चटका लावून गेलेली ‘बनगरवाडी’

सुनील देशपांडे
सोमवार, 14 जून 2021


पुस्तकातून पडद्यावर

‘‘I was an actor by an accident, producer by compulsion and director by choice,’’ असं स्वतःविषयी आवर्जून सांगणाऱ्‍या अमोल पालेकर यांनी दिग्दर्शक म्हणून कायमच वेगळा ठसा उमटवला आहे. ‘बनगरवाडी’सारखी चार पिढ्यांवर गारुड करणारी कादंबरी पडद्यावरही तेवढीच उत्कट वाटते, कारण पटकथा-संवाद लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या बरोबरीनं दिग्दर्शक पालेकर व इतर कलाकारांचा त्यातला सहभागही मोलाचा ठरला.

‘‘दशम्यांची पिशवी पाठीला मारून मी बनगरवाडीला निघालो होतो. अद्याप सर्वत्र काळोख भरून राहिला होता...’’

व्यंकटेश माडगूळकर लिखित ‘बनगरवाडी’ या कादंबरीची ही सुरुवात. माडगूळकरांची ही पहिली कादंबरी १९५५ साली सर्वप्रथम प्रकाशित झाली. अलीकडे दोनच वर्षांपूर्वी तिची २७वी आवृत्ती बाजारात आली.

वर उल्लेख केलेल्या वाक्यांनी कादंबरीची सुरुवात केली खरी, पण तिचा शेवट कसा करायचा हे माडगूळकरांना सुचत नव्हतं. अखेर प्रकाशक त्यांना म्हणाले, ‘तू लिहीत राहा. शेवट आपोआप सुचेल.’ आणि झालंही तसंच. माणदेशाला वेढणाऱ्‍या भीषण दुष्काळाचं वर्णन असलेलं शेवटचं प्रकरण त्यांनी लिहायला घेतलं आणि शेवटची वाक्यं लिहून ते थांबले, ‘समोर दूरपर्यंत पसरलेल्या माळावर कुणीही दिसत नव्हते. उजाड बनगरवाडी मागे राहिली होती आणि मी परत चाललो होतो...’

या पहिल्या आणि शेवटच्या वाक्यांमध्ये येणारी गोष्ट म्हणजे ‘बनगरवाडी’. मराठी ‘अक्षर’साहित्यात अढळ स्थान प्राप्त केलेली कादंबरी. व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (१९२७-२००१) या सिद्धहस्त लेखकाच्या कारकिर्दीतलं एक सोनेरी पान. ‘माणदेश’ म्हणून ओळखल्या गेलेल्या परिसरात माडगूळ या गावी व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म झाला. बालपणापासून या भागातली गावं, तिथली माणसं, पशु-पक्षी यांना न्याहाळत आणि तिथली बोली ऐकत मोठा झालेल्या या माणसाच्या मनात ‘माणदेश’ असा काही रुजला की त्याच्या लेखनातून तो वेगळा करणं कठीण व्हावं. कादंबरीबरोबरच कथासंग्रह, नाटकं, पटकथा, ललित गद्य, व्यक्तिचित्रं आणि जंगल भ्रमंतीवरची पुस्तकं अशी चौफेर कामगिरी करणारे तात्या माडगूळकर एक उत्तम चित्रकार होते. आकाशवाणीत तीस वर्षे नोकरी करताना त्यांनी लेखन व चित्रकलेचा छंद तेवढ्याच निष्ठेनं जोपासला. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपद, साहित्य अकादमी पुरस्कार, जनस्थान पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना लाभले. ‘बनगरवाडी’ या कादंबरीचा इंग्रजी व डॅनिशसह अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला.  

‘बनगरवाडी’च्या कथेचा काळ साधारण १९४०च्या सुमाराचा. तत्कालीन पंतप्रतिनिधी सरकारनं नियुक्त केलेला राजाराम विठ्ठल सौंदणीकर हा तरुण पोरगा बनगरवाडीला तीन वर्षांसाठी शिक्षक म्हणून जातो. तिथल्या वास्तव्यात त्याला आलेल्या भल्या-बुऱ्‍या अनुभवांची ही गोष्ट. रूढ अर्थानं या कादंबरीला कथानक नाही. बनगरवाडी या नावाचा गाव खरोखरच अस्तित्वात होता का, त्यात वर्णन केलेले प्रसंग आणि माणसं लेखकाच्या जीवनात आली होती का, नसतील तर त्या परिसराचं, माणसांचं एवढं प्रत्ययकारी वर्णन लेखकानं कसं केलं असेल? ... असे नाना प्रश्न ही छोटेखानी कादंबरी वाचताना मनाला स्पर्शून जातात.

राजारामचं घर तालुक्याला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे उठून पाच-सहा कोसांची वाट पायी चालत दुपारी बनगरवाडी गाठायची, धनगरांच्या वस्तीवरची ही शाळा एकट्यानं चालवायची, सुट्टीच्या आदल्या दिवशी शाळा संपताच पुन्हा वाट तुडवत गावी परत जायचं, असा परिपाठ. तो रुजू व्हायला जातो तेव्हा शाळा बंद पडलेली असते. कारण गावातल्या कोणाला शिक्षणात रसच नसतो. अपवाद ऐंशी वर्षांच्या ‘कारभाऱ्‍या’चा. त्यांच्या पाठिंब्याच्या बळावर राजाराम ग्रामस्थांचं मन वळवून शाळा पुन्हा भरवायला लागतो. मुलांची संख्या वाढेल यासाठी प्रयत्न करतो, ग्रामस्थांच्या अडीअडचणी जमेल तशा सोडवतो, गावकऱ्‍यांच्या सहकार्यानं मुलांसाठी व्यायामशाळा बांधून घेतो. गाव सुधारत असतानाच दुर्दैवानं भीषण दुष्काळाचं संकट कोसळतं. कोंबड्या, मेंढ्या, बैल मरायला लागतात. माणसांना अन्न-पाणी मिळत नाही. बहुतेक माणसं जगण्यासाठी कुटुंब-कबिल्यासह जिकडं तिकडं पांगतात. वाडी उजाड होते. निराश झालेला राजाराम बदली करून घेऊन जड अंतःकरणानं वाडीचा निरोप घेतो.

उण्यापुऱ्‍या शंभर पृष्ठांची ही कादंबरी आशयाच्या अंगानं मोठी असल्याची जाणीव वाचकांना होते, याचं श्रेय माडगूळकरांच्या लेखणीबरोबरच त्यांच्या निरीक्षणांना आणि कल्पनाशक्तीला द्यावं लागेल. धनगरबहुल अशा बनगरवाडीचं चित्र रंगवताना या धनगरांची जीवनशैली, त्यांची बोलीभाषा, त्यांच्यातला जिव्हाळा आणि हेवेदावे, मेंढरांची आणि मेंढपाळांची दिनचर्या, लांडग्यांचं भय, शेतकऱ्‍यांची शेतीची लगबग, चावडीवरच्या गप्पा, आजूबाजूचा निसर्ग, मावलीची जत्रा, नवस, अंधश्रद्धा... एक ना दोन, कितीतरी गोष्टी राजारामच्या प्रथमपुरुषी निवेदनातून उलगडत जातात.

आजूबाजूला सपाट मोकळा माळ, रखरखीत जमीन, दुष्काळ पाचवीला पुजलेला, अशी ही बनगरवाडी. शिक्षणाबद्दलची अनास्था आणि उपजत अंधश्रद्धा हे त्यांच्यातले जुन्या रोगासारखे गुण. तरीदेखील त्यांच्यात काही चांगली माणसं आहेत. चांगले गुणही आहेत. वाडीत सामूहिक लग्नं लावायची पद्धत आहे. दरवर्षी एक मुहूर्त बघायचा आणि त्याच दिवशी गावातली लग्नं उरकून घ्यायची. यामुळं सर्व गाव जेवू घालण्याचा भार एकावर पडत नाही, हा विचार. सरकारनं मास्तर धाडलाय म्हणजे आपली सगळी कामं तो करेल असं मानण्याइतपत हे लोक भोळसट आहेत. पत्र लिहून देऊन ती तालुक्याच्या पोस्टात टाकणं, कुण्या बाईची चोळी तालुक्याहून शिवून आणणं, कुणा शेतकऱ्‍याला बैल मिळवून देणं ही कामंदेखील राजारामला करावी लागतात.

मेंढरं पाळणारा तो ‘मेंढका’. अशा मेंढक्यांच्या चालिरीती लेखक बारकाव्यांनिशी उलगडून सांगतो. चरायला गेलेली मेंढरं संध्याकाळी परत आल्यानंतर होणारी लगबग, दिवसभर घरी थांबलेल्या तान्ह्या मेंढरांचा ‘आई’ला शोधताना उडणारा गोंधळ हे सारं वर्णन गुंगवून सोडतं. कळपातलं आपलं मेंढरू नेमकं कोणतं हे मेंढक्याला बरोबर कळत असतं आणि लुचणारं पोर आपलं की दुसऱ्‍याचं हे मेंढीला अचूक उमगत असतं. याशिवाय निसर्गातल्या हालचाली, वाडीतल्या बेरकी माणसांच्या करामती माडगूळकर ज्या बारकाव्यांसह टिपतात त्याला तोड नाही.

अशी ही ‘बनगरवाडी’ तब्बल ४० वर्षांनी सिनेमाच्या पडद्यावर आणण्याचं महत्त्वाचं काम दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी केलं. पालेकरांमधला अभिनेता आणि दिग्दर्शक या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. ‘आक्रीत’, ‘अनकही’ आणि ‘थोडासा रूमानी हो जाए’ या तीन चित्रपटांचं दिग्दर्शन केल्यानंतर अमोल पालेकर यांनी ‘बनगरवाडी`सारख्या विषयाला या कादंबरीवरील निखळ प्रेमातूनच हात घातला असणार, याची प्रचिती १९९५ साली पडद्यावर झळकलेला ‘बनगरवाडी’ देऊन जातो. 

माडगूळकरांप्रमाणे पालेकर हेही मुळात चित्रकार. इथं दोघांची नाळ जुळली असणार. पटकथा व संवादांची जबाबदारी तात्या माडगूळकरांवरच सोपवून पालेकरांनी ही कादंबरी आपल्याला ‘आहे तशी’ पडद्यावर आणायची आहे, त्यात कोणतेही बदल करायचे नाहीत हा इरादा स्पष्ट केला असणार. हाच दृष्टिकोन संपूर्ण टीमनं ठेवल्यामुळं एक सर्वांगसुंदर कलाकृती प्रेक्षकांना अनुभवता आली.

अगदी सुरुवातीला आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन राजारामचं बनगरवाडीला जायला निघणं आणि अखेरीस वाडीहून गावी परतायला निघणं इथपर्यंत हा चित्रपट कादंबरीचं बोट धरून चालतो. प्रसंगांचा क्रम थोडाफार बदलला असेल एवढंच. रामा लिगाड्या (किशोर कदम) राणीछाप नाणी मोडीत घालून त्याचे पैसे करून आणायची कामगिरी मास्तरवर सोपवत असतो. एकदा त्याची मोठी रक्कम चोरीला जाणं अन पुढे ती अवचितपणे सापडल्यानं मास्तराचा जीव भांड्यात पडणं, दादू बालट्या (नागेश भोसले) या खुनशी माणसानं आल्या दिवसापासून मास्तरावर डूख धरणं, त्याच्याच कलागतीपायी कारभाऱ्‍याचा गैरसमज होऊन त्यानं मास्तराशी अबोला धरणं, पुढे तो गैरसमज दूर झाल्यानं कारभाऱ्‍याला पश्चात्ताप होणं, मास्तराला अकारण त्रास देणा‍ऱ्या दादूला आनंदा रामोशी (नंदू माधव) आणि हरकाम्या आयबू (सुनील रानडे) या दोघांनी अंधाऱ्‍या रात्री गाठून बेदम मारहाण करणं (आणि त्याची कबुली स्वतः आनंदानंच शेवटी मास्तरचा निरोप घेताना देणं), एकच बैल हाताशी असल्यानं शेती विनापेर जाण्याची भीती असलेल्या शेकूच्या (उपेंद्र लिमये) बायकोनं (सुषमा देशपांडे) बैलाच्या जोडीनं स्वतःच्या खांद्यावर जू घेणं, व्यायामशाळेच्या उभारणीसाठी साऱ्‍या वाडीनं अंग मोडून काम करणं नि तिच्या उद्‍घाटनासाठी प्रत्यक्ष औंधच्या पंतसरकारांनी गावाला भेट देणं, परगावातल्या विधवा बाईला पळवून आणणारा जगन्या रामोशा नि त्या बाईला दोन्ही गावांतल्या लोकांनी ‘शिक्षा’ देणं असे अनेक प्रसंग दिग्दर्शकानं व अभिनेत्यांनी जिवंत केलेयत. थकलेल्या कारभाऱ्‍याचा शांतपणे झालेला मृत्यू आणि ओसाड गावाचा निरोप घेताना मनाचे श्लोक म्हणत राजारामनं स्वतःला दिलासा देणं हे प्रसंग अस्वस्थ करून जातात.

‘बनगरवाडी’त अभिप्रेत असलेला रखरखीतपणा कॅमेऱ्यातून नेमका टिपणारे देबू देवधर, गाणी नसताना केवळ पार्श्वसंगीतातून खोलवर परिणाम साधणारे संगीतकार वनराज भाटिया हेही या चित्रपटाला आशयघन बनवून जातात. कादंबरीतली निरनिराळ्या स्वभावाची माणसं चित्रपटात हुबेहूब त्याच रूपात भेटत राहतात, हे पात्रनिवड किती अचूक असू शकते, याचं उदाहरण. वृद्ध कारभाऱ्‍याच्या रूपात बुजूर्ग अभिनेते चंद्रकांत मांडरे यांची आश्वासक हजेरी आणि मास्तरच्या रूपात प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचं नट म्हणून ‘चकित करणारं’ पदार्पण ही मोठी जमेची बाजू. वेगवेगळ्या पिढीतल्या दोन ‘चंद्रकांतां’नी हा चित्रपट अक्षरशः तोलून धरला.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, फिल्मफेअरतर्फे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे पुरस्कार तसेच राज्य चित्रपट पुरस्कार, ‘कालनिर्णय’ सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ‘बनगरवाडी’नं त्या वर्षी पटकावले.

शेवटी ‘बनगरवाडी’ पुस्तकातली चांगली की पडद्यावरची, हा प्रश्न एखाद्याला पडणं साहजिकच. पण हा प्रश्न सोडवणं कठीण व्हावा, एवढ्या या दोन्ही कलाकृती उत्कट झाल्या आहेत.

माझ्यासाठी हा मुळाकडे जाण्याचा प्रवास – चंद्रकांत कुलकर्णी
‘‘नाट्य दिग्दर्शक म्हणून नावारूपाला येणारा मी अचानक ‘बनगरवाडी’ चित्रपटात कसा झळकलो, तोही मास्तरच्या मध्यवर्ती भूमिकेत, याचं अनेकांना कुतूहल असतं. या भूमिकेत मी पडद्यावर अवतरेन असं मलादेखील वाटलं नव्हतं. १९९३-९४मध्ये कधीतरी अमोल पालेकरांनी मला भेटायला बोलावलं. माझी नाटकं त्यांनी बघितली होती. ‘तू बनगरवाडी वाचलीयस का?’ त्यांनी विचारलं. मी म्हटलं, ‘हो वाचली आहे.’ पुढं ते म्हणाले, ‘मी त्यावर चित्रपट करतोय. येऊन भेट.’ मला वाटलं, कदाचित साहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी त्यांना हवा असेन. प्रत्यक्ष भेटीत त्यांनी ‘यातली मास्तरची भूमिका तू करशील का?’ असं मला विचारलं तेव्हा मी उडालोच. ‘अहो, काहीतरीच काय?’ मी हसण्यावारी नेऊ लागलो. पण ते गंभीरपणे बोलताहेत हे ध्यानात आलं तेव्हा मी विचार करू लागलो. कादंबरीतला राजाराम अगदीच पोरसवदा आहे. मी त्या तुलनेत जरा थोराड होतो. पण त्यांनी माझी मिशी काढून आणि केस जुन्या पद्धतीनं कापायला लावून स्क्रीन टेस्ट घेतली आणि त्यात मी चक्क पास झालो. पुढला वर्ष-दीड वर्षाचा प्रवास माझ्यासाठी भारावून टाकणारा होता. पुढल्या काळात ‘वाडा चिरेबंदी’ करताना किंवा चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम करतानादेखील मला ‘बनगरवाडी’चा अनुभव मोलाचा ठरला. ‘बनगरवाडी’मधल्या जवळजवळ प्रत्येक दृश्‍यात मी दिसतो, यावरून ही भूमिका किती महत्त्वाची आहे, ते कळेल. मुळात मी खेड्यातून आलेला माणूस. या चित्रपटाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा माझं बालपण अनुभवलं. एक प्रकारे मला माझ्या मुळाकडे नेणारा हा प्रवास होता.’’

संबंधित बातम्या