रानभाज्या - निसर्गाचा अमूल्य ठेवा

नीलिमा जोरवर
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

कव्हर स्टोरी
 

चविष्ट, चौरस, औषधी गुणधर्म असलेल्या आणि पौष्टिक अन्न पुरवणाऱ्या रानभाज्या खास पावसाळ्यातच खायला मिळतात. अशा रानभाज्या रानात आणि जंगलात येतातच, पण यातल्या काही भाज्या अगदी आपल्या परस बागेतदेखील येतात...   

‘श्रावण मासी, हर्ष मानसी’ असे म्हटल्याप्रमाणे श्रावणात सर्व चराचर हिरवे लेणे नेसलेले असते. ग्रीष्मात वठलेल्या झाडांचे हिरवे, न्हाऊन निघालेल रूप, स्वच्छ चकाकी आणि हिरवे कोंदण ल्यालेल्या डोंगर-दऱ्याही माणसाला खुणावत असतात. बेडकांचे गाणे, खेकड्यांचे मुक्त फिरणे, फुलपाखरांचे बागडणे अशा सर्वच गोष्टी जंगलांची मोहिनी घालत असतात. याचवेळी पृथ्वीच्या कुशीत दडून बसलेल्या अनेक वनस्पती डौलाने आपले अस्तित्व निर्माण करत असतात. अशावेळी खरे तर रान फिरले, की त्यांचे वैविध्य आपल्या नजरेत भरते. यातच ज्या वनस्पती खाऊ शकतो, अशा रानभाज्यादेखील असतात. आपल्या पूर्वजांनी, आदिवासींनी त्यांची व्यवस्थित माहिती करून घेऊन त्या कशा खायच्या, कधी खायच्या, कोणता भाग खायचा याची अनमोल माहिती मौखिक परंपरेतून पिढ्यानुपिढ्या जोपसलेली आहे. 

या सर्व रानभाज्या समजून घेणे ही गोष्ट खूपच मनोरंजक आहे. सुरुवातीला माणसांचे अन्न हे जंगल व आसपासच्या परिसरातून मिळत असे. यात कंदमुळे, जंगलातून अपोआप मिळणारी फळे व रानभाज्यांचा समावेश होतो. माणसाने शेती करायला सुरुवात केली, त्याच्या खान-पानाच्या सवयी बदलल्या तसतसे या सहज मिळणाऱ्या अन्नाचा वापर बदलला.        

गेल्या काही दशकांत कृषीव्यवस्थेत झालेल्या अमुलाग्र बदलामुळे तर या भाज्या आपण विसरूनच गेलो आहोत. कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची अशा अनेक भाज्यांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश झाला आणि आपसूक मिळणाऱ्या रानभाज्यांचा हा ठेवा दुर्मिळ होत गेला. मात्र, जंगल भागात विशेषतः आदिवासी भागात या भाज्या आजही काही प्रमाणात खाल्ल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने कंदवर्गीय, झुडूपवर्गीय, वेलवर्गीय, वृक्षवर्गीय, अळंबी आणि निवडुंग अशी यांची विभागणी करू शकतो. 

पावसाला सुरुवात होण्यापूर्वी हवामानात जे बदल घडतात, तेव्हाच खरे तर या रानभाज्या दिसू लागतात. यात काही अळंबीदेखील असतात. म्हणजे कात्रुड नावाची ही अळंबी जंगलात अगदी सुरुवातीलाच झाडा-झाडांच्या बेचक्यात निघते. जस-जसे ढग निघत जातात, तसतशी तिची वाढ होते. ही अळंबी काही ठराविक झाडांवरच येते. जसे जुनाट आंब्याचे किंवा जांभळाचे झाड असेल, तर हमखास येते. स्थानिकांना हिच्या येण्याच्या जागा माहीत असतात. काही अळंब्या या खास श्रावण महिन्यातच निघतात. अगदी भातशेतीच्या बांधावर. नैसर्गिक स्वरूपात मिळणाऱ्या या अळंबी प्रथिनांची मोठी गरज भागवत असतात. परंतु, यात एकसारखी दिसणारी विषारी अळंबीही असू शकते. त्यामुळे स्थानिक लोकांकडून याची नीट माहिती घेऊन मगच ते खाण्यासाठी वापरावे. याच दरम्यान ‘चाई’ ही रानभाजी मिळते. या वनस्पतीचे असणारे कोवळे तुरे हे खाण्यासाठी वापरतात. 

एखादा पाऊस होऊन गेला, की मग या भाज्यांची रेलचेल वाढते. कुरडू, तेरा, पाथरी, तांदूळसा, माठ, दिवा, बडदा, सराटे, आघाडा, टाकळा, नारळी अशा अनेक पालेभाज्या जंगलात व मोकळ्या पडीक जागेत दिसू लागतात. तुम्ही कोणत्याही आदिवासी भागात गेलात, की लोक सांगतात, ‘एकदा का पाऊस पडला, की मग आम्ही फक्त रानातल्याच भाज्या खातो’ आणि हे अगदी खरे असते. बाजारातल्या त्याच-त्याच भाज्या खाण्यापेक्षा अतिशय चविष्ट व औषधी गुणधर्म असणाऱ्या या भाज्या खाणे, हे कधीही चांगले. 

पावसाळ्यात पोटाचे विकार कमी करण्यासाठी ‘टाकळा’ किंवा ‘तरोटा’ ही भाजी अवश्य खाल्ली जाते. हिचे कृमिनाशक गुणधर्म हे पोटाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. याशिवाय कामुनी नावाची भाजीदेखील कावीळ झाली असल्यास अवश्य खातात. भारंगीची कोवळ्या पानांची भाजीदेखील अशीच औषधी आहे. सर्वच रानभाज्या या काही न काही औषधी गुणधर्म असलेल्या अशा आहेत. शिवाय त्या उगवण्यासाठी कोणतीही रासायनिक खते वापरात आलेली नसतात. त्यामुळे विषमुक्त असे अन्न आपल्याला त्यातून मिळते.  

रानभाज्यांमध्ये असलेली विविधता ही आपल्याला चौरस व पौष्टिक अन्न पुरविते. शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषकतत्त्वे यातून आपल्याला मिळतात. जसे की शेवगा, हादगा, मोह, माठवर्गीय भाज्या यांचा विशेष उल्लेख करता येईल. यातून मिळणारे लोह, कॅल्शिअम आणि इतर जीवनसत्वे हे मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहेत. सर्वच रानभाज्या या अॅंटी अॉक्सिडंट जास्त प्रमाणात असणाऱ्या आहेत. त्यामुळे आजार होऊच नये, यासाठी त्या उपयुक्त ठरतात. 

या भाज्या आम्हाला खाण्यासाठी कशा उपलब्ध होतील, असा प्रश्न मला नेहमीच विचारला जातो. आपल्याला असे वाटत असते, की रानभाज्या मिळवण्यासाठी नेहमीच कोठेतरी जंगलात जावे लागेल आणि मग आपल्याला त्या उपलब्ध होतील. तर सर्वप्रथम आपण हा गैरसमज दूर केला पाहिजे. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात मोकळी जागा असेल, तर तेथेही काही रानभाज्या येतात. अगदीच शेतातसुद्धा त्या असतात. फक्त त्या ओळखता यायला हव्यात. जसे की टाकळा, आघाडा, पाथरी, कोंबडा, घोळ, आंबूशी, तांदूळसा, कुंजीर, हिरवा माठ, काटेमाठ या भाज्या तण म्हणून उगवलेल्या असतात. या भाज्या आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात. यांच्या बिया जमा करून त्या आपण आपल्या परसबागेत किंवा गच्चीवर कुंड्यांमध्येही उगवू शकतो.  

याशिवाय काही वृक्षवर्गीय भाज्यांची लागवड आपल्याला करता येते. जसे की शेवगा, हादगा, भोकर, कांचन ही झाडे आपण परिसरात, मोकळ्या जागेत अथवा शेताच्या बांधावर लावू शकतो. शेवग्याच्या पाना-फुलांची आणि शेंगांची भाजी आपल्याला वर्षभर सहज मिळू शकते. हादग्याच्या फुलांची आणि शेंगांची भाजी आपण खाऊ शकतो. भोकर अतिशय गुणी असे झाड. याच्या कोवळ्या पानांची, मोहराची आणि कच्च्या फळांची अतिशय रुचकर व पौष्टिक भाजी मिळते. शिवाय पिकलेली फळे नुसती खाल्ली जातात किंवा त्याचे सरबत केले जाते. कांचन किंवा कोरल हा वर्षभर हिरवा असणारा छोटेखानी वृक्ष, बऱ्याचदा बागेत शोभेसाठी लावलेला असतो. याच्या कोवळ्या पालवीची, तसेच फुलांची व शेंगांची भाजीही केली जाते.

या भाज्या खायच्या कशा हाही एक महत्त्वाचा प्रश्न असतो. काही रानभाज्या या विशेष प्रक्रिया करून खाव्या लागतात. जसे की बडदा ही भाजी इतकी खाजरी असते, की त्यासोबत कोणतीही आंबटभाजी वापरावी लागते. बऱ्याच भाज्या या साध्या उकडून, पिळून, कांदा-मिरचीची फोडणी घालून परतून करतात. भाज्या खाण्याआधी एक तर त्या नीट ओळखाव्यात आणि त्या करण्याच्या पद्धती समजून घेऊन मगच खाण्यासाठी वापराव्यात. बाजारात मिळणाऱ्या भाज्यांची पाककृती विक्रेत्याकडूनच समजून घ्यावी.

रानभाज्यांचे व्यावसायीकरण करताना काही मुद्दे आपण समजून घेतले पाहिजेत. रानभाज्या या अनेकदा ठराविक मातीत व वातावरणातच येतात. त्यामुळे नैसर्गिकपणे असणारी ही जैवविविधता ओरबाडली जाणार नाही, याची दक्षता घेणे खूप महत्त्वाचे आहे. या भाज्यांची शेती करता येऊ शकते का? असा अनेकांचा प्रश्न असतो. आतापर्यंत फक्त जंगलातून किंवा रानातून गोळा करून रानभाज्या खाल्ल्या जात असत. पण आता त्याच्या लागवडीच्या विविध पद्धतीदेखील आपल्याला शोधाव्या लागतील. वेगवेगळे प्रयोग करावे लागतील, मिळेल त्या जागेत किंवा ठरवून त्याची लागवड करावी लागेल. बिया गोळा कराव्या लागतील... आणि हो, ज्या फक्त जंगलातच येतात, अर्थात ज्या भाज्या फक्त त्यांच्या अधिवासातच आढळतात अशासाठी वापरण्याची संहिता ठरवावी लागेल. अन्यथा जे काही शिल्लक आहे, ते संपण्यासाठी वेळ लागणार नाही. कमी प्रमाणात असलेल्या भाज्यांचा वापर टाळावा लागेल. ज्या जास्त उपलब्ध आहेत अशांचे योग्य मूल्यवर्धन करून त्यातून स्थानिक आदिवासींना किंवा शेतकऱ्यांना उपजीविकेची सांगड घालून देणे गरजेचे आहे. जसे की जंगलात मोठ्या प्रमाणात मिळणारे मोह, अहळीव, करवंद यांची काही उत्पादने बाजारात आणता येतील. असा प्रयत्न आम्ही कळसुबाई महिला शेतकरी गट, उडदावणे या गावात केला आहे. करवंदापासून करवंद सरबत, लोणचे व कँडी असे प्रकार तयार केले आहेत, जे इथल्या महिलांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देत आहेत. शिवाय असा रोजगार मिळाल्यामुळे करवंदाची झाडे तोडण्याचे प्रमाण कमी होते. नागपूरच्या एका शेतकऱ्याने टाकळ्याच्या बियांची कॉफी केली आहे, ज्याला बाजारात चांगली मागणी आहे. लाल अंबाडीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतात घेऊन त्यापासून जाम, सरबत, लोणचे असे अनेक प्रकार करता येतात. अनेक ठिकाणी आता मोहफुलांचे पौष्टिक लाडू, मोहाचा सॉस असे अनेक प्रकार बाजारात येत आहेत. मूल्यवर्धनामुळे अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.        

थोडक्यात सांगायचे झाले, तर रानभाज्या हा निसर्गातील एक मोठा ठेवा आहे. मानवाच्या पूर्वजांचा तो वारसा आहे. हा वारसा समजून घेऊन जपण्यासाठी आपण सर्वांनीच पुढे यावे. हे संपत चाललेले ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याची आणि त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांचीच आहे.

संबंधित बातम्या