शिक्षण व्हाया ऑनलाइन...

सानिका सावंत
सोमवार, 5 एप्रिल 2021

कव्हर स्टोरी

ऑनलाइन ‘अध्यापन’ तर सुरू झाले, शाळांनी आणि शिक्षकांनी नवे तंत्रही स्वीकारले पण ‘अध्ययना’चे काय? या ऑनलाइन पद्धतीत संकल्पनांचे आकलन होते आहे का? ऑनलाइन शिक्षण मुलांसाठी योग्य आहे का? मुलांपर्यंत ते पोचतेय का? अंतर्मुख करायला लावणारे हे प्रश्न आपल्‍यासमोर उभे ठाकले आहेत. 

वर्ग ः  पहिली
ठिकाण ः आपापलं घर 

एशिका : ताई, आज तुम्ही छान शिकवलं. (ताई - शिक्षिका)
ताई दरवेळी मन लावून, प्रत्येकाला समजेल असे शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण कधी मुलांच्या नेटवर्कची अडचण, तर कधी ताईंच्या नेटवर्कची! त्यादिवशी मात्र दोघांनाही अडचण आली नाही. ताईंनी शिकवलेली पेन्सिल कॅप एशिकाला समजून तयार करता आली. त्यामुळे पटकन तिच्या तोंडून वरील उद्‍गार आले.

नेहमी ताई मुलांना शाबासकी देतात, पण आज मुलीने ताईंना शाबासकी दिली होती. आपण शिकवलेली कृती नीट करता आली म्हणजे मुलांना ‘समजलं’ असं होतं. आपण ते ‘आकलन’, ‘अध्ययन निष्पत्ती’ अशा शब्दांत बांधतो. खरेच ऑनलाइन वर्गात मुलांना समजतेय का? ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात   

मार्च २०२०मध्ये कोरोनामुळे टाळेबंदीमुळे शाळा बंद झाल्या, तरी फोन आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शिक्षक मुलांशी जोडलेले होते. शिक्षकांनी तयार केलेल्या चित्रफिती व्हॉट्सॲपवर पाठवण्यापासून सुरू झालेला प्रवास झूम, गुगल मीटसारख्या माध्यमांतून ऑनलाइन अध्यापनापर्यंत येऊन पोचला आहे. हा प्रवास निश्चितच सोपा आणि सुकर नव्हता. बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेत शिक्षकांनी त्यातून चांगल्या प्रकारे मार्ग काढला. नवीन तंत्रज्ञान शिकून घेत ही नवी पद्धत आत्मसात केली. 

‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ या शासनाच्या भूमिकेमुळे ऑनलाइन ‘अध्यापन’ तर सुरू झाले, पण ऑनलाइन ‘अध्ययना’चे काय? शाळेत शिकतानादेखील वाचन-लेखन-गणनात मुले किती मागे आहेत, हे वारंवार झालेल्या सर्वेक्षणातून, वर्तमानपत्रात आलेल्या आकडेवारीतून आपल्याला समजते. मग या ऑनलाइन पद्धतीत संकल्पनांचे आकलन होते आहे का? ऑनलाइन शिक्षण मुलांसाठी योग्य आहे का? तळागाळातील मुलांपर्यंत ते पोचतेय का? अंतर्मुख करायला लावणारे हे प्रश्न आपल्‍यासमोर उभे ठाकले आहेत. 

अडचणींची मालिका
ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारा स्मार्टफोन, संगणक किंवा टॅब आणि हेडफोन, तसेच उत्तम दर्जाचे इंटरनेट मुलांकडे असले की शिक्षण निदान सुरू तरी होईल. पहिली माशी शिंकते ती इथेच! महाराष्ट्रातला बराचसा ग्रामीण भाग हा दुर्गम आहे. जिथे अद्याप वीजही धड पोहोचलेली नाही, तिथे इंटरनेटची काय सुविधा असेल याविषयी न बोललेलेच बरे... ग्रामीण आणि शहरी भागांतही आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील मुलांना दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असते, तिथे स्मार्टफोन कसा घेणार? अशा अडचणींमुळे ही मुले ऑनलाइन शिक्षणापासून वंचितच राहत आहेत. आवश्यक साधने नसल्याने त्यांच्या मनात न्यूनगंड तयार होऊन शिक्षणाच्या प्रवाहापासून ती दूर जाणार नाहीत ना, अशी भीती मनात येतेय.

ऑनलाइन शिकणे
स्मार्टफोन, इंटरनेटची सुविधा असलेल्या मुलांचे तरी ऑनलाइन पद्धतीत ‘शिकणे’ घडतेय का ?...   शिक्षकांनी मुलांना शिकवणे, ही पारंपरिक पद्धत आता बदलतेय. घरी, शाळेत, परिसरात, मित्रमैत्रिणींसोबत अनेक गोष्टी बघत, ऐकत, हाताने करत, अनुभव घेत मुले शिकत असतात. त्यासाठी योग्य वातावरणनिर्मिती, शैक्षणिक साधने, आवश्यक संधी शिक्षक उपलब्ध करून देत असतात. मुलांचे जास्तीत जास्त शिकणे हे त्यांनी घेतलेल्या अनुभवातून घडतं. ऑनलाइन शिक्षणात असे अनुभव घेता येत नसल्याने त्यांच्या शिकण्याला मर्यादा येते. चेहऱ्यावरील भाव पाहून मुलांना समजलेय की नाही हे शिक्षकांना कळते. कित्येकदा सांगूनसुद्धा मोठी मुले व्हिडिओ बंद ठेवतात, त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाचे समाधान मिळत नाही आणि काहीही न घडता दिवस संपतो. परंतु मुलांच्या शिकण्याला पूरक असे वातावरण शिक्षकांनी निर्माण केले, तर मुलांचे शिकणे खूपच सुलभ होते, हा आमचा अनुभव आहे. 

दि शिक्षण मंडळ, गोरेगाव (मुंबई) या संस्थेच्या डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत मी शिक्षिका म्हणून काम करते. आमचे काही अनुभव नक्की सांगावेसे वाटतात. प्राथमिक शाळेतील मुलांना ऑनलाइन शिक्षण झेपेल का? मोबाईल योग्यरीत्या हाताळता येईल का? अशा शंका मनात घेऊनच आम्ही ऑनलाइन अध्यापनाला सुरुवात केली. पण हळूहळू मोबाईल हाताळणे, माईक चालू-बंद करणे हे मुले सराईतपणे करू लागली. पहिली हा मूलभूत शिक्षणाचा पाया असतो. या टप्प्यावर अक्षरओळख, शब्द, वाक्य व छोटे उतारे अशी एकेक पायरी चढत मुले वाचन-लेखन करू लागतात. संख्याओळख, बेरीज-वजाबाकी या मूलभूत गणिती क्रियांची ओळखदेखील याच इयत्तेपासून होते. ऑनलाइन पद्धतीने हे कसे शक्य होईल? परंतु, एकमेकांशी तसेच शाळेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून केलेल्या प्रयत्नांचा परिपाक म्हणूनच की काय, मुले वाचू-लिहू लागली आहेत. आमच्या प्रयत्नांमुळे आम्ही पूर्णतः यशस्वी झालो असे नाही, पण मुले शिकती झाली आहेत एवढे नक्की.

पालकांची भूमिका
ऑनलाइन शिक्षणात पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. निरक्षरतेमुळे आणि कामामुळे वेळ न देऊ शकणारे, मुलांना आवश्यक तिथेच मार्गदर्शन करणारे आणि मुलांच्या अध्ययनात अवाजवी हस्तक्षेप करणारे असे तीन प्रकारचे पालक आम्हाला दिसतात.   

पहिली-दुसरीच्या मुलांना ताईंनी सांगितलेल्या काही कृती पालकांबरोबर कराव्या लागतात. पालकांनी समजून करून घेतल्या तर मुलेही व्यवस्थित करतात. वाचन-लेखनाचा खूप सराव घ्यावा लागतो. शाळेत वेगवेगळ्या पद्धतीने सराव घेतला जातो. जे पालक असा सराव घेतात आणि ज्या मुलांना थोडासा सराव पुरेसा असतो, ती मुले व्यवस्थित वाचू लागली आहेत. परंतु, ज्यांचे आई बाबा साक्षर नाहीत किंवा ज्यांना पुरेसा वेळ देता येत नाही, अशा मुलांच्या शिकण्यात अडचणी येतायत. 

काही पालक ऑनलाइन वर्गाच्यावेळी मुलांजवळच असतात. ताईंनी प्रश्न विचारताच मुलाला विचार करायला क्षणाचीही उसंत न देता तेच उत्तर सांगून मोकळे होतात! असे झाले तर मुलाला एखाद्या संकल्पनेचे आकलन झाले आहे किंवा नाही हे ताईंना कसे कळणार?आपल्या मुलाची सर्व उत्तरे बरोबरच यायला हवीत, यासाठी हा पालकांचा अट्टहास असतो. मुलाचा मेंदू तरतरीत ठेवायचा असेल तर सतत डोक्याला चालना मिळाली पाहिजे, वेगवेगळे प्रश्न समोर आले पाहिजेत. मेंदूसमोर जितक्या अवघड गोष्टी आपण ठेवू त्यातून तो शिकत जाईल, हे मेंदूचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी अनेक प्रयोगांअंती सिद्ध केलेले आहे. नेमकी किती, कुठे आणि कशा प्रकारची मदत द्यावी याबाबत पालकसभेत वारंवार बोलत राहावे लागते.

शिकणे आणि आकलन होणे
एखादी संकल्पना दोनदा-तीनदा ऐकून, पाहून, कृती करून समजून घेणारी, खूप सरावानंतर शिकणारी आणि वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज असणारी अशी मुले वर्गात असतातच. गप्पा मारून, हाताने करून किंवा त्यांच्यासाठी योग्य ठरेल त्या पद्धतीने तिसऱ्या गटातील मुलांच्या मूलभूत संकल्पना पक्क्या करून घ्याव्या लागतात. शाळेच्या वातावरणात ही जास्तीची मेहनत नक्कीच फळाला येते आणि मुले शिकू लागतात. ऑनलाइन शिक्षणात पहिल्या गटातील मुलांना फारशा अडचणी येत नाहीत. परंतु दुसऱ्या गटातील मुलांना जास्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. सर्वांत जास्त अडचणी येतात तिसऱ्या गटातील मुलांना... यांना शिकण्यात मदत मिळावी म्हणून ताई जास्तीचा वर्ग घेऊन या मुलांसोबत संवाद साधतात. एकूणच इंटरनेटची अडचण, वर्गातील अनियमितता, मुलांच्‍या आजूबाजूच्या आवाजांमुळे ऑनलाइन वर्गात एकाग्रतेचा अभाव, घरात एकच स्‍मार्टफोन आणि दोन-तीन भावंडे यामुळे आपापल्‍या वेळांचा ताळमेळ घालण्‍यात येणाऱ्‍या अडचणी या साऱ्‍यामुळे मुलांच्या शिकण्यात अडचणी येत आहेत. ऑनलाइन वर्गात शिकवलेल्या संकल्पनांचे मुलांना पूर्णतः आकलन झाले आहे की नाही, हे आज अगदी खात्रीशीरपणे आपण सांगू शकत नाही. 
शाळेत कमीत कमी पाच तास मुले असतात, पण ऑनलाइन वर्ग दीड-दोन तासाच्या पुढे घेता येत नाही. मोबाईलची बॅटरी संपणे, डेटा संपणे, इंटरनेटचा वेग कमी होणे, एका जागी बसून स्क्रीनकडे बघत राहणे मुलांना नकोसे होते. अशावेळी पालकांबरोबर सराव करणे हा पर्याय मुलांकडे उरतो. पालकांसोबत संवाद साधून मुलांचा अभ्यास कसा घ्यावा यासाठी मार्गदर्शन केलेले असले तरीही सरावाच्या वेगवेगळ्या पद्धती माहीत नसल्याने एकाच पद्धतीने ते सराव घेतात. कधी स्वाध्यायासाठी, सरावासाठी पाठवलेल्या लिंक माहितीच्‍या अभावामुळे त्यांना चालू करता येत नाहीत, त्यामुळेदेखील मुलांच्या शिकण्यात अडचणी येतात.

शाळेतील सुखद वातावरण
आकलन न होण्यामागचे आणखी एक मोठे कारण आहे, शाळेतल्‍या आणि घरातल्‍या वातावरणातला फरक. शाळेचे वातावरण मुलांच्या शिकण्याला पूरक असते. मुले विविध शैक्षणिक साधने वापरून, कृती करून, अनुभव घेऊन संकल्पना समजून घेत असतात. गरज लागेल तिथे शिक्षकांना प्रश्न विचारतात. त्या विषयावर पाठ्यपुस्तकापलीकडच्या अवांतर गप्पा होतात. शिक्षक आणि मुलांचा संवाद घडतो. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करत असताना मुलांसोबत त्यांचे समवयस्क असतात. असेही म्हणतात की मोठ्यांपेक्षा आपल्या समवयस्कांकडून चांगल्या प्रकारे मुले समजून घेऊ शकतात. ऑनलाइन शिक्षणात या सगळ्या गोष्टींना मर्यादा येतात. शाळेत शिक्षकांकडून मिळणारी शाबासकीची थाप, कौतुकाचे शब्द, शिक्षकांचा आश्वासक स्पर्श मुलांना हवाहवासा असतो. वर्गातील मुलांच्या साथीने शिकणे, वर्गातील गमतीजमती, हसणे, भांडणे, मधल्या सुटीतील मजा, एकत्र डबा खाणे, मैदानावरचे खेळ, मित्र-मैत्रिणींसोबत शाळेत येणे या सर्व भावनिक आणि शारीरिक गरजा ऑनलाइन शिक्षणात पूर्ण होऊ शकत नाहीत. सर्वच मुलांच्या घरचे वातावरण शिकण्यासाठी पोषक असेलच याचीही खात्री आपण देऊ शकत नाही.

शिक्षणक्षेत्रात अनेक वर्षे काम करणाऱ्या आमच्‍या मार्गदर्शक, शिक्षणतज्ज्ञ वर्षा सहस्रबुद्धे नेहमी म्हणतात, ‘मुलं शाळेत खेळण्यासाठी, मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत खाऊ खाण्यासाठी येतात. त्यातून वेळ काढून आपण अभ्यास घ्यायचा असतो.’ हे किती खरे आहे याची प्रचिती आत्ताही आम्हाला येते. ऑनलाइन वर्गात मित्रमैत्रिणी दिसले तरी त्यांच्यासोबत खेळणे, गप्पा मारणे या गोष्टी मुलांना करता येत नाहीत. त्यामुळे काही मुले अस्वस्थ होतात. पहिलीतील एक मुलगा ऑनलाइन वर्गात फक्त आपल्या मित्राला शोधत असतो. तो मित्र नसेल तर हाही लक्ष देत नाही आणि ‘आधी त्याला फोन करून वर्गात यायला सांग, तरच मी अभ्यास करीन’ असे आईला सांगतो. सध्या मुले खूपच चिडचिडी झाली आहेत, असेही पालक सांगतात. 

शिकण्याच्या संधी
ऑनलाइन शिक्षणामुळे शाळेत घेतल्‍या जाणाऱ्‍या विविध उपक्रमांनाही मुलांना मुकावे लागते. शाळेतील प्रदर्शन, स्नेहसंमेलन, वस्तू तयार करून दुकानजत्रेत विकणे, खेळदिनाला चुरशीने खेळ खेळणे आणि मुले पहिलीपासून ज्याची वाट पाहत असतात असे चौथीचे रात्रशिबिर अनुभवणे (एक रात्र मित्रमैत्रिणी व ताईंसोबत शाळेत राहणे) यांसारख्या उपक्रमांची मजा मुलांना अनुभवता येत नाही. डोंगरावर, जंगलात फिरणे, सार्वजनिक वाहनाने सहलीला जाणे यांसारखे अनुभवही घेता येत नाहीत. आमच्या अ.भि. गोरेगावकर या माध्यमिक शाळेतही एकेका विषयावर मुले प्रदर्शन मांडतात. हे अनुभव मुलांच्या वाढीत मोलाची भूमिका बजावत असतात. प्रत्येक शाळेत थोड्याफार फरकाने असे उपक्रम असतात. काही उपक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा प्रयत्नदेखील केला, पण शाळेतली मजा तिथे आली नाही.

मूल्यमापन
मूल्यमापन हा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. शिकण्याचा हेतू, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि मूल्यमापन हे चक्र पूर्ण झाले तरच शिकणे घडले असे म्हणतात. हे शिकणे घडले का ते मुलांचे प्रतिसाद,  मुलांच्या चेहऱ्यावरील भाव, मुलाचे स्मितहास्य पाहूनही लक्षात येते. हे प्रतिसाद शिक्षक आपल्याकडे नोंदवूनही ठेवतात. एखाद्या संकल्पनेचे आकलन झाले का हे तपासण्यासाठी रोजच्या सरावपत्रिका, दर आठवड्याच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे शिक्षकाला अध्यापनाची दिशा ठरवता येते, उणिवा, कमतरता भरून काढता येतात. वर्गात, मैदानात, सहलीला, उपक्रमांच्यावेळी मुलांचे मिळणारे प्रतिसाद हेही मूल्यमापनच असते. सध्या हे अजिबातच घडू शकत नाही. मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरण्यालाही मर्यादा आहेत. तसेच मुलांचे शिकणे घडले का याबाबतही मनात संभ्रम आहे. जर शिकणे घडलेच नसेल तर मूल्यमापन-परीक्षा घेणेही अर्थहीन आहे. आता सरावपत्रिका, चाचण्या दिल्या जात असल्या तरी मुख्य अडचण म्हणजे हे काम मुलानेच केले का याची खात्री देता येत नाही. त्यामुळे शिकवलेल्यापैकी कितपत मुलांपर्यंत पोचले ते तपासण्यासाठी मूल्यमापन घेता येईल. पण तेही योग्य मूल्यमापन आहे, असे ठामपणे म्हणता येणार नाही. तरीही पुढच्या वर्षीच्या नियोजनासाठी त्याचा उपयोग नक्कीच होईल. 

येणाऱ्या काळासाठी...
ऑनलाइन शिक्षणात काही गोष्टी सकारात्मकही आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे मुले ‘स्‍मार्ट’ झाली आहेत. ‘माईक म्युट/अनम्युट करा, पुन्हा जॉईन व्हा, लिंकवर क्लिक करा, कॅमेरा ऑन/ऑफ करा, स्लाईड बघा...’ ही भाषा सुरुवातीला सवयीची नसल्याने मुले गांगरून जात होती. आता मात्र ती सरावली आहेत. पूर्वी कॅमेरासमोर कमी बोलणारी किंवा लाजणारी मुले आता आत्मविश्वासाने कवितेचा व्हिडिओ तयार करून पाठवत आहेत. कला-कार्यानुभवाच्या तासाला काही समजले नाही तर आम्ही व्हिडिओ बघून करू असे सांगून त्याप्रमाणे करू लागली आहेत. दुसरीकडे, ऑनलाइन वर्गासाठी शिक्षकांनी तयार केलेल्या पीपीटी, चित्रफिती शाळा सुरू झाल्यावरदेखील चांगल्या प्रकारे वापरता येतील. व्‍हॉट्सॲप गटांचा उपयोग सूचनांपुरता मर्यादित न ठेवता मुलांचे शिकणे अधिक सुलभ होण्यासाठी चित्रफिती, ध्वनिफिती पाठवणे, घरी मुलांना सरावासाठी सरावपत्रिका, स्वाध्यायपत्रिका पाठवणे यासाठीही करून घेता येईल. 
पुढच्या वर्षी शाळा नियमित सुरू होतील की नाही याबाबत आपण सध्या तरी काही सांगू शकत नाही. पण जो काही वेळ मिळेल त्याचे अत्यंत काटेकोर नियोजन करून मुलांच्या राहिलेल्या क्षमता पूर्ण करून घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा शिक्षकांना अवलंब करावा लागेल. सर्व मुलांना एकाच पातळीवर आणण्यासाठी कृती योजना तयार कराव्या लागतील. तसेच मुलांचे शिकणे म्हणजे काय? याबाबत पालकांचेही प्रबोधन करावे लागेल. मुलांच्या शिकण्यात राहिलेल्या कमतरता भरून काढण्यासाठी शिक्षणक्षेत्रात विचारांची देवाणघेवाण करावी लागेल. अचानक उद्‍भवलेल्या परिस्थितीत जे जे नवीन शिक्षकांच्या आणि मुलांच्या पदरी पडले आहे, ते सोडून न देता शिक्षकांचे शिकवणे अधिक प्रभावी आणि मुलांचे शिकणे अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी टिकवून ठेवले पाहिजे. शाळा व परिसरातून मिळणारे शिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण यांचा योग्य मेळ घालून नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मुलांना सक्षम करणे आणि येणाऱ्या काळासोबत यशस्वीरीत्या पुढे जात राहणे यासाठी आपण सर्वांनीच आता तयार राहिले पाहिजे.

(लेखिका गोरेगाव (मुंबई) येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत सहशिक्षिका आहेत.)

संबंधित बातम्या