हिरवाईचा नजराणा

मुझफ्फर खान
बुधवार, 28 मार्च 2018

कोकणच्या किनारी भागातील गावांना, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण रेल्वे या प्रवासी माध्यमांचा उपयोग अद्याप थेट असा होत नाही. जिल्ह्यांतर्गत सागरी प्रवासी वाहतुकीची कोकणवासीयांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी विचारात घेऊन सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरिन सर्व्हिसेसचे डॉ. चंद्रकांत मोकल आणि डॉ. योगेश मोकल यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारी सागरी प्रवासी वाहतूक सुरू केली. या प्रवासी बोटींना ‘जंगल जेट्टी’ असे म्हटले जाते. महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रवासी तिकिटाचे दर आणि अन्य आवश्‍यक परवाने मंजूर केले आहेत. 

कोकणच्या किनारी भागातील गावांना, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण रेल्वे या प्रवासी माध्यमांचा उपयोग अद्याप थेट असा होत नाही. जिल्ह्यांतर्गत सागरी प्रवासी वाहतुकीची कोकणवासीयांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी विचारात घेऊन सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरिन सर्व्हिसेसचे डॉ. चंद्रकांत मोकल आणि डॉ. योगेश मोकल यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारी सागरी प्रवासी वाहतूक सुरू केली. या प्रवासी बोटींना ‘जंगल जेट्टी’ असे म्हटले जाते. महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रवासी तिकिटाचे दर आणि अन्य आवश्‍यक परवाने मंजूर केले आहेत. 

इंधनाची बचत
राज्यातील पहिली फेरी बोट आणि जंगल जेट्टी सेवा रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ-धोपावे या खाडी दरम्यान सुरू करण्यात आली. यापूर्वी तेथील स्थानिकांना दापोली ते राष्ट्रीय महामार्ग आणि पुढे गुहागर असा प्रवास करावा लागत असे. यात इंधन, पैसा व वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होत असे. आता नव्या सागरी सेवेमुळे हा तीन तासांचा प्रवास केवळ सहा मिनिटांवर आला आहे. या यशस्वी सेवेनंतर वेसवी (रत्नागिरी) ते बागमांडले (रायगड) आणि पुढे दिघी ते आगरदांडा अशा फेरी बोट कार्यान्वित होऊन, आता रत्नागिरी आणि रायगड हे दोन्ही जिल्हे फेरीबोटीद्वारे जोडले गेले आहेत. या नव्या सागरी मार्गामुळे मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत होत आहे.

सुरक्षित प्रवास
सागरी मार्गामुळे सुरक्षित, जलद आणि अल्पखर्चात प्रवास होत असल्यामुळे, स्थानिकांबरोबरच पर्यटकांनीही याला चांगला प्रतिसाद दिलेला दिसून येतो. सुवर्णदुर्ग शिपिंग आणि मरिन सर्व्हिसेसच्या माध्यमातून जिल्ह्यांतर्गत सुरू झालेली सागरी प्रवासी वाहतूक, स्थानिकांना व्यावसायिकदृष्ट्या जशी फायद्याची ठरली, तशीच ती कोकणच्या पर्यटन विकासासदेखील मोठा हातभार लावणारी ठरली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे हे पर्यटकांचे खास आकर्षण असते. वेळासचा कासव महोत्सव, मुरूड, हर्णे, कर्दे, आंजर्ले, केळशी, कोळथरे, गुहागर, वेळणेश्वर येथील समुद्रस्नान, हेदवीतील बामणघळ, पुळणीतील गणपतीसाठी प्रसिद्ध असलेले गणपतीपुळे येथे पर्यटक येतात, राहतात आणि निळंशार आकाशाबरोबर, समुद्राची गाज ऐकत निसर्गाचा आनंद अनुभवतात. आज सागरी महामार्गामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे जोडले गेले आहेत. शिवाय रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यांच्या ठिकाणी (बाणकोट खाडी, दाभोळ खाडी, जयगड खाडी) फेरीबोट सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनासह खाडी ओलांडण्याची सुविधा पर्यटकांसाठी सोयीची ठरत आहे.  येथील समुद्रकिनारे जरी सारखे असले तरी प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचे एक वेगळे वैशिष्ट्य राहिले आहे.  त्यामुळेच हे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी आकर्षणाचे स्थान आहे.

कासव महोत्सव
मंडणगड तालुक्‍यातील वेळासचा समुद्रकिनारा म्हणजे ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांचे प्रजननाचे स्थान आहे. २००३ सालापासून  समुद्री कासवांची अंडी संरक्षित करणे आणि जन्माला आलेली शेकडो कासवे समुद्रात सोडणे ही कामे तेथील गावकरी तन्मयतेने करतात. दरवर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान वेळासला कासव महोत्सव साजरा केला जातो. देशी विदेशी हजारो पर्यटक हा कासव महोत्सव पाहण्यासाठी वेळासला येतात. या छोट्याशा गावात लॉज किंवा हॉटेल नाही. परंतु घरगुती राहण्याची व जेवण्याची सोय गावात उत्तम प्रकारे होते. दापोली तालुक्‍यातील केळशीचा समुद्रकिनारा वाळूच्या डोंगरासाठी प्रसिद्ध आहे. कोकणात असा वाळूचा डोंगर अन्यत्र दिसत नाही.  केवड्याचे बन, शंख, शिंपले, कवड्या, समुद्रफेणी, निरनिराळ्या आकारांची समुद्रप्राण्यांची घरे ही देखील केळशीच्या समुद्रकिनाऱ्यावर पहायला मिळतात. याशिवाय पेशवेकालीन वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेले सिद्धिविनायक गणपती मंदिरही केळशीमध्ये आहे. 

हर्णे बंदर
विस्तीर्ण समुद्रकिनारा, नौका विहारातून सुवर्णदुर्गाचे दर्शन, डॉल्फिन सफारी आणि माशांचा लिलाव अशा वैशिष्ट्यांनी हर्णे ओळखले जाते.  त्याचबरोबर कनगदुर्ग, फतेगड अशा दोन गडांचे अवशेषही हर्णे गावात आढळतात. त्यामुळे हर्णे हे सागरी पर्यटनातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. मासेमारीचे मुख्य केंद्र असल्याने सायंकाळी ४ नंतर हर्णे बंदरात होणारा माशांचा लिलाव पाहण्यासारखा असतो.  विविध प्रकारचे ताजे मासे खरेदी करण्याची हौसही येथे भागविता येते.  शिवाय बोटींची दुरुस्तीदेखील येथे होत असल्याने लहान मुलांची संपूर्ण बोट पाहण्याचे कुतूहल येथे पूर्ण करता येते. 
थंडीच्या मोसमात दापोली तालुक्‍यातील कर्दे परिसरात हजारोंच्या संख्येने स्थलांतरित समुद्रपक्षी (सी गल) येतात.  या पक्षांचे थवे पाहण्यात वेळ कधी निघून जातो ते समजत नाही.  शिवाय समुद्रात जाऊन डॉल्फिन पाहण्याची संधी देखील कर्दे समुद्रकिनाऱ्यावर उपलब्ध आहे. पॅरासेलिंग, स्पीड बोट, बनाना बोट, सॅन्ड स्कूटर, उंट सफर अशा विविध सोयी मुरूडच्या समुद्रकिनाऱ्यावर उपलब्ध आहेत.  किनाऱ्यालगतच निवासाची व्यवस्था असल्याने मुरूडचा समुद्रकिनारा पर्यटकांनी कायम फुललेला असतो. येथे महर्षी कर्वे यांचे स्मारक आहे. महर्षी कर्वेंची दुर्मिळ छायाचित्रे, जीवनपट ह्यांचे स्मारक पाहता येतो. 

गुहागरातीचे साहसी खेळ
गुहागरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा देखील पर्यटकांना भुरळ पाडतो. गुहागरमध्ये राहण्यासाठी चांगली हॉटेल्स असल्याने तसेच शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय असल्याने अनेक पर्यटक गुहागरला प्राधान्य देतात.  मुरूडच्या समुद्रकिनाऱ्याप्रमाणेच गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरही स्पीड बोट, बनाना बोट, सॅन्ड स्कूटर या साहसी खेळांचा आस्वाद घेता येतो. लाईफगार्डची व्यवस्था असल्याने मनमुराद समुद्रस्नान करता येते. किनाऱ्यावर खाऊगल्लीप्रमाणे अनेक दुकाने असल्याने समुद्रावरच जेवण्याचा आनंदही मिळतो. येथील हॉटेलमध्ये, होम स्टेमध्ये कोकणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येतो. 

गुहागर तालुक्‍यातील वेळणेश्वर येथेही विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे.  हेदवीला फार मोठा समुद्रकिनारा नाही. परंतु समुद्रावरील अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले उमा महेश्‍वरचे मंदिरात विसाव्याचे दोन क्षण आनंदात जातात. याच मंदिरामागे निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखली जाणारी बामणघळ आहे. भरतीच्या वेळी १० - १५ फूट उंच उडणारे नैसर्गिक कारंजे, घळीमधील लाटांचा खळखळाट भान हरपून टाकतो.

रत्नागिरीतील पर्यटन स्थळे
रत्नागिरी तालुक्‍यातील गणपतीपुळे म्हणजे पुळणीतील स्वयंभू गणेशाचे मंदिर. वर्षभरात लाखो भक्त आणि पर्यटक येथे दर्शनासाठी, मंदिर पाहण्यासाठी, समुद्रस्नानासाठी येथे येतात. निवासासाठी होम स्टेसह पंचतारांकित हॉटेल्स्‌ची सुविधा येथे आहे. गणपतीपुळ्यातील प्राचीन कोकण, मालगुंडमधील कवी केशवसुत स्मारक, जयगडचा किल्ला या पर्यटनस्थळांना गणपतीपुळ्यात राहून सहज भेट देता येते. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या रत्नागिरीत रत्नदुर्ग किल्ला, भगवती मंदिर, पतितपावन मंदिर, मत्स्यालय, भाट्ये समुद्रकिनारा, झरी विनायक मंदिर ही पर्यटनस्थळे आहेत. मिऱ्या येथे स्कुबा डायव्हिंगची सोय नव्याने झाली आहे. याच तालुक्‍यातील गणेशगुळे येथील समुद्रकिनारा आहे. गावखडी व पूर्णगड येथे विस्तीर्ण सुरूबनात लपलेला निसर्गरम्य समुद्र आहे. राजापूर तालुक्‍यातील वेत्ये समुद्रकिनाऱ्यालाही पर्यटक भेट देतात. 
विस्तीर्ण समुद्रकिनारे, निसर्ग सौंदर्य, पक्षी दर्शन, लोककला, शाकाहारी मांसाहारी मत्स्याहारी खाद्यपदार्थांची पर्वणी असे विविधांगी सागरी पर्यटनाचे समाधान रत्नागिरी जिल्ह्यात मिळवता येते. समुद्राचे काही नैसर्गिक नियम आहेत त्यांचा स्वीकार केल्यास सागरी पर्यटन अनेक दिवसांसाठी संस्मरणीय ठरेल. 

दाभोळच्या खाडीत सफर आणि मगर दर्शन
गुहागर तालुक्‍यातील वेलदूर, धोपावे तसेच दापोली तालुक्‍यातील दाभोळ येथे पर्यटकांसाठी खाडी सफरची सुविधा आहे. एका तासामध्ये खाडीतून किनाऱ्यावरील जनजीवनाचा अनुभव यातून मिळतो. गोवळकोट (ता. चिपळूण), परचुरी (ता. गुहागर) येथे वाशिष्ठी नदीची सफर करताना मगरींचे दर्शनही घेता येते. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या