अशी रंगवा मेंदी...

राजश्री बिनायकिया
सोमवार, 9 ऑगस्ट 2021

कव्हर स्टोरी

स्त्रीच्या सौंदर्य प्रसाधनेत मेंदी हा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. आयुष्यातल्या सर्वात तरल रंगीबेरंगी नाजूक क्षणांना अधिक खुलवणारी, आनंददायी करणारी मेंदी ही तिची सखी. मेंदीची नक्षी, तिचा हातावर चढलेला रंग याची नजाकत काही औरच आणि म्हणूनच मेंदीची परंपरा आजही टिकून आहे.

स्त्रीचे सौंदर्य अधिक अधिक खुलवणारी मेंदी हे एक सुंदर प्रसाधन आहे. हातांवर मेंदीची लालचुटूक नाजूक नक्षी पाहणाऱ्यांची नजर खिळवून ठेवते आणि तिचा गंध मनाला मोहवून टाकतो. एका नाजूक अशा झाडाची ही पाने. पण हात लावला आणि काय जादू झाली, तर हात लाल झाले! म्हणून ती खुडली गेली. हातावर चढलेला हा रंग शुभशकुनाचे प्रतीक मानले गेले, आणि तेव्हापासून मेंदीचा आणि स्त्रीचा संबंध कायमचा जोडला गेला.

नागपंचमीच्या सणाला खेड्यातील-शहरातील मुली आणि सुवासिनी मेंदीने विविध नक्षीकाम हातावर, पायावर करतात. लग्न सोहळा, मंगळागौर, करवा चौथ इत्यादी उत्सवांच्या साजशृंगाराला मेंदीशिवाय परिपूर्णता येत नाही. मेंदी हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

मेंदीची सुंदर नक्षी काढता येणे ही जशी एक कला आहे, तसेच मेंदी भिजवणे हीदेखील एक कला आहे. सर्व साहित्य योग्य प्रमाणात घेतले, तरच मेंदीचा रंग छान येतो. मेंदी कशी भिजवावी, मेंदीचा कोन कसा असावा, मेंदी रंगण्यासाठी काय करावे, यासाठी काही टिप्स...

     मेंदीचा उत्तम सुंदर शृंगार साधण्यासाठी मेंदी विकत घेण्यापासूनच काळजी घेतली पाहिजे. मेंदी विकत घेताना चांगल्या प्रतीची, व्यवस्थित रंगणारी घ्यावी. मेंदी पूड ताजी असावी. हिरव्या रंगाची मेंदी ताजी असते. खूप दिवसांची तपकिरी रंगाची मेंदी रंगत नाही.

     बाजारातून विकत आणलेली मेंदी सर्वप्रथम मलमलच्या कापडातून दोन वेळा चाळून घ्यावी. भांड्यावर हे कापड ताणून धरून त्यावर मेंदीची पूड टाकून बोटाने दाबून फिरवत वस्त्रगाळ करावी. मेंदी वस्त्रगाळ न केल्यास कचरा कोनाच्या छिद्रात अडकून मेंदी व्यवस्थित कोनातून बाहेर येत नाही.

     मेंदीची पूड गाळून झाल्यावर तिचे मिश्रण तयार करायला घ्यावे. 

मेंदीचे मिश्रण
     मेंदीचा एका कोनाचे मिश्रण तयार करण्यासाठी एक कप पाणी घ्यावे. त्यामध्ये एक टीस्पून कॉफी, एक टीस्पून चहा पावडर, दोन ते तीन लवंगा कुटून, थोडी चिंच, अर्धा टीस्पून कात टाकावी. मिश्रण उकळावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये अर्धे लिंबू पिळावे. हे मिश्रण गाळून घ्यावे. नंतर निलगिरीचे दहा ते बारा थेंब टाकावेत. नंतर त्या मिश्रणात मावेल इतकी वस्त्रगाळ केलेली मेंदी पूड घालावी व चांगले फेटावे. मेंदीचे मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त सैल असू नये. केकवरच्या क्रीमसारखा घट्टपणा असणारी पेस्ट तयार करावी. भिजवताना गुठळ्या होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

  • मेंदी दोन ते तीन तास अगोदर लोखंडी भांड्यात भिजवावी. नंतर कोनामध्ये भरावी.
  • मेंदीचा रंग अधिक खुलावा, अधिक गडद व्हावा यासाठी निलगिरी तेल, कात, कॉफी, चहा पूड, जास्वंदीच्या फुलांचा रस, चुना, ठेचलेली भेंडी, मंडुरची पावडर असे अनेक पदार्थ मेंदी भिजवताना वापरतात.
  • भिजवलेली मेंदी प्लॅस्टिक कोनच्या मदतीने काढतात. हा कोन घरी तयार करता येतो.
  •  

मेंदीचा कोन 

  • कोन करण्यासाठी स्वच्छ आणि जाड पॉलिथिन वापरावे. दुधाच्या पिशवीऐवजी बाजारात मिळणारे कोनाचे प्लॅस्टिक वापरावे.
  • १० सेंटिमीटर बाय १२ सेंटिमीटर आकाराचे प्लॅस्टिक घ्यावे.
  • त्रिकोणी आकारात दुमडून (शंकूचा आकार देऊन) सेलोटेपने कोन बंद करावा.
  • कोनामध्ये छोट्या चमच्याने मेंदी भरावी.
  • नंतर वरून दोन्ही बाजूने कोन दुमडावा.
  • कोन भरल्यानंतर वरील बाजूने गुंडाळी करून सेलोटेपने चिकटवावे. हा कोन तयार झाला.
  • कोन जास्त मोठा करू नये. कोन लहान असेल तर मेंदी काढणे सोपे होते.
  • कोन करताना शक्यतो कोनाच्या खालचे छिद्र बंद करू नये.
  • कोनातून मेंदी बाहेर येण्यासाठी कात्रीऐवजी सेफ्टी पिन किंवा सुईचा वापर करावा.
  • मेंदीचा कोन छिद्राजवळ न धरता थोड्या वरच्या बाजूला धरून तेथे हलका दाब द्यावा म्हणजे मेंदी खाली सरकेल.
  •  नक्षी काढण्यापूर्वी कोनात भरलेली मेंदी व्यवस्थित बाहेर येते आहे ना याची खात्री करण्यासाठी खराब कागदावर किंवा कपड्यावर रेषा काढून पाहाव्यात. 

मेंदीचा रंग खुलण्यासाठी

  • कोन तयार झाल्यावर मेंदी काढण्याअगोदर हात, पाय स्वच्छ धुऊन कोरडे करावेत. नंतर मेंदी काढावी. हाताला मेंदीचे तेल किंवा निलगिरी तेल लावावे.
  • मेंदीची नक्षी काढण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. प्रथम नक्षीतील मोठे मोठे भाग फक्त आऊटलाईनने (म्हणजेच पोकळ) काढून घ्यावेत. त्यांच्यात आवडेल ती नक्षी काढावी.
  • आधीच एक एक भाग पूर्ण करत गेले, तस समजा नक्षी थोडीफार बदलण्याची वेळ आली तर आधीची संपूर्ण मेहनत तर फुकट जातेच. शिवाय बारीक काम करण्यात वेळ जातो. तेवढ्या वेळात हातही रंगतो. त्यामुळे नक्षी बदलायला काहीच वाव उरत नाही. प्रथम मुख्य ढाचा आखून घ्यावा व त्यानंतर डिझाईनचे काम करावे. मग नक्षीचे रूप कसे खुलून येते पाहा.
  • मेंदी किमान पाच तास तरी हातावर राहू द्यावी. मेंदी काढताना त्यावर पाणी लागू नये याची काळजी घ्यावी, अन्यथा मेंदी गडद रंगण्याची शक्यता कमी असते.
  •  बारीक कलाकुसर केलेली हातावरील मेंदी लगेच सुकून गळून पडायला लागते. म्हणून मेंदी वाळल्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस व एक टीस्पून साखर यांचे मिश्रण चांगले मिक्स करावे. नंतर कापसाने वाळलेल्या मेंदीवर हळुवारपणे लावावे. त्यामुळे मेंदी अधिक वेळ चिकटून राहते. या मिश्रणाऐवजी चहाचे पाणी किंवा खोबरेल तेलही लावतात.
  •  मेंदी लवकर सुकावी म्हणून मुद्दाम हाताला उष्णता देऊ नये. नैसर्गिकरीत्या मेंदी सुकू द्यावी.
  • मेंदी सहा तासांपेक्षा हातावर जास्त वेळ ठेवू नये. मेंदी पाण्याने न धुता खोबरेल तेल, गोडे तेल लावावे व मेंदी चोळून काढावी.
  • मेंदीचा रंग गडद होण्यासाठी मेंदीवर बाम किंवा मोहरीचे तेल लावावे. हे पदार्थ उष्णता निर्माण करतात. यामुळे मेंदीचा रंग गडद होतो.
  • तवा तापवून त्यावर चार ते पाच लवंगा टाकून त्याची धुरीही हातावर घेऊ शकता, मेंदीचा रंग गडद होतो.
  • पुन्हा चार ते पाच तास मेंदीचा हात पाण्यात घालू नये.
  • मेंदी धुतल्यावर साबण, शाम्पू हाताला लावू नये.
  • मेंदी किती रंगेल हे प्रत्येकाच्या शरीराच्या उष्णतेवर अवलंबून असते, परंतु वरील सर्व गोष्टी पाळल्या तर आपली मेंदी नक्कीच रंगेल.

संबंधित बातम्या