खेळू आनंदे...

इरावती बारसोडे 
सोमवार, 29 एप्रिल 2019

सुटी विशेष

रविवार दुपारची वेळ. सुटीचा वार असल्यामुळं सारं कसं शांत शांत होतं. पण ही शांतता फार काळ टिकली नाही. बाहेरून ‘दरवेळी मीच का अंपायर? याला काय अर्थ आहे?’, ‘अरे आत्ता हो, पुढच्या वेळेस पहिली बॅटिंग तुला.’ असले काहीतरी संवाद ऐकू आले. पाठोपाठ आणखी तीन-चार आवाज त्या संवादात मिसळले. मग नुसताच आरडाओरडा ऐकू येऊ लागला. साहजिकच मुलांची शाळा संपून उन्हाळ्याची सुटी सुरू झाल्याचा आवाज होता तो. गॅंग बहुदा क्रिकेटसाठी दोन टीम्स पाडण्यात मग्न होती. मुलं बाहेर खेळतायत बघून बरं वाटलं. त्यांच्याकडं बघून मन नॉस्टॅलजियात हरवून गेलं. 

उन्हाळ्याची सुटी जास्त आवडती होती, कारण एकतर मोठी असायची आणि मुख्य म्हणजे त्या सुटीत दिवाळीच्या सुटीसारखा अभ्यास नसायचा. आख्खा दिवस नुसता हुंदडण्यात नाहीतर काहीतरी खेळण्यात जायचा. खेळ तरी किती प्रकारचे असायचे. लपंडाव, डबडा ऐसपैस, लगोरी, विशामृत, पकडापकडी, शिरापुरी, मधलं माकड, आंधळी कोशिंबीर, डोंगराला आग लागली, तळ्यात मळ्यात, खो-खो... एक ना अनेक! सुटीमध्ये एका ठराविक कुठल्या खेळाला पसंती नसायची. हमखास सगळे खेळ खेळले जायचे, कारण वेळ भरपूर असायचा ना. लपंडाव हा माझा सगळ्यात आवडीचा खेळ. एकानं राज्य घ्यायचं, बाकीच्यांनी लपून बसायचं. मला लपायला फार आवडायचं. आमच्या सोसायटीला दोन फाटकं होती. आमचं लपणं म्हणजे एका फाटकातून बाहेर पडून सोसायटीला प्रदक्षिणा घालून दुसऱ्या फाटकानं आत यायचं. राज्य असलेला गडी बिचारा खूप वेळ शोधत बसायचा. पकडापकडी, एकानं राज्य घ्यायचं आणि बाकीच्यांनी पळायचं. आंधळी कोशिंबीरमध्ये ज्याच्यावर राज्य असेल, त्याला आंधळं करायचं म्हणजेच त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधायची आणि तो इतरांना पकडायचा. चुकून घरात हा खेळ खेळला, तर राज्य असलेला पकडायचा कमी आणि अडखळून पडायचा जास्त. विशामृत काय किंवा डबडा ऐसपैस काय, हे सारेच खेळ धावपळीचे, पळापळीचे. खेळ तेच पण त्यांची नावं थोडी वेगवेगळी असायची. यातला कुठलाच खेळ एकट्यानं खेळण्यासारखा नाही. खेळगडी जेवढे जास्त, तेवढी मजाही जास्त यायची. त्यामुळं नेहमीच बरोबर मित्र-मैत्रिणी असायचे. एखादा कोणी नाही आला तरी फरक पडायचा नाही, कारण टोळी मोठी असायची. नाश्‍ता झाला, की सकाळी खेळाचा एक हप्ता व्हायचा. मग जेवून पुन्हा बाहेर पडायची इच्छा असायची, पण दुपारी बाहेर उन्हात खेळू नका म्हणून ओरडा बसला, की याच्या घरातून त्याच्या घरात भ्रमंती सुरू व्हायची आणि सुरू व्हायचे बैठे खेळ. सापशिडी, ल्युडो, व्यापार, कॅरम, राजा-राणी-चोर-शिपाई आणि अगदी नाव-गाव-फळ-फूलसुद्धा! हल्लीच्या मुलांना हा खेळ माहिती नसेल कदाचित. मराठीमधलं एक अक्षर घेऊन त्या अक्षरापासून सुरू होणारं नाव, गाव, फळ, फूल, प्राणी, पक्षी, वस्तू, सिनेमा इत्यादी गोष्टी कागदावर लिहायच्या. ज्याला येणार नाही, त्याला गुण मिळणार नाहीत. खेळाच्या शेवटी ज्याचे गुण सर्वांत जास्त तो जिंकला. साधा, सोपा खेळ. खेळताना नकळत बुद्धीला चालनाही मिळायची. घरबसल्या खेळायचा आणखी एक लोकप्रिय खेळ म्हणजे पत्ते. त्यामध्ये भिकार सावकार, गड्डा झब्बू, बदाम सात, रमी, नॉटॅठोम (खरं नाव नॉट ॲट होम, पण लहानपणी ‘नॉटॅठोम’ हेच बरोबर वाटायचं.) हे ठरलेले खेळ. ‘उनो’ आत्ता आला. तेव्हा असता, तर तोही नक्कीच खूप खेळलो असतो.

थोडक्‍यात काय, तर आमचा सुटीतला बहुतांश वेळ घराबाहेर आणि उरलेला वेळ घरात टिवल्याबावल्या करण्यातच जायचा. आमची नव्वदीच्या दशकातली पिढी. त्यामुळं घरी बसून मोबाईलवर गेम खेळणं, व्हिडिओ गेम खेळणं हा प्रकार तेव्हा अस्तित्वात नव्हता. बाहेर खेळायचो त्यामुळं आपसूक व्यायाम व्हायचा, वेगळा व्यायाम करण्याची गरज भासायची नाही. खेळून दमायचो आणि जबरदस्त भूकही लागायची. मग, समोर येईल ते चविष्ट लागायचं. तेव्हा कळालं नाही, पण एकत्र खेळायचो त्यामुळं तेव्हापासून संघभावना निर्माण होत गेली. सुटीचा खेळ म्हणजे फक्त मनोरंजन नव्हतं, तर त्याचे फायदेही खूप होते. अर्थात तेव्हा फायदे वगैरे कळण्याएवढी अक्कल नव्हती. खेळताना मजा यायची हे महत्त्वाचं!

आताच्या मुलांना मोबाईल आणि व्हिडिओ गेम्समध्ये जास्त मजा वाटते. या मुलांना तंत्रज्ञानामुळं जग खुलं झालंय. सारं काही बोटांच्या टोकावर मिळतं. मोबाईल ही गोष्ट खूपच कॉमन. व्हिडिओ गेम्सचं प्रस्थही खूप वाढलं. माझा भाऊ आताच दहावीत गेला. त्यालाही व्हिडिओ गेम्सची प्रचंड आवड. त्या दिवशी तो कॉम्प्युटरवर कसलातरी मारामारीचा खेळ खेळत होता. त्याला विचारलं, ‘का रे बाबा, एवढे का आवडतात तुला व्हिडिओ गेम्स?’ ‘का म्हणजे, मजा येते,’ एवढं बोलून तो पुन्हा स्क्रीनकडं वळाला. खरंच काय असतं एवढं व्हिडिओ गेम्समध्ये? मोबाईल आणि कॉम्प्युटर अशा दोन्ही यंत्रांवर खेळता येतील असे चिक्कार गेम्स आता उपलब्ध आहेत. त्यातही शूटिंग, रेसिंग, रोल प्लेईंग, फॅमिली फ्रेंडली, पझल्स असे अनेक प्रकार आहेत. काही ऑनलाइन खेळावे लागतात, काही ऑफलाइन खेळता येतात. एकट्यानेही खेळता येतात आणि ग्रुपमध्येही खेळता येतात. ग्रुपमध्ये खेळायचं असलं तरीही उठून दुसऱ्याकडं जाण्याची गरज नाही. प्रत्येकानं स्वतःच्याच घरात बसून एकाच वेळी ऑनलाइन आलं की झालं. पब्जी (प्लेअर अननोन्स बॅटल ग्राउंड), क्रॉस फायर, बुलेट फोर्स, ब्रदर्स इन आर्म्स, फॉरवर्ड ॲसल्ट हे सगळे शूटिंग आणि फायटिंग कॅटॅगरीमधले खेळ. त्यामुळं त्यांच्या नावातच बॅटल ग्राउंड, बुलेट, ॲसल्ट असे शब्द आहेत. मारामारी हेच या खेळांचं मूळ. पण मुलांना ही व्हर्च्युअल मारामारी जाम आवडते. पब्जी खेळ तर एकाच सर्व्हरवरून १०० लोक खेळू शकतात. या खेळांचा दृश्‍य प्रभाव (व्हिज्युअल इफेक्‍ट) इतका वास्तववादी असतो, की आपण खरोखर युद्धभूमीवर आहोत, असं वाटायला लागतं. याच कारणामुळं हे खेळ स्क्रीनसमोर मुलांना खिळवून ठेवतात. मुलींमध्ये व्हिडिओ गेम्स खेळण्याचं प्रमाण अगदी नगण्य दिसतं. मुलांमध्ये अशा खेळांची ‘क्रेझ’ जास्त आहे.

फक्त मारामारीचेच व्हिडिओ गेम्स आहेत असं नाही. नीड फॉर स्पीड, रिअल रेसिंग यांसारखे रेसिंग गेम्सही भरपूर आहेत. मुलांना तेही खूप आवडतात. या खेळांचा मूळ हेतू रेसिंग. त्यासाठी हव्या त्या मॉडेलची गाडी हव्या त्या रंगामध्ये निवडता येते. रेसिंगसाठीचा मार्गही निवडता येतो. प्रत्येक खेळाचे फीचर्स वेगवेगळे असतात. फॅमिली फ्रेंडली व्हिडिओ गेम्समध्ये हिंसा नसते. मुलांमध्ये एखाद्या खेळाची ‘क्रेझ’ किती काळ टिकेल काही सांगता येत नाही. काल-परवापर्यंत अतिशय प्रेमानं खेळला जाणारा खेळ, दुसरा नवीन खेळ आला की लगेच मागं पडतो. तुम्हाला आठवत असेल, तर अगदी अलीकडेच कॅंडी क्रश, सबवे सर्फर, टेंपल रन अशा गेम्सची खूप क्रेझ होती. प्रत्येकाच्या स्मार्ट फोनमध्ये हे खेळ असायचेच (काही जणांकडं अजूनही असतील.) आणि मुलंही आई-बाबांचे फोन घेऊन खेळत बसायची. ‘थोडाच वेळ खेळतो,’ म्हणून सुरू झालेला खेळ कधी व्यसन बनतो हे ना मुलांच्या लक्षात येत ना पालकांच्या. 

व्हिडिओ गेम्समुळं तसा शारीरिक, मानसिक फायदा काहीच होत नाही. डोळे मात्र खराब होऊ शकतात. या खेळांमुळं आभासी दुनियेत काही काळ विरंगुळा होतो एवढंच. पण काही काळच. त्याचं व्यसनात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. मुलं लहान असतात, त्यांना स्वतः भलंबुरं कळत नाही. ही सगळी ‘आभासी दुनिया’ आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. आपण किती वेळ व्हिडिओ गेम खेळावा, याचं बंधन ती स्वतःवरच घालू शकत नाहीत. अशा वेळी पालकांनी कठोर व्हायला हवं. त्याचा त्याचा खेळतोय ना, त्रास देत नाहीये ना, मग झालं तर, अशी भूमिका घेऊन चालणार नाही. मुलांनी जास्तीत जास्त बाहेर खेळायला हवं. मित्रांमध्ये मिसळायला हवं. ही जबाबदारी पालकांचीच! 

संबंधित बातम्या