हे खरे की ते खरे?

सुनील देशपांडे
सोमवार, 19 एप्रिल 2021

पुस्तकातून पडद्यावर

रजनीगंधा! दीड-पावणेदोन तासांच्या या चित्रपटात फार मोठा आशय दडला असल्याची जाणीव प्रेक्षकांना होते याचं श्रेय लेखिका मन्नू भंडारींसोबतच दिग्दर्शक बासू चटर्जी आणि कलाकारांच्या अभिनयाला द्यावं लागेल...

वर्षानुवर्षे मनीमानसी रुजलेल्या धारणा जेव्हा काळाच्या कसोटीवर उतरतात तेव्हा त्या आणखी घट्ट होत जातात आणि याच धारणांना धक्का बसतो तेव्हा आपण त्यांना ‘अपवाद’ ठरवून मोकळे होतो. ‘पहिलं प्रेम हेच आयुष्यातलं खरं प्रेम, नंतरचं प्रेम म्हणजे तडजोड’ हीसुद्धा अशीच एक धारणा. मात्र तिला खोटं ठरवत, ‘पहिलं-दुसरं असं काही नसतं, आपल्याला त्या क्षणी जे भावतं तेच प्रेम खरं,’ असं मानत ठामपणे निर्णय घेणारी नायिका मन्नू भंडारी या लेखिकेनं रंगवली आणि वाचकांनी तिचा स्वीकार केला. काही वर्षांनी हीच नायिका रुपेरी पडद्यावर अवतरली तेव्हादेखील प्रेक्षकांनी तिला स्वीकारलं. लेखक वा दिग्दर्शक आपली पात्रं किती प्रामाणिकपणे उभी करतो त्यावर हे अवलंबून असतं. मन्नू भंडारी यांची ‘यही सच है’ ही १९६६ मध्ये प्रकाशित झालेली कथा आणि त्यावरचा १९७४ साली आलेला ‘रजनीगंधा’ चित्रपट ही या ‘प्रामाणिकपणा’ची उदाहरणं ठरावीत.  

आधुनिक हिंदी साहित्यात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्‍या मन्नू भंडारी यांना सर्वाधिक लोकप्रियता ‘रजनीगंधा’ या सिनेमानं मिळवून दिली, हे त्यादेखील मान्य करतील. एखाद्या चित्रपटानं मूळ साहित्यकृतीकडे लक्ष वेधलं गेल्याची अनेक उदाहरणं आहेत. ‘यही सच है’ ही याच परंपरेतली एक उत्कट कथा. मध्यप्रदेशातल्या भानपुरा इथं १९३१ साली जन्मलेल्या मन्नू भंडारी यांचं मूळ नाव महेंद्रकुमारी. त्यांचं शैक्षणिक जीवन राजस्थानात अजमेर इथं व्यतीत झालं. हिंदी साहित्यात एम.ए. केल्यानंतर दिल्लीत हिंदीच्या प्राध्यापिका म्हणून दीर्घकाळ काम करतानाच दुसरीकडे लेखिका म्हणून त्यांची कारकीर्द घडत गेली. कादंबऱ्‍या, कथासंग्रह, आत्मकथन, पटकथा, ‘दूरदर्शन’ मालिका (‘रजनी’) यासारखं विविधांगी लेखन त्यांनी केलं.

कथानायिका दीपाच्या आयुष्यात काही वर्षांच्या अंतरानं आलेले भिन्न प्रकृतीचे दोन प्रियकर, दुसऱ्‍या प्रेमात ती पूर्णतः बुडालेली असतानाच अचानक पहिल्या प्रियकराचं पुन्हा तिच्या आयुष्यात येणं, आयुष्याचा जोडीदार म्हणून या दोघांपैकी कोणाची निवड करावी यावरून झालेली तिची घालमेल आणि या घालमेलीनंतर तिच्या मनानं दिलेला कौल यांचा अतिशय मनोवेधक गोफ लेखिकेनं या कथेत विणला आहे.

अबोध वयात दीपा तिच्याच कॉलेजमधल्या निशीथाच्या प्रेमात पडते. निशीथही तिच्यावर नितांत प्रेम करणारा मनस्वी तरुण. प्रेमाच्या आणाभाका, पत्रांची देवाणघेवाण इत्यादी सुरू असताना कसल्याशा कारणानं झालेल्या भांडणात निशीथ तिचा घोर अपमान करतो. एवढंच नव्हे, तिच्याशी असलेले संबंध कायमचे तोडून टाकतो. दीपाच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड अढी बसते. कालांतरानं दीपा प्रेमभंगाचं दुःख विसरते. कानपूरला जाऊन एम. ए. केल्यानंतर तिच्या आयुष्यात येतो संजय हा दुसरा तरुण. बडबड्या पण मोकळ्या स्वभावाचा, हसतमुख असणारा, तिच्यासाठी नेहमी निशिगंधाची ताजी फुलं घेऊन येणारा संजय तिला मनापासून आवडत असतो. त्याच्या प्रेमात ती भूतकाळ विसरून जाते. कधीमधी निशीथची आठवण आलीच तर ‘अठराव्या वर्षीच्या त्या प्रेमाला कसला आलाय अर्थ’ असं म्हणत ती त्याचा विचार झटकून टाकते. तिचा पीएच.डी.चा प्रबंध पूर्ण झाल्यानंतर लग्न करायचा दोघांचा विचार असतो. अशातच दीपाकडे प्राध्यापकपदाच्या नोकरीची संधी चालून येते. मुलाखतीसाठी तिला कोलकात्याला जावं लागतं. तिथं कॉलेज काळातली मैत्रीण इरा हिच्याकडच्या मुक्कामात दीपाची निशीथशी पुन्हा भेट होते. ती विसरू पाहत असलेला भूतकाळ पुन्हा समोर उभा राहतो. आठवडाभराच्या मुक्कामात निशीथ तिच्या नोकरीसाठी हरप्रकारे मदत करतो. त्याच्याविषयीचा तिरस्कार दूर होऊन तिचं मन पुन्हा त्याच्याकडे ओढ घेऊ लागतं. कोलकात्याहून परत जाईपर्यंत ती पूर्णतः निशीथमध्ये गुंतलेली असते. कानपूरला पोहोचल्यानंतर सुरू होते प्रचंड मानसिक घालमेल आणि शेवटी...?

 मन्नू भंडारी यांनी पूर्णतः नायिकेच्या भूमिकेतून ही कथा लिहिली आहे. किंबहुना दीपाच्या निवेदनातूनच कथा उलगडत जाते. पाच-सहा वर्षांच्या अंतरानं आयुष्यात आलेले दोन प्रियकर आणि त्या दोघांतून कुणाची निवड करावी यावरून तिला पडलेला पेच यांचं प्रत्ययकारी चित्रण लेखिका करून जाते. दोन्ही प्रियकरांविषयी तिला वाटणारी आस्था, या आस्थेच्या समर्थनाखातर तिच्या मनात घोळणारे विचार... हे सारंच मनोविश्लेषणाच्या अंगानं जात राहतं. त्यामुळं कथा मनात ठसते. 

सत्तरच्या दशकात दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी ही कथा पडद्यावर आणायचं ठरवलं आणि साकारली ‘रजनीगंधा’ ही सुंदर कलाकृती. कला आणि व्यवसाय या दोन प्रवाहांचा सुवर्णमध्य गाठून स्वच्छ, निर्मळ चित्रपट तयार करणाऱ्‍या ‘मध्यममार्गी’ दिग्दर्शकांची जी फळी सत्तरच्या दशकात आली त्यांतले बासू चटर्जी (१९२९-२०२०) हे एक महत्त्वाचे दिग्दर्शक. कमीत कमी बजेट, मुख्यतः मध्यमवर्गीयांच्या जीवनाचं चित्रण करणारे हलकेफुलके कथाविषय, शक्यतो नवोदित कलाकार आणि खास ‘बासू स्टाइल’ हाताळणी ही त्यांच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये असत. ‘ब्लिट्झ’ या प्रख्यात इंग्रजी साप्ताहिकात व्यंगचित्रकार म्हणून सुमारे दोन दशकं काम केल्यानंतर बासू चटर्जी यांनी साठच्या दशकात चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं ते ‘तीसरी कसम’चे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून. स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला ‘सारा आकाश’ (१९६९) हा त्यांचा पहिला चित्रपट खरं तर गंभीर प्रकृतीचा आणि समांतर प्रवाहातला. अपेक्षेप्रमाणे तो चालला नाही. मात्र सत्तरच्या दशकात ‘पिया का घर’ आणि ‘उस पार’ या चित्रपटांद्वारे त्यांनी ‘मध्यममार्ग’ स्वीकारला आणि ७४ सालातल्या ‘रजनीगंधा’नं या मार्गावर शिक्कामोर्तब केला. ‘छोटी सी बात’, ‘चितचोर’, ‘खट्टा मीठा’, ‘बातों बातों में’ अशी त्यांची गाडी सुसाट निघाली. अभिनेत्यांमध्ये अमोल पालेकरशी त्यांचे सूर अधिक जुळले. गंभीर विषयांमध्ये ते फारसे खुलले नाहीत. मात्र कारकिर्दीच्या उत्तरार्धात ‘एक रुका हुआ फैसला’ आणि ‘कमला की मौत’ यासारखे गंभीर चित्रपट करून त्यांनी ही ‘दुबळी बाजू’ही भरून काढण्याचा प्रयत्न केला.

काही किरकोळ बदल सोडल्यास ‘यही सच है’ या कथेला बासूदांनी धक्का लावला नाही. मूळ कथा कानपूर आणि कोलकाता शहरांत घडते, त्याऐवजी चित्रपटात त्यांनी दिल्ली आणि मुंबई या शहरांचा पर्याय निवडला. दीपा आणि संजय ही नावं कायम ठेवली तरी निशीथ मात्र चित्रपटात ‘नवीन’ म्हणून येतो. नवीन हा मुळात गंभीर प्रकृतीचा, मोजकं बोलणारा आहे तर संजय त्याच्या अगदी उलट. कथेतला गंभीरपणा कमी करून तिला हलकीफुलकी करताना बासूदांनी संजयच्या व्यक्तिरेखेला काहीशा धांदरटपणाची जोड दिली. त्यात संवाद बासूदांचेच असल्यानं अनेक प्रसंगांची रंगत वाढली. (इथं व्यंगचित्रकार बासूदांच्या अचूक निरीक्षणशक्तीचा प्रत्यय येतो.) संजयनं आपल्याशी प्रेमाच्या चार गोष्टी बोलाव्यात ही दीपाची अपेक्षा, तर त्याच्या तोंडी कायम ऑफिसमधलं राजकारण, प्रमोशन, युनियन, डी.ए., बोनस, संप इत्यादी गोष्टी. कोणतीही गंभीर बाब खेळकरपणे घ्यायची हा त्याचा स्वभाव. दीपासोबत हॉटेलमध्ये असताना ऑफिसचे मित्र भेटले तर तिला सोडून हा मित्रांसोबत चकाट्या पिटणार. तिला सिनेमाला नेताना हमखास उशिरा अन ऐन वेळी तिकिटे घरी विसरून येणार.

याउलट नवीनचा स्वभाव. कमालीचा वक्तशीर आणि शांत. खरं तर मुंबईला गेल्यानंतर इरा नवीनशी तिची भेट घडवून आणते, हे दीपाला आवडत नाही, पण मुंबईतल्या त्या सात दिवसांत नवीन तिच्यासाठी जे काही करतो त्यानं तिचा त्याच्यावरचा राग पूर्णतः निवळतो. (दीपा व नवीन यांच्या बिनसण्यामागचं कारण कथेत गुलदस्तातच ठेवलंय. चित्रपटात मात्र कॉलेजमधील संपाच्या वेळी दोघांमध्ये भांडण झाल्यानं तो तिच्याशी संबंध तोडतो, असा प्रसंग आहे.) मधल्या सहा वर्षांत नवीन खूप बदललेला असतो. मुंबईच्या मुक्कामात तो कायम तिच्या दिमतीला हजर असतो. एवढंच काय, दीपाला नोकरी मिळणं जवळजवळ अशक्य असताना नवीनच्या ओळखीच्या बळावर तिला चक्क नोकरी मिळते. नवीनला संजयविषयी सांगून टाकावं असं दीपाच्या मनात अनेकदा येतं, पण तिला ते धाडस होत नाही. आपल्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी त्यानं थोडासा पुढाकार घेतला तरी आपण त्याच्यावरून जीव ओवाळून टाकू असं तिला तीव्रतेनं वाटत असतं. नवीनच्या वागण्या-बोलण्यातून तोही प्रेमातुर असल्याचं सूचित होत असलं तरी तो स्पष्टपणे काही बोलत नाही. मुंबईचा निरोप घेताना डोळे भरून आलेली दीपा खिडकीतून नवीनच्या दिशेनं हात पुढं करते. तोही तिला स्पर्श करण्यासाठी धावतो खरा, पण गाडीनं वेग घेतल्यामुळं ते शक्य होत नाही. दीपा दिल्लीला परत येते ती मनोमन नवीनचा स्वीकार करूनच. त्याच ओढीपायी ती नवीनला पत्र लिहिते. मात्र त्यानं पाठवलेल्या उत्तरात ‘नोकरी मिळाली, अभिनंदन! बाकी पुन्हा...’ एवढाच मजकूर असतो. तिच्याविषयी त्याला काय वाटतं याविषयी अवाक्षरही नसतं. ती निराश होते. त्याच क्षणी संजय येतो. तेच मोकळं हास्य आणि निशिगंधाची फुलं घेऊन! सारं काही बाजूला सारून दीपा संजयकडे धाव घेते. त्याच्या मिठीत विसावण्यासाठी. तिच्यासाठी हेच खरं प्रेम असतं...

दीड-पावणेदोन तासांच्या या चित्रपटात फार मोठा आशय असल्याची जाणीव प्रेक्षकांना होते याचं श्रेय लेखिका मन्नू भंडारींसोबत बासू चटर्जी यांनाही द्यावं लागेल.

दीपा साकारणाऱ्‍या विद्या सिन्हाची ही सर्वात लक्षणीय भूमिका ठरावी. तिचं दिसणं (कायम साडीमधलं), हसणं, अंतर्मुख होणं अविस्मरणीय ठरलं. अमोल पालेकर (संजय) आणि दिनेश ठाकूर (नवीन) हे दोघेही रंगभूमीवरचे कसलेले नट. आपापल्या भूमिकेचे रंग त्यांनी नेमके उचलले.

या चित्रपटात गाणी टाकायचं ठरलं नव्हतं. मात्र, शूटिंग झाल्यानंतर उपलब्ध दृश्यांवर पूरक ठरतील अशी दोन गाणी ध्वनिमुद्रित करून समाविष्ट केली गेली. संगीतकार सलील चौधरी आणि गीतकार योगेश यांनी केलेली ‘रजनीगंधा फूल तुम्हारे’ (लता) आणि ‘कई बार यूं भी देखा है’ (मुकेश) ही दोन्ही गाणी चित्रपटात चपखल बसली.

हलकेफुलके प्रसंग व मिश्कील संवाद यांचा प्रसन्न शिडकावा असूनही ‘रजनीगंधा’चा समावेश विनोदपटांमध्ये करण्याचं धाडस सुबुद्ध प्रेक्षक करत नाही. कारण चित्रपट संपताना मनावर ठसलेले असतात त्यातले तरल, हळुवार प्रसंग आणि दोन अर्थपूर्ण गाणी.

संबंधित बातम्या