छोटे दोस्त काय करतात?

मधुरा कुवळेकर, ऋता सप्तर्षि, अद्वय धनवे-पाटील, शताक्षी वनारसे, त्रैगुण्य भाले
सोमवार, 29 एप्रिल 2019

सुटी विशेष

वार्षिक परीक्षा संपली आणि चिल्लर पार्टीचे सुटीचे प्लॅन तयारही झाले...!
सुटीतला वेळ सार्थकी लावण्यासाठी मुलांना सुटीत काय काय अन कित्ती कित्ती करायचं आहे, कोणाला रंगकाम करायचं आहे, तर कोणाला ट्रेकिंग करायचं आहे, कोणी त्यांच्या चित्रांविषयी लिहीलं आहे, तर कोणी आवडत्या पुस्तकाविषयी... तर त्यांच्या प्लॅन्सविषयी वाचा त्यांच्याच शब्दांत...!

चित्रकलेतून विरंगुळा
मधुरा कुवळेकर (सहावी)
प्रत्येकाला काहीना काही छंद असतात. माझे छंद पियानो वाजवणं, चित्र काढणं, बॅडमिंटन खेळणं, पुस्तक वाचणं हे आहेत. पण माझा सर्वांत आवडता छंद चित्रकला आहे. मला लहानपणापासूनच वेगवेगळी चित्रं काढायला आवडतं. मी अगदी लहान असल्यापासून आई-बाबा मला रंगीत खडू, पेन्सिल्स, वॉटर कलर्स, वेगवेगळे ब्रश, पॅलेट्‌स, पुस्तकं आणून देतात. त्यामुळं मला प्रोत्साहन मिळतं. रेघोट्यांपासून सुरुवात झाली, मग हळूहळू बघून बघून चित्र काढण्याचा प्रयत्न करू लागले आणि आता कल्पनाशक्ती वापरून मी चित्रं काढू शकते. 

मला बऱ्याच प्रकारची चित्रं काढायला आवडतात. वेगवेगळे विषय निवडून त्यावर चित्र काढताना मला नेहमीच मजा येते. पण त्यातल्या त्यात मला प्राण्यांची चित्रं काढायला खूपच आवडतात. प्राणी हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळेच असेल कदाचित. प्राण्यांमधला निरागसपणा मला खूप भावतो. त्यांचे भाव हाताने रेखाटण्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे. थोडीशी अवघड अशी गणपती बाप्पा, देवी, शंकर, मारुती, श्रीकृष्ण, श्रीराम यांची चित्रंही मला काढायला आवडतात. शाळेमध्ये आम्हाला शिकवलेली वस्तुचित्रं काढून रंगवणं मला छान जमतं. मेमरी ड्रॉइंग हा प्रकार मला तितकासा जमत नाही, कारण माणसं काढणं मला तेवढं अजून येत नाही. परंतु, शेडिंग करून रंगवायची चित्रं मला मनाप्रमाणे येतात. निसर्गचित्रं आणि त्यांचं शेडिंग मला प्रचंड आवडतं. हिरव्यागार शेतापासून निळ्याशार समुद्रापर्यंत सगळं काढून रंगवणं मला आनंद देतं. मी आत्तापर्यंत शेडिंग केलेली टी-पॉट, आकाशकंदील, फुलदाणी, मनीमाऊ, फुलांची बाग, शेकोटी, सूर्योदय ही चित्रं सगळ्यांना खूप आवडलेली आहेत. त्यातली बरीचशी चित्रं मी जपून ठेवलेली आहेत. 

मी चित्रकलेच्या स्पर्धा परीक्षाही दिल्या आहेत. त्यासाठी तयारी करताना मला मार्गदर्शक पुस्तकं मिळाली. त्याचा मला खूप उपयोग झाला. त्यातून मी चित्रं बघून बघून काढण्याचा सराव करते. पुस्तकांमुळं मला रंगांविषयी आणि त्यांच्या वापराविषयी भरपूर माहिती मिळाली आहे. इंटरनेटवरून चित्र बघून जशीच्या तशी काढण्याचाही मी सराव करते. कधीकधी अभ्यास करायचा कंटाळा आला, की गंमत म्हणून छोटंस चित्र काढायची मला सवय आहे. 

चित्रं काढताना मी खूप पसारा करते म्हणून मला आई कधीकधी ओरडते. पण माझं चित्र काढणं तिलाही आवडतं हे मला माहिती आहे. चित्र काढली आणि रंगवली, की मला ताजंतवानं वाटतं. रंगवायला सुरुवात केली, की माझं मन एकाग्र होतं. एकदा त्यात गुंतलं, की पूर्ण झाल्याशिवाय मी जागेवरून उठत नाही. माझं लक्ष फक्त आपलं चित्र चांगलं कसं होईल याकडेच असतं. बऱ्याचदा मला हवं तसं ते होत नाही, पण मी परत परत चुका सुधारण्याचा प्रयत्न करते. म्हणतात ना, ‘Practice makes man perfect’ ते अगदी खरं आहे.

मला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकलेच्या परीक्षांनाही बसायची इच्छा आहे. त्यासाठी हाताला चित्रं काढण्याचं वळण असावं लागतं असं म्हणतात. त्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारची चित्रं काढून बघणार आहे. लहानपणी मला डुडल्स बघायला खूप आवडायची पण आता काढताना ते इतकं सोपं नाही हे लक्षात येतं. चित्रकलेमध्ये भूमितीदेखील असते आणि तो विषय परीक्षांमध्ये असतो हे मला नव्यानंच कळालं आहे. मला कोलाजकाम करून चित्रं रंगवायलासुद्धा आवडतं. मला चारकोल पेंटिंग शिकण्याची इच्छा आहे. तसंच मला पोट्रेट ड्रॉइंगसुद्धा शिकायचं आहे.

माझा चित्रं काढताना वेळ छान जातोच, पण माझ्यासाठी हा फक्त विरंगुळाच नाही, तर एक प्रकारचं मेडिटेशन आहे. म्हणूनच एक दिवस जरी चित्र काढलं नाही, तरी मला बेचैन होतं. माझी ही आवडती कला मी जोपासते आणि जोपासतच राहीन. 


इतिहास शिकविणारी सहल
ऋता सप्तर्षि (सातवी)

नोव्हेंबर-डिसेंबरचा महिना म्हणजे दिवाळीची सुटी, सहल, ट्रेकिंग आणि निसर्गात मनसोक्त भटकंती करण्याचा काळ. मागच्या दिवाळीच्या सुटीत आम्ही निसर्गातील निरागसता, निवांतपणा अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या काळ्या-कातर सह्याद्रीतील पर्यटनस्थळाची निवड केली. 
ही सहल माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. कारण या सहलीत नव्हता नेहमीसारखा आरामदायी प्रवास, ना एसी हॉटेलमधला निवास, ना पिझ्झा-बर्गर जंकफूड, ना वॉटर पार्क, ॲम्युझमेंट गेमची धमाल. तर, या सहलीत मला खुणावत होता आपला ‘शिवशौर्याचा साक्षीदार’... रांगडा सह्याद्री!

इतिहासातील प्रसिद्ध पन्हाळा, तसेच कोल्हापूर, सज्जनगड, ठोसेघर धबधबा हे आमच्या सहलीचे डेस्टिनेशन ठरले. आम्ही पहाटेच पुण्याहून निघालो ते थेट सज्जनगडावर येऊन पोचलो. सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींचे दर्शन घेऊन आणि समर्थांची बलोपासनेची महती जाणून घेतल्यावर आम्ही सर्वांनीच रोज नियमितपणे व्यायाम करायचाच असा निश्‍चय केला खरा, पण... ‘रोज’ अजून उजाडायचा आहे. 

गडावरून आम्ही ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी गेलो. ‘भारतातील सर्वांत उंच चौथ्या क्रमांकाचा हा धबधबा,’ गाइडकाका त्याविषयी माहिती सांगत होते. पण मला पुढच्या ठिकाणांची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. ठोसेघर धबधबा पाहून आम्ही संध्याकाळपर्यंत कोल्हापुरात येऊन पोचलो. कोल्हापुरात भटकंती करताना एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. तेथे एका चौकात काही गवळी लोक आपापल्या गाई घेऊन आणि पाच-सहा ग्लास, चरव्या घेऊन थांबलेले दिसले. चौकशी केल्यावर कळले, की तिथे गाईंचे निरसे दूध काढून देतात. अर्थात कोल्हापूरची माती म्हणजे पैलवान-योद्‌ध्यांना घडवणारी. तिथे असा खुराक मिळणे हे ओघाने आलेच की. मग नाक मुरडतच आम्हीही दोन ग्लास दूध घेतले. ‘‘बोर्नव्हिटा पिणाऱ्यांना या अस्सल दुधाची चव काय कळणार?’’ आजी म्हणालीच. 

दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही करवीर निवासिनी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन, आईची शॉपिंग जराशी आवरती घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. महालक्ष्मी मंदिरातून आम्ही थेट पन्हाळ्याकडे प्रयाण केले. 
मग्न तरीही अभंग आम्ही
काळाच्या पलीकडचे आम्ही
शौर्य-पराक्रम इतिहासाचे
सह्याद्रीचे वारस आम्ही।

स्वराज्यातील सर्वांत मोठा आणि विस्तृत असा किल्ला म्हणजे पन्हाळा. अहो पन्हाळ्यावर थोडा थोडका नाही, तर सबंध तालुकाच वसलेला आहे. पन्हाळ्याच्या प्रवेशद्वारावरच बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा पाहिला आणि शिवरायांच्या इतिहासातील पावनखिंडीची गोष्ट झर्रकन माझ्या डोळ्यापुढे आली. पावनखिंड संग्राम म्हणजे तेजस्वी शिवचरित्रातील रोमांचकारी पर्व. पन्हाळ्यावरील अनेक वस्तू आपल्याला इतिहासातील अनेक घटनांची साक्ष देतात. राजा भोज याने चौदाव्या शतकात बांधलेली धान्याची कोठारे, गुप्तमार्ग, सैनिकांच्या संरक्षणार्थ असलेली तीन मजली विहीर, सज्जाकोठी, ताराराणी महाल, राजदिंडी मार्ग आणि सुंदर, प्रेरणादायी संभाजीराजे मंदिर. सगळे किती सुंदर, भव्य आणि कल्पनातीत. पन्हाळा पाहाताना आणि गाइडकाकांकडून इतिहास ऐकताना तहान-भुकेचा विसर पडला होता, पण जेवण करणे तर गरजेचे होते. मग तिथेच झुणका भाकर आणि ताज्या ताकाची मेजवानी झाली. खरं सांगू, हे जेवण मला त्यावेळी पिझ्झापेक्षाही खूप खूप चविष्ट लागले. 

पन्हाळ्याहून परत कोल्हापूर आणि कोल्हापूरहून पुण्याला परतताना या सहलीतून मी काय मिळवले? कोणती अशी ठेव जी मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, अशा विचारात होते. 

मला वाटतं, या सहलीनं मला जबाबदारीचं भान दिलं. आपल्या संस्कृतीची अलौकिक परंपरेची साक्ष देत उभे असणाऱ्या या गडकोट, किल्ल्यांचे, ऐतिहासिक वास्तूंचे, वारसास्थळांचे जतन संवर्धन करण्याची जबाबदारी आता आपलीच नाही का?

माझी ही सहल अविस्मरणीय ठरली. कारण बऱ्याच गोष्टी मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवल्या होत्या. पहिल्यांदाच घेतला होता रानमेव्यांचा आस्वाद. पहिल्यांदाच चाखली होती निरशा दुधाची चव. पहिल्यांदाच अनुभवला होता सह्याद्रीच्या किर्र जंगलातील जिवंतपणा आणि अनुभवली होती हिंदवी स्वराज्याची अभेद्यता, पन्हाळ्याच्या भेटीत! 

मित्रांनो, ही सहल मी माझ्या मनाच्या कुपीत जपून ठेवलीय. कारण या सहलीमुळे मी इतिहास अनुभवायला शिकले. डोळसपणे सभोवती बघायला शिकले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘मी मराठी आहे’ हे अभिमानाने सांगायला शिकले.


सिंहगड माझा सखा
अद्वय धनवे-पाटील (सहावी)

मी  शनिवार आणि रविवार डान्स क्‍लासला जात होतो. त्यामुळे माझा ट्रेक व्हायचा नाही. पण मग माझ्या पप्पांनी एक युक्ती सुचवली, की आपण सिंहगडावर शनिवारी सकाळी पाच वाजता जात जाऊ. त्या शनिवारी आम्ही पहिल्यांदाच सकाळी ४.३० ला उठलो आणि सिंहगडावर टू व्हीलरवर गेलो. आता दर शनिवारी जातो. निघताना मी ट्रेकिंगची बॅग पॅक करतो. बागेत एक पाण्याची बाटली, एका डब्यात थोडी बिस्किटे आणि खजूर घेतो. आम्ही पायथ्याला ५.३० ला पोचतो आणि मग किल्ला चढायला सुरुवात करतो. जाताना अंधार असतो. आमच्याकडे मोबाईलची बॅटरी असते. काही ठिकाणी अवघड दगडांचे बनलेले शॉर्ट-कट आहेत पण पप्पा माझ्या मागे असतात, मग काही वाटत नाही. गडाच्या अर्ध्यापर्यंत पोचलो, की एक छोटे मंदिर आहे. तिथे मी डोके टेकतो, पप्पा माझा फोटो काढतात आणि मग पुढे जातो. तिथून खाली पाहिले, की खालून येणाऱ्या लोकांच्या मोबाईलच्या बॅटरीचे लाइट गड चढताना दिसतात.

मला पहिल्या वेळी गड चढायला ६७ मिनिटे लागली. मी गडावर शॉर्ट-कट घ्यायचो पण एकदा मी हरवलो म्हणून आता पप्पा सांगतील तसा रूट घेतो. येताना आम्ही कचरा गोळा करतो. कधी आम्ही फक्त पाण्याच्या बाटल्यांची झाकणे गोळा करतो, तर कधी चॉकलेटचे कागद गोळा करतो. आम्ही एकदा १४९ झाकणे गोळा केली आणि घरी येऊन कचरापेटीमध्ये टाकली. एकदा २३१ प्लॅस्टिक स्ट्रॉ गोळा केल्या. येताना आम्ही कचरा गोळा करताना बघून काही लोक मला ‘गुड वर्क, वेल डन’ आणि ‘थॅंक यू’पण म्हणतात. आम्ही येताना फक्त कचरा गोळा करतो, पण कोणालाही तुम्हीपण कचरा गोळा करा म्हणत नाही, आम्ही आमचे काम करतो. घरी आल्यावर आम्ही आमचे फोटो ‘सिंहगड शोधतो मी’ या माझ्या फेसबुक पेजवर टाकतो. लोक लाइक करतात आणि कॉमेंट देतात.

एके दिवशी आम्हाला एक काका भेटले आणि त्यांनापण हा उपक्रम आवडला आणि मग ते म्हणाले, की पुढच्या शनिवारी मीपण येतो एक पिशवी घेऊन. नामदेवकाकांनीसुद्धा मग कचरा गोळा करायला सुरुवात केली. येताना पप्पा माझे छोटे व्हिडिओ काढतात. त्यात मी प्लॅस्टिक टाकू नका आणि जाळू नका आणि आपले किल्ले स्वच्छ ठेवा असे सांगतो.

मी सिंहगड २२ वेळा चढलो आहे. आता मी ६० मिनिटांच्या आत सिंहगडावर जातो. पप्पांना माझ्यापेक्षा १०-१५ मिनिटे जास्त लागतात. शाळेच्या परीक्षा होत्या म्हणून एक महिना ब्रेक होता. मी ५० वेळा सिंहगड चढणार आहे. मग दुसरे किल्ले पप्पा दाखवणार आहेत.

मी माझा पहिला ट्रेक तिकोना किल्ल्यावर केला. मला पहिल्यांदा भीती वाटली. कारण किल्ल्यावर अवघड चढ होता. शरददादा आणि विकासदादा माझ्याबरोबर होते. शरददादा म्हणाला, की किल्ला चढणे सोपे आहे, तू करशील हे. मग मला काहीच वाटले नाही. तिकोना किल्ल्यावरून किल्ले लोहगड, विसापूर, तुंग आणि खोटातुंग हे किल्ले दिसतात. 

मला महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्यांचे ट्रेक करायचे आहेत आणि कलावंतीण दुर्ग या किल्ल्यावर मला माझा वाढदिवस साजरा करायचा आहे. मोठा झाल्यावर माऊंट एव्हरेस्टपण चढायचा आहे. मला पप्पांनी किल्ल्यांची चार पुस्तके आणून दिली आहेत. किल्ल्यांची इंग्लिशमध्ये पुस्तके मिळत नाहीत, असं पप्पा सांगतात. मला मराठी अवघड वाटतं पण किल्ल्यांची माहिती मिळते म्हणून मला खूप छान वाटते. मला १०० किल्ल्यांची नावं पाठ आहेत. कोणत्या जिल्ह्यात कोणता किल्ला आहे, हे पण आता मी सांगतो. मी यूट्यूबवर किल्ल्यांचे व्हिडिओ बघतो. मला किल्ल्यांची सगळी पुस्तके इंग्लिशमध्ये भाषांतरित करायची आहेत. 

मी एकच सांगेन, की शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपले किल्ले आहेत. आपले किल्ले स्वच्छ ठेवा, त्यावर घाण टाकू नका.


पुस्तकं आणि मी
शताक्षी वनारसे (सहावी)

मी  शताक्षी, कोथरूडमधल्या भारतीय विद्याभवनच्या परांजपे विद्यामंदिर येथे इयत्ता पाचवीत शिकते. आता मी सहावीत जाणार आहे. 
मला पुस्तके वाचायला खूप आवडतात. तुम्हाला उत्सुकता असेल, की मला ही वाचनाची आवड कशी लागली? तर तुम्हाला सांगते, माझी आजी, मी तिला छकुआजी म्हणते, ती वाईजवळच्या केंजळ गावात मुख्याध्यापिका होती. ती मला लहान असताना खूप गोष्टी सांगायची. स्वातंत्र्यवीर सावरकर, लालबहादूर शास्त्री, टिळक, आगरकर अशा अनेक थोरा-मोठ्यांच्या कर्तृत्वाच्या गोष्टी, महाभारत, रामायणातल्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टी मी आजीकडून ऐकत असे. आई-बाबापण मला लहान असताना खूप चित्रे असलेली पुस्तके आणत. स्पायडर मॅन, ट्‌विंकल, टॉम ॲण्ड जेरी अशी इंग्रजी मॅगेझिन्स, तसेच बाबांच्या संग्रहातले चांदोबा मासिक. ती चित्रे मी पहात असे आणि कोणीतरी मला वाचून दाखवत असे. सकाळचे बालमित्र तर मला खूप आवडते. त्याच्यातील गोष्टी, चित्रे, कोडी मला खूप आवडतात.

‘सकाळ साप्ताहिक’मधील मुलांसाठी असलेले पानसुद्धा मी वाचते. चिंगीच्या गोष्टी डोक्‍यात खूप प्रश्‍न निर्माण करतात, तर साराच्या डायरीत ती जे लिहिते ते खूप छान असते. गणित हा माझा आवडता विषय आहे, त्यामुळे ते वाचत वाचत सोडवायला मजा येते. मकरंद दादा तर आमचा ट्रेक मित्र. शाळेच्या ट्रेकमध्ये तो आमच्या बरोबर होता. गड-डोंगर-दऱ्या बघताना निसर्ग कसा बघायचा, त्यात काय काय आहे हे मला वाचताना कळाले.

मागच्या वर्षीपासून मी उन्हाळ्याच्या सुटीत घराजवळ असलेली लायब्ररी लावली आहे. त्यामुळे आता सुटीतला वेळही छान जातो. मला इंग्रजी पुस्तके वाचायलासुद्धा खूप आवडतात. सध्या मी प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचे ‘How I taught my grandmother to read and other stories’ हे पुस्तक वाचत आहे. हे त्यांनी मुलांसाठी लिहिलेले पहिले पुस्तक आहे. त्यांची भाषा अतिशय सोपी आहे. वाचत असताना त्या गोष्टींमधील वर्णन डोळ्यांसमोर उभे राहते. सुधा मूर्तींच्याच ‘Grandma’s Bags of Stories’ या पुस्तकामधल्या When Yama called, The Story of silk, Five spoons of salt, The princess new clothes, Island of Status या माझ्या आवडत्या गोष्टी आहेत.

तुम्हाला एक गंमत सांगते, मी माझ्या वाढदिवसाला माझ्या मामा-मामीला, काकाला, मावशीला पुस्तकेच भेट म्हणून द्यायला सांगते. माझी वाचनाची आवड बघून ते सर्वजण मला आनंदाने ही भेट देतात. ‘Thea Stilton’ सीरिज मधील सर्व पुस्तके आता माझ्याकडे आहेत. सर्व मुलांना आवडणारी ‘Gerenimo’ सीरिज पण मला वाचायला आवडते.

आमच्या शाळेची लायब्ररीपण खूप छान आहे. दर आठवड्याला एक पुस्तक घरी वाचायला मिळते. शुक्रवार हा आमचा पुस्तक बदलण्याचा दिवस असतो. पुस्तक वाचून झाल्यावर कधी एकदा शुक्रवार येतो याची मी वाट पहाते. शाळेच्या लायब्ररीतून मी आर. के. नारायण यांचे ‘मालगुडी डेज’ आणून वाचले. रस्किन बाँड, खुशवंतसिंग यांची मुलांसाठी असलेली पुस्तके वाचली.

या माझ्या पुस्तक वाचनाच्या आवडीमुळे एक झाले, माझी सतत मोबाईल बघण्याची वाईट सवय सुटली आणि पुस्तके हे आपले चांगले मित्र असतात हे मला समजले.


माझं सुटीचं प्लॅनिंग
त्रैगुण्य भाले (चौथी)

परीक्षा सुरू झाली, की उन्हाळ्याची सुटी आलीच असं मला वाटायला लागतं आणि उन्हाळ्याची सुटी म्हटलं की माझ्या डोक्‍यात कितीतरी प्लॅन्स तयार व्हायला लागतात. मला दिवसभर मित्रांबरोबर खेळायचं असतं. उन्हात हुंदडायचं असतं. दुपारी पुस्तकं वाचायची असतात. संध्याकाळी पोहायला जायचं असतं. रात्री मित्रांकडं नाइट आउट करायचा असतो. अशा किती आणि कितीतरी गोष्टी मला करायच्या असतात. 

याही वेळेस सुटी लागली आणि आम्ही मित्रांनी भरपूर खेळायचं ठरवलं. पण तीनच दिवस झाले आणि एका दुपारी मी क्रिकेट खेळून कंटाळलो. घरी येऊन मी रंगवायचं ठरवलं. मी पुस्तकातली चित्रं रंगवून तर खूप कंटाळलो होतो. मी घरातल्या भिंती रंगवल्या होत्या, पण तरीही मी हातात पेंट घेऊन भिंती आणि खिडक्‍या रंगवायला लागलो आणि मला खूपच मजा येऊ लागली. मी आई-बाबांना विचारलं, की मी घर रंगवू का? माझं चित्र बघून तर आई-बाबा लगेच हो म्हणाले. त्यानंतर लगेचच मी आणि माझ्या मित्रांनी मिळून ठरवलं, की माझं घर सगळ्यांनी मिळून रंगवायचं. हाच आमच्या सुटीचा प्लॅन!

मग आई-बाबांची मदत घेऊन आम्ही कशा प्रकारचे रंग लागतील, कोणकोणते रंग लागतील, कसले ब्रश लागतील याची एक यादीच केली. त्यातही कोणकोणते रंग वापरता येतील याचाही आम्ही आमच्या चित्रकलेच्या ताईशी बोलून विचार केला. झालं, प्रत्येकानं साहित्याची जमवाजमव करण्याची जबाबदारी वाटून घेतली आणि पुढच्याच आठवड्यापासून रंगकाम सुरू करायची तयारीही केली. बरं, आम्ही रंगकामावर थांबणार नव्हतो काही. आम्ही ठरवलं, की आमची एक खोली प्रत्येकाच्या चित्रांनी भरून काढायची. मग, प्रत्येकाला आवडेल तो रंग द्यायचा आणि झाडं, फुलं, ताऱ्यांनी भरलेलं आकाश असं सगळं खोलीभर रंगवायचं. आहे ना मस्त माझा प्लॅन? 

त्याचबरोबर मला सायकलिंगची आवड असल्यानं मी आणि बाबानं या सुटीत एक खासच प्लॅन ठरवला आहे. सायकल घ्यायची आणि पुण्यात सगळीकडं भटकायचं. बाबानं मला वेगवेगळ्या जागा दाखवायचं प्रॉमिस केलं आहे. मंडई, नदीवरचे घाट, ऐतिहासिक जागा असं सगळं काही. आम्ही असंही ठरवलं आहे, की भटकता भटकता सगळीकडची झाडं पाहायची, त्यातल्या काही झाडांच्या बियाही गोळा करायच्या. या बिया साठवून मी आमच्या बाबाचा मित्र, रघुकाकासोबत रोपंही करणार आहे. जी मला पावसाळ्यात लावायची आहेत.

या सुटीत मी अजून एक महत्त्वाची गोष्ट ठरवली आहे. ती सांगितल्याशिवाय तर माझा सुटीचा प्लॅन पूर्ण होणारच नाही. गेली दोन वर्षं मी कोणती तरी नवीन गोष्ट करायला शिकतो आहे, स्वावलंबन म्हणून. याही वर्षी मी माझे कपडे धुवायचं ठरवलं आहे, रोज... आणि इस्त्रीही करायची ठरवली आहे. मग सुटी संपेपर्यंत मला याची चांगलीच सवय झाली असेल.

शेवटी दोन महिन्याच्या सुटीत काय काय करणार?

संबंधित बातम्या