‘दुबई पॅटर्न’ मेंदीचे वर्चस्व

परीक्षकांचे मनोगत
सोमवार, 29 जुलै 2019

कव्हर स्टोरी : मेंदी विशेष
परीक्षकांचे मनोगत

श्रावण महिना! नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन अशा सणावारांनी परिपूर्ण! नागपंचमी म्हटली की मेंदी आलीच. स्त्रियांच्या आवडीच्या शृंगाराचा अविभाज्य भाग असलेली मेंदी. तिचा ओला हिरवा गंध, ती रंगल्यानंतर मन मोहरून टाकणारा आनंद!
असा हा स्त्रीवर्गाच्या मनाचा आवडता कोपरा ‘सकाळ साप्ताहिक’ने मेंदी विशेषांक आणि मेंदी स्पर्धेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे जपला आहे. त्यासाठी आम्हा परीक्षकांतर्फे ‘सकाळ साप्ताहिक’चे अभिनंदन!

या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो. त्यात सहभागी व्हायला सगळेच उत्सुक असतात. यावर्षीपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जळगाव, नाशिक, लातूर, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नगर इत्यादी जिल्ह्यांमधून स्पर्धकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

काहींनी संदेशपर डिझाईन्स पाठवली होती. उदा. पुलवामावरील हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, सेव्ह अर्थ, सेव्ह वॉटर, साक्षरता अशी डिझाईन्स होती. थीम बेस्ड मेंदीमध्ये संपूर्ण विवाह विधी, डोहाळजेवण, साखरपुडा, राधाकृष्ण अशी उल्लेखनीय डिझाईन्स होती.

यावर्षी प्रामुख्याने ‘दुबई पॅटर्न’ दिसून आला. निवड करताना प्रामुख्याने सुबकपणा, नावीन्य, लय, आकर्षकता याला प्राधान्य दिले. हाताची लांबी-रुंदी, बोटांचा आकार लक्षात घेऊन काढलेल्या डिझाईन्सचा विचार केला आहे. रेखीवपणाला महत्त्व दिले आहे. 

यावर्षी प्रकर्षाने जाणवलेल्या गोष्टी अशा - नियमांचे पालन केले गेलेले नाही. काही स्पर्धकांनी स्केचचे (रेखाटनाचे) फोटो पाठवले. त्याऐवजी हातावर काढलेल्या मेंदीचे फोटो अपेक्षित होते. डिझाईन पूर्ण करताना बोटांची पेरे मोकळी सोडली गेली होती, ते चुकीचे होते. बक्षीसपात्र डिझाईनसुद्धा केवळ बोटांची पेरे भरली नाहीत म्हणून विचारात घेता आले नाही. स्केच पाठवताना प्रमाणबद्ध हाताच्या रेखाटनावर मेंदी डिझाईन पाठवावे. नियमाप्रमाणे फोटो पाठविताना पांढऱ्या बॅकग्राऊंडवर पाठवावा आणि हातावर काढलेल्या मेंदीचाच फोटो पाठवावा. 

प्रथम क्रमांक निवडताना दुबई पॅटर्नबरोबर पारंपरिक डिझाईन्सची सुबक मांडणी याचा सुरेख मेळ दिसून आला. द्वितीय क्रमांकात उठावदार डिझाईन आणि लक्षवेधी मोरांची मांडणी सुरेख केली आहे. तृतीय क्रमांकात पारंपरिक नक्षीसह उठावदार आकृत्या मनाला भावल्या. 

मेंदी स्पर्धेतील विजेते

प्रथम क्रमांक : आरती श्रीकांत काटे

द्वितीय क्रमांक : जागृती प्रवीण वारू
 
तृतीय क्रमांक : सोहेल नूरमोहम्मद शेख

उत्तेजनार्थ
प्रियांका दिलीप गलांडे
नेहा गणेश तरडे
झलक नवनीत परमार
नेहा नारायण नाईक
कोमल संजय कोल्हापुरे
पूनम गेनू थिटे
आंचल खत्री
संध्या अतुल कुंभार
वैष्णवी विनायक बंकापुरे
सोनम चौधरी

संबंधित बातम्या