गंगा आये कहाँ से...

सुनील देशपांडे
सोमवार, 8 मार्च 2021

पुस्तकातून पडद्यावर

कमालीचा साधेपणा आणि निरागसता ही ‘काबुलीवाला’ या कथेची वैशिष्ट्य आहेतच, पण सहज ध्यानात न येणारं एक वैशिष्ट्य हे की देश, प्रांत, वय यांच्या भिंती ओलांडून माणसा-माणसात व्यक्त होणारा लळा-जिव्हाळा या कथेनं अधोरेखित केला आहे. बंगाली व हिंदीतून तयार झालेल्या ‘काबुलीवाला’ या चित्रपटांनी कथेचा हाच धागा नेमका पकडला...  

नदीचा प्रवाह आणि माणसाचं जीवन यातलं चटकन आढळणारं साम्य हे की या दोघांचा प्रवास भले कितीही लांबचा असला तरी त्यांचा शेवट निश्चित असतो, आणि या दोघांतला भेद हा की नदीच्या प्रवासाचा एक मार्ग ठरलेला असतो, तर माणसाच्या आयुष्याचा प्रवास कोणत्या मार्गानं होणार आहे हे शेवट जवळ येईपर्यंत त्याला ठाऊक नसतं... 

अफगाणिस्तानसारख्या दूरदेशातून भारतात नियमितपणे येत-जात असलेल्या रहमत खान ऊर्फ ‘काबुलीवाला’ या फिरस्त्याला तरी कुठं कळला होता त्याच्या आयुष्याचा मार्ग? थोर साहित्यकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथेत याच मुद्द्याला स्पर्श केला होता. 

एखादी लघुकथा वरकरणी छोटी भासली तरी तिच्यात दडलेले जीवनाचं गूढ अर्थ समजायला अनेक वर्षं लागू शकतात. त्यातून ‘काबुलीवाला’सारख्या कृतीवर ‘बालकथे’चा शिक्का बसला तर वाचकाची फसगत होण्याचीच शक्यता अधिक! 

परदेशातून भारतात आलेला एक अनोळखी फिरस्ता आणि इथल्या शहरातली एक छोटीशी गोड मुलगी या दोघांमधला अनोखा भावबंध टिपणारी कथा, हे झालं रवींद्रनाथांच्या या कथेचं अगदी थोडक्यात वर्णन. पण त्याहीपलीकडे जाऊन ही कथा काही सांगते आहे, हे जेव्हा कळतं तेव्हा या लेखकाची थोरवी पटते. 

कथा, कादंबरी, नाटक यासारखे साहित्यप्रकार सहजतेनं हाताळणाऱ्‍या रवींद्रनाथ टागोर (१८६१ - १९४१) यांनी संगीतकार म्हणूनही दिगंत कीर्ती संपादन केली. चित्रकला, शिल्पकला इत्यादी प्रांतातही त्यांना गती होती. त्यांच्या प्रतिभेची आभा स्थळकाळाच्या सीमा ओलांडून सर्वदूर पसरल्यामुळेच जागतिक प्रतिष्ठेच्या ‘नोबेल’ पुरस्काराचे टागोर हे पहिले भारतीय मानकरी ठरले. 

अशा या टागोरांच्या साहित्यकृतींनी चित्रपटसृष्टीला आकर्षित केलं नसतं तरच नवल! त्यांच्या कथांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आधार घेऊन दहा ते बारा चित्रपटांची निर्मिती आजवर झाली आहे. ‘काबुलीवाला’ या कथेचं भाग्य असं की त्यावर आजतागायत पूर्ण लांबीचे म्हणावेत असे तीन चित्रपट तयार झाले. त्यातला एक बंगालीत आणि दुसरा हिंदीत आला, तर तिसरा बांगलादेशमध्ये तयार झाला. शिवाय त्यावरची नाटकं आणि ॲनिमेशन फिल्म्स वेगळ्याच. चित्रकर्त्यांना अनेकदा मोहात पाडणारं असं आहे तरी काय या कथेत?

कमालीचा साधेपणा आणि निरागसता ही तर या कथेची बलस्थानं आहेतच, पण एरवी ध्यानात न येणारा त्यातला विशेष हा की देश, प्रांत, वय यांच्या भिंती ओलांडून माणसा-माणसात व्यक्त होणारा लळा-जिव्हाळा या कथेनं अधोरेखित केला आहे. 

कोलकाता शहरातल्या एका सुखवस्तू परिवाराचा प्रमुख असलेल्या लेखकाच्या निवेदनातून कथा उलगडत जाते. घरात तो, त्याची पत्नी, पाच वर्षांची मिनी नावाची गोड मुलगी आणि नोकर भोला एवढीच माणसं. लेखकाची मुलगी मिनी अतिशय लडिवाळ आणि बडबडी. याच शहरात अफगाणिस्तानातून आलेला एक व्यापारी रस्त्याने हिंडत सुका मेवा आणि इतर वस्तू विकत असतो. काबूल येथून आलेला म्हणून त्याचं नाव काबुलीवाला! सर्वसाधारण बालकांप्रमाणे मिनीलाही या काबुलीवालाविषयी कुतूहल वाटत असतं. त्याचं उंचपुरं शरीर, ढगळ कपडे, हातातली लांब काठी, खांद्याला भली मोठी झोळी आणि त्या झोळीत ठेवलेले वेगवेगळे पदार्थ, डोक्याला तुर्रेबाज फेटा असं त्याचं रूप. एक-दोन भेटींतच त्या दोघांची गट्टी जमते. दोघांना एकमेकांचा लळा लागतो. त्याची मुलगी अमीना ही मिनीच्याच वयाची असल्यानं त्याची मिनीवर माया जडलेली असते. एका माणसावर खुनी हल्ला केल्याबद्दल काबुलीवाल्यास दहा वर्षांची शिक्षा होऊन त्याची रवानगी तुरुंगात होते. काही दिवसांनी मिनी व तिचे वडील त्याला विसरून जातात. वर्षं उलटतात. मिनीच्या लग्नाच्या दिवशीच काबुलीवाला तुरुंगातून सुटतो. एवढ्या वर्षांनी अचानक आलेल्या काबुलीवाल्यास तिचे वडील आधी ओळखत नाहीत. पण अखेर त्याच्यासाठी मिनीचे वडील तिला बाहेर घेऊन येतात. तिला तो डोळे भरून पाहतो. तिच्या नजरेत आरंभी ओळखीचे भाव नसतात, पण त्याच्या बोलण्यानं काही जुने संदर्भ जुळून येत तिच्या नजरेत व्यक्त होताना दिसतात. तिच्यासाठी आणलेला सुका मेवा तो देतो. मिनीच्या वडिलांचं हृदय द्रवतं. ते काबुलीवाल्यास बळेबळे थोडे पैसे देतात, त्याला मायदेशी परत जाता यावं यासाठी. काबुलीवाला निरोप घेऊन जातो. त्याला पैसे द्यावे लागल्यानं मिनीच्या वडिलांना लग्नातल्या काही खर्चांना ऐनवेळी फाटा द्यावा लागतो. मात्र या शुभ घडीला एका भल्या माणसाचा दुवा घेतल्याबद्दल त्यांचं मन प्रसन्नतेनं फुलून आलेलं असतं. काबुलीवाला मायदेशी परत जातो. 

अतिशय निरागस भाव असणारी ही कथा रवींद्रनाथांच्या कथनशैलीमुळं हृदयाचा ठाव घेते. एवढ्या काळानंतरही ती ताजी वाटते. प्रसंग हलकाफुलका असो वा गंभीर, टागोरांची शैली त्यानुसार रूप बदलत राहते. मिनीचा व्रात्य आणि बडबडा स्वभाव स्पष्ट करताना त्यांनी योजलेले संवाद तर सहज हसू फुलवून जातात. काही तरी कारण काढून मिनी लेखकाच्या म्हणजे निवेदकाच्या कादंबरी लेखनात व्यत्यय आणत असते, त्याचं वर्णन ते ‘मिनी मेजाखाली येऊन माझ्या पायापाशी खुडबुड करत होती त्या वेळी माझ्या कादंबरीच्या सत्तराव्या प्रकरणात प्रतापसिंह आपली प्रेयसी कांचनमालासह कारागृहाच्या उंच सज्जातून नदीच्या विशाल पात्रात उडी मारत होते,’ अशा मिस्कीलपणे करतात. 

‘काबुलीवाला’ कथेचा देशविदेशांतल्या अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला. सर्वोत्कृष्ट जागतिक कथांमध्ये तिची गणना केली जाते. (मराठीत मृणालिनी गडकरी यांनी ‘काबुलीवाला’ व इतर कथांचा अनुवाद केला आहे.) या कथेवर बंगाली दिग्दर्शक तपन सिन्हा यांनी १९५७ मध्ये बंगाली भाषेत चित्रपट तयार केला. प्रसिद्ध अभिनेते छबि विश्वास यांनी त्यात रंगवलेला ‘काबुलीवाला’ खूपच गाजला. अर्थात हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना या कथेची ओळख झाली, ती निर्माता बिमल रॉय यांच्या याच नावाच्या चित्रपटामुळं. टागोर जन्मशताब्दी वर्षात १९६१ साली बिमलदांनी ही कथा पडद्यावर आणून त्यांना आदरांजली वाहिली. दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी नावापुरती हेमेन गुप्ता यांच्यावर सोपविली असली, तरी चित्रपटाचे खरे दिग्दर्शक बिमल रॉय हेच होते. पटकथा विश्राम बेडेकरांची होती तर संवाद लेखन एस. खलील यांनी केलं होतं. त्याआधी बिमलदांची पहिली निर्मिती असलेल्या ‘दो बिघा जमीन’मध्ये बलराज साहनी यांनी अभिनयाचा उत्कट आविष्कार घडविला होता. त्यानंतर आठ वर्षांनी बलराज यांना तेवढाच जबरदस्त आविष्कार घडविण्याची संधी ‘काबुलीवाला’च्या भूमिकेद्वारे मिळाली. या संधीचं त्यांनी सोनं केलं. या भूमिकेची देहबोली आणि पठाणी बोली त्यांनी सहजतेनं आत्मसात केली होती. 

मूळ कथा चित्रपटात आणताना काही प्रसंग विस्तारानं तर काही नव्यानं घेतले गेले होते. अगदी सुरुवातीच्या प्रसंगांमध्ये काबुलीवालाचं अफगाणिस्तानमधलं घर, त्याची आई, मुलगी अमीना यांचं दर्शन घडतं, जे कथेत केवळ निवेदनातूनच सामोरं येतं. आपण घर सोडताना मुलीनं रडून आकांत करू नये म्हणून ती रात्री झोपलेली असताना रहमत खान घराचा निरोप घेतो, निघताना तिच्या हाताच्या पंजांचे ठसे कागदावर घेऊन तो कागद उराशी जपून ठेवतो, तुरुंगातून सुटताना त्याच्या साऱ्‍या चीज वस्तूंबरोबर घडी केलेला हा कागदही त्याला मिळतो... यासारखे काही प्रसंग हृदयस्पर्शी ठरले आहेत. (रहमत खाननं मुलीच्या हातांचे ठसे घेऊन ठेवल्याचा प्रसंग कथेतही आहे.)

सिनेमामाध्यमाचं अभिन्न अंग असलेली गाणी याही चित्रपटात होती. संगीतकार सलील चौधरी यांनी ‘ऐ मेरे प्यारे वतन’ (मन्ना डे), ‘गंगा आये कहां से’ (हेमंत कुमार) यासारखी उत्कृष्ट गाणी या चित्रपटातून दिली. नदीकिनारी सांजप्रहरी एका साधूचं गाणं काबुलीवाला तल्लीन होऊन ऐकत असतो. या गाण्याचा अर्थ उलगडून सांगताना साधू म्हणतो, ‘दिवस आणि रात्र यांच्यात किती फरक असतो नाही? पण संध्याकाळ या दोन्हींतला भेद मिटवून टाकते....तुझ्या नि माझ्या भाषेत, रंगरूपात फरक आहे, पण मनात प्रेम असेल तर सर्व जण एक आहेत...’ हाच भाव गुलजार यांनी ‘गंगा आये कहां से’ या गाण्यातून तरलतेनं व्यक्त केला होता. 

बिमलदांचे साहाय्यक म्हणून काम केलेल्या गुलजार यांनी काही वर्षांपूर्वी नसरुद्दीन शाहला घेऊन पुन्हा एकदा ‘काबुलीवाला’ करण्याचा विचार केला होता. पण बलराज साहनी यांचे निस्सीम चाहते असलेल्या नसरुद्दीन यांनी आपण त्या भूमिकेच्या पासंगालाही पुरणार नाही असं सांगून गुलजार यांना नम्रपणे नकार दिला होता. एखाद्या भूमिकेला याहून मोठी दाद कोणती असू शकेल?

संबंधित बातम्या