लॉकडाऊनमधली दहावी, बारावीची सुटी

दहावी-बारावीतील मित्र
सोमवार, 11 मे 2020

जबाबदार सुटी
दहावी, बारावी ही महत्त्वाची वर्षं! सगळी मजा बाजूला ठेवून मुलांनी फक्त अभ्यासच केलेला असतो. एकदा परीक्षा झाली, की मजा-मस्ती करायची असते आणि मग नंतर पुढच्या करिअरचा मार्गही ठरवायचा असतो. त्यासाठी त्यांचं प्लॅनिंगही खूप आधीपासून झालेलं असतं. पण या लॉकडाऊनमुळं प्लॅन केलेल्या गोष्टी करता आल्या का? लॉकडाऊनच्या वातावरणात कशी दिली परीक्षा? आणि आता घरी बसून काय करतायत ही मंडळी? वाचा, त्यांच्याच शब्दांत...

घरी बसूनही खूप काही करता येतं...
लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं तेव्हा वाटलं होतं की काहीच दिवस हे चालेल. तेव्हा त्याचं गांभीर्य एवढं वाटलं नव्हतं. खरं तर लॉकडाऊन हा शब्दच पहिल्यांदा ऐकला होता आणि ते काय आहे हे कळायच्या आधीच लॉकडाऊन सुरूही झालं होतं. आमचा भूगोलाचा पेपर जेव्हा पुढं ढकलला तेव्हा मला खरं पहिल्यांदा खूप आनंद झाला, पण नंतर दुःखही झालं. कारण माझा भूगोलाचा सगळा अभ्यास झाला होता. तो शेवटचा पेपर झाला असता तर बरं झाल असतं. सुरुवातीला अचानक नुसतं घरात बसणं आवडलं नाही आणि झेपलंही नाही. पण आता हळूहळू सवय झाली आहे. माझे सुटीचे सगळेच प्लॅन्स फ्लॉप झाले होते. मी चंद्राशीला फोलिआजबरोबर चंद्राशीलाला, कोकणात मावशीकडं जाणार होतो. आम्ही संपूर्ण कुटुंब मनालीला जाणार होतो. आम्हा मित्रांचेही खूप प्लॅन्स होते. त्यामुळं वाईट वाटलं. पण या लॉकडाऊनमध्ये मी भरपूर नवीन गोष्टी शिकलो. घरच्यांबरोबर वेळ घालवायला मिळतोय, त्यामुळं छानंही वाटतंय. 
लॉकडाऊनमध्ये मी स्वतःला बिझी ठेवण्यासाठी चित्रं काढतो. आता व्यायामही सुरू केला आहे. मी सध्या फ्रेंच भाषापण शिकत आहे. त्याचबरोबर मी माझ्या आजीआजोबांबरोबर बुद्धिबळ खेळतो आणि आम्ही सगळे एकत्र पत्तेही खेळतो. मी काही पुस्तकंही वाचली, जी मला खूप दिवस वाचायची होती आणि ऑनलाइन पीडीएफ पुस्तकंपण वाचतोय. मी घरी आईला घरकामात मदत करत आहे. नवनवीन गोष्टी करायला शिकतोय आणि यूट्युबवर सिनेमेपण बघतो आहे. कॉम्प्युटरवर मित्रांबरोबरही खेळतो. या लॉकडाऊनमुळं मी स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक झालो. त्याचबरोबर आपल्याला घरी बसून किती छान छान गोष्टी करता येतात तेही कळालं.
- श्रीकांत काजळे (दहावी)

फिट राहण्यासाठी सकाळ-संध्याकाळ व्यायाम
मला वाटलं होतं या कोरोनामुळं पेपर पुढं ढकलले जातायत की काय आणि शेवटी तसंच झालं, आमचा शेवटचा भूगोलाचा पेपर पुढं ढकलला. तो कॅन्सल झाला नाही त्यामुळं बरं वाटलं, कारण भूगोल स्कोअरिंग सब्जेक्ट आहे. पण तोही नंतर कॅन्सल झाला. लॉकडाऊन जाहीर झाल्यावर मी मनाची तयारी केली. आधी मला राग आला कारण मित्रांबरोबर मनालीला जायचं, सिनेमे बघायचे... यातलं आता काहीही होणार नव्हतं. पण आता मला घरी बराच वेळ असतो, त्यामुळं मी फिट राहायचं ठरवलं आहे. कारण हल्ली टेबलवर रोज नवीन डिश असते आणि घरी असल्यामुळं वजन वाढलेलं कळत नाही. त्यामुळं मी रोज सकाळ संध्याकाळ व्यायाम करतो. मी घर स्वच्छ ठेवायला मदत करतो आणि आईला स्वयंपाकघरात व इतर कामांतही मदत करतो. संध्याकाळी मित्रांबरोबर गप्पा मारतो. तर आम्ही घरातले सगळे कॅरम खेळतो, मग जेवतो. मला जेव्हा कंटाळा येतो, तेव्हा मी मित्रांबरोबर ऑनलाइन गेमही खेळतो.
- शौनक जोशी (दहावी)

खूप काही शिकवतोय हा विषाणू...
मी नित्त्या, यंदा मिलेनियम नॅशनल स्कूलमधून सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला बसलेले. परीक्षा सुरू होण्याआधीच बऱ्याच मुलांसारखं मीही सुटीत काय काय करायचं याचे मस्त प्लॅन्स आखून ठेवले होते. मित्र-मैत्रिणींबरोबर भरपूर वेळ घालवायचा, गप्पा रमवायच्या आणि नववीपासून जी मजा बुडालेली ती सर्व भरून काढायची. ट्रेकला जायचं, दोन्हीकडच्या आजी-आजोबांना आई-बाबांबरोबर भेटायला जायचं, त्यांच्याबरोबर छान वेळ घालवायचा आणि स्वतःचे भरपूर लाड करून घ्यायचे. आवडीच्या छंदांचा क्लास लावून, कला साधण्यात निकाल येईपर्यंतचा वेळ मार्गी लावायचा, असं मी ठरवले होतं आणि त्या दृष्टीनं पावलंही उचलली होती. 
अगदी दुसऱ्या पेपरपासून कोरोनाच्या बातम्या कानावर पडत होत्या. शेवटचे दोन पेपर मास्क घालूनच लिहिले. शेवटचा पेपर कडेकोट बंदोबस्तात, पूर्णपणे सोशल डिस्टन्सिंग पाळून एकदाचा पार पडला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केलं. सर्व पेपर संपल्याचा आनंद व्यक्त करायचा, की लॉकडाऊनमुळं आखलेल्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं याचं दुःख व्यक्त करायचं, काहीच कळेनासं झालं. काही दिवस चिडचिड झाली, आपल्या वेळेसच असं का झालं याचं वाईटही वाटलं. वेळ जाता जाईना, सगळं सगळं कॅन्सल झालं. मग हळूहळू मी निरीक्षण करू लागले, की आई-बाबा कसा वेळेचा उपयोग करताहेत. मग मी स्वतःहून आईकडून बेकिंग आणि विविध पदार्थ करण्याचे धडे घेऊ लागले. घरकामात मदत करू लागले. लिहायची आवड आधीपासून आहेच, त्यामुळे विविध विषयांवर निबंध लिहू लागले. डू इट युअरसेल्फचे व्हिडिओज बघून, आहे त्या गोष्टींमध्ये स्वतःची रूम छोट्या छोट्या गोष्टींचा उपयोग करून सजवायला लागले. 
माझ्या बाबांचा भगवद्‍गीतेचा खूप चांगला अभ्यास आहे. रोज दोन तास त्यांच्याबरोबर बसून मी त्या संदर्भात नवनवीन गोष्टी शिकू लागले. जसजसं ते मला समजावत गेले, तसतसा माझा इंटरेस्ट वाटू लागला. नंतर मला ऑप्शन मिळाला, की जे क्लासेस लावले होते ते ऑनलाइन करायचे. मग मी विचार केला की हे शिक्षण मला नंतर कधीही आणि कुठंही घेता येईल. पण हे जे मौल्यवान क्षण आहेत ते मला कदाचित कधीच परत मिळणार नाहीत. शिवाय मी यातून एक पॉझिटिव्ह विचार हाही केला, की जर मला पुढच्या शिक्षणासाठी परगावी अथवा परदेशी जायची वेळ आली, तर मला माझी स्वतःची कामं कोणावरही अवलंबून न राहता नीटपणे करता आली पाहिजेत, अगदी सफाईपासून पौष्टिक कुकिंगपर्यंत. ही सगळी त्याची मॉक ड्रिलच नाही का? 
त्यामुळं आता लॉकडाऊन कितीही वाढला, तरी तो आपल्या भल्यासाठीच असा विचार करून आणखीन काय नवं शिकायला मिळतं आहे, याकडं लक्ष केंद्रित करू लागले. बाकी काही हो न हो, हा लॉकडाऊन बरंच काही शिकवून जाणार आहे. आपल्याकडं जे आहे त्याची किंमत ठेवायला, आहे त्यात भागवायला, पाहिजे तेवढंच घ्यायला, वेळेची कदर करायला, एकमेकांच्या कामाबद्दल आदर बाळगायला, कानाकोपऱ्यात स्वछता ठेवायला आणि बरंच काही. जे कोणालाही जमलं नाही, ते सगळं शिकवून जातोय एक न दिसणारा विषाणू. आहे की नाही यात गंमत!
- नित्या उपासनी (दहावी)

यूट्युबच्या मदतीनं...
बारावीची परीक्षा सुरू असताना थोडं टेंशन होतं, पण तेवढंच छान वाटत होतं. परीक्षा संपल्यावर आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी ठरवलं होतं, की गड किल्ले फिरायला जायचं. शेवटचा पेपर झाल्यानंतर फिरायला जाणार, पण जायच्या आदल्या दिवशी बातमी आली, की पुण्यात कोराेनाचं प्रामाण वाढलं आहे. आम्हाला सगळ्यांना थोडं वाईट वाटलं, पण आम्ही ठरवलं नंतर जाऊ. काही दिवसांनी सरकारनं लॉकडाऊन घोषित केलं. तेव्हा आता लॉकडाऊनमध्ये घरी काय करणार हा प्रश्न पडायला लागला. मग दिवसभर फोनवर किती व्हॉट्सॲप वापरणार म्हणून यूट्युबवर वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपीज बघून त्या घरी तयार करून जे येत नाही ते शिकले. बारावीनंतर काय करायचं हे डोक्यात होतं. बारावीनंतर पार्लरच्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायची होती. पण लॉकडाऊनमुळं पार्लर बंद असल्यानं ॲडमिशनही घेता येईना. म्हणून इन्स्टाग्रामवर स्वतःचं पेज सुरू केलं आणि त्यावर स्किनकेअर व होम रेमेडी टिप्स पोस्ट करू लागले. लॉकडाऊनमध्ये मी स्किनकेअर, कुकिंग अशा बऱ्याच गोष्टी यूट्युबवरून शिकले. लॉकडाऊनमध्ये मी माझ्या भविष्यात उपयोगी येतील अशा सर्व गोष्टी शिकले.
- समृद्धी शिंदे, मुळशी (बारावी)

लॉकडाऊचं टेंशन 
मी दहावीची परीक्षा दिली आहे, मात्र कोरोनामुळं सगळीकडं लॉकडाऊन सुरू आहे. असाच लॉकडाऊनचा काळ वाढत राहिला, तर पुढं निकाल लागण्यासाठी उशीर होणार, नंतर अकरावीच्या ॲडमिशनला उशीर होणार. त्यामुळं थोडं टेंशन आलं आहे. दहावीचे पेपर संपल्यानंतर काय काय करायचं याचं मी प्लॅनिंग केलं होतं. पण आता बाहेर पडता येत नसल्यामुळं कोणत्या क्लासलाही जाऊ शकत नाही. 
- किशोरी झिंजुर्डे, पिंपळे सौदागर (दहावी) 

इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न करतो
परीक्षा सुरू असतानाच लाॅकडाऊन सुरू झालं. नऊ मार्चला पेपरचा दिवस असताना सकाळी पुण्यात दोन रुग्ण सापडले. त्यानंतर लाॅकडाऊन दाट होत गेलं. परीक्षा संपल्यानंतर अनेक गोष्टींचं प्लॅनिंग केलं होतं. एमएससीआयटीचा क्लास लावायचा होता, स्विमिंगला जायचं होतं, गावाला फिरायला जायचं होतं, क्रिकेट खेळायचं होतं, गाडी चालवायला शिकायचं होतं, किल्ल्याला भेट द्यायची होती, उद्यानाला भेट द्यायची होती, मुंबईचं शिवाजी महाराज टर्मिनस पाहायचं होतं, वॉटर पार्कला जायचं होतं. पण आता लॉकडाऊनमुळं घरात बसून टीव्ही पाहत बसतो. यूट्युब बघतो. पत्ते खेळतो, कॅरम खेळतो, व्हिडिओ गेमही खेळतो. सध्या मी पानिपत कादंबरी वाचतो आहे. तसंच स्वामी समर्थांचं पारायण करतो आहे. त्याशिवाय रात्री चित्रपट पाहतो, हिंदी व मराठी ऐकतो. घरात टाइमपास व्हावा यासाठी प्रश्न तयार करून इतरांना प्रश्न विचारतो.
सकाळी सहा वाजता उठतो, घरातच व्यायाम करतो. नंतर आईला कामात मदत करतो. दुपारी जेवण झालं की खेळ खेळत असतो. माझा इंग्रजी वाचण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंग्रजीची पाच वाक्यं रोज लिहितो. यूट्युबवर इंग्रजी गोष्टी लावतो. इंग्रजी गोष्टी वाचतो. मराठी गोष्टीही वाचतो. तसंच अपडेट राहण्यासाठी गणिताचे घनमूळ काढणं, वर्गमूळ काढणं, पाढे वाचत राहणं, इतिहास वाचत राहणं या गोष्टीही करतो.
- सुदीप धावले (दहावी)

कुकिंगचा प्रयत्न 
माझा शेवटचा पेपर १८ मार्चला होता. हा पेपर पुढं ढकलला जाईल अशी मला भीती वाटत होती. पण सुदैवानं हा पेपर झाला आणि मी सुटलो. पण माझे काही मित्र इतके नशीबवान नव्हते. 
पहिला लॉकडाऊन जाहीर झाला आणि माझ्या सगळ्या प्लॅन्सवर पाणी फेरलं गेलं. माझा प्लॅन अगदी साधा सरळ होता. मी दोन आठवडे आराम करणार होतो, टीव्ही बघणार होतो आणि गेम खेळणार होतो. त्यानंतर बॅडमिंटन खेळायला जाणार होतो आणि स्विमिंगही करणार होतो. आम्ही काही छोट्या आणि काही मोठ्या ट्रिप्सही प्लॅन केल्या होत्या. मी हॉलिडे मूडमध्ये होतो आणि आता घराबाहेरही पडता येणार नाही हे कळल्यावर मला खूप वाईट वाटलं.
घरात बसून मला आणि माझ्या घरच्यांनाही खूप बोर होतं. पहिले दोन आठवडे मी एंजॉय केले, उशीरा झोपलो, उरा उठलो, गेम्स खेळलो आणि दिवसभर टीव्ही पाहिला. पण आता मात्र स्वतःला व्यग्र ठेवण्यासाठी मला नवीन नवीन गोष्टी शोधाव्या लागतात. मी सध्या यूडेमी किंवा यूट्युबवरून नवीन भाषा शिकण्याच्या विचारात आहे. तसंच मी कुकिंग करण्याचाही प्रयत्न करतो आहे कारण मला खायला आवडतं. मी मित्रांशीही खूपदा गप्पा मारतो. 
हे लॉकडाऊन कोरोनाला हरवेल, अशी आशा आहे!
-मैत्रेय वैद्य (दहावी)

काम करायची सवय लागली 
माझा शेवटचा संस्कृतचा पेपर राहिला होता, जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं. घाबरत घाबरत पेपर लिहायला गेले होते, मास्क आणि सॅनिटायझर घेऊन. परीक्षा संपल्यानंतर स्पर्धा परीक्षांसाठी जोरात अभ्यास सुरू करायचा होता. सिनेमे बघायचे होते, ट्रेकला जायचं होतं; ते सगळं राहून गेलं. त्यामुळं वाईट वाटतंय. मैत्रिणींबरोबर फिरायला जाता येत नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मी अजिबात घराबाहेर पडले नाहीये. लॉकडाऊन खूप काळ राहील हे समजल्यावर मनाची तयारी केली आणि नवीन रुटीन सुरू केलं. अभ्यासामुळं व्यायामाकडं दुर्लक्ष झालं होतं, म्हणून मी रोज ऑनलाइन बघून व्यायाम करते. टीव्ही, मोबाइल यात जास्त वेळ न घालवता वाचन, चित्रकला, नृत्य हे माझे छंद जोपासते. सगळ्या स्पर्धा परीक्षा पुढं ढकलल्या आहेत, त्यामुळं अभ्यासक करायचा कंटाळा येतो. ऑनलाइन क्लासेस सुरू असले, तरी अभ्यास करायचं मोटिव्हेशन कमी होतंय. घरच्या कामातही मी हातभार लावते आहे. आधी क्वचितच केलेली कामं आता रोज करते. तसंच ऑनलाइन नृत्यही शिकते आहे. या लॉकडाऊनमुळं कामाची सवय लागली, पुस्तकं वाचायला वेळ मिळाला. पण तरीही घरात कोंडल्यासारखं वाटतं आणि दिवस उदासवाणा वाटतो.
-भार्गवी काजळे (बारावी)
 

संबंधित बातम्या