शहरांची असह्य घुसमट

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

कव्हर स्टोरी
 

भारतातील अनेक मोठ्या शहरांसाठी हवा प्रदूषण धोकादायक पातळीच्याही वरपर्यंत वाढण्याचा काळ म्हणजे नोव्हेंबर - डिसेंबरचा कालखंड! याही वर्षी देशातील अनेक महानगरं त्याच दिशेनं वाटचाल करू लागली आहेत. दिल्ली हे या आपत्तीचं प्रातिनिधिक शहर म्हणून जगभरात याआधीच प्रसिद्ध झावलं आहे. महानगरांच्या हवेत साचणारे धूर आणि धुळीचे कण अभिशाप बनून लक्षावधी लोकांसमोर आरोग्याचं मोठं संकट उभं करीत आहेत. 

दिल्ली हे आज जगभरात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून ओळखलं गेलं आहे. एका अंदाजानुसार दिल्ली शहरात दरवर्षी अकरा हजारापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. २०१३-१४ पासून वाहनांचं वाढतं प्रमाण, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामं आणि आजूबाजूच्या शेतजमिनीत तृण जाळण्याच्या घटना (Stubble burning) यामुळं प्रदूषणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दिल्लीत २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराच्या तरंगत्या घनपदार्थांचं (Suspended Particulate Matter) प्रमाण १ घन फूट हवेत १५३ मायक्रोग्रॅम इतकं  प्रचंड असतं. हे प्रमाण ६० मायक्रोग्रॅम एवढंच अपेक्षित आहे. यामुळं शहरात नागरिकांच्या श्वसनाच्या तक्रारींत मोठी वाढ तर झाली आहेच, शिवाय तापमानात चढउतार होत राहणं, दृश्यमानता (Visibility) कमी होणं, हवाई वाहतूक बंद पडणं आणि प्रदूषित हवेमुळं शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्याचे प्रसंग या घटनांतही वाढ होतेच आहे. 

यावर्षी पूर्व दिल्लीत एक ऑक्टोबरला १० मायक्रोमीटरपेक्षा जास्त आकाराच्या कणांची पातळी दर घनमीटरला २०० मायक्रोग्रॅम इतकी, म्हणजे प्रदूषण नियंत्रण खात्यानं निश्चित केलेल्या पातळीनुसार ती वाईट होती! २०१६ मध्ये दिल्लीतील २० टक्के वाहनं २.५ मायक्रोमीटर आकाराच्या प्रदूषकांची पातळी वाढायला जबाबदार असल्याचं दिसून आलं होतं. मागच्या वर्षी २०१८ मध्ये त्यात ४० टक्क्यांनी वाढ झाली होती. यावर्षी ११ ते १५ नोव्हेंबर या काळांत हे प्रमाण दर घनमीटरला ४५८ मायक्रोग्रॅम, तर १६ नोव्हेंबरला ते ५४८  मायक्रोग्रॅम इतके प्रचंड होते. दिल्लीमध्ये हवा प्रदूषणाची ही पातळी इतक्या धोकादायक अवस्थेला पोचली आहे, की दृश्यता कमी झाल्यामुळं होणारे रस्त्यांवरचे अपघात, विमानांची उड्डाणं रद्द होण्याच्या घटना यात दरवर्षी वाढच होत आहे. दिल्ली हे शहर एक मोठं ‘गॅस चेंबर’ झालेलं आहे. 

तीन डिसेंबर २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय संघाच्या खेळाडूंनी मास्क लावून क्रिकेट खेळ खेळण्याचा अभूतपूर्व प्रसंग नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत - श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत रविवारी घडला होता ते अनेकांना आठवत असेलच. यावर्षीही बांगलादेशाबरोबरच्या खेळाच्या पहिल्याच दिवशी अतिप्रदूषणामुळं अशीच वेळ येऊन ठेपली होती. अशा प्रकारामुळं दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाबद्दलचा खूपच वाईट आणि वेदनादायक संदेश सगळ्या जगात यावर्षी पुन्हा एकदा पोचला. 

भरपूर झाडांची लागवड, ‘सीएनजी’वर धावणारी वाहनं, पर्यावरण हितैषी दिल्ली मेट्रोची सुरुवात, सम-विषम तारखेला केवळ तशाच क्रमांकांची वाहनं रस्त्यावर आणण्याची सक्ती  असे प्रयत्न होऊनही शहरातील मोटारगाड्यांची वाढती संख्या, वाढती बांधकामं आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागाकडून शहराकडं वाहात येणाऱ्या धुराचं वाढतं प्रमाण यामुळं हे संकट कमी होण्याची लक्षणं नाहीत. 

दिल्लीप्रमाणंच ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा), शांघाय, बीजिंग (चीन), लंडन (यूके), ग्लासगो, एडिनबर्ग (स्कॉटलंड), मेक्सिको सिटी, सॅंटियागो (चिली), तेहरान (इराण), लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया), उल्लून बाटर (मंगोलिया), कालीमंतान (आग्नेय आशिया) अशी अनेक जागतिक शहरं आज या विळख्यात सापडली आहेत. भारतातही पाटणा, ग्वाल्हेर, रायपूर, अहमदाबाद, कानपूर, आग्रा अशी अनेक शहरंही या समस्येनं बाधित आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर इथंही परिस्थिती जवळपास तशीच आहे. हे चित्र आता केवळ भारतापुरतंच मर्यादित राहिलं नसून जगातील अनेक शहरं या विषारी हवा प्रदूषणाचा सामना करीत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार शुद्ध हवेचे सगळे मापदंड ओलांडल्यामुळं  बऱ्याच शहरातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त जनसंख्या यामुळं श्वसनविकारांनी बाधित होत चालली आहे. 

हवेच्या या प्रदूषणाचा इतिहास पाहता असं लक्षात येतं, की माणसानं जेव्हा आगीचा शोध लावला आणि आगीचा उपयोग लाकूडफाटा जाळण्यासाठी सुरू केला तेव्हाच हवेच्या मानवनिर्मित प्रदूषणाला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू अशा जळण्यातून तयार झालेला धूर दाट लोकसंख्येच्या नागरी वस्त्यांवर तरंगताना दिसू लागला. औद्योगिक क्रांतीनंतर तर कोळसाही जाळला जाऊ लागल्यावर प्रदूषणाचं हे संकट आणखीनच गडद होत गेलं. 

इ. स. १८५० च्या सुमारास लंडन शहरावर कोळशाचा धूर आणि धुके (Pea Soup) याच्या प्रचंड मोठ्या काळ्या दाट थरानं शहर काळवंडून जाऊ लागलं. यानं अनेकांचे बळीही घेतले. यावरूनच १९११ च्या सुमारास या प्रदूषण प्रकाराला स्मॉग (smog) म्हणजेच धूरधुके किंवा धुरके असं नाव दिलं गेलं. धूरधुकं हे एकप्रकारचं दृश्य स्वरूपातलं प्रदूषण असून ते नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर ऑक्साइड, ओझोन, कार्बन मोनॉक्साईड आणि धूर यांचं मिश्रण असतं. आजकाल वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळं या प्रदूषणात मोठीच भर पडत आहे. औद्योगिक शहरातील हवेत कारखान्यातील धुरामुळं जलशोषक अणूंचं प्रमाण जास्त असतं. यामुळं सांद्रीभवन होऊन मोठ्या प्रमाणात काळपट धूरधुक्याची निर्मिती होते. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतरही बाहेर पडणाऱ्या सल्फर डायऑक्साइड व इतर सूक्ष्म कणांमुळं असं धूरधुकं तयार होतं. याला व्हॉग (vog) असं म्हटलं जातं.

हे प्रदूषण कमी करण्याच्या अथक प्रयत्नांनंतर लंडन शहर कोळशाचा धूर आणि धुकं यापासून मुक्त झालं. पण आधुनिक काळात वाहनांतून होणाऱ्या धुराच्या उत्सर्जनामुळं प्रदूषणाचं प्रमाण पुन्हा वाढू  

लागलं आहे. अमेरिकेतील पिट्सबर्ग, पेनसिल्वानिया, सेंट लुई, मिसूरी अशा अनेक शहरांत आज दिवसाही वाहनं हेडलाईट लावून चालवावी लागताहेत. १९४८ मध्ये पेनसिल्वानियातील डोनोरा शहरात आजूबाजूच्या डोंगरांनी बंदिस्त केलेल्या दरीत ५ दिवस साठून राहिलेल्या धुक्यात शहरातील स्टीलचे आणि झिंक वितळवणारे कारखाने आणि सल्फ्युरिक ॲसिडचे प्लांट यांनी हवेत सोडलेली प्रदूषकं मिसळली गेली व हजारो माणसं बाधित झाली. त्यानंतर आलेल्या ‘क्लीन एअर ॲक्ट’च्या सक्तीमुळं हे प्रमाण सगळीकडंच एकदम कमी झालं. 

हवेच्या प्रदूषणाची पातळी प्रामुख्यानं कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड, नायट्रिक व नायट्रोजन ऑक्साइड, मिथेन, क्लोरोफ्लुरोकार्बन आणि हवेत तरंगणारे सूक्ष्म घन पदार्थ व द्रवरूपी थेंब यामुळं वाढत असते. 

मोठमोठ्या शहरांवर आजकाल प्रकाशरासायनिक धूरधुकं (Photo chemical smog) व औद्योगिक धूरधुकं (Industrial  smog) अशा २ मुख्य प्रकारच्या धूरधुक्याचे प्रचंड थर आढळून येत आहेत. वर सांगितलेल्या सर्व प्रकारच्या प्रदूषकांत सूर्यप्रकाशामुळं होणाऱ्या परस्परक्रिया ज्या धूरधुक्याच्या निर्मितीस कारण होतात, त्यास प्रकाशरासायनिक धूरधुकं म्हटलं जातं. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळं पिवळसर तपकिरी रंगाचा नायट्रोजन ऑक्साइड तयार होतो. मोठ्या शहरांत सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशानंतर दुपारपासूनच या पिवळसर तपकिरी धूरधुक्याचा थर दिसू लागतो. यामुळं डोळ्यांची आग होऊन ते चुरचुरू लागतात. भरपूर ऊन अनुभवणाऱ्या उबदार व कोरड्या हवेच्या नागरी वस्त्यांवर प्रकाशरासायनिक धूरधुक्याचा प्रभाव जास्त असतो. 

थंडीच्या दिवसात दिल्लीसारख्या औद्योगिक शहरातील लोकांना सल्फर डायऑक्साईडमुळं तयार झालेल्या सल्फ्युरिक ॲसिडच्या तरंगत्या कणांमुळं व उडणारी राख, परागकण, सिमेंटची धूळ, गिरणीतील पीठ पदार्थ, कोळशाची राख व रंगद्रव्यं अशा सूक्ष्म तरंगत्या पदार्थांमुळं (Aerosols) तयार झालेल्या धूरधुक्याचा सामना करावा लागतो. चीन, भारत, युक्रेन व काही पूर्व युरोपियन देशात जिथं प्रदूषण नियंत्रणाचा फारसा प्रयत्न केला जात नाही, तिथं मोठ्या प्रमाणावर कोळसा ज्वलनामुळं अशा प्रकारच्या धूरधुक्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. 

साधारण २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान आकाराचे, आगीतून आणि डिझेल ज्वलनातून हवेत पसरणारे कण वातावरणात बराच काळ तरंगत राहतात आणि माणसांच्या फुप्फुसांत  सहज प्रवेश करतात. 

कोळसा, लाकडं यांच्या ज्वलनातून आणि धुळीची वादळं, जंगलातील आगी याचबरोबर भारतातील डोंगराळ भागांतील सखल दऱ्याखोऱ्यांत अशी प्रदूषित हवा मोठ्या प्रमाणावर साठविली जाते. शेताची भाजावळ (क्रॉप बर्निंग), बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारी प्रचंड धूळ यांचाही यात हातभार असतोच. 

शहरांच्याबरोबर प्रदूषणाचं हे लोण आता शहरांच्या जवळ असलेल्या खेड्यांच्या दिशेनं सरकलं आहे. २०१५ मध्येच खेड्यातील ७५ टक्के मृत्यू हे याच कारणांमुळं झाल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. शेणाच्या गोवऱ्या, लाकूड यांच्या जाळण्यातून उत्पन्न होणारे प्रदूषित वायू याला कारणीभूत होते असे ही माहिती सांगते. शेतात केलेल्या भाजावळीमुळं  दिल्ली, मुंबई, चेन्नईसारख्या महानगरांच्या दिशेनं जो धूर पसरतो, त्यातून ही प्रदूषकं शहरातील बांधकामांची धूळ, वाहनातून बाहेर पडणारा धूर, फॅक्टरी आणि इतर उद्योगांतून सोडला जाणारा धूर यात मिसळून जातो. चुलींच्या वापरातून भारतात २५ टक्के हवा प्रदूषण होते. शहरांजवळच्या वीटभट्ट्याही याला हातभार लावतातच. 

एका सर्वेक्षणानुसार, भारतातील विषारी वायू प्रदूषणाची ही समस्या नक्कीच फार जुनी आहे. आजकाल प्रत्येक शहराभोवती आणि आजूबाजूच्या भागांत हे वायुप्रदूषण मोजण्याचं प्रमाण वाढल्यामुळं ते लक्षात येऊ लागलं आहे इतकंच. प्रदूषण मोजण्याचं हे प्रमाण सगळीकडे जसजसं वाढेल तसं भारतातील आणखी अनेक ठिकाणांनी ही पातळी यापूर्वीच गाठली असल्याचंही लक्षात येण्याची शक्यता आहे. 

शहराचा भूगोल, भूरूपिकी (Geomorphology), हवामान, लोकसंख्येची घनता, औद्योगिक संकुलांची संख्या, छोट्या मोटारी व ट्रक यांची संख्या आणि इंधनांचा वापर अशा सगळ्याच गोष्टींवर हवाप्रदूषणाचं प्रमाण ठरतं. जिथं पर्जन्यवृष्टी किंवा हिमवृष्टी जास्त असते अशी शहरं मात्र नैसर्गिकदृष्ट्या या प्रदूषणातून मुक्त असतात. समुद्रकिनारी असलेली शहरंही या बाबतीत थोडी जास्त नशीबवान असतात. कारण जमिनीकडून समुद्राकडं वाहणाऱ्या हवेतील तरंगती प्रदूषकं, समुद्राकडून येणाऱ्या खारट समुद्री हवेच्या फवाऱ्यामुळं नष्ट केली जातात. किनाऱ्यांवर उंच इमारती असल्या, तर मात्र हा परिणाम थोडा कमी दिसतो. जिथं वारे जास्त वेगानं वाहतात, तिथंही हवेतील प्रदूषकं इतरत्र वाहून नेली जातात. मात्र ज्या दिशेनं ती वाहत जातात, त्या बाजूकडील ठिकाणं प्रदूषणग्रस्त होतात. 

मोठ्या शहरांतील उंच इमारतींमुळं वाऱ्याचा वेग रोखला जातो आणि हवेतील प्रदूषकं तिथंच घुटमळत राहतात. डोंगराळ प्रदेशातील नागरी वस्त्यांतही सखल भागात प्रदूषकं साचून राहतात. ती इतरत्र पसरू शकत नाहीत. तापमानाच्या विपरिततेमुळं (Temperature Inversion) धुकं व त्याबरोबर प्रदूषकंही दरीत साचतात आणि प्रदूषण पातळीत वाढ होते. अनेक पर्यावरणवाद्यांच्या मते नागरीकरण (Urbanization) ही खरं म्हणजे समस्या नसून नागरी वस्त्यांची सर्व दिशांनी होणारी वाढ (Urban Sprawl) ही समस्या आहे. यामुळं आजूबाजूच्या मोठ्या ग्रामीण, प्रदूषणविरहित, स्वच्छ परिसराचा ऱ्हास होण्याची शक्यता वाढत असते. 

दिल्लीसारखी शहरं अधिक शुद्ध, स्वच्छ हवेची, प्रदूषणमुक्त व जगण्यासाठी योग्य बनवणं हे खरं तर या समस्येचं योग्य उत्तर आहे. यासाठी शहरांचं पर्यावरणहितैषी अशा ‘ग्रीन सिटी’ किंवा ‘इको सिटी’मध्ये रूपांतर करणंही आता गरजेचं आहे. अशा शहरात मुख्य भर हा प्रदूषणावर पूर्ण नियंत्रण, कचरानिर्मितीत घट आणि सौर शक्ती वापरून त्याचा पुनर्वापर यावर असावा. शहरातील व आजूबाजूच्या प्रदेशातील जैवविविधतेचं रक्षण करणं व त्यात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणं या गोष्टींनाही इथं प्राधान्य हवं. ही शहरं लोकाभिमुख हवी, ती वाहनाभिमुख (car oriented) नसावी. 

मुंबई, कोलकाता, चेन्नई यासारख्या किनाऱ्याजवळच्या शहरांतील खाड्या, नद्या वारंवार स्वच्छ करून, त्यांच्या पर्यावरणाची सुधारणा किंवा पुनर्निर्मिती; तसंच दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू अशा शहरांच्या नदीपर्यावरणात सुधारणा, वृक्षांची भरपूर लागवड, टेकड्यांच्या पर्यावरणाची सुरक्षितता आणि शहराच्या सर्व दिशांनी वाढणाऱ्या सीमेवर नियंत्रण, असे अनेक उपाय प्रदूषण नियंत्रणाच्या संदर्भात अभ्यासकांनी मांडले आहेत. 

‘इको सिटी’चे यशस्वी प्रयोग या आधीही अनेक ठिकाणी झालेत. ब्राझीलमधील क्युरिटिबा, न्यूझीलंडमधील वैताकेरी, फिनलंडमधील टॅपिओला, ओरेगॉनमधील पोर्टलॅंड आणि कॅलिफोर्नियातील डेव्हिस अशी अनेक उदाहरणं देता येतील. यातील अनेक इकोसिटिजमध्ये प्रदूषण नष्ट करण्यात उत्तम सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा खूप मोठा हातभार आहे. स्वच्छ, स्वस्त, सोयीस्कर, सक्षम व पुरेशी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा शहराला हवेच्या प्रदूषणापासून किती चांगल्या प्रकारे मुक्त करू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ब्राझील या विकसनशील देशातील क्युरिटिबा हे शहर होय. 

दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई, पुणे, बंगळुरू अशा सर्वच शहरांतील वाढत्या प्रदूषण समस्येवर अशा तऱ्हेचाच उपाय करणं योग्य ठरेल. शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी जगात इतरत्र झालेले प्रयोग आपल्याकडं जसेच्या तसे लागू करता येतील असं मुळीच नाही. आपल्या शहरांचा भूगोल, इतिहास, वाढ आणि विकास व पर्यावरण हे सगळं इतकं वेगळं आहे; त्या प्रत्येकाचा विचार करूनच आपल्याला अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय शोधावे लागतील. परदेशातून आणून आपल्याकडं चालू केलेल्या अनेक वाहतूक योजनांचा आपल्या शहरांत कसा बोजवारा उडाला आहे ते आपण पाहतोच आहोत. 

आपल्याकडची बरीचशी शहरं मुळातच कुठलंही नगरनियोजन नसताना वाढली. वेड्यावाकड्या पद्धतीनं आणि जागा मिळेल तशी आणि तिथं वाढलेल्या शहरांत उपाय शोधण्याची गरज आहे आणि ते शोधायला निश्चितच अजूनही अनेक संधी आहेत. वर्षागणिक वाढणारी वाहनसंख्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारी अनिर्बंध बांधकामं यावर नियंत्रण ठेवलं, तरी दिल्ली आणि अर्थातच पुणे, मुंबईसारख्या शहरातील समस्या कमी करता येतील. लोकांची मानसिकता बदलणं आणि त्यांचं सहकार्य शहर विकासाच्या व प्रदूषण निर्मूलनाच्या सर्व चांगल्या योजनांना मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं! ते झालं तर भविष्यात आपणही अनेक प्रदूषणविरहित, स्वच्छ, सुंदर ‘इको सिटीज’ नक्कीच तयार करू शकू यात शंका नाही.   

संबंधित बातम्या