेव्हा संपूर्ण शिखर कोसळले तेव्हा आतील गर्भगृह उघडे पडले. गर्भगृहाच्या आजूबाजूचे दगड बाजूला सारून जेव्हा गर्भगृह मोकळे करण्यात आले, तेव्हा मंदिराची मुख्य सूर्यप्रतिमा गाभाऱ्‍यात नाहीच असे लक्षात आले. ही सूर्यप्रतिमा कोठे गेली याचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही. मुसलमानांच्या हल्ल्यात मंदिराचे पावित्र्य भंग झाल्यामुळे सूर्यदेवतेची प्रतिमा पुरीच्या मंदिरात हालवली असावी असेही म्हटले जाते. या मंदिरासंबंधी अनेक वंदता निर्माण झाल्या होत्या. काहींच्या मते कोनार्कच्या मंदिरातील प्रतिमासुद्धा पुरीच्या मंदिरातील मूर्तीप्रमाणे लाकडाची केली असावी आणि शिखर कोसळल्यानंतर ती खंडीत झाली असावी. कारणे काहीही असोत, मुख्य देवतेची मूर्तीच नाहीशी झाल्यामुळे वंचित अवस्थेतील सूर्यमंदिर पूर्णपणे दुर्लक्षित झाले असावे. हळूहळू सुरू झालेली पडझड पुढे मुख्य देऊळ कोसळण्यास कारणीभूत झाली असावी. 

साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात किनाऱ्‍यावर येणाऱ्‍या दर्यावर्दी लोकांनी, व्यापाऱ्‍यांनी या भव्य वास्तूचे रूपांतर दीपस्तंभ म्हणून करण्याचा घाट घातला होता. पण सुदैवाने तो प्रत्यक्षात उतरला नाही. प्रख्यात ब्रिटिश पुरातत्त्व संशोधक जेम्स फर्ग्युसन याने १८३७ मध्ये पहिल्यांदाच कोनार्कचे मंदिर पाहिले. त्यावेळी त्याने काढलेले रेखाचित्र आजही उपलब्ध आहे. मंदिराचे जे अवशेष त्याला पाहायला मिळाले त्यावरून त्याने बांधलेल्या आडाख्यानुसार मंदिराचा जो भाग त्यावेळपर्यंत उभा होता, त्याची उंची अंदाजे बेचाळीस ते सत्तेचाळीस मीटर असावी. तदनंतर वर्षभराने या मंदिरास भेट देणाऱ्‍या मार्क हॅमकीट यांनीही मंदिराचा काही भाग अद्यापही उभा असल्याचा उल्लेख केलेला आहे. मात्र १८६८ मध्ये पुरातत्त्व संशोधक राजेंद्रलाल मिश्रा यांनी जेव्हा कोनार्क मंदिराला भेट दिली, तेव्हा गर्भगृहावरचे संपूर्ण शिखर कोसळून जगमोहनाला लागून दगडमातीचा केवळ ढिगारा तयार झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले होते. एवढेच नव्हे तर त्यात चारपाच पिंपळवृक्षही वाढलेले होते. यापुढची वाईट अवस्था म्हणजे लगतच्या खुर्दा राजाने स्वत:च्या किल्ल्यामध्ये बांधल्या जाणाऱ्‍या मंदिरासाठी कोनार्क मंदिराच्या आवारातील दर्शनी भागातील अनेक सुंदर शिल्पाकृती पळवल्या, अशी नोंद जेम्स फर्ग्युसन यांनी करून ठेवली आहे. 

वर सांगितल्याप्रमाणे युरोपियन दर्यावर्दींच्या दृष्टीने पूर्व किनाऱ्‍यावर ठळकपणे दिसणारा ब्लॅक पॅगोडा ऊर्फ कोनार्कचे सूर्यमंदिर ही मोठी ठशठशीतपणे उठून दिसणारी खूण होती. त्याकाळात पुरीतील जगन्नाथाचे मंदिर संपूर्णपणे पांढऱ्‍याशुभ्र रंगात रंगवलेले होते. ही दोन्ही मंदिरे समुद्रकिनाऱ्‍यालगत असल्यामुळे किनाऱ्‍याजवळ येणाऱ्‍या जहाजांना त्यांचा आधार वाटे. त्यामुळे १८०८ पासूनच या पडझड होणाऱ्‍या मंदिराची दुरुस्ती व्हावी आणि त्याचा दीपस्तंभ म्हणून वापर व्हावा यासाठी ही मंडळी प्रयत्नशील होती. अत्यंत दुरावस्थेत असलेल्या या भव्य मंदिराची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी अनेकांनी तळमळीने प्रयत्न केले. जेम्स फर्ग्युसन यांनी मंदिर पाहिल्या क्षणापासून यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र एकोणिसाव्या शतकात फक्त मंदिराच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणात वाढलेले जंगल साफ करण्याचे काम पार पाडण्यात यश आले. या साऱ्‍या पसाऱ्‍यात इतस्तः विखुरलेल्या हत्ती, घोडे आणि इतर प्रचंड आकाराच्या (कलोजल) शिल्पाकृती एकत्रित करून त्यांना योग्य जागी प्रस्थापित करण्याचे काम करण्यात आले. 

मंदिराच्या दुरुस्तीचे काम निकराने सुरू झाले, ते ले. ज. जॉन वूडबर्न यांच्या पुढाकाराने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस, जेव्हा १९०० मध्ये त्यांनी या मंदिराला भेट दिली. सर्वात महत्त्वाचे काम होते ते जगमोहनाची म्हणजेच सभागृहाची इमारत कोसळण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करणे. मात्र प्रत्यक्षात १९०५ मध्ये या प्रयत्नांना खरी चालना मिळाली. त्या दृष्टीने सुरुवातीला जगमोहनाच्या शिखराचे निखळलेले दगड पूर्ववत बसवण्याचे अवघड काम केले गेले. नंतर जगमोहनाच्या आतील भागात आधारासाठी नव्याने बांधकाम केले गेले. या वास्तूचे उत्तर आणि दक्षिण दरवाजे बांधकाम करून कायमचे बंद केले गेले. जगमोहनाच्या अंतर्भागातील दगडमातीचा ढीग हटवल्यानंतर मुख्य देवळाच्या गर्भगृहाकडे जाणारा मार्ग मोकळा झाला. त्यावेळी पडझडीनंतरही शिल्लक राहिलेला, सुंदर कोरीवकाम केलेला चौथरा आणि अनेक शिल्पाकृती प्राप्त झाल्या. जगमोहनाच्या आतील भागामध्ये समुद्राच्या रेतीचे ढीग साचलेले होतेच. मंदिराच्या अंतरंगाचे निरीक्षण करण्याच्या उद्देशाने आधी तेथील साफसफाई करण्यात आली होती. याच दरम्यान जगमोहनाच्या आतील बाजूस एका खांबाला टेकवून उभी करण्यात आलेली क्लेराईट दगडापासून केलेली एक सूर्यप्रतिमा हाती लागली. आज ही अप्रतिम सुंदर प्रतिमा दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे. नंतर जगमोहनाची संपूर्ण वास्तू आतील भागात वाळू भरून पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर इतर गोष्टींना प्राधान्य देण्यात आले. संपूर्ण आवारात अनेक शतकांपासून साठत गेलेल्या रेतीचे ढीग उपसणे हेसुद्धा फार मोठे कार्य होते. गंमत म्हणजे हे वाळूचे ढीग हटवल्यानंतर संपूर्ण मंदिराचा पाया हा एका उंच चौथऱ्‍यावर रचलेला आहे ही गोष्ट लक्षात आली. शिवाय जगमोहनाच्या समोर असलेली, परंतु वाळूच्या ढिगाऱ्‍याखाली पूर्णपणे लपून गेलेली नृत्यमंडप किंवा भोगमंडप ही अप्रतिम वास्तूही उजेडात आली. त्याचवेळी मुख्य मंदिराच्या पाठीमागे नैऋत्य कोपऱ्‍यात असलेले तिसरे मंदिरही पडझड झालेल्या अवशेषांमधून शोधण्यात आले. हे मंदिर सूर्यपत्नी मायादेवीचे आहे असे मानण्यात येते. या मंदिरातही अप्रतिम अशी शिल्पकला पाहायला मिळते. १९०० मध्ये सुरू झालेले संवर्धनाचे काम आजही अव्याहतपणे सुरूच आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या