त्यांना हवा आधार!
कव्हर स्टोरी
नोकरी, उच्चशिक्षणानिमित्त मुले परदेशी जातात आणि तिथेच स्थायिक होतात. त्यांच्या भारतात राहिलेल्या पालकांच्या व्यथा वेगळ्याच आहेत. पण, दरवेळी मुलांचीच चूक असते असेही नाही. अशा वेळी ज्येष्ठांनाही सन्मानाने जगता यावे आणि त्यांच्यामध्ये दुर्लक्षित असल्याची भावना येऊ नये यासाठी भारतीय जेरियाट्रिक सोसायटीचे सचिव डॉ. संजय बजाज यांनी आठ कलमी आचार संहिता ठरवून दिली आहे. दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची गरज वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही वृद्धाश्रमांमधील वृद्धांचे अनुभवही सोबत दिले आहेत.
एक : अंगात सुट घातलेला साठीतील व्यक्ती कधी नागपूरच्या रेल्वेस्थानकावर, तर कधी विमानतळावर आलटून पालटून जातो. त्याची तीक्ष्ण नजर भ्रमिष्टासारखी काहीतरी शोधत असते. आज नाही तर उद्या येईल लेकरू, या प्रतीक्षेत २० वर्षे लोटून गेली. पत्नी सोडून गेली. आता जगणेच कठीण झाले, म्हणून दररोज साठीतील ‘बापा’चे डोळे आशेने बघत आहेत. परंतु, विदेशात असलेली त्यांची दोन्ही लेकरे आलीच नाहीत.
दोन : लेकाने लंडनमध्ये घर घेतल्याने गगनात मावेनासा आनंद त्या वृद्ध मात्यापित्याला झाला. मुलाच्या एका शब्दावर कधीकाळी बॅंकेत मॅनेजर असलेल्या बापाने नागपुरातील घर दोन कोटीला विकून सारे पैसे लेकाला लंडनमध्ये घर घेण्यासाठी दिले. परंतु, लेकाने दोन कोटी घेतले आणि पुढील खेपेस आईबाबांना घेऊन जाण्याचे स्वप्न देऊन गेला. या दुःखी पालकांसाठी ते दिवास्वप्न ठरले. आता जगण्यासाठी भाजीपाला विकत असल्याची माहिती आहे.
...अशी एक नव्हे तर शेकडो, नाही हजारो, नव्हे तर यापेक्षाही कितीतरी जास्त अनिवासी भारतीय मुलांच्या पालकांच्या दुःखाने माखलेल्या कथा आहेत. अनिवासी भारतीय मुलांकडून त्यांच्या पालकांना मिळत असलेल्या यातनांच्या कथा आहेत. ज्या पालकांनी मुलांना घडवले, त्या पालकांना या अनिवासी भारतीय मुलांनी पंढरीची यात्रा नव्हे, तर यातनांची यात्रा त्यांच्या भविष्यात लिहून ठेवली आहे. करिअरच्या नवनवीन संधी मिळवण्यासाठी देशाबाहेर जाणे अनेकदा अनेक तरुणांसाठी अपरिहार्य ठरते. आईवडील लेकरू उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहे म्हणून आनंदी असतात. परंतु, पुढे परदेशात करिअर करण्याची शिकस्त, तिथल्या राहणीमानाशी जुळवून घेणे अशी अनेक आव्हाने तरुण मुलांनी पेलवल्यानंतर ते तेथीलच रहिवासी होतात... आणि मनात कुठेतरी घरी एकट्या असलेल्या आई-वडिलांची काळजीसुद्धा करत नाहीत. मनात असूनही ते परदेशातील संस्कृतीच्या कुशीतून भारतीय पालकांच्या कुशीत विसावण्याच्या कल्पनेपासून दुरावत जातात. अशा अनिवासी भारतीय मुलामुलींच्या पालकांसाठी मदतीचा आरोग्यदायी हात देण्यासाठी भारतीय जेरियाट्रिक सोसायटीची स्थापना नागपुरात झाली आहे. ही संस्था ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी सक्रिय आणि वेगवान होताना दिसत आहे.
उच्चशिक्षणासाठी तसेच नोकरीनिमित्त ज्यांची मुले परदेशात जातात, अशा मुलांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी तसेच निरनिराळ्या कारणांमुळे परावलंबी असलेल्या आजी-आजोबांना मदतीचा आरोग्यदायी हात देऊन त्यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी ही संस्था दोन दशकांपासून काम करत आहे. उतार वयात ज्येष्ठांना भेडसावणारे मानसिक प्रश्न, मनात डोकावणारे नकारात्मक विचार, ताणतणाव, नात्यांमधील वाढते अंतर, एकटेपणा तसेच त्यांचे आजारपण यांसारख्या समस्यांचे गांभीर्य दिवसेंदिवस व्यापक रूप धारण करत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांना डोळसपणे पाहणे आणि त्यांच्यावर मलमपट्टी करण्याचे काम डॉ. संजय बजाज आणि त्यांचे सहकारी भारतीय जेरियाट्रिक सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. एस. राजन मिळून करीत आहेत.
साधारण १९९५ पूर्वीचा काळ आणि परिस्थिती वेगळी होती. तेव्हा इंटरनेट नव्हते. इंटरनॅशनल कॉल महाग असायचे. तुम्ही कसे आहात? आम्ही ठीक आहोत. यापलीकडे संवाद होत नसे. उर्वरित सारा मजकूर पत्रातून सुरू राहायचा. पुढे तोही बंद पडतो. नंतर मुलांना आपले आईबाबा भारतात आहेत या आई-वडिलांप्रति असलेल्या भावनिक नात्याचे कधी विस्मरण होते हे कळतही नाही. मात्र, या परदेशातील मुलांनी समजून घ्यावे यासाठी संस्थेने एक आचारसंहिता तयार केली आहे. अलीकडचा काळ इंटरनेटचा आहे. मुले व्हॉट्सॲपवरून पालकांशी संवाद साधू शकतात. समस्या त्वरित व योग्यरीतीने सोडविल्या जाऊ शकतात. व्हिडिओ कॉलवरून थेट संवाद साधता येतात. परंतु, मुलांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण झाल्यामुळे मुले पळवाटा काढतात.
डॉ. संजय बजाज यांनी ठरवून दिलेली आठ कलमी आचारसंहिता
- अनिवासी भारतीय मुलांनी भारतातील त्यांच्या पालकांची काळजी घेणाऱ्या शेजाऱ्यांशी चांगले वर्तन ठेवावे. आजारी असलेल्या पालकांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक तसेच आवश्यक मदतीसाठी सदैव उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- भारतभेटीत मुलांनी पालकांवर उपचार करणाऱ्या प्रत्येक डॉक्टर्सची भेट घेणे आवश्यक आहे. अनिवासी समुदाय अमेरिकेत राहण्याच्या नावाखाली पालकांच्या उपचार करणाऱ्या डॉक्टर्सकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. बहुतांश अनिवासी भारतीय मुले दुटप्पी भूमिका घेत भेट टाळतात.
- मुलांनी आपल्या मिळकतीतील किमान १० टक्के रक्कम पालकांना पाठविणे आवश्यक आहे. एकेकाळी हेच पालक आपल्या अनिवासी मुलांच्या कल्याणासाठी कर्जबाजारी झालेले असतात. त्यांचे आयुष्य खर्ची घातलेले असते. मुले मात्र त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. भारतात आजच्या घडीला अशा प्रकारची लाखो उदाहरणे पाहायला मिळतात. अनेकवेळा अशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होतात.
- भारत सरकार आणि अमेरिका सरकारसह इतर विकसित देशांनी अशा पालकांकडे लक्ष ठेवण्यासाठी आर्थिक ताळेबंद राखणे आवश्यक आहे. अनिवासी भारतीय मुलांना जाब विचारायला हवा. व्हिसा प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण करताना पालक व भारतातील संबंधित एजन्सीकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मागावे. हे दोन देशांच्या सरकारमध्ये कराराप्रमाणे होणे गरजेचे आहे.
- या करारानुसार पालकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास या मुलांची चौकशी करून ते दोषी आढळून आल्यास त्यांना भारतात हद्दपार करण्यासोबतच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच त्यांची सर्व संपत्ती पालकांच्या कल्याण निधीला दिली पाहिजे.
- पालकांकडे दुर्लक्ष करण्याच्या आरोपाखाली पोलिसांत तक्रार नोंदविण्याची सोय याच करारानुसार करण्यात यावी.
- तक्रारीची प्रत भारतीय दूतावास व व्हिसा विभागांसह मुलगा, पत्नी व आपल्या मुलांसोबत राहात असलेल्या देशात देण्यात यावी. अनिवासी मुलांना त्यांच्या पाल्यांसाठी ज्यावेळी मदतीची गरज असते. त्यावेळी भारतात राहणाऱ्या आपल्या आईवडिलांची आठवण होते. अशा प्रकरणात मुलांसह त्यांची पत्नीही तितकीच दोषी असते.
- भारतातील गेल्या तीन दशकांत ज्येष्ठांचा अभ्यासक म्हणून हे निरीक्षण आहे. ही केवळ सुरुवात आहे. अनिवासी मुलांच्या नियमावलीत अर्थात आचारसंहितेत इतरही अनेक बाबींचा समावेश करता येईल. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या ज्वलंत समस्येचा आकडेवारीसह अभ्यास करणे आवश्यक आहे. विकसनशील देशांमधून विकसित देशांमध्ये जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत हे सातत्याने घडत आहे.
भारतीय जेरियाट्रिक सोसायटीचे सचिव डॉ. संजय बजाज यांच्या मते जगभरात सुमारे एक कोटीपेक्षा अधिक अनिवासी भारतीय आहेत. त्यामुळे यातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त अनिवासी भारतीय मुलांच्या पालकांची समस्या सारखीच आहे. सारे एकाच नौकेचे प्रवासी आहेत. परदेशी स्थायिक झालेल्या मुले-नातवंडांपासून दुरावलेल्या या पालकांचे दुःख दूर करण्यासाठी, त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर फुंकर घालण्यासाठी भारतीय जेरियाट्रिक सोसायटीने दहा कलमी कार्यक्रम तयार करून त्यांची अंमलबजावणी करत ज्येष्ठांना सन्मानाने जगण्यासाठी ही आचारसंहिता तयार केली आहे. अनिवासी भारतीय पालकांना सन्मानाने जगवण्यासाठी भारत सरकार आणि अमेरिका तसेच इतरही विकसित देशांत जिथे मुले आहेत, तेथील सरकारने या मुलांना नोकरी देतानाच पालकांच्या समस्या सोडण्यासंदर्भातील विश्वास नव्हे, तर हमी घेतली पाहिजे. पैसा उपलब्ध करून देण्यापासून समस्या सोडविण्याचा त्यांच्यातील संवाद नियमित व्हावा हाच या मागचा उद्देश आहे. असे झाले तर अनिवासी भारतीय पालकांच्या आयुष्यात असलेली भयाण शांतता दूर होईल.
हे चित्र हरवले
तीस वर्षांपूर्वी घरोघरी एकत्र कुटुंब पद्धत होती. कुटुंबातली सगळी माणसे पिढ्यान्पिढ्या एकाच ठिकाणी आणि सगळे मिळून राहात असत. जेवणाच्या वेळी पंगत बसत असे. नातवंडे जन्मल्यापासून आजीआजोबांच्या अंगाखांद्यावर खेळतच मोठी होत असत. त्यांच्या दरम्यान एक घट्ट नाते निर्माण होत असे. वयस्क झालेले आजीआजोबा प्रपंचाचा भार पुढल्या पिढीवर सोपवून आपला वेळ नातवंडांना खेळवण्यात घालवत असत. यामुळे नातवंडांनादेखील आजीआजोबांचा चांगला लळा लागत असे. मात्र, आजकालच्या आजीआजोबांची मुले गेली बरीच वर्षे परदेशात राहतात. तिकडेच स्थायिक झाली आहेत. अशा आजीआजोबांची नातवंडे तिकडेच लहानाची मोठी होत असतात. परदेशात आपल्या मुलांकडे जाऊन त्यांना भेटता येत नाही. गतवर्षी अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या मुलांची संख्या एक लाख ३९ हजार होती. यातील ८० टक्के मुले पुढे अनिवासी भारतीय होण्यात रस घेतात. असे विदारक चित्र आजच्या घडीला आहे.
- विजय अग्रवाल,
अनिवासी भारतीय मुलींचे पालक, नागपूर.