मुलांनो, कोरोना समजून घ्या..

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 11 मे 2020

जबाबदार सुटी : आरोग्य संपदा
काही दिवसांपासून  रोज सोशल मीडिया, टीव्ही, न्यूजपेपर  सर्वत्र 'कोरोना विषाणू' या एकाच विषयावर चर्चा होताना दिसतात. एवढेच काय घरातील, आजूबाजूचे लोकही याच विषयावर बोलत असतात. घरातील लहान मुले या  चर्चा ऐकत असतात, मात्र  त्यांना नेमका अर्थ कळत नाही. त्यासाठीच  मुलांना समजेल अशी कोरोना विषाणूची माहिती...  

माझ्या बालमित्रांनो, गेले दोन महिने तुमच्या शाळांना सुटी आहे. यावर्षी तुमच्या वार्षिक परीक्षासुद्धा नाही झाल्या. कोरोना नावाचे संकट जगावर आले आहे म्हणून तुम्हाला घरीच थांबायला सांगितलेय. तुम्ही बाहेर मित्रांकडे जाऊन खेळायचे नाही, वाढदिवसाची पार्टी करायची नाही, असेही तुम्हाला सांगतायेत. कोरोना विषाणूच्या बातम्या तुम्ही वेगवेगळ्या टेलिव्हिजन चॅनेल्सवरून सतत ऐकताय. तुमचे आई-बाबासुद्धा गेले दीड महिना कामाला न जाता घरीच आहेत. त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या चर्चा, टेलिफोनवरून होणारे संवाद तुमच्या कानावर पडतायेत. हे सगळे ऐकून तुमच्या मनात काही प्रश्न नक्की निर्माण होत असतील. जगामध्ये काही तरी भयंकर चाललेय हे तुम्हाला समजतेय. कदाचित तुमच्यापैकी काही जणांना खूप घाबरूनही जायला होत असेल? हे सगळे नक्की काय आहे? हे कोरोनाचे काय प्रकरण आहे? हे आज आपण समजून घेऊया.  

व्हायरस म्हणजे काय?
कोरोना म्हणजे एक व्हायरस असतो, त्याला मराठीत विषाणू म्हणतात हे तुम्हाला आता ऐकून ऐकून पाठ झाले असेल. पण विषाणू किंवा व्हायरस म्हणजे काय असते? 

व्हायरस म्हणजे डोळ्यांनी न दिसणारा अगदी अतिसूक्ष्म असा एक पदार्थ असतो. हे व्हायरस सृष्टीच्या आरंभापासून अस्तित्वात असावेत असे म्हणतात. पण १८९२ मध्ये डिमिट्री इव्हानोव्स्की या रशियन वनस्पती शास्त्रज्ञाने तंबाखूच्या रोपांना कीड लागल्यावर, त्या रोपांच्या आतील रस निरोगी रोपांना लावला, तर ती कीड त्यांनाही लागते असे दाखवून दिले. त्यानंतर मार्टिनस बायजेरिंक या डच शास्त्रज्ञाने त्या किडीमधील एक पदार्थ शोधून काढला आणि त्याला 'व्हायरस' म्हणजे 'विषाणू' असे नाव दिले. १९३१ मध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागल्यावर त्यांचे अस्तित्व शास्त्रज्ञांना दिसून आले.

विषाणूंना पदार्थ अशासाठी म्हणायचे, की तो म्हटले तर निर्जीव असतो आणि म्हटले तर सजीव. निर्जीव अशासाठी की तो बाह्य वस्तूंवर आहे तशाच अवस्थेत महिनोनमहिने राहतो. पण एखाद्या सजीवात तो शिरला, की मग त्याची वाढ वेगाने व्हायला लागते. सजीव म्हणजे ती कधी वनस्पती असते, तर कधी प्राणी, म्हणजे अगदी मनुष्य प्राणीसुद्धा. मात्र या गुणधर्मामुळे या व्हायरसचे वनस्पतींचे व्हायरस, प्राण्यांचे व्हायरस आणि मनुष्यांचे व्हायरस असे प्रकार पडतात. माणसांना बाधित करणारे विषाणू आपल्या ठराविक संस्थेमध्ये शिरून त्यांच्यात संसर्ग निर्माण करतात. त्यावरून पुन्हा श्वसनसंस्थेचे विषाणू, मज्जासंस्थेचे विषाणू, त्वचेचे विषाणू, पचनसंस्थेचे विषाणू असे उपप्रकार पडतात.

विषाणूंच्या सुमारे दोन हजार प्रजाती आहेत. कोरोना ही एक प्रजाती शास्त्रज्ञांनी १९६५ 
मध्ये शोधून काढली. त्याची रचना काटेरी मुगुटासारखी असते, मुगुटाला लॅटिन भाषेत कोरोना म्हणतात. त्यामुळे या विषाणूंच्या प्रजातीला 'कोरोना' असे नाव दिले गेले. या प्रजातीमध्ये आजवर अनेक विषाणू आजवर शोधले गेले. हे सर्व मनुष्याच्या श्वसनसंस्थेला बाधित करतात. यामध्ये 222E, NL63, OC 43, HKU 1, सार्स, मर्स आणि आजचा कोव्हिड-१९ हे विषाणू येतात.
सध्या जो कोरोना विषाणू जगभरात पसरला आहे, याला शास्त्रज्ञांनी COVID-19 असे वैज्ञानिक नाव दिले आहे. २०१९ मध्ये चीनच्या वुहान प्रांतात अचानक खूप व्यक्ती आजारी पडल्या. त्यांच्या संशोधनात हा विषाणू सापडला.

लक्षणे
कोरोना विषाणू माणसाच्या शरीरात श्वासावाटे पसरतो. तो नाक, घसा, श्वासनलिका, श्वासवाहिन्या यांमधून प्रवास करत फुप्फुसांत पोचतो. तो माणसाच्या शरीरात गेल्यावर या अवयवांच्या पेशींमध्ये शिरतो आणि तिथे त्यांची वेगाने आणि खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते. या सर्व अवयवांवर असलेल्या आवरणांना सूज येते. त्यामुळे त्या व्यक्तीला... 

  •      सर्दी.
  •      घसा खवखवणे आणि खूप दुखणे.
  •      खूप कडक आणि लवकर न उतरणारा ताप येणे.
  •      खोकला येणे.
  •      दम लागणे.

अशी लक्षणे दिसू लागतात.

कसा पसरतो?
 कोरोना या व्हायरसचे वैशिष्ट्य म्हणजे हा एका माणसाकडून दुसऱ्याकडे वेगाने पसरतो. या प्रसाराचे फक्त तीन प्रकार असतात. 

  • कोरोनाचा रुग्ण खोकल्यावर त्याच्या तोंडातून, घशातून तुषार बाहेर पडतात. या तुषारांच्या प्रत्येक थेंबामध्ये कोरोनाचे अमर्याद विषाणू असतात. या तुषारांचा फवारा रुग्णापासून तीन फूट अंतरापर्यंत उडतो. आता समजा, की हे तुषार हवेत असताना एक निरोगी व्यक्ती रुग्णापासून तीन फुटांच्या आत उभी आहे. अशा वेळी काय होणार? ते तुषार आणि त्यातले असंख्य विषाणू त्या निरोगी व्यक्तीच्या श्वासातून त्याच्या नाका-तोंडात जाणार आणि तिथून घशात आणि त्यापुढे श्वासमार्गात जाणार. असे झाले की त्या निरोगी व्यक्तीला कोरोनाची लागण होते.
  • दुसऱ्या प्रकारात, कोरोनाने बाधित रुग्ण खोकल्यावर उडणारे तुषार आणि त्यामधले विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात. म्हणजे टेबल, खुर्ची, कपाट, दरवाजा, फरशी असे जे काही त्या रुग्णापासून तीन फुटांपर्यंत असेल त्या वस्तूवर पडणार. त्यानंतर जर एखाद्या निरोगी व्यक्तीचा हात त्या वस्तूंना लागला, की त्याच्या हातांना त्या वस्तूंवरचे विषाणू चिकटणार आणि जर हा हात त्या निरोगी व्यक्तीने आपल्या नाकातोंडाला लावला की, त्याच्या शरीरात पसरणार.
  • आता लक्षात घ्या, त्या दुसऱ्या व्यक्तीच्या हाताला कोरोनाचे विषाणू लागलेले आहेत. मग ती व्यक्ती आपले हात जिथे जिथे आणि ज्या वस्तूंना आपल्या हातांनी स्पर्श करते, त्या त्या वस्तूंना ते विषाणू जाऊन चिकटतात... आणि मग त्या वस्तूंना जेव्हा इतर व्यक्ती हात लावतात, त्यांच्या हातांना ते विषाणू चिकटतात आणि विषाणूंचा संसर्ग करण्याचा प्रवास सुरू होतो.

टाळण्याचे उपाय
कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो हे ध्यानात आल्यावर त्याच्यापासून आपला बचाव कसा करायचा हे तुमच्या लक्षात आपोआपच येईल.

कोरोनाच्या रुग्णाच्या खोकल्यातील तुषार तीन फुटांपर्यंत उडतात. म्हणून बाहेर गेल्यावर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीपासून आपण तीन फूट अंतरावर उभे राहायचे असते. यालाच सोशल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग म्हणतात. शाळेत मुले दाटीवाटीने बसतात, खेळताना जवळ जातात, मस्ती करतात. म्हणून या आजाराच्या साथीत तुम्हाला संसर्ग होऊ नये म्हणून शाळा, कॉलेजेस बंद ठेवली आहेत. चित्रपटगृहे, समारंभ, मॉल्स, बसेस, रेल्वे, लोकल्स, विमाने, बागा, मैदाने, ऑफिसेस, कारखाने यामध्ये लोक एकमेकांजवळ बसतात, गर्दी करतात आणि तीन फुटांचे अंतर ठेवले जात नाही. म्हणून या साथीमध्ये या सर्व गोष्टी बंद ठेवल्या आहेत. याच कारणासाठी आपली क्रिकेटची आयपीएल आणि ऑलिंपिक स्पर्धासुद्धा पुढे ढकलली आहे. ऑफिसेस आणि कारखाने बंद ठेवल्यामुळे तुमचे आई-बाबा घरीच थांबले आहेत. काही जणांचे पालक घरूनच संगणकांवर काम करत आहेत.

या सगळ्या गोष्टी बंद ठेवल्या, तरी लोक बाहेर फिरतात, त्यातून आजाराचा प्रसार होतो. त्यामुळे सक्तीने सगळे बंद ठेवावे लागते. त्यासाठी आधी जमावबंदी म्हणजे कर्फ्यू जाहीर केला गेला. हा आजार सर्व भारतभरात पसरायला लागला म्हणून सक्तीचे सोशल डिस्टन्सिंग करण्यासाठी सर्व भारतभरात लॉकआऊट जाहीर केला. लॉकआऊट म्हणजे घराला बाहेरून टाळे लावल्यासारखे आपण घरात बसायचे. बाहेर पडायचे नाही. आता आले ना लक्षात तुम्हाला घरात कोंडल्यासारखे का बसवलेय?

कोरोनाचा रुग्ण खोकला की त्यातले तुषार आपल्या नाकातोंडात जातात, म्हणून तुमचे आई-बाबा किराणामाल आणायला किंवा भाजीपाला आणायला बाहेर जातात, तेव्हा कापडाचा मास्क तोंडावर लावतात. हा मास्क नाक आणि तोंडावर घट्ट बांधायचा असतो, म्हणजे बाजूच्या फटीतून तुषार अंगावर येत नाहीत आणि बाहेर कदाचित त्यावर कुणी खोकले आणि त्यातून विषाणू मास्कवर पडले असतील, तर ते निघून जावेत म्हणून मास्क रोजच्या रोज धुवायला टाकायचा असतो. कदाचित कोरोनाची ही साथ आटोक्यात आल्यावर तुमच्या शाळा सुरू झाल्या, तर तुम्हालाही असे कापडी मास्क घालून शाळेत जावे लागेल आणि तीन फुटांचे अंतर ठेवून वर्गात बसावे लागेल.

कोरोनाचे जंतू हाताला लागून तोंडात जातात. त्यामुळे या साथीत कारण नसताना नाकाला, तोंडाला आणि डोळ्यांना हात लावू नये आणि जेवण्यापूर्वी किंवा चेहऱ्याला कुठेही हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायचे असतात. हात धुवायला साधा साबण किंवा सॅनिटायझर वापरावा. साबणाने हात धुताना 
१)     हातावर पाणी घेऊन हातांना साबण चोळावा, साबणाचा फेस करावा.
२)     मग प्रथम दोन्ही तळहात, मग दोन्ही हातांची बाहेरील बाजू एकमेकांवर चोळावी.
३)     नंतर बोटे बोटांमधल्या बेचक्यांत घालून बेचक्या घासाव्यात.
४)    त्यानंतर पाची बोटांची टोके तळहातावर चोळावीत.
५)    शेवटी दोन्ही हातांची मनगटे साबणाच्या फेसाने चोळून घ्यावीत.
६)    त्यानंतर नळाच्या प्रवाहाने हात सर्व बाजूंनी स्वच्छ धुवावेत. 
७)    शेवटी स्वच्छ पंचाने किंवा टिशू पेपरने हात कोरडे करावेत. 

हात स्वच्छ करण्याचे हे तंत्र तुम्ही शिकून घ्या. या गोष्टीला फक्त २० सेकंद लागतात. पण या पद्धतीने हात धुतलेत, तर कोरोनाच काय तुम्हाला साधी सर्दी, खोकला, फ्लू, जुलाब असे आजार होण्याचे प्रमाणसुद्धा एकदम कमी होईल. 

आपण स्वतः खोकताना तोंडासमोर हात धरून कधीही खोकू नये. त्याऐवजी हातात टिशू पेपर धरून त्यात खोकावे आणि नंतर तो सुक्या कचऱ्यात टाकून द्यावा. नाहीतर खोकताना आपला दंड तोंडासमोर धरून दंडाच्या आतील बाजूस खोकावे.

मन प्रसन्न ठेवा
कोरोनाच्या साथीच्या बातम्या ऐकून तुम्हाला भीती वाटतेय? 
घाबरू नका. वर दिलेल्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्हाला हा आजार मुळीसुद्धा होण्याची शक्यता नाही. तुम्हाला सांगतो, तुमच्या वयाची मुले खरेच गुणी आहेत आणि ते या गोष्टी पाळतात. म्हणूनच ५ ते १९ वयाच्या मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. तुमच्या आई-बाबांनासुद्धा या गोष्टी पाळायला सांगा तेसुद्धा या साथीत सुरक्षित राहतील.

तुम्हाला टेंशन येत असेल, काळजी वाटत असेल तर छान छान गोष्टींची पुस्तके वाचा. संगणकावर नवनवीन गोष्टींची माहिती घ्या. तुमच्या आवडीची गाणी ऐका, ती म्हणा. टेलिव्हिजनवर किंवा संगणकावर चांगले सिनेमे बघा. कागदाचे निरनिराळे आकार करण्याची ओरिगामी कला शिका, चित्रे काढा, कविता करा, एखादा नवा छंद शिका किंवा तुमच्या एखाद्या छंदाचा पाठपुरावा करा. 

तुमच्या नात्यातल्या सगळ्यांशी, तुमच्या मित्रांशी फोनवर गप्पा मारा. तुमच्या आई-बाबांशी गप्पा मारा. त्यांना घरातल्या कामात अगदी स्वयंपाकामध्येही मदत करा. तुमच्या परीक्षा झालेल्या नाहीत, त्यामुळे रोज थोडावेळ अभ्यासही करा. 

सुटी असल्यामुळे रोज सकाळच्या वेळी न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण व्यवस्थित करा. रोज दूध प्या. अधूनमधून उगीचच काही खाऊ नका. रात्री लवकर झोपायची आणि सकाळी लवकर उठायची सवय लावून घ्या. जागरणे करू नका. 

व्यायाम म्हणून सूर्यनमस्कार शिकून घ्या. योगासने, पुलअप्स, जोर, डिप्स, घरातल्या घरात किंवा टेरेसवर, पार्किंगमध्ये चालणे असे व्यायाम, भस्रिका प्राणायाम असे श्वासाचे व्यायाम शिकून घ्या. संगणकांवरील काही साईट्सवर मेडीटेशन किंवा ध्यान कसे करावे याची माहिती असते, ते शिकून घ्या. 

सर्वात शेवटी सांगायचे म्हणजे कोरोनाचा विषाणू शरीरात शिरला, की तो आपोआपच बाहेर पडतो. त्याला कोणतेही औषध नसते, पण तरीही शंभरातले शहाण्णव रुग्ण बरे होतात आणि आता लवकरच त्याची लस आणि औषधे येतील, मग कशाला घाबरायचे. तुम्हाला काही शारीरिक त्रास झाला, ताप आला, डोके दुखले, खोकला झाला तर मनानेच औषधे घेऊ नका. आई-बाबांना सांगून तुमच्या डॉक्टरांना दाखवून औषधे घ्या. तब्येतीबाबत काही शंका असतील, तर डॉक्टरांना दिलखुलासपणे न घाबरता विचारा. 

लक्षात ठेवा, कोरोनावर विजय मिळवायचा आहे. त्यात शिस्त आणि आरोग्याचे आपण आत्ता चर्चा केलेले नियम पाळलेत, तर तुम्हाला काय कुणालाही कसलाच त्रास होणार नाही.
 

संबंधित बातम्या