...बाहर तो वसंत आ चुका है!

प्रवीण टोकेकर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

सरतं वर्षं किंचित मागं वळून बघायला हवं. किंचितच, कारण मागं बघण्यासारखं या वर्षात काही घडलंच नाही. रस, स्वाद, रूप, गंध आणि स्पर्शानं आपल्याला काय काय दिलंय, याची जाणीवच नव्हती इतकी वर्षं. गेल्या वर्षात हे पाचही मित्र दुरावले. जीवनरस आटून गेला. जगण्याची चव गेली... पण हा जगण्यातला अर्धविराम होता. आता पुन्हा लगोऱ्या मांडायला हव्यात....

ऐ खुदा, रेत के सहरा को समंदर कर दे...
या छलकती हुई इन आंखो को पत्थर कर दे...

 

- शाहीद मीर

नको देवराया, अंत आता पाहू. प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. संपू दे एकदाचं हे नष्टचर्य. उरकून टाक ते अनिष्ट ग्रहण. जीवनाच्या दिव्याला धरलेली ही काजळी झटकून टाक. लख्ख प्रकाश पडू दे. पाण्याचा टिपूसही कुशीत सामावून न घेणाऱ्या या रेताड, निर्जीव मरुभूमीचे रूपांतर अथांग समुद्रात कर. जिथं निवडुंगाचे फड माजले, तिथं जीवसृष्टीचा पाळणा पुन्हा हलू दे.

हे तूच करू शकतोस... हो ना? की विसरलास तुझा इल्लम?

नसेल जमत तर तसं सांग, देवराया... आणि या ओलावलेल्या डोळ्यांच्या एकदाच्या खाचा करून टाक. कर्मदारद्र्याचे पोपडे उडालेल्या भिंती पाहण्यापेक्षा तो काळोखच बरा.
एवढं कर.

पुन्हा सारं काही सुरू होऊ दे. शिशिरातल्या पानगळीमुळे उघडी बोडकी झालेली ही झाडंझुडं पुन्हा बहरू देत. त्यांना पुन्हा एकवार अस्तित्वाचे अंकुर फुटू देत.
पुन्हा एकदा वसंताचा रथ दौडत चराचरात येऊ दे. पुन्हा एकदा गंधांचे कोष उलगड. उधळू देत रंगगंधांचे लोटच्या लोट. क्षितिजावर रंगांची आरास सजव. या मलूल पडलेल्या भूमीवर जीवनरस पुन्हा एकवार खळखळून वाहू दे. स्वादाची रुचकर दुनिया उघड. चवीढवींचा खजिना रिता कर. स्पर्शाची ताकद कळू दे पुन्हा साऱ्यांना. 

मित्राचा खांद्यावरला हात. सखीचा उष्ण तळहात. लहानग्याच्या जावळाचा असोशीचा स्पर्श. वृद्ध मायेच्या सुरकुतलेल्या आणि थरथरणाऱ्या हाताचा आधारस्पर्श. पिकलेल्या बापाने पांघरूण घालताना संकोचानं पोराच्या डोक्यावरून फिरवलेला हात. आप्तांची गळामिठी... या साऱ्या स्पर्शखजिन्याला मुकलेल्या माणसाला थोडातरी आधार दे. उभारी दे.

अगदी मुस्कटात मारताना होणाराही स्पर्श सर आंखोपर... पण तो आमच्या वाट्याला येऊ दे.

अरे ईश्वरा, या मरुभूमित पुन्हा वाहू दे सागर साचा
अथवा माझी नजर मरु दे, व्हाव्या नेत्रांच्याही खाचा
***    
रणरणत्या उन्हात भुकेल्या पोटी पत्ता शोधत गल्लीबोळ हिंडताना रस्ताच चुकावा, आणि पोटातली भूकही मरून जावी, असं व्हावं. पत्ता सापडत नाही, पायपीट थांबत नाही, आणि भुकारलेलं पोटही काही बोलत नाही, असं व्हावं. तोंडाची चवच हरवून जावी, आणि कशाचीच वासना राहू नये, असं व्हावं.

असं मागणं कुणी मागितलं होतं? कुणाकडं? कशासाठी?

गेलं वर्ष तसंच गेलं. ते कुणी मागितलं नव्हतं. तरीही बोकांडी बसलं, आणि आता आणखी काही दिवसात तोंड काळं करेल. जा बाबा जा! एकदाचा टळ. यंदा भेटलास, पुन्हा येऊ नकोस.

रस्ता लांबचा आहे. पायपीट चालूच आहे. जीव थकला आहे. अजून बरंच चालायचं आहे. पण तरीही या वळणावर थोडं थांबावं. दम घ्यावा. गळ्याभोवतीचा घाम पुसावा. जवळ असलंच तर, थोडंसं घोटभर पाणी प्यावं. तेवढ्यापुरतं थांबून हे वर्ष सरता सरता किंचित मागे वळून बघायला हवं. किंचितच. जास्त मागे वळून बघण्याचं कारण नाही. बघायचं काय? रणरणता, कटलेला रस्ता. 

कटलेला रस्ता. कटलेलं वर्ष. याच वर्षांचं जल्लोषात स्वागत केलं होतं. आकाशात रंगीबेरंगी फटाके फुटले होते. घंटानाद झाले होते. चषक एकमेकांना भिडले होते, हिंदकळले होते. फेसाळ उत्साहात वर्षाचं स्वागत झालं होतं. आलं, आणि सारा जीवनरस शोषून घेतला लेकाच्यानं. सरत्या वर्षा, तुला कुठल्या निवडक तीनशे पासष्ट शिव्या देऊ? 

गेल्या वर्षी याच सुमाराला तुझ्या स्वागतासाठी तयारी करत होतो, याची लाज वाटते आहे आज. असल्या अवलक्षणी वर्षाचं स्वागत  

आपण केलं. स्वत:च्या हातानं दुर्दैव बोलावून आणलं?

साथरोगाचा फेरा आला. गावगाडा उजाड झाला. पण तेवढ्यावर भागलं नाही. वादळं, चक्रीवादळं, मरणाचा पाऊस, गारपीट, महापूर... काही काही बाकी ठेवलं नाही. चहू बाजूंनी घेरलेल्या लोकजीवनाला वेठीला धरणारं हे वर्ष. आता टळतंय, हे चांगलंच.

अख्खंच्या अख्खं वर्ष कॅलेंडरातून रद्द करण्याची काही सोय असते का? बारा महिन्यांची बारा पानं एकदम टरकावून टाकायची. एकदम क्यान्सल! फुली मारून वर्ष टळतं? नाही हो. नाही टळत. ते भोगायचंच असतं. भागवायचंच असतं. मगच ते टळतं. पंचांगातून संवत्सर रद्द करण्याची काहीही सोय नाही. 

नशिबी आलेलं दिवटं वर्षं दिवे लावून आता टळतंय, हे काय कमी आहे? जा बाबा, जा!

***
आज इथं वळणावर बसून दम खात मागे वळून पाहताना आठवताहेत ते निर्मनुष्य रस्ते. ओसाड वस्त्या. दरवाजाबंद घरं. शटरबंद दुकानं. सुनसान तिठ्यांवरचे पोलिसांचे जथे. काठ्या परजत चुकारांना शोधणारे पोलिस. काही खुर्चीत पेंगणारे पोलिस. वाहनं परत पाठवणारे रागीट पोलिस. जीपगाड्यांची वर्दळ. त्या संचारबंदीच्या जाहीर सूचना... बरंच काही.

...चिडिचूप खोलीत दुपारी गरगरणारा स्वमग्न पंखा. रिकामा दिवस. रिकाम्या रात्री. असह्य उकाडा. दिवसेंदिवस तळ गाठणारं बॅकेचं पासबुक. पगाराची चिंता मनात आणि दुपारी जिन्यात मजेत खेळणारी चिंतामुक्त बालसुलभ मुलं. त्यांना बिचाऱ्यांना ठाऊकच नव्हतं की बाहेर रस्त्यावर मृत्यू नावाचं काहीतरी सरकत सरकत चाललं आहे. थोडी हालचाल केली, तर सरकत सरकत आपल्या घराकडे येईल.

अधून मधून येणारे ते रस्त्यावरल्या अँब्युलन्सचे आवाज कानात भरून राहिले आहेत. अजूनही एखाद्या फितूर रात्री ते वाजतात. दचकून जाग येते. तेव्हाच्या निर्मनुष्य दिवसात अँब्युलन्सचा आवाज ऐकून छातीत धडधडायचं. कोण गेलं? कोण निघालंय? एक दिवस आपल्याही दारात येणार का हे वाहन? नखशिखांत झाकलेले ते कोविडयोद्धे. त्यांच्या त्या मर्यादित हालचाली. सगळं कसं भयपटातल्या धूसर दृश्यांसारखं मनात घर करून बसलं आहे. अजूनही. कोपऱ्यात वेटोळं घालून बसलेल्या जित्राबासारखं.

...आपल्यालाच काही झालं तर? थोडा खोकला. थोडी सर्दी. थोडा ताप. मग नाकात काडी. पॉझिटिव्ह. मग कोविड वॉर्ड. बिनचेहऱ्याच्या डॉक्टरमंडळींचे अस्पष्ट आवाज. ऑक्सिजन लेवल. बीपी. सीटीस्कॅन वगैरे. मग... मग सगळा अंधार.

...असे भयानक भयानक विचार.

सकाळी उठून मोबाइल फोन चालू करताना काळजात लकलक  व्हायची. ‘अमका अमका गेला किंवा गेले किंवा गेल्या. गेले तीन दिवस कोविड इस्पितळात होता किंवा होते किंवा होत्या. ऑक्सिजन लेवल घसरली, वगैरे... काळीज चरचरत यायचे हे निरोप, आणि चरचरतच जायचे.

ये जीना भी कोई जीना है लल्लू?

जगण्याचा हुरूपच निघून गेला. महिनोन्महिने कुणाची तोंडं पाहाणं नाही. साधं एकमेकांना टाळी देणं नाही. हॉटेलात जेवायला गेलं तर समोरच्या दोस्तानं टाकून दिलेली नळी ‘टाकतोस काय माजोरड्यासारखा’ असं ऐकवत आपल्या ताटात ओढून घेणं नाही. मिसळीबरोबर शेवटचा पाव अर्धा-अर्धा तोडून दोस्तांनी वाटून खाणं नाही. कटिंगचे ते छोटे ग्लास तर बरेच महिने दिसलेसुद्धा नाहीत.

नेहमीचा पानवाला टपरी बंद करून जो गावाला गेला, तो पुन्हा आलाच नाही. राहिला बहुधा बिहारमध्येच. आता नवा पानवाला शोधणं आलं. नवं वर्ष. नवी पानाची गादी. नवा पानवाला.

सकाळी थोडावेळ भाजीवाले उभे राहायचे. डाळतांदुळाची सोय करणारा किराणावाला आणि दिवसरात्र उघडा असलेला हमरस्त्यावरचा मेडिकलवाला सोडला तर सगळं चिडिचूप बंद होतं. मास्कची सवय होता होत नव्हती. चष्म्यावर वाफ धरली की वैताग यायचा. चालताना छातीत दम कोंडल्यागत व्हायचं. पण...
***

रस, स्वाद, रूप, गंध आणि स्पर्शानं आपल्याला काय काय दिलंय, याची जाणीवच नव्हती इतकी वर्षं. गेल्या वर्षात हे पाचही मित्र दुरावले. जीवनरस आटून गेला. जगण्याची चव गेली. महिनोन्महिने घरात कोंडलेलं जीवित आपलं रूप हरवून बसलं. निरनिराळे कितीतरी गंध नाकाशी रुंजी घालायचे. तेही हरवले. स्पर्शाला तर अगदीच पारखे झालो. 

आजही कुणी रस्त्यात भेटलं तर लांबूनच नमस्कार घडतो. मास्कच्या आडून लांबूनच बोलायचं. मित्राच्या कडेवर चिमुकला असेल तर त्याचा साधा गालगुच्चा नाही घेता येत. टप्पल नाही मारता येत. मित्राच्या पाठीवर साधी थाप मारणं दुष्कर झालं. हळूहळू जीवनमान थोडं रुळावर येतंय, हे खरं आहे. पण मनातली भीती काही पुरती गेलेली नाही. तोंडावरचा मास्क थोडा खाली सरकू लागला आहे, पण तो अजूनही आहेच. आपलं माणूस भेटलं की गेल्या वर्षीपर्यंत खिशातून चंची किंवा पुडी बाहेर यायची. आता सॅनिटायझरची चिमुकली बाटली येते!

एकाच इयरफोनवर दोघांनी मोबाईलमधली गाणी ऐकण्यातली मजाच हरवली. एक बोंडुक तुझ्या कानात, एक माझ्या. पण मग सोशल डिस्टन्सिंगचं काय? चिमणीच्या दातानं चॉकलेट तोडण्यातला निरागसपणा निघून गेला. गोबऱ्या गोबऱ्या गालांचा मट्टदिशी मुका घेण्यातला मायाळपणा विरून गेला. 

गंधांची केवढी तरी दुनिया आसपास होती. गल्लीच्या तोंडाशी भज्यांचा घाणा तळत बसलेल्या भय्यानं चर्रर्रदिशी पाण्याचा शिपकारा मारला की जीभ खवळून उठायची. मॉलमध्ये फूडकोर्टात गेल्यावर तर जीभ आणि नाक खलास व्हायचं. पण तेच बंद झालं. पॉपकॉर्नचा तो खमंग दर्वळ आजही दुरापास्त आहे. कधी मिळेल हातात तो पॉपकॉर्नचा भलादांडगा आणि महागामोलाचा वाडगा? काही अंदाज? पॉपकॉर्नचा किंगसाइज वाडगा महागडा होता, पण त्याला एक शहरी ऐट होती. मस्तीत जगण्याचा रुबाब होता. तोच फोलपटासारखा उडाला. पुन्हा पॉपकॉर्न मिळेल? रेग्युलर साइजसुद्धा चालेल. 

लॉकडाउनच्या घरकोंडीची हळूहळू अशी आदत झाली की दाढी करणं सोडूनच दिलं. आता ‘गुलाब हेअर ड्रेसर्स’ चालू झालंय, पण कोण जायला बसलंय? इतकी काय घाई आहे? आणि गुळगुळीत दाढी करून जायचं कुठे? विंदा करंदीकरांच्या सुप्रसिद्ध कवितेतल्या त्या ‘हल्ली हल्ली फुलू लागलेल्या शेजारील सान्यांच्या पोरी’ही हल्ली पार्लरमध्ये जायला काचकूच करतात. अजूनही धोका टळलेला नाही. कशाला उगीच विषाची परीक्षा? राहू देत.

आत्ता आठवलं, गेल्या कैक युगात नाटकाला गेलो नाही. सिनेमाला नाही. गणपती उत्सवात उभ्या उभ्या कुणाचं गाणं ऐकलं नाही. कुणाच्या रिसेप्शनला जाणं नाही की साखरपुड्याच्या हॉटेली पार्टीतली हंसीमजाक अनुभवली नाही. जगण्याजोगं जे जे होतं, ते ते गायब झालं या घरकोंडीत. कित्येकदा वाटतं की गेला उडत तो लॉकडाउन. मस्त जाजमावर लोडाला टेकून पडावं, आणि गाणी ऐकावी. आसपास चांगले श्रोते. मनभावन मैफल जागवावी. पत्ते कुटावेत, काहीही करावं. पण जगावं.  

नाही म्हणायला यूट्यूबनं बरीच साथ केली. त्यामुळे काहीबाही ऐकून होत होतं. पण दुधावरची तहान ताकावर नव्हे, ‘आयुष काढ्या’वर भागवण्याचा प्रकार तो. आयुष काढा हा काही पर्याय असू शकतो अमृताला? छे.

रस-रूप-स्वाद-गंध-स्पर्शाची मिरास अशी संपून गेली. एका वर्षात होत्याचं नव्हतं झालं.

*** 
छे, छे, पण असं कसं चालेल? बिळातल्या उंदरासारखं जगण्यासाठी उत्क्रांती केली का आपण? अस्वल सहा महिने दीर्घ निद्रेत काढतं असं म्हणतात. कोण बघायला गेलंय? असेलही. आपण काही अस्वल नाही. चांगली मेंदूवाली दोन पायांची माणसं आहोत. मेंदूच्या जोरावर मंगळावर जायला निघालो आहो. इतकंच काय, जगाला वेठीला धरणाऱ्या त्या कुठल्याशा भयंकर विषाणूचा नायनाट करणारी लससुद्धा आपण शोधून काढली आहे. बिळात कशाला राहायचं. बिळात राहील, भालू आणि बेडकं... आपण नव्हे!

हा एक स्वल्पविराम होता, असं म्हणावं. एक दु:स्वप्न होतं, जाग आल्यावर स्मरणातूनही नष्ट होण्याच्या लायकीचं वाईट स्वप्न, असं म्हणावं. रडत कुढत बसायचं असतं तर माणूस कशाला झालो असतो?

जगण्याचा हा खेळ खेळता खेळता टाइमप्लीज म्हटलं होतं, म्हणून खेळ थांबला होता. आता पुन्हा लगोऱ्या मांडायला हव्यात.

***
माणसानं माणसागत जगावं. फुलझाडं लावावीत. प्रसंगी ती फुलं डोक्यात माळावीतसुद्धा.

माणसानं माणसागत जगावं. गाणं गुणगुणावं. प्रसंगी गिटारची तार छेडावीसुद्धा.

माणसानं माणसागत जगावं. दोन द्यावे, दोन घ्यावेतसुद्धा.

माणसानं माणसागत जगावं. खुशीला खिळू नये, संकटात संधी सोडू नयेसुद्धा.

माणसानं माणसागत जगावं. दाद द्यावी. दाद घ्यावीसुद्धा.

माणसानं माणसागत जगावं... आणि माणसागत मरावंसुद्धा.

रसरूपस्वादगंधस्पर्शाचं हे माणसाला लाभलेलं वरदान अबाधित राहो. कारण तोच आहे आपल्या इतिहासाचा सारांश, वर्तमानाचं सार आणि भविष्याचा अंश. 

मनाचा दुबळेपणा झटकावा, आणि जगण्याला पुन्हा एकवार भिडावं, हे खरं.

हळूहळू दारं किलकिली होत आहेत. भीड चेपू लागली आहे. माणसं घराबाहेर पडू लागली आहेत. बरड  माळरानावरचा खडक फोडून एक दिवस अचानक कोवळा अंकुर फुटावा, आणि निसर्गाच्या नकळत तिथं एक सोनसळी गवतफूल डोलू लागावं, तसं काहीतरी होईल.

सारं मळभ नष्ट होऊन स्वच्छ, मनमोकळा श्वास घेता येईल. तो दिवस दूर नाही. घरकोंडीचे दिवस आता संपत आले आहेत. संपलेच म्हणा. 

घरकोंडी मनात असते. बाहेर असतात ती फक्त दारं नि खिडक्या. एकदा तो भयाचा कोष फुटला की घडी घालून ठेवलेले नवेकोरे पंख वाऱ्यावर पसरतात. क्षितिज खुणावू लागतं.

ज्येष्ठ हिंदी कविवर्य रामदरश ‌मिश्र यांची एक सुंदर कविता आठवते आहे...

बंद खोलीत बसून कुठवर 

प्रतीक्षा करणार तुम्ही वसंत ऋतुची?

तुम्हाला अजूनही ठाऊक नाही, मित्रहो,

बाहेर वसंत केव्हाच फुललाय!

देखो मेरे मित्र, बाहर तो वसंत आ चुका है...

संबंधित बातम्या