देखणा सिंधुदुर्ग

शिवप्रसाद देसाई
बुधवार, 28 मार्च 2018

आंबोलीचे पर्यटन...

आंबोलीचे पर्यटन...
अंबोली हे समुद्रसपाटीपासून सुमारे सातशे मीटर उंचीवर असलेले पर्यावरणसंपन्न असे थंड हवेचे ठिकाण आहे. इथले दाट जंगल, थंड हवा, सह्याद्रीचे विस्तीर्ण दर्शन, वनौषधी, वन्यजीवन अशा कितीतरी गोष्टी मनाला भुरळ पाडतात. येथे पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद अवर्णनीय असतो. राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असल्याने कोकणातील पावसाचा अनुभव हमखास घेता येईल, असे ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख आहे. महादेवगड पॉइंट, मनोहर मनसंतोषगड पॉइंट, कावळेसाद पॉइंट अशी काही पर्यटनस्थळे विशेष लक्षवेधी आहेत. येथे राहण्याची व्यवस्था चांगली आहे. आंबोलीत रेल्वेने यायचे झाल्यास सावंतवाडी स्थानकात उतरून एसटी किंवा खासगी बसने पोहोचता येते. मुंबई-गोवा महामार्ग किंवा पुणे-बंगलोर महामार्गाने कोल्हापूर-आजरामार्गे आंबोलीत येता येते.

निसर्गरम्य मांगेली...
सिंधुदुर्गातील आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे मांगेली. आंबोलीच्या तुलनेत या ठिकाणचा विकास झाला नसला तरी इथला निसर्ग पर्यटकांना वेड लावणारा आहे. पावसाळ्यात इथल्या सौंदर्याला वेगळाच साज चढतो. सिंधुदुर्ग आणि कर्नाटक यांच्या सीमेवर असलेले मांगेली हे प्रतिआंबोली शोभावी असे गाव आहे. दोडामार्गपासून सुमारे २५ किलोमीटरवर हा गाव आहे. येथे पावसाळ्यात खूप सुंदर धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. येथे धबधब्याबरोबरच कर्नाटकच्या सीमेवर सडा या भागात गोविंदगड हा ऐतिहासिक गडही भुरळ घालतो. अर्थात तिथपर्यंत पोहोचायला तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. मांगेलीतून तीन ते चार किलोमीटरवर ओहोळ, नाल्यांची आणि झाडाझुडपांनी वेढलेली वाट पार करून तेथील सडा या आणखी एका धबधब्यापर्यंतही पोचता येते. 
मांगेलीत पर्यटकांसाठीच्या फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. निसर्गाची आवड आणि नवे काहीतरी पाहण्याच्या शोधात असलेल्यांना हे पर्यटनस्थळ नक्कीच आवडेल.

चौकुळचे ग्रामपर्यटन
आंबोलीपासून आठ ते दहा किलोमीटरवर असलेले चौकुळ अलीकडे ग्रामपर्यटनामुळे नावारूपास आले आहे. निसर्गाच्या आस्वादाबरोबरच अस्सल मालवणीच पाहुणचाराची सोय येथे आहे. आंबोलीप्रमाणेच चौकुळ हेही थंड हवेचे, अतिपावसाचे आणि निसर्गसंपन्नतेने नटलेले गाव. येथे मोठमोठी आलिशान हॉटेल्स नसली तरी ग्रामस्थ पर्यटकांची आपल्या घरातच व्यवस्था करतात. त्यांचा पाहुणचार लक्षात राहण्यासारखा असतो. उंचावर असलेल्या या गावातून सह्याद्रीच्या रांगांचे सौंदर्य न्याहाळता येते. येथे निसर्ग संपन्नतेची चुणूक दाखविणारे छोटे-छोटे कितीतरी पाँईटस्‌ आहेत. येथे असलेली धबधब्याची मालिकाही आकर्षित करते; मात्र ती खासगी जागेत आहे. या ठिकाणच्या प्रथा परंपरा, गावची पंचायत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे तळकोकणातील ग्रामव्यवस्था समजून घ्यायची असल्यास चौकुळसारखा दुसरा पर्याय सध्यातरी नाही. आंबोलीत येऊन या ठिकाणी रिक्षा किंवा अन्य वाहनाने पोचता येते.

रेडीचे पर्यटन
वेंगुर्लेपासून आणि सावंतवाडीपासून सुमारे ३० ते ३५ किलोमीटरवर असलेले रेडी गाव द्विभूजा गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. याच गावात असलेला यशवंतगड हा देखणा किल्ला ऐतिहासिक पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी पर्वणी ठरणारा म्हणता येईल.
सावंतवाडी संस्थानच्या आधिपत्याखाली हा किल्ला होता. १६६२ मध्ये तो शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला. पुढे सावंतवाडी संस्थान, पोर्तुगीज यांनीही यावर वेळोवेळी सत्ता गाजवली.या किल्ल्याचे अवशेष आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना परिसरात द्विभूजा गणेश मंदिराबरोबरच गोव्याच्या हद्दीत येणारा तेरेखोल किल्ला, आरवली, शिरोडा येथील समुद्रकिनारा ही स्थळेही पाहता येतात. आरवली शिरोडा येथे निवास व्यवस्थाही आहे.

सावडावचा धबधबा 
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर जी काही दुर्लक्षित स्थळे प्रकाशझोतात आली त्यात सावडाव येथील सुरक्षित असलेल्या नैसर्गिक धबधब्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मुंबई-गोवा महामार्गापासून जेमतेम तीन किलोमीटरवरील हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांनी गजबजलेला असतो. एमटीडीसी आणि स्थानिक ग्रामपंचायतीने येथे चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठा येथून ६ किलोमीटर आणि कणकवली शहरापासून ५ किलोमीटरवर सावडाव तिठा लागतो. तेथून गावात जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. गावाच्या एका बाजूला हा धबधबा जून ते ऑक्‍टोबरपर्यंत पर्यटकांना खुणावत असतो. हा धबधबा मुले, महिला, वृद्धांसाठी सुरक्षित आहे. जेमतेम २० ते २५ फुटांवरून कोसळणारे पाणी अंगावर घेता येते. मुसळधार पाऊस कोसळत असेल तर फारच मजा लुटता येते. 

ऐनारीची देखणी गुहा
पंधरा फूट लांबीचे अरुंद प्रवेशद्वार, त्यानंतर कोरीव सिंहासन, साचेबद्ध चार खोल्या, दगडी जलकुंडे, देवघर, स्नानगृह, पाषाणी समई अशी परिपूर्ण रचना असलेली ऐनारी गुहा साहसी पर्यटक व इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणी आहे.  वैभववाडी शहरापासून २२ किलोमीटर आणि भुईबावडा बाजारपेठेपासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर ही गुहा आहे. ऐनारी गावापर्यंत पर्यटकांना सर्व प्रकारची वाहने घेऊन जाता येतात. त्यानंतर गुहेकडे जाण्यासाठी साधारण तासभर चालावेच लागते.या गुहेचे प्रवेशद्वार पूर्वी फारच अरुंद होते. गुहेत सहजपणे जाणे शक्‍य होत नसे. मात्र दोन-तीन वर्षापूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदानातून गुहेच्या प्रवेशद्वाराची रुंदी वाढविली. या गुहेत प्रवेश केल्यानंतर एका वेगळ्या कालखंडात गेल्याची अनुभूती येते. १५ फूट लांबीचे प्रवेशद्वार ओलांडून गेल्यानंतर आत चार प्रशस्त खोल्या नजरेला पडतात. कोरीव-रेखीव अशी सिंहासन पद्धतीची बैठक आहे. प्रत्येक खोलीत पाषाणी समई नजरेस पडतात. देखणी जलकुंडे आहेत. स्नानगृहाचीही गुहेत व्यवस्था आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देवघरात महादेवाची पिंडी बसविण्यात आली आहे. या गुहेकडे ज्याप्रमाणे वैभववाडी तालुक्‍यातून जाता येते, त्याप्रमाणे गगनबावडा-असळज (जि. कोल्हापूर) येथूनही रस्ता आहे. 

सिंधुदुर्ग किल्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख मालवण येथील शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरून निर्माण झाली आहे. १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी ४४ एकरमध्ये हा जलदुर्ग बांधला. याच्या आत शिवराजेश्‍वरमंदिर, महाराजांच्या तळहाताचे व पायाचे ठसे, भवानीमाता, शंभुमहादेव, जरीमरी, महापुरुष यांची मंदिरे पाहायला मिळतात. मालवण जेटीवरुन येथे पोहोचतांना जलप्रवासाचा आनंद घेता येतो. याशिवाय मालवण तालुक्‍यात भरतगड आणि भगवंतगड, तारकर्लीचा किनारा, देवबागचा किनारा, चिवला बीच, तोंडवली, आचरा येथील किनारे, सर्जेकोट किल्ला, रामगड, धामापूर तळे, आचऱ्यातील रामेश्‍वराचे मंदिर आदी पर्यटनस्थळे पाहता येतात.

मच्छिंद्रनाथांची तपोभूमी
मुंबई-गोवा महामार्गा दरम्यान कुडाळ-भंगसाळ नदीकडून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर देवडोंगरावर मच्छिंद्रनाथांची तपोभूमी आहे. झाडावेलींनी बहरलेल्या वेडीवाकडी वळणे असणाऱ्या या तपोभूमीत दुपारच्या वेळेत गेलो तरी शांत, थंडावा अनुभवता येतो. देवडोंगराचा भाग हा आंबडपाल गावात येतो. हे गाव शंकराचार्यांना इनाम देण्यात आले आहे. अगदी कालपर्यंत शंकराचार्यांच्या आश्रमाकडून शेतसारा नेण्यात यायचा.  

विजयदुर्ग किल्ला
जिल्ह्यातील जुना आणि तुलनेत सुस्थितीत असलेला किल्ला म्हणून विजयदुर्गकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील सगळ्यात जुन्या किल्ल्यामध्ये गणना होणाऱ्या विजयदुर्गने अनेक स्थित्यंतरे अनुभवली. याच्या तटबंदीवर झालेल्या हल्ल्यांच्या पाऊलखुणा आजही पहायला मिळतात. थेट किल्ल्यापर्यंत मोटार जाण्याची व्यवस्था येथे आहे.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या