चक्रव्यूहात शिरल्यानंतर...

सुनील देशपांडे
सोमवार, 17 मे 2021

पुस्तकातून पडद्यावर

‘‘चक्रव्यूह में घुसने से पहले कौन था मैं और कैसा था? यह मुझे याद ही न रहेगा.... चक्रव्यूह में घुसने के बाद मेरे और चक्रव्यूह के बीच सिर्फ जानलेवा निकटता थी. इसका मुझे पता ही न चलेगा.... एक पलडे में नपुंसकता, दूसरे पलडे में पौरुष. और ठीक तराजू के कांटे पर – अर्धसत्य?’’ ‘अर्धसत्य’ चित्रपटात समाविष्ट केलेली कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची ही अनुवादित कविता या चित्रपटाचा सारांश सांगून जाते... 

एकोणीसशे ब्याऐंशी सालातल्या नोव्हेंबर महिन्यातली सकाळ. कथालेखक श्री. दा. पानवलकर यांच्या घरी त्यांचे मित्र, प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर आणि चित्रपट दिग्दर्शक गोविंद निहलानी हे दोघं येतात. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर गोविंद निहलानी थेट विषयाला हात घालतात, ‘पानवलकर, तुमच्या `सूर्य’ या कथेवर मी चित्रपट करणार आहे. त्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे, ती घेण्यासाठी मी आलो आहे.’

चेहऱ्‍यावर आश्चर्य दाखवत पानवलकर त्यांना विचारतात, ‘माझ्या कथेवर चित्रपट? सकाळी सकाळी कुणी भेटला नाही का तुम्हाला?’

‘मी खरंच बोलतोय पानवलकर. त्यासाठीच मी तेंडुलकरांना सोबत घेऊन आलोय. तुमच्या कथेवर आधारित एक छान पटकथा तेंडुलकरांनी लिहून दिली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात मी शूटिंग सुरू करणार आहे. तुमची अनुमती मला हवी आहे. द्याल ना तुम्ही ती?’

‘गोविंद म्हणतो ते खरं आहे.’ तेंडुलकर एवढं एकच वाक्य बोलतात.

‘नाही’ म्हणायचं काही कारण नसतं. प्रसिद्ध पटकथा लेखक तेंडुलकर आणि ‘आक्रोश’, ‘विजेता’ यासारख्या चित्रपटांचे उत्कृष्ट छायालेखक व दिग्दर्शक निहलानी समोर बसले असताना नकार द्यायचा प्रश्नच नसतो. पानवलकर आनंदानं संमती देतात...

एकोणीसशे त्र्याऐंशी सालात प्रदर्शित झालेल्या आणि त्या वर्षातल्या बहुसंख्य चित्रपट पुरस्कारांवर आपलं नाव कोरून गेलेल्या ‘अर्धसत्य’ या चित्रपटाच्या निर्मितीची ही पार्श्वभूमी. स्वतः पानवलकरांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेली. ‘अर्धसत्य’ ज्यावर आधारित आहे ती पानवलकरांची ‘सूर्य’ नावाची कथा ‘अर्धसत्य’ चित्रपटापेक्षा कितीतरी चांगली आहे, असं तेंडुलकरांनी एका समारंभात सांगितलं असलं, तरी ते ‘पूर्णसत्य’ नाही. त्यात तेंडुलकरांच्या विनयाचा भाग अधिक असावा. मुळात तेंडुलकरांनी पटकथेसाठी या कथेचा फार थोडा आधार घेतला होता. मूळ कथेतून घेतलेले काही प्रसंग सोडता पटकथेची मांडणी त्यांनी पूर्णतः स्वतंत्र पद्धतीने केली होती. आजच्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘अर्धसत्य’ची पटकथा ही ‘सूर्य’ या कथेचा ‘सिक्वेल’ होती. सांगली येथे १३ फेब्रुवारी १९२८ रोजी जन्मलेले श्रीकृष्ण दामोदर पानवलकर हे मराठीतले एक कसदार कथाकार होत. मुंबईत कस्टम्स खात्यात त्यांनी सुमारे तीस वर्षं नोकरी केली. दरम्यान १९६०च्या सुमारास त्यांनी लेखनास सुरुवात केली. ‘गजगा’, ‘औदुंबर’, ‘सूर्य’, ‘एका नृत्याचा जन्म’, ‘चिनाब’ आणि ‘जांभूळ’ हे कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. यातल्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाले. ‘सूर्य’ या कथेला १९६६ साली ‘अभिरुची’ मासिकाच्या कथास्पर्धेत पारितोषिक मिळाले होते. १९६८ साली ‘सूर्य’ याच नावाने आलेल्या कथासंग्रहात ती समाविष्ट होती. पुढे १९८४ साली ‘अर्धसत्य’चे मूळ लेखक म्हणून याच कथेसाठी पानवलकरांना ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला. विशेष उल्लेखनीय म्हणजे ‘अर्धसत्य’ या चित्रपटाच्या संपूर्ण चित्रीकरणाची दैनंदिनी त्यांनी लिहिली, जी ‘शूटिंग’ या नावाने ‘मौज’तर्फे १९८५मध्ये पुस्तकरूपात आली. दुर्दैवाने हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी १९ ऑगस्ट १९८५ रोजी वयाच्या ५८व्या वर्षी सांगली या आपल्या जन्मगावीच पानवलकर दिवंगत झाले...

अजिबात पाल्हाळ नसलेली, शब्दांचा नेमका व टोकदार वापर असलेली अल्पाक्षरी लेखनशैली पानवलकरांनी कायम जोपासली. ‘सूर्य’ कथाही त्याला अपवाद नव्हती. पोलीस खात्यात फौजदार असलेला बाप आणि त्याचा एकुलता एक मुलगा अनंत या दोघांतल्या तणावपूर्ण नात्याचं वेधक चित्रण या कथेत दिसतं. बापानं तीस वर्षं फौजदारकी केली. त्याचा दरारा खात्यात आणि घरात दोन्हीकडे सारखाच. त्याच्याविरुद्ध बोलायची ना बायकोची बिशाद ना अनंताची. सतत नजरेच्या धाकावर घराला तोलणारा, ‘कुठं गेली रांड?’ म्हणत बायकोच्या कमरेत लाथ घालणारा बाप त्याच्या मनात दगडासारखा कोरलेला. बापाचा बापही एकेकाळी जमादार होता नि दरोडेखोरांचा सामना करताना छातीवर भाला झेलून तो कामी आला होता. अनंतानंदेखील घराण्याची शान चालवत पोलिसात भरती व्हावं, पुढेमागे डी.एस.पी. व्हावं ही बापाची महत्त्वाकांक्षा. त्यासाठीच लहानपणापासून त्याला सूर्यनमस्कार घालण्याची कठोर दीक्षा त्यानं दिलेली. आईच्या वळणावर जात यानं ‘शामळू’ होऊ नये यासाठी बापाचा आटापिटा सुरू असतो. खरंतर अनंताला पोलीस खात्याचा तिटकारा असतो. पण बापासमोर तोंड उघडून बोलणार कसा? आईचं काळीज अनंतासाठी तुटत राहतं, पण आयुष्यभर नवऱ्‍याच्या धाकात राहिलेली ही माउली पोटच्या पोराची बाजू घेऊ शकत नाही. कॉलेजात अनंतानं एकदोन प्रेमप्रकरणं सहज गाजवली असती. पण बाप गुरकावतो, ‘अंत्या, फुलांना टिचक्या मारण्यापेक्षा चेंडूला लाथा घालायची प्रॅक्टिस कर.’ पदवी परीक्षा दुसऱ्‍या श्रेणीत उत्तीर्ण झालेला अनंता बापाच्या हट्टाखातर पोलीस खात्यात भरती होतो. प्रशिक्षण नेटानं पूर्ण केल्यानंतर सब इन्स्पेक्टर म्हणून त्याची मुंबईत नियुक्ती होते. बाप सुखावतो. पोराला निरोप देतानाही त्याचा उपदेशाचा पाढा सुरूच असतो.

अनंता मुंबईत रुजू होतो. पोलिसी तपास, जाबजबाब, पंचनामे, पाठलाग, धाडी, चौकश्या या चक्रात व्यग्र होतो. चतुराईनं गुन्ह्यांचा तपास करतो. आरंभी गुन्हेगारांवर हात उचलायला कचरणारा अनंता हळूहळू त्यालाही सरावतो. मदिरा नि मदिराक्षी यांचा सहवास त्यालाही प्रिय होऊ लागतो. बापाचं पत्र वाचून भिरकावून देण्याएवढी निडरता अंगी येते. अशातच एके दिवशी बाप मुंबईला त्याला भेटायला येतो. अनंता नशेत धुंद होऊन पलंगावर निजलेला. नशेत बरळणाऱ्‍या अनंतावर बाप डाफरतो, ‘शुद्धीवर आहेस का हरामखोरा?’ आयुष्यात प्रथमच तो बापावर ओरडतो, ‘चूप, ओरडायचं काम नाही. हे घर तुमचं नाही. बाप असाल तर गप्प राहा.’ बापाचा सारा नूर खर्रकन खाली येतो. खांदे तुटल्यासारखा ओघळलेला बाप स्वतःशीच पुटपुटतो, ‘पार बदलत चाललाय अनंता...’ सकाळी जागा झालेला अनंता जमिनीवर मुटकुळं करून गाढ झोपलेल्या बापाकडे पाहतो. रात्रीचा प्रताप आठवून त्याला शरम वाटते. इतका निवांत झोपलेला बाप त्यानं कधीच पाहिलेला नसतो. बाजूची चादर घेऊन तो ती बापाच्या गळ्यापर्यंत पांघरतो. कुशी बदलून बाप घोरू लागतो... अशी ही कथा.

पानवलकर यांच्या खास शैलीमुळं ही कथा पकड घेते. एखाद्याच वाक्यात लेखक सारा आशय मांडून जातो. ‘बापाच्या निवडुंगाच्या बोंडासारख्या डोळ्यांची फिरत श्वापदासारखी....’, ‘त्याचं प्रत्येक वाक्य लोखंडी गज ठोकल्यासारखं...’, ‘भरड्या अंगरख्यावर काळा आकडा ठोकलेल्या बेरडासारखा बाप दिसला...’ यासारख्या प्रतिमा त्या माणसाचं व्यक्तिमत्त्व उभं करून जातात. मदिराक्षीच्या संगतीत अनंतानं घालवलेल्या धुंद रात्रीचं वर्णन लेखकाच्या तरल शैलीची ओळख देऊन जातं.

या कथेचा हिंदी अनुवाद वाचल्यानंतर गोविंद निहलानी यांनी त्यावर चित्रपट करायचा निर्णय घेतला. वर म्हटल्याप्रमाणे तेंडुलकर यांनी या कथेचा थोडासाच आधार घेत पटकथेला पूर्णतः नवा बाज दिला. मूळ कथेतले संदर्भ ‘फ्लॅशबॅक’च्या रूपात दिसतात, तेही तुटक तुटक प्रसंगांत. मुळातला सालस अनंत पोलिसी धबडग्यात राहून कसा राठ होतो, ते कथेत दिसतं. तर अनंत वेलणकर नामक पोलीस अधिकाऱ्‍याची इथल्या व्यवस्थेत होणारी गळचेपी आणि कुचंबणा यांचं भेदक दर्शन चित्रपट घडवतो. खरंतर त्याच्या रूपात सर्वच प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्‍यांच्या व्यथा हा चित्रपट वेशीवर मांडतो. ‘अर्धसत्य’ चित्रपट बहुतेकांच्या मनात ताजा असल्याने त्याच्या कथानकाची उजळणी करायला नको. मुंबईच्या पोलीस खात्यात काम करताना वेलणकरला अनेकदा अवमान सहन करावा लागतो. तो गुंडांना पकडून चौकीवर आणतो तेव्हा हे गुंड ज्याचे हस्तक त्या रामाशेट्टीच्या सांगण्यावरून वरिष्ठ अधिकारी चक्क त्या गुंडांना सोडून देतात. वर पुन्हा ‘रामाशेट्टीला जाऊन भेट’ असा ‘आदेश’ही त्याला मिळतो. अनंत रामाशेट्टीशी वैर ओढवून घेतो, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. एकाला जिवंत जाळल्याच्या प्रकरणात रामाशेट्टीला अटक करायला अनंत जातो, तेव्हा रामाशेट्टी त्याला विकत घ्यायचा प्रयत्न करतो. तो विकला जात नाही हे दिसताच त्याच्यासमोरच वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन लावून रामाशेट्टी त्याला ‘फायर’ करवतो. एका बँक दरोड्याचा तो शिताफीनं छडा लावतो तेव्हा त्याचं श्रेय आणि मेडल ऐनवेळी भलताच अधिकारी घेऊन जातो. हे व असे अवमान पचवताना अनंतचं वैफल्य वाढत जातं. हा राग तो दारूच्या नशेत आणि गुन्हेगारांना मारहाण करून जिरवू पाहतो. अनंतची प्रेयसी ज्योत्स्ना हिंसाचाराला विरोध करणारी विचारी स्त्री असते. ‘माझा पती पोलीस खात्यातला नसेल’ असं ती त्याला निक्षून बजावते. अनंत सैरभैर होतो. त्यानं केलेल्या मारहाणीत लॉकअपमधला एक गुंड मारला जातो. परिणामी तो नोकरीतून निलंबित होतो. स्वतःला वाचवायचं असेल तर रामाशेट्टीलाच जाऊन भेट असा सल्ला त्याला दिला जातो. अनंत तेही करतो. पण निलंबनातून वाचवण्याच्या बदल्यात अनंतनं ‘आपला माणूस’ म्हणून पोलीस दलात काम करावं अशी अट रामाशेट्टी घालतो. बिथरलेला अनंत गळा दाबून रामाशेट्टीलाच मारून टाकतो. पोलीस ठाण्यावर जाऊन या कृत्याची कबुली देतो. इथंच चित्रपट संपतो. 

गुन्हेगारी आणि पोलिसी जगतातलं क्रौर्य, पोलीस दलातलं राजकारण, भ्रष्ट व्यवस्थेला असलेला राजकीय वरदहस्त अशा अनेक मुद्द्यांना हा चित्रपट हात घालतो. हे सारंच चित्रण अंगावर येणारं झालं आहे. माणसाच्या मनातले क्रौर्य हा ज्यांच्या ‘अभ्यासाचा’ विषय, त्या तेंडुलकरांनी हे सारे पैलू पटकथेत प्रभावीपणे आणले होते. संवाद लेखनात तेंडुलकरांना तेवढीच दमदार साथ मिळाली वसंत देव यांची. कॅमेरा हे किती प्रभावी माध्यम ठरू शकतं याचा वस्तुपाठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी या चित्रपटातून घालून दिला.

अनंत वेलणकर प्रत्यक्षात असाच वागू शकेल हे ठसवणारा ओम पुरी, अतिशय थंड डोक्याचा परंतु खुनशी रामाशेट्टी मूर्तिमंत उभा करणारा सदाशिव अमरापूरकर, पानवलकरांच्या कथेतले ‘बाप’ आणि ‘आई’ याहून वेगळे असू शकणार नाहीत याची ग्वाही देणारे अमरीश पुरी आणि माधुरी पुरंदरे या मुख्य कलाकारांनी हा चित्रपट तोलून धरला. याखेरीज अनंतची प्रेयसी ज्योत्स्ना (स्मिता पाटील), दारूच्या नशेत आत्मघात करून घेणारा निलंबित पोलीस अधिकारी माईक लोबो (नसिरुद्दीन शाह), नायकाला ‘प्रॅक्टिकल’ होण्याचा सल्ला देणारा इन्स्पेक्टर हैदर अली (शफी इनामदार) या भूमिकाही मनात ठसणाऱ्‍या. बाप आणि मुलगा यांच्या अनोख्या नात्याचं चित्रण करणारी ‘सूर्य’ ही कथा खुद्द पानवलकर यांच्या आयुष्यावर बेतलेली असेल काय? स्वतः पानवलकरांनी हे कधी सांगितल्याचं ऐकिवात नाही. पण, ‘‘केवळ माझ्यासाठी म्हणून हंटर वापरणारे माझे वडील, ती. अण्णा आणि सदोदित डाग देण्याची नुसती धमकी देणारी माझी आई यांच्या पुण्यस्मृतीस’’ ही पानवलकरांच्या ‘औदुंबर’ या कथासंग्रहाची अर्पणपत्रिका वरील शंका मनात जागी करून जाते हे खरं...

संबंधित बातम्या