प्रवास देवदासचा...

सुनील देशपांडे
सोमवार, 31 मे 2021


पुस्तकातून पडद्यावर

‘कालजयी साहित्यकृती’ कोणती मानावी? वर्षानुवर्षं जी वाचकांना भुरळ पाडते ती? जास्तीत जास्त आवृत्त्या निघून जी खपात कायम अग्रस्थानी असते ती? की ज्यावर सर्वाधिक नाटके व चित्रपट निघाली ती? चित्रपटांवर प्रेम करणारा साहित्यवाचक यातल्या तिसऱ्या निकषाला महत्त्व देईल यात शंका नाही. आणि हाच निकष महत्त्वाचा मानला तर शरच्चंद्र चट्टोपाध्याय (चटर्जी) यांची ‘देवदास’ कादंबरी निःसंशय ‘कालजयी’ ठरते...

केवळ बंगालीच नव्हे तर हिंदी आणि बहुतेक प्रादेशिक भाषांमधल्या वाचकांपर्यंत पोहोचलेली ‘देवदास’ ही भारतातली सर्वाधिक लोकप्रिय कादंबरी ठरावी. अशा गाजलेल्या साहित्यकृतीची चित्रपट क्षेत्राला वारंवार भुरळ पडणं स्वाभाविकच. शरच्चंद्र यांच्या कादंबऱ्यांवर एकाहून अधिक वेळा चित्रपट तयार झाले. 

वाचकप्रियतेत सदैव अव्वल राहिलेल्या शरच्चंद्र चटर्जी (१८७६-१९३८) यांनी १९०१मध्ये, ऐन पंचविशीत ‘देवदास’ लिहून पूर्ण केली. काहींच्या मते त्या आधीची चार-पाच वर्षं ते या कादंबरीचं लेखन करीत होते. विशेष म्हणजे लेखन पूर्ण झाल्यानंतर ही कादंबरी सोळा वर्षं अप्रकाशित राहिली. या विलंबामागे शरच्चंद्र यांचं ब्रह्मदेशात आपल्या मामांकडे वास्तव्यास जाणं हे जसं कारण होतं, तसं स्वतः शरच्चंद्र ती प्रकाशित करण्यास उत्सुक नव्हते, असंही सांगितलं जातं. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर १९१७मध्ये ‘देवदास’ पुस्तकरूपानं प्रसिद्ध झाली. ही ‘असफल प्रेमाची दास्ताँ’ बंगाली वाचकांमध्ये एवढी लोकप्रिय झाली की तिच्या आवृत्त्यांमागून आवृत्त्या निघाल्या. यथावकाश तिचा हिंदी अनुवाद आला. पुढं अन्य दहा-बारा भाषांमधून ती वाचकांपर्यंत पोहोचली. गाजलेल्या साहित्यकृतीच्या नशिबी येणारे ‘हार आणि प्रहार’ याही कादंबरीच्या वाट्याला आले. पुस्तकाप्रमाणेच त्यावर तयार झालेले चित्रपटही वादाचा विषय ठरले. याप्रमाणेच ‘‘सर्वांत चांगला ‘देवदास’ कोणता’’ यावरही चर्चा झडत राहिल्या. हे सारे वाद आणि चर्चा पचवून ‘देवदास’ कादंबरी तिचं स्थान टिकवून आहे...

स्वातंत्र्यपूर्वकालीन बंगालमधल्या एका खेड्यातल्या धनाढ्य जमीनदाराचा पुत्र देवदास आणि त्याच्या शेजारी राहणारी, सामान्य कुटुंबातली पार्वती अर्थात ‘पारो’ यांची बालपणापासूनची प्रगाढ मैत्री, देवदासच्या वांडपणामुळं वडिलांनी त्याची शिक्षणासाठी कोलकात्याला (त्यावेळचे कलकत्ता) केलेली रवानगी, तरुणपणी त्या दोघांच्या लग्नास देवदासच्या वडिलांनी केलेला विरोध, त्या अवमानापायी पारोच्या कुटुंबीयांनी एका गडगंज श्रीमंत पण बिजवर इसमाशी लावलेलं तिचं लग्न, प्रेमभंगामुळे देवदासचं कोलकात्याला झालेलं प्रयाण, तिथं एका गणिकेच्या सहवासात येऊन त्याचं व्यसनाधीन होणं, या व्यसनातून स्वतःच्या आयुष्याची त्यानं केलेली धूळधाण, पारो आणि चंद्रमुखी या दोघींनी देवदासला सावरण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरणं, सरतेशेवटी भणंग अवस्थेत पारोच्या गावी जाऊन तिच्या हवेलीसमोरच्या पारावर बेवारस अवस्थेत त्यानं प्राण सोडणं... हे आहेत ‘देवदास’ कादंबरीतले ठळक प्रसंग.

शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीची भारतातली सामाजिक रचना आणि त्या पार्श्वभूमीवर देवदास, पारो आणि चंद्रमुखी तीन जिवांची व त्यांच्या निकटवर्तीयांची होणारी घालमेल यांचं प्रत्ययकारी चित्रण जेमतेम सव्वाशे पानांच्या या कादंबरीत शरच्चंद्र यांनी केलं. यातल्या पात्रांना शरतबाबूंच्या लेखणीनं अमर केलं. त्यांचा देवदास जितका मनस्वी आणि हट्टी आहे तितकाच दिलदार आहे. एका बाजूला देवदासशी लग्न व्हावं यासाठी आसुसलेली पारो प्रसंगी स्वाभिमान जपणारी आहे. लग्न झाल्यानंतरदेखील देवदासकरिता तिच्या मनात एक हळवा कोपरा आहे. तर चंद्रमुखी वेश्या असूनही देवदाससाठी स्वतःचा पेशा सोडून विरक्तीचं आयुष्य कंठायला तयार आहे. या दोघींविषयी देवदासच्या मनात एकाच वेळी आसक्ती आणि तिरस्कार आहे. 

बालम आए बसो मोरे मन में...

‘देवदास’वर आजवर अनेक वेळा चित्रपट तयार झाले. १९२८ साली बंगालमध्ये नरेशचंद्र मित्र यांनी या कथेवर एका मूकपटाची निर्मिती केली होती. पुढे बोलपटाचं आगमन झाल्यानंतर १९३५मध्ये कोलकात्याच्या ‘न्यू थिएटर्स’ या प्रख्यात कंपनीनं आधी बंगालीत आणि त्या पाठोपाठ हिंदीमधून ‘देवदास’ची निर्मिती केली. दोन्ही आवृत्त्यांचं दिग्दर्शन प्रमथेशचंद्र (पी. सी.) बरुआ यांनी केलं होतं. बंगालीमध्ये स्वतः बरुआ यांनी तर हिंदीत प्रख्यात गायक नट कुंदनलाल सैगल यांनी देवदास साकारला. जमुना या नटीनं पारो, तर राजकुमारीनं चंद्रमुखी साकारली होती. दोन्ही भाषांतले ‘देवदास’ तेवढेच गाजले. विशेषतः सैगलच्या देवदासनं अवघ्या सिनेप्रेमींवर मोहिनी घातली. सैगल यांनी स्वतः गायलेल्या ‘बालम आए बसो मोरे मन में’ आणि ‘दुख के अब दिन बीतत नाही’ या तसेच ‘ब्लाईंड सिंगर’ के. सी. डे यांच्या गाण्यांवर (संगीतकार तिमिर बरन) सिनेरसिक डोलू लागले. त्या काळाचा विचार करता न्यू थिएटर्सचा ‘देवदास’ तंत्र आणि आशय या दोन्ही अंगांनी प्रगत असा चित्रपट होता. ठोकळेबाज आणि रडारडीचे प्रसंग टाळून बरुआ यांनी या कलाकृतीला एका वेगळ्या उंचीवर नेलं. देवदासचा उद्वेग आणि अखेरच्या काळात रेल्वेतून गावोगावी होणारा त्याचा प्रवास यासारखी दृश्यं कलात्मक पद्धतीनं चित्रीत करून एक अविस्मरणीय शोकांतिका त्यांनी साकारली. या चित्रपटानं पी. सी. बरुआ यांना दिग्दर्शक म्हणून पहिल्या रांगेत नेऊन ठेवलं, तर ‘न्यू थिएटर्स’ला महत्त्वाची संस्था म्हणून प्रस्थापित केलं. अर्थात या चित्रपटावर कलाकृती म्हणून टीकाही भरपूर झाली. देवदास व एकुणातच ‘न्यू थिएटर्स’च्या चित्रपटांतून व्यक्त होणारा नैराश्यवाद समाजाला दुःखी व नेभळट बनवत आहे, अशी टीका ‘प्रभात’च्या व्ही. शांताराम यांनी केली. ‘जीवन हे आत्मघातासाठी नसून जगण्यासाठी आहे’ हा विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी शांताराम यांनी ‘आदमी’ (मराठीत ‘माणूस’) हा चित्रपट केला.  

आन मिलो आन मिलो श्याम सांवरे...!

‘न्यू थिएटर्स’च्या ‘देवदास’साठी कॅमेरामन म्हणून प्रभावी कामगिरी बजावणारे बिमल रॉय पुढल्या काळात दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आले. १९५५ साली त्यांनी स्वतःच्या संस्थेतर्फे पुन्हा एकदा ‘देवदास’ची निर्मिती केली. ‘परिणीता’ व ‘बिराज बहू’नंतर शरतकथेवर बिमलदांनी केलेला हा तिसरा चित्रपट. पहिल्या देवदासशी निगडित पी. सी. बरुआ आणि के. एल. सैगल या दोघांच्या स्मृतीला तो अर्पण करण्यात आला होता. दिलीप कुमार (देवदास), सुचित्रा सेन (पारो) आणि वैजयंतीमाला (चंद्रमुखी) अशी उत्तम स्टार कास्ट लाभलेला हा चित्रपट आजवरचा ‘सर्वमान्य’ देवदास म्हणून ओळखला जातो. नवेन्दू घोष (पटकथा), राजेंद्रसिंग बेदी (संवाद), कमल बोस (छायाचित्रण), साहिर (गीते) आणि सचिन देव बर्मन (संगीत) अशी उत्कृष्ट फळी बिमलदांनी निवडली. पहिल्या देवदासमध्ये वगळलेला देव-पारो यांच्या बालपणाचा भाग या देवदासमध्ये पाहायला मिळाला. ‘आन मिलो आन मिलो श्याम सांवरे’ या आर्त भजनाबरोबरच ‘अब आगे तेरी मर्जी’, ‘जिसे तू कबूल कर ले’, ‘मितवा.. लागी रे’ इत्यादी सुमधुर गाण्यांची जोड मिळाल्यानं हा चित्रपट संस्मरणीय झाला. दिलीप कुमारच्या कमालीच्या उत्कट अभिनयानं या ‘देवदास’ला वेगळीच उंची लाभली. ‘वो शादी के रास्ते चली गयी और मै बरबादी के रास्ते...’, ‘कौन कंबक्त है जो बरदाश्त करने के लिये पीता है?’ यासारख्या संवादांचं दिलीपनं अक्षरशः सोनं केलं. सुचित्रा सेन आणि वैजयंतीमाला या दोघींचा अभिनयही तोडीस तोड होता. देवदासला दारू आणि चंद्रमुखी या दोन्हींची ‘ओळख’ करून देणारा चुनीलाल हे या कथेतलं महत्त्वाचं पात्र. मोतीलाल या गुणी अभिनेत्यानं हा चुनीलाल मस्तच रंगवला. पारो आणि चंद्रमुखी या दोघींची प्रत्यक्ष भेट न होता दुरून होणारी नजरानजर आणि देवदासचा बेवारस अवस्थेत होणारा मृत्यू या प्रसंगांमधून बिमल रॉय यांची ताकद दिसून आली.

डोला रे डोला रे...

संजय लीला भन्साळी या कल्पक दिग्दर्शकानं या शतकाच्या आरंभी भव्यदिव्य स्वरूपात पुन्हा एकदा ‘देवदास’ सादर केला. अफाट खर्च करून (पन्नास कोटींचं बजेट) निर्माण केलेली ही टोलेजंग निर्मिती पाहून ‘मल्टिप्लेक्स पिढी’तल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फिटले. शाहरुख खाननं साकारलेल्या देवदासबरोबरच ऐश्वर्या रायची पारो, माधुरी दीक्षितची चंद्रमुखी तसंच लाखो रुपयांच्या त्यांच्या साड्या, आभूषणं, जुना काळ जिवंत करणाऱ्या ट्राम, मोटर गाड्या, मंदिरं... हे सारं डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी उसळली. देवदासच्या कथेचा स्वतःचा अन्वयार्थ (इंटरप्रिटेशन) लावण्याचा अधिकार अबाधित ठेवत भन्साळी यांनी कथेत आवश्यक तसे बदल केले. मूळ कथेत पारो आणि चंद्रमुखी एकमेकींना भेटत नाहीत. भन्साळींनी पारो आणि चंद्रमुखी यांची केवळ भेटच घडविली नाही तर या दोघींना सख्या बनवून नाचगाण्यांचा जलसा सादर केला. पारोची आई (किरण खेर)देखील नाचगाणं करताना दाखवली. चुनीलाल याला (जॅकी श्रॉफ) शीघ्रकवीच्या थाटात काव्यं प्रसवताना पेश केला. मूळ कथेत सुशील असलेला पारोचा सावत्र मुलगा इथं खलनायकी ढंगात (मिलिंद गुणाजी) अवतरला. साधा पालापाचोळा उडतानादेखील भव्यता दिसेल याची काळजी घेतली गेली. प्रत्येक चित्रचौकट देखणीच दिसावी या ध्यासापोटी, देवदासच्या मृत्यूची वार्ता ऐकल्यानंतर बेभान होत हवेलीच्या प्रवेशद्वाराकडे धावणाऱ्या पारोच्या उंची शालूचा हवेत तरंगणारा पदर हाही मग ‘कलात्मक पैलू’ ठरला. हे सारं पाहता जुन्या देवदासच्या चाहत्यांनी या भव्यदिव्य कलाकृतीला नाकं मुरडली नसती तरच नवल! अर्थात कलावंतांचा अभिनय आणि इस्माईल दरबार व पंडित बिरजू महाराज यांनी सांभाळलेली संगीताची बाजू भक्कम ठरल्यानं नव्या पिढीतल्या प्रेक्षकांना हा देवदास पसंत पडला.

ये तेरा इमोशनल अत्याचार...

एकवेळ भन्साळींनी केलेलं देवदासचं ‘इंटरप्रिटेशन’ क्षम्य वाटेल एवढं या कथेचं ‘भन्नाट’ सादरीकरण नव्या पिढीचा दिग्दर्शक अनुराग कश्यप यानं २००९मध्ये केलेल्या ‘देव - डी’मध्ये पाहायला मिळतं. शरच्चंद्र यांच्या कथेचा मूळ ढाचा वर्तमानकाळातल्या पात्रांभोवती गुंफण्याचा हा प्रयोग बुद्धिमान तर होताच, पण हिंदी चित्रपटांच्या बदलत्या परिभाषेची ओळख सांगणारा होता. पात्रांची नावं मूळ कथेप्रमाणे नसती तर ‘देव - डी’ला ‘देवदास’चा आधार आहे, हे सांगूनही खरं वाटलं नसतं. नायक देव (अभय देओल) चंदीगडमधल्या बड्या उद्योगपतीचा मुलगा आहे. त्याची बालमैत्रीण पारो (माही गिल) स्मार्ट असली, तरी सामाजिक भेदापायी या दोघांचा विवाह होऊ शकत नाही. पारोचं लग्न दुसऱ्याशी होतं. निराश झालेला देव दिल्लीला जाऊन दारू आणि ड्रग्सच्या आहारी जातो. तिथं चंदा (कल्की कोचलीन) या वेश्येच्या संगतीत तो येतो. या तीन पात्रांभोवती कथा फिरत राहते- मूळ कथासूत्रानुसार पण आधुनिक परिवेशात. पटकथा व संवाद विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांचे असून ते पुरेसे ‘बोल्ड’ (प्रसंगी अश्लील) वाटतील असे आहेत. यातला नायक शेवटी मरताना दाखवलेला नाही. काहीसा खोडकर, काहीसा व्रात्य असा हा चित्रपट ‘ब्लॅक कॉमेडी’ असल्याचं म्हटलं गेलं. पारंपरिक प्रेक्षकांसाठी तो त्यातल्याच एका गाण्यानुसार ‘इमोशनल अत्याचार’ ठरला.  

तर अशी देवदासची कथा आणि त्यावर तयार झालेले चार हिंदी चित्रपट. नवा देवदास आल्यानंतर ‘आधीचा देवदास खूपच बरा होता,’ असं दरवेळी वाटत राहतं. हेच या कथेचं वेगळेपण असेल काय?

संबंधित बातम्या