वृद्धाश्रम... गरज कोणाची?

इरावती बारसोडे
सोमवार, 8 जुलै 2019

कव्हर स्टोरी
सद्यःस्थितीत घरातील बाई-पुरुष दोघंही कामावर जाणारे. दोघांनी कमवणं ही काळाची गरज. घरात मागं एकटा राहतो तो वृद्ध. घरात एकटेपणा अंगावर येतो, घर खायला उठतं. म्हातारं माणूस म्हटलं, की पथ्यपाणी सांभाळावं लागतं. घरात कोणीच नसल्यामुळं पथ्यपाणी सोडा, पण वेळेवर जेवायला मिळायचेही वांधे होतात. दरवेळी पुढची पिढी जाणूनबुजून दुर्लक्ष करते, असंही नसतं. कामाच्या रगाड्यात वेळ देणं जमत नाही, हेच खरं. मग वृद्धांनाही वाटायला लागतं, माझ्यामुळं लेकरांना त्रास होतोय, माझं ओझ होतंय यांना... आणि मग समोर येतो वृद्धाश्रमाचा पर्याय. 

वृद्धाश्रम हा शब्दच किती उदासवाणा वाटतो ना? पण खरंच वृद्धाश्रम इतके उदासवाणे असतात का? वृद्धांना कुटुंबापासून दूर आश्रमात ठेवायची वेळ का येते? लेकरांना आई-वडिलांची कटकट नकोशी होऊ लागते म्हणून? की घरी काळजी घेणं खरंच शक्‍य नसतं म्हणून? आपण ओझं होऊ नये म्हणून वृद्ध स्वतःच वृद्धाश्रमात जाऊन राहतात का? पुण्यातल्या काही वृद्धाश्रमांना भेट देऊन या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक ठिकाणी काहीसा वेगळा अनुभव आला.


मातोश्री वृद्धाश्रम
राजाराम पुलाजवळचा मातोश्री वृद्धाश्रम १९९९ पासून कार्यरत आहे. राजा श्री शिवराय प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीनं चालतो. सध्या तिथं साधारण मध्यमवर्गीय घरातील १०० वृद्ध आहेत. ७० महिला आणि ३० पुरुष. महिलांचं प्रमाण का जास्त? तर, घरातला वाद. सासू-सुनेचं पटत नाही. पुरुषांना घरातील अधिकार पद सोडवत नाही, म्हणून वाद होतात आणि शेवटी तेही इथं येतात. मातोश्रीमध्ये दुसरा शनिवार आणि चौथा रविवार नातेवाइकांना वृद्धाश्रमात येऊन भेटता येतं. या दोन्ही दिवशी फाटकाजवळच्या बाकड्यांवर गर्दी असते. वृद्ध वाट पाहत राहतात. पण भेटायला येणाऱ्या नातेवाइकांचं प्रमाण खूपच कमी असतं. इथं वृद्ध आहेत १०० आणि भेटायला येणारे २०-३०. दुर्दैवाची गोष्ट अशी, की इथल्या वृद्धांचे नातेवाईक पुण्यातच राहणारे आहेत. पण, त्यांना भेटायला यायला तासभरसुद्धा वेळ नाही.  

वृद्धाश्रमामध्ये प्रवेशासाठीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण करताना नातेवाईक कधी फोटो, कधी वयाचा दाखला अशी एखादी गोष्ट विसरतात. ही बाब लक्षात आणून दिल्यावर ते म्हणतात, ‘ते आम्ही उद्या आणून देतो पण यांना आजपासूनच इथं ठेवून घ्या,’ असा अनुभव तिथले कर्मचारी सांगतात. बहुतांश वेळी हीच परिस्थिती असते. नातेवाइकांना वृद्धांना तिथं सोडून जायची खूप घाई झालेली असते. काहींचे नातेवाईक नेहमी भेटायला येतात, तर काहींचे ‘येऊन भेटून जा, तब्येत बरी नाही,’ असा चार-चार वेळा फोन केला तरीही येत नाहीत. वृद्ध मात्र वाट पाहत राहतात. इथं एकूण १३ निवासी कर्मचारी आहेत. व्यवस्थापक प्रकाश देशपांडे यांना पडद्यामागचे सूत्रधार म्हणतात. इथं काम करण्यासाठी त्याग, समर्पण लागतं. या कर्मचाऱ्यांमुळंच कारभार व्यवस्थित चालतो. देशपांडे त्यांचा एक अनुभव सांगतात, ‘महाराष्ट्र बॅंकेमधून निवृत्त झालेले एक ७५ वर्षांचे गृहस्थ चौकशीसाठी आले. सगळी माहिती घेतली आणि नंतर फिरकले नाहीत. महिन्याभरानंतर ते पुन्हा सगळी कागदपत्रं घेऊन आले. मला वाटलं यांनाच प्रवेश हवाय. पण, ते त्यांच्या ९४ वर्षांच्या आईला घेऊन आले होते. कारण, ते तिसऱ्या मजल्यावर राहात होते. इमारतीला लिफ्ट नव्हती आणि आईला घराबाहेर पडल्याशिवाय चैन पडायची नाही. त्या काही दिवस इथं राहिल्या. काही कार्यक्रमानिमित्त ते गृहस्थ त्यांना घेऊन गेले आणि तिथं त्या पडल्या. त्यामुळं सध्या रुग्णालयात आहेत.’

‘माझ्या मते, वृद्धाश्रम ही संकल्पना असावी. कारण, वृद्धांसाठी हा निवारा आहे. बाहेरच्या जगात त्यांना बोलायला जागा नसते. आपण इथं राहतो याची खंत असते त्यांच्या मनात. वृद्धाश्रमात त्यांना दिलासा मिळतो. प्रवेश घेतात तेव्हा मी त्यांना विचारतो, ‘इथं एका खोलीत चार माणसं असतात, ॲडजेस्टमेंट करावी लागते. घरीच अशी ॲडजेस्टमेंट करून घरीच का नाही राहात?’ तर, वृद्ध म्हणतात, ‘ते सगळं ठीक आहे. पण घरी वेळेवर जेवण कुठं मिळतं? घरी उपाशी राहावं लागत असेल, तर उपयोग काय?’ व्यवस्थापक प्रकाश देशपांडे त्यांचा अनुभव सांगताना म्हणाले.
मातोश्री वृद्धाश्रम, 
कर्वेनगर, पुणे, संपर्क : ०२०-२५४१२३७५


देवतरू... ज्येष्ठांचे घरकुल 
सिंहगड रस्त्यावर असणाऱ्या या घरकुलात ४९ आजी-आजोबा आहेत. त्यातले ४७ जण ८० वर्षांच्या पुढचे आहेत. बहुतांश जणांची मुलं परदेशी स्थायिक आणि कामामध्ये अतिशय व्यग्र. सुदैवानं इथले बहुतेक वृद्ध सुस्थितीत आणि स्वावलंबी आहेत. त्यांचं स्वतःचं उत्पन्न, निवृत्ती वेतन आहे. अनेक जण स्वतःहून इथं राहायला आले आहेत, कारण घरी एकटं वाटतं आणि त्यांच्याकडं बघणारं कोणी नाही. घरकुलात त्यांना घरच्यासारखं जेवण मिळतं. बीपी, मधुमेहवाल्यांचं पथ्यपाणी सांभाळलं जातं. सणावाराला गोडाधोडाचा स्वयंपाक असतो. वाढदिवस असेल तर केक कापला जातो, औक्षण केलं जातं. 

चारच वर्षांपूर्वी दीपिका ओसवाल आणि त्यांचे सहकारी अजय कुलकर्णी यांनी देवतरूची स्थापना केली. ओसवाल या स्वतः समुपदेशक आहेत. त्या पूर्वी वृद्धाश्रमांमध्ये जाऊन समुपदेशन करीत असत. त्यामुळं देवतरू सुरू केलं तेव्हा त्यांनी ठरवलं होतं, काहीही झालं तरी वृद्धांमध्ये आपण दुर्लक्षित आहोत, ही भावना कुठंही राहता कामा नये. दीपिका ओसवाल सांगतात, ‘ज्येष्ठांचं घरकुल असणं चुकीचं नाही. इथं राहणाऱ्या वृद्धांमध्ये आपल्यामुळं घरच्यांना त्रास होतोय, ही भावना नसते. मुलंही आई-वडिलांना भेटायला आली, की त्यांना उत्तम वेळ देतात. मुलं परदेशी असली तरी त्यांचं आपल्या पालकांकडं लक्ष आहे. पण, जेव्हा आम्हाला त्यांचं दुर्लक्ष होतंय, असं वाटतं तेव्हा आम्ही त्यांना पुन्हा खेचून परत आणतो. इथले सगळेच वृद्ध ८० च्या घरातले असल्यामुळं त्यांना सतत डॉक्‍टर, वैद्यकीय सेवेची गरज भासते. डॉ. अमोल सप्तर्षि यांचं पहिल्यापासूनच खूप सहकार्य मिळालं आहे.’ सुरुवातीला इथं आले तेव्हा झोपून असलेले अनेक आजी-आजोबा आता हिंडू-फिरू लागले आहेत. सध्या फक्त नऊ जण झोपून आहेत.  

इथले सगळे वृद्ध ८० वर्षांच्या पुढचे असल्यामुळं त्यांच्या मेंदूला कार्यक्षम ठेवण्यासाठी सतत नवनवीन उपक्रम राबविले जातात. रोज नावाच्या, गाण्याच्या भेंड्या खेळल्या जातात. हा उपक्रम सुरू झाला तेव्हा आजी-आजोबांना नावं, गाणी आठवायची नाहीत. पण, आता आज बास, उरलेल्या भेंड्या उद्या म्हणून थांबवावं लागतं, असं ओसवाल सांगतात.

इथल्या पहिल्या रहिवासी म्हणजे तुळसा ओंकार. वय ९२. त्यांना स्वतःचं असं कोणीच नाही. एक भाची आहे. तीच यांच्याकडं बघते. त्या इथं आल्या तेव्हा पूर्णतः झोपून होत्या. कशाचंच भान नव्हतं. त्यांना झोळीतून देवतरूमध्ये आणलं होतं. डॉक्‍टरांनी फार दिवस जगणार नाहीत, म्हणून सांगितलं. त्या गोष्टीला आता चार वर्षं झाली.
देवतरू... ज्येष्ठांचे घरकुल, 
सारसबागेच्या मागे, सिंहगड रस्ता, पुणे.
संपर्क : ०२०-२५५३११४६,२५५३२६३०, ७०३०२११७७५, ९८५०९०४८५८


सहजीवन वृद्धनिवास
नारायण पेठेतल्या पुणे मराठी ग्रंथालयासमोरच ‘सहजीवन वृद्धनिवास’ आहे. २००७ मध्ये त्याची स्थापना झाली. आत्ता तिथं २५ आजी आणि ३ आजोबा आहेत. २०१२ ंमध्ये भूगाव येथे आणखी एक वृद्धनिवास सुरू करण्यात आला. तिथं ४२ वृद्ध आहेत. भूगावच्या वृद्धनिवासमधील अनेकांची मुलं परदेशात आहेत. 

दिलीप देवधर हे पेशानं डॉक्‍टर आहेत आणि सहजीवन वृद्धनिवासचे कार्यकारी विश्‍वस्त. ते सांगतात, ‘मी गेली ४५ वर्षं फॅमिली डॉक्‍टर म्हणून काम करतोय. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. आता कुटुंबं विभक्त झाली. घरातली सगळीच माणसं कामावर जायला लागली, त्यामुळं वृद्धांकडं बघणारं कोणीच नाही. त्यात वृद्ध आजारी पडले, की आणखी त्रास होतो. वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे आणि ती आणखी वाढणार आहे. म्हाताऱ्या लोकांनाही आपण मुलांवर ओझं होऊन राहणं पसंत नसतं. त्यामुळं स्वतःहून येऊन राहणारेही खूप आहेत.’ काही वेळा असंही होतं, की आजी-आजोबांना फसवून आणलं जातं. तुला बरं नाहीये ना, मग काही दिवस डॉक्‍टरांकडे राहिलीस की बरं वाटेल, असं सांगून आणलं जातं. देवधर स्वतः डॉक्‍टर असल्यामुळं वृद्धांना सुरुवातीला ते खरंही वाटतं. पण खरी गोष्ट जेव्हा कळते, तेव्हा साहजिकच मन दुखावतं. 

म्हातारं माणून आजारी पडलं, की त्याची सुश्रुषा करणं सोपं नाही. शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या हे काम आव्हानात्मक आहे. 
स्मिता हर्डीकर (वय ७५) आजी सांगतात, ‘छान घरगुती वातावरण आहे. सकाळी दोन मुली येतात आणि सगळ्यांकडून छान व्यायाम करून घेतात. फावल्या वेळात मी टीव्ही बघते. पुण्यात माझे नातेवाईक आहेत. पण, सगळे आपापल्या उद्योगात मग्न. भाऊ-बहीणच बघतात.’ 
सहजीवन वृद्धनिवास
सहजीवन, नारायण पेठ, पुणे.
संपर्क : ०२०-२४४९१६१७
सहजीवन, भूगाव, मानस सरोवराच्या मागे.
संपर्क : ८५५०९३२७८५


पलाश एल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर
अनेकदा ज्येष्ठांची गंभीर आजार किंवा शस्त्रक्रियेनंतर घरच्या घरीसुद्धा व्यवस्थित वैद्यकीय काळजी घेणं आवश्‍यक असतं. पण, घरामध्ये कोणीच नसल्यामुळं योग्य काळजी घेतली जात नाही आणि आजार पुन्हा बळावण्याची शक्‍यता असते. अशांना ‘पलाश एल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर’ या संस्थेने आपल्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. हे सेंटर फेब्रुवारीतच सुरू झाले आहे.
हा काही पारंपरिक वृद्धाश्रम नाही. गंभीर आजारानंतरच्या उपचारांसाठी वृद्धांना इथं ठेवून घेतलं जातं. इथं येणारे वृद्ध घरात नकोसे झाले म्हणून आलेले नाहीत. घरात एकमेकांशी पटत नाही, वाद होतात म्हणून वृद्धाश्रमात नेऊन ठेवा, हा प्रकार इथं नाही. आजी-आजोबा इथं येतात कारण घरी सांभाळ करणारं कोणी नाही. आजारातून उठल्यावर घरच्यासारखी आपलेपणानं काळजी घेणारं कोणीतरी हवं असतं आणि ते पलाशमध्ये मिळतं. वृद्ध आजारातून बरे होतात आणि आपापल्या घरीही जातात. इथं अजूनतरी कोणीही कायमचं राहिलेलं नाही.
रुग्णालयातून शस्त्रक्रिया किंवा इतर काही उपचार घेऊन आल्यानंतर विशेष काळजी घेणं आवश्‍यक असतं. घरी अशी काळजी घेणं शक्‍य होत नाही. कारण, अनेकांची मुलं बाहेरगावी, परदेशी असतात. मुलं आई-बाबांना स्वतःबरोबर घेऊन जायला तयार असतात, पण त्यांना पुणं सोडायचं नसतं. मग पर्याय काय? तर अशा संस्था! त्यांचा दुसरा विचार असा असतो, की नातवंडांनी आपल्याला या अवस्थेत बघू नये. त्यांना आजारपणाची झळ लागू नये. त्यामुळं ते अशा ठिकाणी येऊन राहणं पसंत करतात. सगळे मिळून-मिसळून राहतात, कारण त्यांना घरच्यासारखं वातावरण वाटतं. इथं २४ तास वैद्यकीय सेवा पुरविली जाते. मदतीला माणसं असतात. पलाशचे संचालक हर्शल वटे सांगतात, ‘वृद्धाश्रम आणि रुग्णालय यांचा सुवर्णमध्य काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आम्ही स्वतः कोणत्याही उपचारपद्धतीचा सल्ला देत नाही. डॉक्‍टरांनी जी काळजी घ्यायला सांगितली आहे, जे उपचार सांगितले आहेत, आम्ही तेच करतो. आमच्याकडे एक ५५ वर्षांचे अाजोबा होते. त्यांना एक दिवसाआड डायलिसिस सांगितलं होतं. आम्ही त्यांचे उपचार योग्य पद्धतीने केले. जाताना अाजोबा ॲक्‍टिव्हावर मुलीच्या मागं बसून गेले. हेच आमचं यश. रुग्णाला पूर्ण बरं करायचं असेल तर त्याचं आणि त्याच्या नातेवाइकाचं पूर्ण सहकार्य लागतं. त्याशिवाय हे शक्‍य नाही. कामाच्या गडबडीत घरातील वृद्धांकडं दुर्लक्ष होतं. कोणी आजारी असेल आणि त्यांची काळजी घेतली गेली नाही, तर आजार आणखी वाढतो. अशा दुर्लक्षातून आजार वाढू नये यासाठी अशा सुविधांची गरज आहे आणि ही गरज वाढणार आहे.’
मुलं व्यावहारिक दृष्टिकोनातून पलाशमध्ये आई-वडिलांना आणून ठेवतात. बाहेर असणाऱ्याना मुलांनाही आपल्या पालकांकडं बघणारं कोणीतरी आहे, त्यांची काळजी घेतली जातेय, याचं समाधान असतं. ज्येष्ठ नाट्य अभिनेते राघवेंद्र कडकोळ आणि त्यांच्या पत्नीही गेल्या काही महिन्यांपासून पलाशमध्ये राहत आहेत. 
पलाश एल्डर्ली केअर अँड रिकव्हरी सेंटर, बावधन
संपर्क : ९७६७२३०००३, ७०२०३६७३४५

ज्यांना कोणीही वाली नाही, मुलांनी टाकून दिलेले असेच लोक वृद्धाश्रमात राहतात, असा समज आज आपल्याकडं पाहायला मिळतो. पण एकट्यानं राहण्यापेक्षा माझ्या वयाच्या लोकांबरोबर राहतो/राहते, म्हणून स्वतःहून वृद्धाश्रमात येऊन राहणारेही आहेत. सध्याच्या काळात कोणत्याही वृद्धानं घरात एकटं राहणं सोपं नाही. त्यापेक्षा समवयस्क, समविचारी लोकांमध्ये राहिलेलं काय वाईट, असा विचार करून वृद्ध स्वतःला वृद्धाश्रमात भरती करतात. ज्या-ज्या आजी-आजोबांशी संवाद साधला, त्या प्रत्येकानं हेच सांगितलं, ‘वेळेवर खायला मिळतं, काळजी घेणारी माणसं २४ तास असतात.’ घरातली भांडणं असोत, असह्य होणारा एकटेपणा असो किंवा वेळेवर जेवायला मिळत नाही हे कारण असो... वृद्धाश्रम हाच आता अनेक वृद्धांचा आधार होऊ लागला आहे.


आमचा इथला दिनक्रम ठरलेला आहे. इथं सगळं चांगलं आहे. जेवण, चहा या गोष्टी वेळेवर मिळतात. शिवाय परिसरसुद्धा छान आहे. ओपीडी चांगली आहे. माझी मुलगी आणि एक मुलगा पुण्यात असतो. तिसरा मुलगा मुंबईला. इथं घरच्यासारखं नसेल, पण गैरसोयही होत नाही. मी गेली १२ वर्षं इथं राहते आहे. इथं खूप वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटली. घरात राहून कळले नसते, एवढे स्वभाव इथं कळले. माझ्या मते, सध्याच्या काळात कोणत्याही वृद्धानं घरात एकट्यानं राहणं चांगलं नाही. मला टेंशन-फ्री आयुष्य जगायचं होतं. संसारातून निवृत्ती हवी होती म्हणून मी इथं आले. आपली मुलांच्या संसारात लुडबूड कशाला? घरात राहिलं, की नाही म्हटलं तरी मुलांच्या अपेक्षा असतात, जबाबदाऱ्या असतात. ते नको होतं.’ उत्तरा पोतदार (वय ८०) म्हणाल्या.

ओंकार आजी म्हणाल्या, मला माझी माणसं नव्हती. मी इथं आले तेव्हा मला बरं नव्हतं. इथल्या लोकांनी माझी सेवा केली. इथं घरची आठवणसुद्धा येत नाही, इतकं सगळं छान आहे. इथलं वातावरण छान आहे. जेवण छान असतं. सगळे प्रेमानं सेवा करतात, चौकशी करतात. भाची महिन्यातून एकदा भेटायला येते. इथं यायच्या आधी मी तिच्याकडंच होते. पण तिला तिचा प्रपंच आहे. मी इथं आनंदात आहे.’ 

मी दीड महिन्यापूर्वीच इकडं राहायला आले. माझं पाठीचं ऑपरेशन झालंय. घरातले सगळे गावाला जाणार होते, म्हणून तात्पुरती सोय म्हणून मला इथं ठेवलं. पण मी आता इकडंच राहायचं ठरवलं आहे. मुलगा महाराष्ट्र बॅंकेत आहे, सून शाळेत शिक्षिका आहे आणि नात माँटेसरीमध्ये आहे. त्यामुळं घरात कोणीच नसतं. मला इथं आवडलंय. सगळे आपुलकीनं करतात. खाणं-पिणं व्यवस्थित मिळतं. डॉक्‍टर चांगले आहेत. मला जरा कोणी विचारलं तर मी त्यांना इथंच राहा, असं सांगणार आहे, सुलभा गोडबोले (वय ८९) सांगत होत्या.

संबंधित बातम्या