राग-अनुरागाची उत्कट कहाणी

सुनील देशपांडे
सोमवार, 11 जानेवारी 2021

चित्रपटाला ‘कथा’ असतेच. अगदी टाकाऊ चित्रपटापासून काळावर मात करून तगलेल्या अभिजात कलाकृतींना हे लागू पडतं. पण एखाद्या कालजयी साहित्यकृतीवर तेवढ्याच उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट तयार होणं हा अनुभव रसिकांना सुखावून जात असतो. अशाच काही निवडक साहित्यकृती आणि त्यावर निर्मिलेल्या चित्रपटांची आस्वादक ओळख या सदरातून...

‘दर्जेदार साहित्यकृती आणि त्यावर आधारित चित्रपट’ या विषयावरची ही लेखमाला मनात साकारू लागली तेव्हा सर्वप्रथम ध्यानात आले ते शरच्चंद्र चॅटर्जी यांच्या कादंबऱ्यांवर बिमल रॉय यांनी तयार केलेले चित्रपट! बिमलदांचे तब्बल तीन चित्रपट शरच्चंद्रांच्या साहित्यकृतींवर आधारित असून ‘परिणीता’ त्यातली पहिली कलाकृती होय.

‘परिणीता’ हा शब्द परिणय (विवाह) या शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ आहे ‘विवाहिता’. शरच्चंद्रांच्या या कादंबरीची नायिका त्या अर्थाने विवाहिता नसली तरी मनोमन तिनं स्वत:ला विवाहिता मानलेलं आहे. तीच या कथानकाची नायिका अथवा मध्यवर्ती पात्र आहे.

‘परिणीता’ ही बंगाली भाषेतली लघुकादंबरी १९१४ साली, शरच्चंद्र यांच्या वयाच्या ३८व्या वर्षी प्रकाशित झाली. शरच्चंद्र चॅटर्जी (१८७६ - १९३८) हे ब्रिटिशकालीन भारतातले सर्वाधिक लोकप्रिय बंगाली लेखक. त्यांनी मुख्यत्वे कादंबरी आणि कथालेखन केलं. त्यांच्या लोकप्रिय साहित्यकृतींमध्ये ‘परिणीता’बरोबरच ‘देवदास’, ‘श्रीकांत’, ‘बिराज बहू’, ‘पंडित मोशाय’, ‘शेष प्रश्न’ इत्यादी कादंबऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ‘परिणीता’, ‘देवदास’ आणि ‘बिराज बहू’ या कादंबऱ्यांवर बिमल रॉय यांनीच चित्रपट केले. 

वरवर पाहता ‘परिणीता’ ही एक अबोध वा सुकुमार प्रेमकथा भासली, तरी या लघुकादंबरीत विसाव्या शतकाच्या प्रारंभीची भारतीय समाजरचना, बऱ्या-वाईट चालिरीती आणि जातिभेदादी प्रश्नांचं प्रत्ययकारी चित्रण केलं आहे. स्वाभाविकच लोकप्रियतेचा कळस गाठलेल्या या साहित्यकृतीचा हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती इत्यादी भाषांमध्ये अनुवाद केला गेला.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कोलकाता महानगरात घडणारी ही कथा या शहरात राहणारे दोन सख्खे शेजारी गुरुचरण आणि नविनचंद्र यांच्यातल्या प्रेमाचे आणि वितुष्टाचे संबंध विशद करतानाच या दोन घरांमधल्या तरुण-तरुणीच्या अबोध प्रेमाचं तरल चित्रण करते. शेजारी शेजारी घरं असली तरी गुरुचरण आणि नविनचंद्र यांच्या सांपत्तिक स्थितीमध्ये फार मोठा फरक असतो. गुरुचरण हे सामान्य परिस्थितीतले सत्शील गृहस्थ. नोकरीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नात कसंबसं घर चालवणारे. घरात पाच मुलींचं लटांबर आणि तेरा वर्षांची एक अनाथ भाची एवढ्यांसोबत गुरुचरण व त्यांची पत्नी संसाराचा गाडा रेटत असतात. याउलट शेजारच्या नविनचंद्र यांचा खाक्या! माणूस गडगंज श्रीमंत. गुरुचरण यांनी थोरल्या मुलीच्या लग्नाचा खर्च भागवण्यासाठी नविनबाबूंकडे घर गहाण ठेवून कर्जाऊ रक्कम घेतलेली. पैशासाठी गुरुचरण यांच्याकडे तगादा लावणाऱ्या नविनचंद्र यांच्या मनात वेगळा डाव असतो. आधीच ओढगस्तीला आलेले गुरुचरण एक पैही परत करू शकणार नाहीत, पर्यायाने भिंतीला भिंत लागून असलेलं गुरुचरण यांचं दुमजली घर आपल्याला विनासायास लाटता येईल अशी योजना त्यांच्या मनात साकारत असते. 

कर्ज प्रकरणातून निर्माण झालेला एवढा एक ताण सोडता दोन्ही घरांतल्या इतर सदस्यांमध्ये चांगला एकोपा असतो. समाईक गच्चीवरून परस्परांच्या घरात प्रवेश करण्याची सोय आणि मुभा असते. नविनबाबूंचा धाकटा मुलगा शेखर सरकारी वकील असून स्वभावानं मनमिळाऊ असतो. गुरुचरण यांची आईबापाविना वाढलेली तेरा वर्षांची भाची ललिता खूप कष्टाळू आणि लाघवी स्वभावाची असते. मामा-मामीबरोबरच नविनबाबूंच्या पत्नीलाही तिचा लळा लागलेला असतो. यामुळेच शेखरच्या घरात तिला मुक्त प्रवेश असतो. शेखरची खोली, त्याचं कपाट आवरून ठेवणं, त्याला वेळच्या वेळी हवं-नको ते बघणं ही कामं तिच्या दिनचर्येचाच भाग असतात. कोणत्याही कामासाठी लागणारे पैसे शेखरच्या कपाटातून काढून घेण्याइतका अधिकार तिला असतो. तिच्या मदतीवाचून त्याचं  

पान हलत नसतं. याबरोबरच ललितानं कुठं जावं, कुठं जाऊ नये, काय करावं, काय करू नये याबाबत शेखर अधिकार गाजवत असतो आणि एका अनामिक जाणिवेतून ललितानं तो अधिकार मान्य केलेला असतो. ललिताचं हे अस्तित्व सर्वांनाच हवंहवंसं वाटत असतं. 

एकदा घरातल्या मुलींनी बाहुला-बाहुलीच्या लग्नाचा खेळ मांडलेला असताना तिथला फुलांचा हार ललिता गमतीनं (की अजाणतेपणी?) एकांतात शेखरच्या गळ्यात टाकते. शेखर तोच हार काढून तिच्या गळ्यात घालतो. चेष्टामस्करीतली ही ‘चूक’ ललिताच्या ध्यानात येते तेव्हा ती कमालीची लज्जित होते. मात्र त्याच क्षणापासून ती शेखरला आपला पती मानायला लागते.

इकडे शेखरच्या लग्नासाठी नविनबाबूंनी एका धनाढ्य माणसाची मुलगी पसंत करून ठेवलेली असते. या लग्नात भरपूर हुंडा, सोनं-नाणं मिळेल ही त्यांची अपेक्षा. पण शेखरच्या होकाराअभावी गाडं अडून राहतं. याच काळात नविनबाबू गुरुचरण यांना घरी बोलावून कर्जाच्या परतफेडीसाठी चारचौघात त्यांचा अपमान करतात. व्यथित झालेले गुरुचरण खिन्न अवस्थेत असताना पलीकडल्या घरातल्या चारुलताकडे आलेला तिचा मामा गिरीन्द्र अर्थात गिरीन गुरुचरण यांच्या मदतीला धावून येतो. सुधारणावादी ब्राह्मो समाजाचा स्वीकार केलेला गिरीन खरंतर ललिताकडे आकृष्ट झालेला असतो. याच आकर्षणापोटी, गुरुचरण यांना कर्जफेडीसाठी लागणारी सारी रक्कम त्यांना बिनव्याजी द्यायला तो तयार होतो. गुरुचरण यांनी रकमेची परतफेड केल्यानं नविनबाबूंचे मनसुबे उधळले जातात. गिरीनच्या उपकाराने प्रभावित झालेले गुरुचरण ललिताचं लग्न त्याच्याशी ठरवतात. हे समजल्यावर नविनबाबू गुरुचरण यांना घरी बोलवून त्यांची निर्भत्सना करतात. पण गुरुचरण सडेतोडपणे बोलत त्यांना निरुत्तर करतो. दोघांमध्ये खडाजंगी होते. रागाच्या भरात नविनबाबू दोन्ही घरांमध्ये भिंत बांधून येण्याजाण्याचा रस्ता बंद करतात. त्या दोघांचं कडाक्याचं भांडण होऊन हृदयविकाराचा झटका आल्यानं नविनबाबू मरण पावतात. तो धक्का सहन न होऊन गुरुचरणही काही दिवसांनी जगाचा निरोप घेतात. ललिताचं गिरीनशी लग्न ठरल्यानं दुखावलेला शेखर तिला टाळू लागतो. पण ललिता गिरीनला आपलं लग्न आधीच शेखरबरोबर झाल्याचं स्पष्ट करते. गिरीन उदारमनानं बाजूला होतो. शेखरच्या मनातला गैरसमज दूर होतो आणि ललिता व शेखर यांचं शुभमंगल होतं. शेवट अर्थातच गोड!

शरच्चंद्रांच्या लेखणीतून साकारलेली ‘परिणीता’ पडद्यावर आणण्याचा मोह अनेकांना झाला. त्यामुळेच या कथेवर बंगालीमध्ये तीन, हिंदीमध्ये तीन आणि तमिळ भाषेत एक चित्रपट तयार झाले. हिंदीतला पहिला ‘परिणीता’ १९५३ मध्ये बिमल रॉय यांनी, दुसरा ‘संकोच’ या नावानं १९७६ मध्ये अनिल गांगुली यांनी, तर अगदी अलीकडे, २००५ मध्ये प्रदीप सरकार यांनी केला. या तीनही कलाकृतींमध्ये मूळ कथेशी सर्वाधिक प्रामाणिक राहून तयार केलेला, अतिशय हळुवार चित्रपट म्हणून बिमलदांच्या ‘परिणीता’चं स्थान वादातीत आहे. किंबहुना हा लेख लिहिताना माझ्या नजरेसमोर तीच ‘परिणीता’ आहे. 

चित्रपटांच्या परिभाषेत ज्यांना ‘न्यू थिएटर्स स्कूल’चे दिग्दर्शक म्हणून संबोधलं जातं त्या बिमल रॉय यांनी  आपल्या बंगाली व हिंदी चित्रपटांतून प्रतिभेचा असा काही आविष्कार घडवला, की पुढल्या काळात त्यांच्या कारकिर्दीला ‘बिमल रॉय स्कूल’ असा सार्थ गौरव प्राप्त झाला. बिमलदांची हिंदीतली पहिली निर्मिती असलेला ‘दो बीघा ज़मीन’ आणि ‘परिणीता’ हे दोन्ही चित्रपट १९५३ साली आले. ‘परिणीता’चे निर्माते होते अशोक कुमार. त्यांनीच नायक शेखरची भूमिका अतिशय संयतपणे केली होती. नझीर हुसेन (गुरुचरण) आणि बद्रीप्रसाद (नविनचंद्र) यांचा अभिनयही उत्तम होता. अर्थात या सर्वांहून सरस ठरली ती मीना कुमारी. तिनं आत्मसात केलेला ललिताच्या व्यक्तिमत्त्वाचा नूर चित्रपटभर पसरून राहतो. तिचा मुद्राभिनय तर बघण्यासारखाच, पण ललिताचं शेखरच्या घरात सहजतेनं - नव्हे किंचित अधिकारानं - वावरणं, त्याची खोली आवरून ठेवणं, शेखरला सांगून त्याच्या कपाटातून पैसे घेणं, खास बंगाली पद्धतीनं पदर सावरणं, शिवण-टिपण इत्यादी कामं करणं, एवढंच काय, तिचं तुरुतुरु चालणं अशा कितीतरी गोष्टींनी ही ‘परिणीता’ मनात ठसते.

कादंबरीवरून चित्रपट करताना काही बदल अपरिहार्य असतात. तसे ते बिमल रॉय यांनीही केले. नविनबाबू आणि गुरुचरण यांचं अखेरचं भांडण मूळ कथेत फार विस्तारानं येत नाही, मात्र चित्रपटात हा प्रसंग खूपच नाट्यपूर्ण पद्धतीनं येतो. त्यामुळंच नविनबाबूंनी दोन घरांमध्ये भिंत बांधणं, संतापातिरेकानं त्यांना हृदयविकाराचा त्रास होणं या गोष्टी स्वाभाविक वाटू लागतात. कादंबरीत एका उत्कट क्षणी शेखर ललिताला जवळ ओढून तिचं चुंबन घेतो हा प्रसंग आहे, तो चित्रपटात नसणं हे त्या काळाच्या सभ्यतेला धरूनच झालं. मूळ कथेतला बाहुला-बाहुलीच्या लग्नाचा प्रसंग चित्रपटातही तेवढाच रंजक होऊन येतो हे विशेष!

संगीत हे हिंदी चित्रपटांचं एक अविभाज्य अंग. बिमलदांच्या ‘परिणीता’मधली गाणी मधुर होती. भिक्षेकऱ्याच्या तोंडी असलेलं ‘चली राधे रानी’ (मन्ना डे), बाहुलीच्या लग्नप्रसंगी येणारं ‘गोरे गोरे हाथों में मेहंदी रचाके’ (आशा भोसले), नायिकेची उदास मनोवस्था प्रकट करणारं ‘चाँद है वोही’ ही गाणी उत्कृष्ट होती. चित्रपटाला संगीत दिलं होतं अरुणकुमार मुखर्जी यांनी. 

साहित्यकृती आणि त्यावर आधारित चित्रपट या दोहोंनी उत्कटतेची पातळी गाठलीय, असं वाटायला लावणारे प्रसंग कमी असतात. बिमलदांची ‘परिणीता’ हाच उत्कट अनुभव देते.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व चित्रपट अभ्यासक आहेत.)

संबंधित बातम्या