कमला आणि कमला...

सुनील देशपांडे
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

पुस्तकातून पडद्यावर

विजय तेंडुलकरांचं ‘कमला’ हे नाटक चार दशकांपूर्वी आलं तेव्हा ते पत्रकारितेवर भाष्य करणारं असल्याचं अनेकांनी मानलं. आजही बऱ्‍याच जणांचा तसा समज असतो. तो पूर्णतः चुकीचा नाही, पण केवळ पत्रकारितेच्या नव्हे तर एकूणच बदलत्या समाजरचनेत स्त्री आणि पुरुष या दोघांची वेगवेगळ्या स्तरांवर होणारी कोंडी हा या नाटकाचा विषय आहे. अन्यथा गेल्या चार दशकांत पत्रकारितेचं स्वरूप आमूलाग्र बदलेलं असताना हे नाटक कालबाह्य ठरण्याचीच अधिक शक्यता होती. तसं न होता ते आजही तेवढंच कालसंगत वाटतं...

काळ १९८०च्या दशकाच्या आरंभीचा. माध्यम क्रांती, आर्थिक उदारीकरण या बाबींची चाहूलही नसलेला. अशा वातावरणात राष्ट्रीय स्तरावर दबदबा असलेल्या एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेल्या त्या बातमीनं पत्रसृष्टीबरोबरच राजकीय वर्तुळात आणि सुजाण नागरिकांमध्ये खळबळ उडते. काय असतं त्या बातमीत? एका आदिवासीबहुल भागात अजूनही स्त्रियांचा ‘गुलाम’ म्हणून कसा वापर केला जातो आणि आदिवासी स्त्रियांची कशी खरेदी-विक्री केली जाते, याचा तो जिताजागता वृत्तांत असतो. त्या इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकारानं त्या भागातून कमला नावाच्या एका गरीब आदिवासी स्त्रीला चक्क ‘विकत’ आणून दिल्लीमध्ये थेट पत्रकार परिषदेत ‘पुरावा’ म्हणून सादर केलेले असतं. समाजमन ढवळून टाकणाऱ्‍या त्या घटनेचे सर्वदूर पडसाद उमटतात- राजकीय दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप, लेख-अग्रलेख, वाचकांच्या पत्रांचा भडिमार, चर्चा-परिसंवाद अशा विविध मार्गांनी. या घटनेचा आधार घेऊन नाटक वा चित्रपट तयार होणं हा याच पडसादांचा एक भाग...

ती बातमी एप्रिल १९८१मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या घटनेवर आधारित ‘कमला’ हे विजय तेंडुलकरांचं नाटक ऑगस्ट ’८१ मध्ये रंगभूमीवर सादर झालं होतं. पुस्तकरूपात ते १९८२मध्ये प्रसिद्ध झालं. त्या पाठोपाठ या नाटकाच्या हिंदी व इंग्रजी अनुवादाचेही प्रयोग सादर झाले. एकुणात तेंडुलकरांच्या याही नाटकाची बऱ्‍या-वाईट अशा दोन्ही अर्थांनी चर्चा झाली...

चार दशकं उलटल्यानंतर आज जेव्हा या नाटकावर विचार करू लागतो, तेव्हा वरवरचे काही बदल वगळता सामाजिक परिस्थितीत फारसा बदल झाला नसल्याचं लक्षात येतं. थोड्याफार फरकानं ‘कमला’ आजही समाजात कायम असल्याचं पाहायला मिळतं.

‘कमला’सारख्या एक-दोन घटना या महाकाय देशात घडत असतीलही, त्याचा एवढा बाऊ करणं कितपत योग्य? एखादी घटना घडल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत त्यावर नाटक कसं तयार होऊ शकतं?... यासारखे नाना प्रश्न त्याही काळात उपस्थित केले गेले, आजही ते चर्चेला येऊ शकतात. तेंडुलकरांचं नाटक या सर्व वाद-चर्चांना पुरून उरत काळावर मात करत टिकून राहिलं; विचारी मनाला अस्वस्थ करत.

केवळ पत्रकारितेवर भाष्य करणं नव्हे, तर स्त्री आणि पुरुष या दोघांची सध्याच्या समाजव्यवस्थेत होणारी कुचंबणा समोर आणणं हा या नाटकाचा उद्देश आहे. नाटकात जेमतेम सहा पात्रं. त्यातही मुख्य पात्रं चार. नायक जयसिंग जाधव हा दिल्लीतील एका इंग्रजी दैनिकात असोसिएट एडिटर म्हणून काम करणारा तरुण पत्रकार आहे. दिल्लीतल्या सुखवस्तू भागातील एका बंगल्यात पत्नी सरिता व तो राहतात. महाराष्ट्रातली मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेलं हे जोडपं आता दिल्लीत बऱ्‍यापैकी स्थापित झालं आहे. जयसिंगनं स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर पत्रकारितेच्या विश्वात दबदबा निर्माण केला आहे. त्याच्या बोलण्या-चालण्यात पंजाबी लहेजा असणारं इंग्रजीमिश्रित हिंदी आणि पुरेशी बेफिकिरी दिसू लागली आहे. त्याची पत्नी सरिता सुशिक्षित असली तरी स्वतःच्या करिअरपेक्षा घराकडे लक्ष देण्यात तिला स्वारस्य आहे. एकेकाळी घोडेस्वारी आणि नेमबाजी करणाऱ्‍या व सरदार घराण्यातून आलेल्या सरितानं आता स्वतःचं अस्तित्व ‘हाऊस वाइफ’ एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवलंय. नुकतेच तिचे चुलते काकासाहेब मोहिते दिल्लीत राहायला आलेत. एके काळी स्वातंत्र्यसैनिक असलेले काकासाहेब आता एक ध्येयवादी पत्रकार असून आपल्या गावी स्वतःचं साप्ताहिक चालवतात. सरकारकडून सवलतीच्या दरानं मिळणारा कागदाचा कोटा आपल्या साप्ताहिकासाठी मंजूर करून घेण्यासाठी ते सध्या दिल्लीत ठाण मांडून बसलेत.

एकदा कुठल्याशा दौऱ्‍यावर गेलेला जयसिंग परत येतो तो एका खेडूत स्त्रीला सोबत घेऊन. आपण दौऱ्‍यावर नव्हे तर खास मोहिमेवर गेलो होतो हे सांगत तो एक गौप्यस्फोट करतो. बिहारमधल्या दुर्गम आदिवासी भागातून या स्त्रीला आपण ‘विकत’ आणल्याचं त्यानं सांगताच घरातल्या साऱ्‍यांना धक्काच बसतो. बिहारच्या काही भागात आजही बायकांची जनावरांप्रमाणे खरेदी-विक्री केली जाते. अक्षरशः एका बैलापेक्षाही कमी किमतीत बाईला विकलं जातं. माणसांचा बाजार चालतो, लिलाव होतो. हे सगळं चव्हाट्यावर आणण्यासाठी जयसिंगनं प्रत्यक्ष त्या भागात जाऊन या स्त्रीला विकत आणलेलं असतं. असा काही प्रकार घडत असल्याचा पोलिसांकडून नेहमी इन्कार केला जातो, सरकारही कानावर हात ठेवत असते, म्हणूनच आपण पत्रकार परिषदेत या स्त्रीला सादर करणार आहोत. जंगजंग पछाडल्यानंतर या गुलामांच्या बाजाराचा छडा मी लावलाय, त्या ठिकाणी पोहोचणारा मीच पहिला पत्रकार आहे... पुरावा दाखल केल्यानंतर या राजकारण्यांची बोलती बंद होईल, असाही दावा तो करतो.

यसिंगची ही कल्पना न आवडलेले काकासाहेब आणि सरिता त्याच्या या अचाट साहसाला विरोध करतात. पण जयसिंग आपल्या निर्धारावर ठाम असतो. ठरल्यानुसार तो पत्रकार परिषद घेऊन कमलास सर्वांसमोर हजर करतो. अपेक्षेप्रमाणे या गौप्यस्फोटाची बातमी सर्वत्र ठळकपणे प्रसिद्ध होते.

एकदा आपला हेतू साध्य झाला की कमलाला महिला अनाथाश्रमात नेऊन सोडायचं जयसिंगनं ठरवलेलं असतं. सरिता यालाही विरोध करते, पण तो कमलाला सोडून येतो. कमला मात्र आपण जयसिंगची पत्नी म्हणूनच या घरात आल्याच्या भ्रमात असते. या सगळ्या प्रकरणात जयसिंगशी झालेल्या वादानं सरिता कमालीची दुखावते. विशेषतः जयसिंग आणि त्याचा पत्रकार मित्र यांच्याकडून पत्रकार परिषदेचा ‘रसभरीत’ वृत्तांत ऐकून ती हतबुद्ध होते. आपण सुशिक्षित असलो तरी एका मर्यादेनंतर आपलं अस्तित्वही कमलापेक्षा वेगळं नाही... आपण गृहिणी आहोत, पण प्रत्यक्षात पती म्हणून जयसिंगची सेवा करण्यापलीकडे आपला धर्म नाही... त्याच्या खाण्यापिण्याची, कपड्यालत्त्याची वास्तपुस्त बघणं, आल्यागेल्यांचं स्वागत करणं, त्याला आवडणाऱ्‍या साड्या नेसून रात्रीच्या पार्ट्यांमध्ये सोबत करत त्याचं व्यक्तिमत्त्व खुलवणं आणि त्याला हवं तेव्हा त्याची शय्यासोबत करणं इत्यादी कर्तव्यं पार पाडणं हाच आपला धर्म हे तिला उमगतं. तिच्या उघड नाराजीनंतरही नशेतला जयसिंग रात्री शरीरसुखाची मागणी करत तिच्यावर झेपावतो तेव्हा तर तिला शिसारीच येते. समाजातल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा वेळोवेळी पवित्रा घेणारा आपला पती प्रत्यक्षात समस्त पुरुषवर्गाचं प्रतिनिधित्व करणारा ‘पशू’ आहे, दीनदुबळ्या स्त्रियांचा कैवार घेण्याचा आव आणत असला तरी स्वतःच्या पत्नीचा विचार तो एक ‘मादी’ म्हणूनच करतो या जाणिवेनं ती मोडून पडते. पण दुसऱ्‍याच क्षणी ती बंडाचा पवित्रा घेते.

तिकडे जयसिंगच्या वृत्तपत्रातही सारं काही आलबेल नसतं. या मानवी बाजाराशी अनेकांचे लागेबांधे असतात. राजकीय वरदहस्त असतात. याच राजकीय दबावातून जयसिंगला नोकरी गमवावी लागते. तो अक्षरशः कोलमडून पडतो. नशेत बुडालेला जयसिंग गलितगात्र होऊन पडतो. अखेर त्याला सावरायला सरिताच पुढं येते... ‘आदर्श गृहिणी’पदाचं तिचं आद्य कर्तव्य पार पाडायला सज्ज होते. एक दिवस असा असेल की त्या दिवशी मी गुलाम रहाणार नाहीं, असा आशावादी सूर तिच्या तोंडून व्यक्त करत नाटक संपतं.

आरंभी म्हटल्याप्रमाणे एका बाजूला पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रीची होणारी कुचंबणा आणि दुसऱ्‍या बाजूला भांडवलशाही अर्थरचनेमुळे पुरुषाची होणारी कोंडी या दोन स्तरांवर हे नाटक उलगडत जातं. जगमोहन मुंधरा या दिग्दर्शकानं या नाटकावर त्याच नावाचा चित्रपट करताना विषयाशी शक्यतो प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाची बाब ही की चित्रपटाच्या संवादलेखनाची जबाबदारी खुद्द तेंडुलकर आणि या नाटकाचा हिंदी अनुवाद करणाऱ्‍या वसंत देव या दोघांवर सोपवल्यामुळे मूळ विषय भरकटत गेला नाही. कमलाकर सारंग दिग्दर्शित ‘कमला’ नाटकात विक्रम गोखले (जयसिंग), लालन सारंग (सरिता), चारुशीला साबळे (कमला) आणि स्वतः कमलाकर सारंग (काकासाहेब) यांच्या भूमिका होत्या. त्यावर निघालेल्या चित्रपटात या भूमिका अनुक्रमे मार्क झुबेर, शबाना आझमी, दीप्ती नवल आणि ए. के. हनगल यांनी केल्या. अभिनयाच्या पातळीवर दोन्ही कलाकृती सरस होत्या. दुर्दैवानं नाटकाच्या तुलनेत चित्रपटानं म्हणावी तशी कलात्मक उंची गाठली नाही. ‘कमला’नंतर भंवरीदेवी बलात्कार प्रकरणावरचा ‘बवंडर’ आणि अमेरिकेतल्या एका सत्य घटनेवर आधारित ‘प्रोव्होक्ड’ अशी पीडित स्त्रियांवरची चित्रत्रयी मुंधरा यांनी पूर्ण केली. ‘कमला’साठी मात्र दिग्दर्शक म्हणून ते थोडे कमी पडले. अर्थात रंगभूमीच्या अंगभूत मर्यादेमुळे नाटकात दाखवता न आलेले काही प्रसंग पडद्यावर दाखवता आल्यानं चित्रपटाला वजन प्राप्त झालं. विशेषतः कमलाची ‘खरेदी’, जयसिंगची पत्रकार परिषद आणि महिलाश्रमातून झालेलं कमलाचं अपहरण ही चित्रपटातली दृश्यं परिणामकारक ठरली.

लेखक म्हणून तेंडुलकरांची ताकद याही नाटकात (आणि अर्थातच चित्रपटात) दिसून येते. कमलानं सरिताला ‘तुला केवढ्याला विकत आणलं?’ असं विचारणं, ‘आपण दोघी मिळून या घरात राहू’ असं निरागसपणे सांगणं हे मूळ वार्तापत्रात नमूद केलेले प्रसंग असले तरी लेखकानं त्यांची मांडणी प्रभावीपणे केल्यानं ते ठसतात.

एका बाजूला कमला आणि सरिता यांची, तर दुसऱ्‍या बाजूला जयसिंगची होणारी कोंडी दाखवताना तेंडुलकर घटनांबरोबरच चर्चेला महत्त्व देतात. काकासाहेब आणि जयसिंग या दोन पिढ्यांतल्या संवादातून पत्रकारितेच्या बदलत्या रूपावर ते टोकदार भाष्य करतात. कमलाला चांगल्या साडीऐवजी तिच्या मळकट, विरलेल्या साडीत पत्रकार परिषदेला घेऊन जाण्याचा जयसिंगचा आग्रह, दुसऱ्‍या एका प्रसंगात पार्टीला जाताना सरितानं महागडी साडी नेसावी ही त्याची सूचना, कमलास प्रश्न विचारताना पत्रकारांनी गाठलेली हद्द, प्रकरण अंगाशी आल्यावर मालक आणि संपादकांनी जयसिंगला थंडपणे राजीनामा द्यायला सांगणं, नोकरी गमावताच जयसिंगनं मालकाला शिव्या घालणं या प्रसंगांत तेंडुलकरांच्या लेखणीला धार चढते. त्यांच्या नाटकाची संहिता वाचणं हाही एक वेगळा अनुभव असतो. पात्रांच्या मनातले भाव कंसातल्या तपशीलाद्वारे मांडण्याची त्यांची शैली अद्‍भुत!

हिंसा, मग ती मानवी मनातली असो, वा स्त्रियांबाबत पुरुषांकडून होणारी शारीरिक आणि मानसिक हिंसा असो, तेंडुलकरांच्या लेखनाचा हा चिरंतन विषय आहे. ‘कमला’ नाटक आणि चित्रपटातूनही तो तेवढ्याच जोरकसपणे पुढं येतो.

संबंधित बातम्या